मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|
कारण चरित्र लिहायचें आहे !

दिवाकर - कारण चरित्र लिहायचें आहे !

नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.


'' चरित्र काय पुढच्या अंकांत देणार आहांत का ? - छान बाळाभाऊ म्हणजे नामांकितच लेखक ! अहो वा ! त्याचा माझा स्नेह लहानपणापासूनचा ! - लंगोटीमित्रच आम्ही ! त्यामुळें हवी तितकी माहिती मला देतां येईल ! - हां, तेवढें मात्र विचारुं नका ! लेखनांत काय त्यानें तेज दाखविलें असेल तेंच ! बाकी मनुष्य आपला - तुमच्या आमच्यांतल्या गोष्टी या - मनुष्य आपला असा तसाच ! - अहो स्वभाव काय, अन् वर्तन काय ! गोंधळ ! काय सांगायचें तुम्हांला ? सरळपणा म्हणून यत्किंचित् नाहीं ! कधीं कोणाचे पैसे घेतले, आणि ते बोवा परत केले आहेत, नांव नाहीं ! याचे घे, त्याचें घे असें करुन सातआठ हजारांला तरी त्यानें बुडविलें असेल ! शिवाय लोकांची पुस्तकें दाबली ती वेगळीच ! हा जिथें साधा व्यवहार, तिथें काय बोलायचें आणखी ! हीच तर्‍हा व्यसनाची ! अहो, परवां मरायच्या आधीं महिना दोन महिन्यांतली गोष्ट ! दिवसाढवळ्या, अगदी भर चौकांत एक टांगेवाल्याशीं मारामारी केली ! बोला आतां ! - अहो, कसचें कारण अन् काय ! यथास्थित झोकली होती झालें ! - नीट नोकरी नाहीं, धंदा नाहीं, सदा चहा आणि विडया ! रोज उठून घरांत भांडणें ! - कां नाही व्हायची ! वेळ नाहीं, अवेळ नाहीं, येईल त्याच्या नरड्यांत चहा ओतायचा ! कांही त्याला सुमार ? - आपलें बोलायचें किंवा लिहायचें नाही इतकेंच ! बाकी अशा एक एक गोष्टी आहेत कीं, - चांगलें बाबांचें लग्न करुन दिलें, पण घटकाभर पटेल तर शपथ ! कारण बाहेर यांचा रोमान्स बोकाळलेला ! शेवटीं एक दिवस नवराबायकोची अशी जुंपली कीं काहीं पुसूं नका ! - झालें ! पुढें काय ? ती उठून बापाच्या घरी चालती झाली, आणि हें काय ? - यांची उप्पर मिशी ! कारण, '' गेली, तर गेली ! नाकावर टिच्चून दुसरें लग्न करीन मी ! '' - आणि ठणठणीत केलें लग्न ! तेव्हां अशा या भानगडी, पण लिहून थोडेंच चालतें आहे ? तिथें म्हणजे, ' यांना दोन बायका होत्या ही गोष्ट खरी. पण पहिलीला मूल होईना, तेव्हां ती सारखी झुरणीस लागली ! इतकी कीं, शेवटीं तिनें अंथरुण यांनीं दुसरें लग्न करावें ! शेवटीं अगदीं निरुपायानें - कारण लग्न केलें ! ' - म्हणजे अशा तर्‍हेनें सगळें फिरवून - कारण चरित्र लिहायचें आहे, तेव्हां तें - ''

३ मार्च १९१३


References : N/A
Last Updated : September 18, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP