हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
वार

वार

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


आदित्यश्र्चंद्रमा भौमो बुधश्र्चाथ बृहस्पतिः ।

शुक्रः शनैश्र्चरश्र्चैव वासराः परिकीर्तिताः ॥६८॥

गुरुश्र्चंद्रो बुधः शुक्रः शुभा वाराः शुभे स्मृताः ।

क्रूरास्तु क्रूरकृत्येषु ग्राह्या भौमार्कसूर्यजाः ॥६९॥

वारदोषाश्र्च ये प्रोक्ता रात्रौ न प्रभवंति ते ।

शनिभौमार्कवारेषु विशेषादिति केचन ॥७०॥

‘ उदयादुदयं वारः ’ म्हणजे एका सूर्योदयापासून दुसर्‍या सूर्योदयापर्यंत मध्यें जाणारा तो काळ त्यास वार अशी संज्ञा आहे . हे वार सात आहेत . त्यांचीं नांवें येणेंप्रमाणें : - १ आदित्यवार , रविवार किंवा भानुवार , २ सोमवार , इंदुवार किंवा चंद्रवार , ३ मंगळवार किंवा भौमवार , ४ बुधवार , किंवा सौम्यवार , ५ बृहस्पतिवार किंवा गुरुवार , ६ शुक्रवार किंवा भृगुवार ७ शनिवार किंवा मंदवार . पृथ्वीवर सर्व देशांत सातच वार असून ते याच अर्थाचे आहेत . एके ठिकाणीं जो वार असेल , तोच पृथ्वीवर कोठेंही गेलें तरी असेल . वाराला वासर असेंही म्हणतात . वर लिहिलेल्या सात वारांपैकीं सोमवार , बुधवार , गुरुवार आणि शुक्रवार हे चार वार सर्व कार्यास साधारपणें शुभ मानिलेले आहेत . मंगळ आणि शनि हे क्रुर वार आहेत , म्हणून त्या वारांवर क्रुर कृत्यें मात्र करावीं . उदाहरणार्थ - शिकार करणें , शस्त्रप्रयोग , भेद , युद्ध इत्यादि . दुष्ट वाराचा दोष रात्रीं नसतो . शनि , भौम आणि रवि हे जरी क्रुर वार आहेत तरीही त्यांचा रात्रीं दोष नाहीं , असें कित्येक ग्रंथकार म्हणतात .

वारांच्या नांवांची उत्पत्ति .

शनिर्जीवः कुजश्र्चैव रविः शुक्रबुधेन्दवः ।

एवं क्रमेण विज्ञेयाः कालहोरेश्र्वरा ग्रहाः ॥७१॥

दिवसाच्या प्रथम होर्‍याचें जें नांव तेंच त्या वाराचें नांव असतें . याचा स्पष्टार्थ असा आहे कीं , वारांवर ग्रहांचें अधिपतिस्व आहे . अहोरात्राचे २४ विभाग कल्पून प्रत्येक विभागास होरा अशी संज्ञा दिलेली आहे . येथें समजुतीकरितां आपण होर्‍याला पाहिजे तर तास किंवा कलाक म्हणूं . सात ग्रह हे त्या चोवीस तासांचे किंवा होर्‍यांचे अधिपति मानिलेले आहेत . त्यांचा क्रमा वरील श्लोकांत दिल्याप्रमाणें प्रथम शनि , नंतर त्याच्या खालीं अनुक्रमानें गुरु , मंगळ , रवि , शुक्र , बुध आणि चंद्र असा आहे . याच सात ग्रहांचे पुनः पुनः फेरे होतात . म्हणजे ग्रह ७ आणि अहोरात्राचे होरे २४ म्हणून अहोरात्रांत २४ / ७ = ३ याप्रमाणें सात ग्रहांच्या पुनः पुनः तीन आवृत्या होऊन चवथ्या आवृत्तीचे तीन तास शेष राहिले . त्या तीन तासांच्या चवथ्या आवृत्तीचे तीन ग्रह दिले . अर्थात् चवथ्या फेर्‍याचा चवथा ग्रह , जो उगवत्या दिवसाच्या पहिल्या होर्‍याचा किंवा तासाचा अधिपति असतो , तोच वार होय . उदाहरणार्थ , शनीपासून होर्‍याचा आरंभ मोजावा म्हणजे त्यापासून चवथा रवि येतो , म्हणून शनीच्या पुढील रविवार होय . त्याचप्रमाणें रवीच्या पुढें चवथा चंद्र , चंद्रापासून चवथा मंगळ इत्यादि . वारांची उत्पत्ति होऊन सुमारें पांच हजार वर्षें झालीं असावीं असें विद्वान् , ज्योतिष्यांचें म्हणणें आहे . ऋग्वेदासारख्या प्राचीनतम ग्रंथांत ह्याच क्रमानें वारांचीं नांवें आढळलीं तर वाराची उत्पत्ति याहूनही प्राचीन ठरेल .

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP