पक्षविचार
शुक्लकृष्णावुभौ पक्षौ दैवे पित्र्ये च कर्मणि ।
ग्राह्यौ तथा शुभं सर्वे शुक्लपक्षे प्रशस्यते ॥
आदौ शुक्लः प्रवक्तव्यः केचित्कृष्णोऽपि मासकम ॥५२॥
महिन्याच्या तिथि तीस असतात हें सर्वास ठाऊक आहेच. पंधरा तिथींचा एक भाग असे तीस तिथींचे म्हणजे महिन्याचे दोन भाग कल्पिलेले आहेत. त्यांस पक्ष किंवा पंधरवडे म्हणतात. एक शुक्ल म्हणजे चांदण्याचा पक्ष व दुसरा कृष्ण म्हणजे काळोखाचा पक्ष. प्रतिपदेपासून पूर्णिमेपर्य़ंत ज्या पंधरा तिथि तो शुक्लपक्ष, व पौर्णिमेनंतर अमावास्येपर्य़ंत ज्या पंधरा तिथि तो कृष्णपक्ष. शुक्लपक्षांतील प्रत्येक तिथीस रात्रीच्या आरंभापासून तिथीच्या दुप्पटीइतक्या घटिकांपर्यंत चांदणें असतें. उदाहरणार्थ, प्रतिपदेस दोन घटिका चांदणें असतें, द्वितीयेस चार घटिका, अष्टमीस सोळा घटिका, आणि पौर्णिमेस तीस घटिका म्हणजे सर्व रात्र चांदणें असतें. या वेळेस चंद्राच्या कला पूर्ण होतात. नंतर कृष्णपक्षास आरंभ झाला म्हणजे प्रत्येक तिथीस चंद्राचें चांदणें दोन दोन घटिका कमी होत जातें. म्हणजे रोज रात्रीच्या प्रारंभापासून तिथीच्या दुप्पटीइतक्या घटिका उशीरां चंद्र उगवतो. उदाहरणार्थ, प्रतिपदेस दोन घटिका रात्रीं, चतुर्थीस आठ घटिका रात्रीं, अष्टमीस सोळा घटिका रात्रीं चंद्रोदय होऊन चांदणें पडतें व अमावास्येस सर्व रात्र काळोख असतो. यावरुन हें स्पष्ट झालें कीं, शुक्लपक्षांत तिथींच्या दुप्पटीइतक्या घटिकांनीं रात्रीं चंद्र मावळतो, आणि कृष्णपक्षांत पौर्णिमेपासून पुढील तिथींच्या दुप्पटीइतक्या घटिकांनीं तो रात्रीं उगवतो. उदाहरणार्थ, शुक्ल अष्टमीस सोळा घटिका रात्रीं चंद्र मावळतो, आणि कृष्ण अष्टमीस सोळा घटिका रात्रीं तो उगवतो. याचें कारण असें आहे कीं, प्रत्येक तिथीस सूर्यापासून बारा अंश पुढें चंद्र जातो म्हणजे आजच्या तिथीस ज्या वेळीं तो उगवेल त्या वेळेच्या बारा अंश मागाहून उद्यां उगवेल हें स्पष्ट आहे. पृथ्वीला तीनशेंसाठ अंश फिरण्यास ६० घटिका लागतात; या हिशेबानें १२ अंशांना म्हणजे एका तिथीला २ घटिका लागतील. शुक्लपक्षांत चंद्राच्या कलांची वृद्धि होत असून रोज दोन दोन घटिका चांदणें अधिक पडतें व कृष्णपक्षांत क्षय होत असून रोज रात्रीच्या आरंभींच्या दोन दोन घटिका चांदणें कमी होत जातें.
नर्मदेच्या उत्तरेकडील प्रदेशांत पौर्णिमांत मास धरितात; म्हणजे आपण जसा आपला महिना अमावास्येत संपतो असें समजतों, त्याप्रमाणें त्यांचा महिना पौर्णिमेस संपतो असें ते समजतात. यावरुन कित्येकांची अशी समजूत झालेली असते कीं, आपला जो शुक्लपक्ष तो त्या लोकांचा कृष्णपक्ष असतो. या म्हणण्याचा अर्थ असा होतो कीं, आमच्या येथें ज्या रात्रीं चांदणें असतें, त्या रात्रीं त्यांच्या प्रदेशांत काळोख; पण असें होणें अशक्य आहे. कारण ज्या रात्रीं एके ठिकाणीं चांदणें असेल त्या रात्रीं कोठेंही गेलें तरी चांदणेंच आढळेल. तेव्हां आमच्या शुक्लपक्ष तो त्यांचा कृष्णपक्ष किंवा त्यांचा कृष्णपक्ष तो आपला शुक्लपक्ष कसा होईल ? तसेंच, स्फटिकासारखें शुभ्र असें आल्हादजनक पौर्णिमेचें चांदणें पाहून कित्येक असें म्हणतांना आढळतात कीं, परमेश्वरानें प्रतिरात्रीं अशा चांदण्याची योजना कां केली नाहीं ? परंतु, जसा प्रतिदिनीं सूर्याचा पूर्ण प्रकाश असतो त्याप्रमाणें, प्रतिरात्रीं जर चंद्राचें पूर्ण चांदणें असतें तर, आजज्या असंख्य तार्यांचा शोध लागला आहे, तो लागला असता काय ? चंद्रप्रकाश असतांना बहुतेक तारे दिसत नाहींत हें जसें आपण पाहतों, तसेंच अमावास्येच्या रात्रीं अगणित तारे आपणांस दृष्टिगोचर होतात हेंही आपण पाहतों. याशिवाय ही अशी व्यवस्था करण्यांत परमेश्वराचे दुसरे अनेक महत्वाचे हेतु असतील. तात्पर्य, ईश्वरकृति परिपूर्ण व निर्दोष आहे, तींत सुधारणेला लेशही अवकाश नाहीं.
शुक्लकृष्णपक्षांचें स्वरुप.
आपूर्यमाणो मुख्यः स्यात्सर्वस्मिन् शुभकर्मणि ।
कृष्णो गौणो दशांतः स्यान्नागांतो व्रतबंधने ॥५३॥
ज्या पंध्रवडयांत चंद्राच्या कला क्रमशः पूर्णत्वास पावून रात्रिसमय मनोल्हादक होतो असा शुक्लपक्ष सर्व मंगलकृत्यें करण्यास विशेष प्रशस्त मानिला आहे. मौंजीबंधनाकरितां कृष्णपक्ष तर निषिद्धच आहे. तथापि कृष्ण पंचमीपर्यंत गौणपक्ष समजून उपनयन करावें. कृष्ण षष्ठीपासून उपनयनकृत्य अवश्य वर्ज्य करावें. उपनयनाशिवाय इतर शुभकृत्यें मात्र कृष्ण दशमीपर्यंत करावीं. पुढें एकादशीपासून अमावास्येपर्यंत पांच तिथि सर्वथा त्याज्य होत. कारण, असें सांगितलें आहे कीं,
कृष्णे एकाद्शीषटं निंद्यं निंद्यतरं तु यत् ।
द्वादश्यादि चतुष्कं तत् भूतान्निंद्यतमं द्वयम् ॥५४॥
कृष्णपक्षांतील एकादशीपासून शुक्ल प्रतिपदेपर्यंत सहा तिथि शुभकार्यास निंद्य होत. त्यांतही द्वादशीपासून अमावास्येपर्यंत चार तिथि विशेष निंद्य होत. त्याहीपेक्षां चतुर्दशी व अमावास्या ह्या दोन तिथि तर अत्यंतच निंद्य आहेत असें जाणावें.
तेरा दिवसांचा पंधरवडा ( विश्वघस्त्रपक्ष.)
त्रयोदशदिने पक्षे विवाहादि न कारयेत् ।
गृहारंभादि कर्माणि वर्जयेत् व्रतबंधनम् ॥५५॥
एक पक्ष, म्हणजे पंधरवडा; हा सामान्यतः पंधरा दिवसांचा असतो असें जरी आहे, तरी तिथींच्या क्षयवृद्धीमुळें कधीं कधीं चौदा किंवा सोळा दिवसांचाही पंधरवडा होतो. क्वचित् प्रसंगीं तेरा दिवसांचाही होतो, त्याला विश्वघस्त्रपक्ष म्हणतात. ज्या पक्षाच्या पंधरा तिथिच्या काळांत तेरा सूर्योदय होतात; आणि त्या पक्षाची पहिली ( प्रतिपदा ) तिथि व शेवटची ( पौर्णिमा किंवा अमावास्या ) तिथि यांचा क्षय झालेला नसतो, तो क्षयपक्ष धार्मिक कार्याला वर्ज्य समजावा. अशा वेळीं द्वितीया किंवा तृतीया, आणि त्रयोदशी किंवा चतुर्दशी बहुधा क्षयतिथि होत असतात. असा क्षयपक्ष जगांत उद्भवणार्या संकटांचा सूचक असतो. अशा तेरा दिवसांच्या पंधरवड्यांत विवाह, वास्तुशांति, गृहारंभ, उपनयन किंवा कोणतेंही मंगलकृत्य करुं नये. कृष्णपक्षांत विश्वघस्त्रपक्ष संभवेल तर फारच अशुभ होय. शुक्लपक्षांत असलेला त्याहून किंचित् कमी भयसूचक असतो इतकेंच.