कपिलाषष्ठी .
भाद्रे मास्यसिते पक्षे भानौ चैव करे स्थिते ।
पाते कुजे च रोहिण्यां सा षष्ठी कपिला भवेत् ॥१४७॥
अस्यां हुतं च दत्तं च सर्वं कोटिगुणं भवेत् ।
अयं योगो दिवा ग्राह्यो न तु रात्रौ कदा बुधैः ॥१४८॥
भाद्रपद महिन्यांत कृष्णपक्षांत षष्ठी मंगळवारीं असून त्या दिवशीं रोहणीनक्षत्र , व्यतीपात व सूर्यनक्षत्र हस्त , इतके योग असतील तर कपिलाषष्ठी होते . असा योग साठ वर्षात एकदां आला तर येतो . ह्या पर्वणीमध्यें दान , होम , श्राद्ध वगैरे केलें असतां कोटिगुण फळ मिळतें . हे सूर्यपर्व असल्यामुळें दिवसासच हे योग असले पाहिजेत . म्हणजे रात्रीं असल्यास निष्फळ समजावे .
गजच्छायायोग .
अमावास्यां नभस्ये तु सूर्यचंद्रौ करस्थितौ ।
सा विज्ञेया गजच्छाया श्राद्धेऽक्षय्यफलप्रदा ॥१४९॥
भाद्रपद कृष्णपक्षांस अमावास्येचे दिवशीं हस्तनक्षत्र असून सूर्यनक्षत्रही हस्तच असेल तर त्या पर्वणीला गजच्छाया म्हणतात . त्या दिवशीं श्राद्धादि कृत्यें केलीं असतां अनंत फलांची प्राप्ति होते , असें मानिलेलें आहे .
अर्धोदय - महोदययोग .
पौषे मासि रवौ दर्शे व्यतीपाते श्रवान्विते ।
अर्धोदयाभिधो योगः सूर्यपर्वशताधिकः ।
अयं शस्तो दिवा योगः किंचिदूनो महोदयः ॥१५०॥
पौषमासांत रविवारीं अमावास्या असून त्या दिवशीं व्यतीपात आणि श्रवण नक्षत्र असे योग असतील तर त्या पर्वणीला अर्धोदय म्हणतात . ही पर्वणी सूर्यग्रहणापेक्षां शतपटीनें फला देणारी आहे . हा योग दिवसास असेल तरच प्रशस्त मानिलेला आहे . या योगांत एकादा योग न्यून असतां त्याला महोदय म्हणतात . माघमासांतही हे योग असतां अर्धोदययोग होतो , असें कित्येकांचें मत आहे .