मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|
कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही.

दिवाकर - कोण मेलें म्हणजे रडूं येत नाही.

नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.


''..... कोण हो कोण ? - काय ! अवचितराव करकर्‍यांची सून ? आणि ती एकाएकी कशानें हो मेली ? - वाख्यानें का ? बरें झालें हो ! सुटली एकदांची आपल्या दुःखांतून ! बिचारीचा नवरा वारल्याला दोन वर्षे व्हायला आलीं असतील नाहीं ? - बाई ! बाई !! केवढा आकांत माजला होत्या त्या वेळेला या घरांत ! घरांतल्या बायकांच्या ओरडण्यानें सगळी आळी किं हो गर्जून गेली होती ! आणि आतां ? या सोळा - सतरा वर्षाच्या मुलीकरतां - आनंदीच नाहीं का हिचें नांव ? - बिचारीकरतां या घरांतलें एक चिटपांखरुं तरी आता ओरडत आहे का ? - बरोबरच आहे ! नवरा मेलेली पोर ! हिच्या मरणाबद्दल हो कोणाला वाईट वाटणार आहे ! उलट जें तें हेंच म्हणणार कीं, ' विधवा मेली ना ? बरें झालें चला ! सुटली एकदांची ! ' इतकेंच काय, पण कितीएक तर असेंसुद्धां म्हणायला कमी करीत नाहींत कीं, ' बरें झालें ! आमच्या घरांतला अपशकुन - बरेच दिवस खिळलेली अवदशा लवकरच नाहींशी झाली ' म्हणून ! नवरा मेलेल्या बायका गेल्या, तर त्यांच्याबद्दल हें अशा तर्‍हेचें दुःख जगाला होत असतें ! - सवाष्ण मेली तर ? अहो कशाचें आलें आहे ! तिची लहान मुलेंबाळें जी काय रडतील, गागतील तेवढींच ! बाकी जग तर हेंच म्हणतें, ' सवाष्ण मेली ? भाग्यवान् आहे ! बरोबर कायमचें - अखंड ! - सौभाग्य घेऊन स्वर्गाला गेली !! ' - हं: , पाहिलें तर तें ' अखंड सौभाग्य ! ' नदींत तिच्या प्रेताची पुरती राख विरघळेपर्यतसुद्धा टिकत नाहीं ! लागलीच दुसरी कोणी तरी पाठीमागून धांवत येऊन, झिंज्या धरुन, पाठींत लाथ मारुन, तें ' अखंड सौभाग्य ! ' बिचारीच्या हातांतून हिसकावून घेऊन, पुनः जगांत परत येतेही ! - खरेंच तर काय ! बायकाचें जगणे आणि मरणें, सारखेंच ! - जगल्यास जगा ! मेल्यास मरा ! अहो नाहीं तर, या आनंदीच्या नवर्‍यासाठी, तिच्या सासूसार्‍यांनी कसा पाण्यासारखा पैसा खर्च केला होता ना ? आणि आतां ? नाहीं, तुम्हींच समक्ष पाहिलें आहे म्हणून विचारतें ? अहो ! आनंदीचा नवरा जगावा म्हणून जशी यांनी खटपट केली, तशीच ही एकदांची मरावी म्हणून यंनी निष्काळजीपणाची खटपट केली असेल बरें ! - ती पहा ! ती पहा ! तिला बाहेर आणली आहे ! आई ! आई !! कशी कोंवळी पोर ! कायरे देवा हिला जगांत आणून हिची हौस पुरवलीस ? - तिला पाणी घेतलेली तिची प्रत्यक्ष आईच ना हो ती ? - जावयाकरितां कशी ऊर बडवून किं हो रडत होती ? आणी आतां ? - अहो हिच्या पोटचा गोळा ना तो ? - पण नाहीं, ही मेली म्हणून तिला - प्रत्यक्ष आईलासुद्धां - मनांतून बरें वाटत असेल ! .... ''

२० फेब्रुवारी १९१२


References : N/A
Last Updated : September 17, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP