मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|
एका नटाची आत्महत्या

दिवाकर - एका नटाची आत्महत्या

नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.


'' .... ओढ ! जगा, असेल नसेल तितकी शक्ति खर्च करुन ओढ ! - हं चालूं दे ! दांतओंठ खाऊन अगदी जोरानें - अस्सें ! चालूं दे ! - आलों, आलों ! थांबा, भिऊं नका ! - अरे वेडया जगा, कां उगीच धडपडत आहेस ? हं ! नको आपल्या जिवाला त्रास करुन घेऊंस ! माझें ऐक. सोड मला. एकदां दोनदा तूं मला परत फिरविलेंस - काय सांगितलेंस ? काय माझें समाधान केलेंस रे तूं ? निव्वळ आरडाओरडा ! ' वाहवा, वाहवा ! भले शाबास ! खूप बहार केलीस ! ' - बेशरम ! हंसतोस काय ? - अरेरे ! तुझ्या नादीं लागून आजपर्यत या तोंडाला रंग फासला काय - नाचलों काय - रडलों - हंसलों ! - हाय ! जिवाची चेष्टा - या जिवाची विटंबना केली ! नको ! नको !! मला ओढूं नकोस !!! - काय वार्‍याचा सोसाटा हा ! जिकडे तिकडे धूळ आणि पाचोळाच - पाचोळा उडाला आहे ! - अबब ! केवढा प्रचंड सर्प हा ! घाल, खुशाल माझ्या अंगाला विळखा घाल ! अरे जारे ! कितीही जोरानें तूं मागें ओढलेंस, तरी मी थोडाच आतां मागें फिरणार आहे ! खुपस, मस्तकांतून अगदीं पायापर्यत तूं आपला - अस्सा हा ! चालूं दे ! - दंत खुपस ! नाहीं ! मी परत फिरणार नाही जा ! - ओरडा ! मोठमोठ्यानें आरोळ्या मारा ! टाळ्या वाजवा ! नाटकी - ढोंगीपणानें सगळें जग भरलें आहे ! अरे जगायचें तर चांगलें जगा ! नाही तर - चला दूर व्हा ! अरे नका ! माझ्या तोंडाला चुना - काजळ - फांसूं नका ! कोण ? कोण तुम्ही ? मला फाडायचें आहे ? तें कां ? मी कशानें मेलों तें पाह्यचें आहे ? सलफ्यूरिक ऍसिड ! - अहाहा ! काय गार - गार - वारा सुटला आहे हा ! जिकडे तिकडे बर्फच - बर्फ ! अनंतकाल झोंप - चिरकाल झोंप ! - हः हः ! वेडया जगा ! माझीं आंतडी आपल्या कमरेभोंवती गुंडाळून मला मागें खेचण्यासाठीं कां इतका धडपडत आहेस ? अरेरे ! बिचारा रडकुंडीस आला आहे ! काय काय ? माझें आतां गूढ उकलणार ? अहाहा ! - उलथलें ! जग उलथून पडलें ! ओहो ! .... ''

७ नोव्हेंबर १९१२


References : N/A
Last Updated : September 17, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP