ऋतु आणि त्यांचे काल
ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे.
वसंतो ग्रीष्मसंज्ञश्च ततो वर्षा ततः शरत् ।
हेमंतः शिशिरश्र्चैव षडेते ऋतवः स्मृताः ॥३४॥
मीनमेषगते सूर्ये वसंतः परिकीर्तितः ।
वृषभे मिथुने ग्रीष्मो वर्षाः सिंहेऽथ कर्कटे ॥३५॥
शरत्कन्यातूलयोश्र्च हेमंतो वृश्चिके धने ।
शिशिरो मकरे कुंभे षडेवमृतवः स्मृताः ॥३६॥
चैत्रादि द्विद्विमासाभ्यां वसंताद्यृतवश्च षट् ।
ऋतूंचा सबंध सूर्याच्या गतीशीं आहे. जसजसा सूर्य क्रांतिवृत्तांतून फिरतो तसतसे ऋतु बदलतात. हे ऋतु सहा आहेत. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरत्, हेमंत आणि शिशिर. सूर्य कोणत्या राशीस आला म्हणजे कोणता ऋतु असतो हें खालीं लिहिल्यावरुन ध्यानीं येईल. चैत्रादि बारा महिन्यांत, क्रमानें दोन दोन महिन्यांचा एकेक ऋतु होतो. म्हणजे चैत्र - वैशाख वसंतऋतु, ज्येष्ठ - आषाढ ग्रीष्मऋतु इ० सहा ऋतु बारा महिन्यांत पूर्ण होतात.
राशि ऋतु.
मीन व मेष = वसंतऋतु
वृषभ व मिथुन = ग्रीष्मऋतु
कर्क व सिंह = वर्षाऋतु
कन्या व तूळ = शरऋतु
वृश्र्चिक व धनु = हेमंतऋतु
मकर व कुंभ = शिशिरऋतु
ह्याप्रमाणें सूर्यानें दोन संक्रांति किंवा राशि भोगिल्या म्हणजे चैत्रादिकरुन बारा महिन्यांत सहा ऋतु पूर्ण होतात. राशी किंवा संक्रांति म्हणजे काय हें येथें सांगितलें पाहिजे. ज्या * मार्गीतून सूर्य फिरतोसा दिसतो त्या मार्गाचे म्हणजे क्रांतिवृत्ताचे बारा भाग कल्पिलेले आहेत. ते बारा भाग ह्याच बारा राशि होत. सूर्य एका वर्षात सर्व क्रांतिवृत्तावरुन म्हणजे बारा राशींवरुन जातो. या ठिकाणीं सूर्य फिरतो असें लिहिलें आहे, तें केवळ विषयाच्या समजुतीकरितां लिहिलें आहे. वास्तविक सूर्य फिरत नाहीं. पृथ्वी सूर्याभोंवतीं फिरते आणि त्यामुळें सूर्यच फिरतो आहे असें दिसतें. एका राशींतून दुसर्या राशींत जें सूर्याचें जाणें त्यास संक्रांति म्हणतात. ह्या बारा राशींचीं किंवा संक्रांतींचीं निरनिराळीं नांवें आहेत, तीं येणेंप्रमाणें: -
मेषो वृषोऽथ मिथुनं कर्कः सिंहोऽथ कन्यका ।
तुलाऽथ वृश्चिको धन्वी मकरः कुंभमीनकौ ॥३७॥
१ मेष २ वृषभ ३ मिथुन ४ कर्क ५ सिंह ६ कन्या ७ तूळ ८ वृश्चिक ९ धनु १० मकर ११ कुंभ आणि १२ मीन.
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2012
TOP