''.... पेट्रोल वगैरे आहे ना रे भरपूर ? - ठीक आहे ! तबेल्यांतून आणलीस कीं निघालोंच आम्ही ! - छे हो ! नाहीं जमलें बोवा आज सकाळी फिरायला जायचं ! सगळा वेळ त्या बक्षीस समारंभांत मोडला ! आठ वाजल्यापासूज जें सुरु झालं, तें दहा साडेदहापर्यत चाललं होतं आपलं ! अस्सा कंटाळा आला होता कीं, ज्याचं नांव तें ! - नकोसं झालं होतं अगदीं ! बरं, मधेंच उठून येईन म्हटलं, तर तिकडूनही पंचाईत ! कारण समारंभाची मुख्य देवता .... अध्यक्षच पडलों आम्ही, तेव्हां थोडंच कुठं हालतां येतं आहे ? - हें म्हणा रे, तें म्हणा रे, स .... गळं कांहीं होईपर्यंत मग - शीः ! कसली व्यवस्था अन् काय ! .... चाललं होतं आपलं कसं तरी ! - अहो, मुळीं हेडमास्तरनाच कुणी विचारीना, तिथं कोण जुमानतो अध्यक्षाला अन् फध्यक्षाला ! मारे जोरजोरानं ओरडून बिचारा सांगत होता कीं, ' हें पहा ! हे जे आपले आजचे सन्माननीय पाहुणे आहेत कीं नाहीं, ते या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत ! फार त्यांना शाळेचा अभिमान आहे ! ' - झा.... लं ! असं म्हणतांच, जो कांहीं टाळ्यांचा, अन् बाकांवर हातपाय आपटण्याचा धडाका सुरु झाला, तो कांहीं .... राम ! राम ! .... पुसूं नका ! म्हटलं आतां शाळा पडते कीं काय होतंय तरी काय ! पुढं हीच रड आमच्याही भाषणाच्या वेळीं ! - अहो, कारटीं आवरतां आवरेनात ! हा उठतो आहे, तो ओरडतो आहे, गोंधळ इथून तिथून ! अन् जरा कांही झालं कीं नाही, कीं टाळ्या अन् दणदणा हातपाय आपटायचे ! - काय हें ! छे बोवा ! आपल्या वेळेला होतं कांहीं असं ? - हेः ! तर्हाच कांही वेगळी आजची ! काय पोरं, अन् काय मास्तर ! वा रे वा !! - जाऊं द्या झालं ! सगळीच जिथं घाण .... रॉटन झालं आहे, तिथं काय आपण तरी - चला ! आली मोटार वाटतं दाराशीं - पण हे.... चिरंजीव कुणीकडे निघाले आहेत आमचे ? फिरायला न्यायचं म्हणतों मी त्याला ! - अप्पू, ए अप्पा ! कोणीकडे निघाला आहेस ? ग्राउंडांत - काय असतं रे रोज उठून तिथें ? चल आज बरोबर फिरायला ! - पुरे रे बोवा ! असेल बोलावलं मास्तरांनीं ! - आहे ठाऊक किती ऐकतां तुम्ही तें ! - हँततेच्या ! येवढंच ना ? म ... ग रे काय ! चल ये बैस लवकर ! - भिकार स्काउटिंग तें काय ! अन् त्यांत रे काय ऐकायचं येवढं त्यांचं ! .... ''
२६ डिसेंबर १९२९