हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
पंचांग पाहण्याची रीति

पंचांग पाहण्याची रीति

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


पंचांग पाहण्याची रीति

तिथिर्वारश्च नक्षत्रं योगः करणमेव च ।

एतैः पंचभिरंगैः संयुतं पंचांगमुच्यते ॥१७५॥

तिथि , वार , नक्षत्र , योग आणि करण हीं कालाचीं पांच मुख्य अंगें ज्यांत दाखविलेलीं असतात , त्यास पंचांग असें म्हणतात . ह्या पांच अंगांखेरीज ज्यांचा ज्योतिषाशीं मुळींच संबंध नाहीं अशा पुष्कळ उपयुक्त गोष्टी पंचांगांत दाखविण्याचा अलीकडे प्रचार पडला आहे . पंचांग बहुतकरुन सर्वांस पाहतां येतें , परंतु ज्यांस तें पाहण्याची पद्धति ठाऊक नसेल त्यांच्याकरितां पुढील माहिती दिली आहे .

मुंबई किंवा पुणें येथील पंचांग घ्या , आणि कोणताही महिना काढा . पंचांगांत शिरोभागीं पहिल्या आडव्या ओळीस डाव्या हाताकडे शक , महिना व पक्ष हीं लिहिलेलीं असतात ; व उजव्या हाताकडे अयन व ऋतु हीं लिहिलेलीं असतात . पंचांगांत उभीं कोष्टकें पुष्कळ आहेत . त्यांपैकीं पहिल्या उभ्या कोष्टकांत एक , दोन , तीन असे जे अनुक्रमानें अंक एकाखालीं एक दिलेले असतात त्या तिथि होत . दुसर्‍या कोष्ठकांत वार लिहिलेले असतात . वाराचें पूर्ण नांव न लिहितां फक्त पहिलें अक्षर लिहितात . तिसर्‍या व चवथ्या कोष्टकांत अनुक्रमें तिथींच्या घटिका व प्रळें हीं दाखविलेलीं असतात . पांचव्या कोष्टकांत दिवसाचें नक्षत्र लिहिलेलें असतें . वारांप्रमाणें नक्षत्राचें देखील फक्त पहिलेंच अक्षर लिहिण्याचा प्रचार आहे . सत्तावीस नक्षत्रांपैकीं ज्यांचीं आद्याक्षरें सारखींच आहेत , अशीं कांहीं नक्षत्रें आहेत . उदाहरणार्थ , ‘ अ ’ म्हणजे अश्विनी किंवा अनुराधा होईल . ‘ आ ’ म्ह ० आर्द्रा किंवा आश्लेषा होईल . ‘ पु ’ म्ह ० पुवर्वसु किंवा पुष्य होईल , ‘ पू ’ म्ह ० पूर्वा , पूर्वाषाढा किंवा पूर्वाभाद्रपदा होईल आणि ‘ उ ’ म्हणजे उत्तरा , उत्तराषाढा किंवा उत्तराभाद्रपदा होईल . अशा ठिकाणीं चुकी होण्याचा संभव असतो , म्हणून नक्षत्र पाहतेवेळीं मागचें व पुढचें नक्षत्र पाहून नंतर दिवसनक्षत्र ठरवावें . पंचांगकारांनीं या ठिकाणीं थोडीशी सुधारणा केली तर बरें होईल . संशयाचीं स्थलें असतील तेथें नक्षत्राचें एकच अक्षर न लिहितां दोन दोन अक्षरें लिहावीं . जसें अनुराधांबद्दल अनु ., उत्तराषाढांबद्दल उ . षा ., इत्यादि . सहाव्या व सातव्या कोष्टकांत अनुक्रमें नक्षत्रांच्या घटिका व पळें लिहितात . आठव्या कोष्टकांत योग दाखविलेला असतो . नवव्या व दहाव्या कोष्टकांत योगाच्या अनुक्रमें घटिका व पळें हीं दाखविलेलीं असतात . अकराव्या कोष्टकांत करण व बाराव्या कोष्टकांत करणाच्या घटिका असतात . करणाचीं पळें दाखविण्याचा प्रचार कांहीं पंचांगांत नाहीं . तेराव्या कोष्टकांत दिनमान दाखवितात . ह्या कोष्टकाच्या शिरोभागीं दि . ( दिनमान ) असें लिहिलेलें असतें . पंधरवड्याच्या पहिल्या व शेवटच्या दिवशीं मात्र दिनमानाच्या घटिका व पळें हीं दाखविलेलीं असतात . मधल्या दिवशीं फक्त पळेंच लिहिलेलीं असतात . म्हणून एकाद्या मधल्याच दिवसाचें दिनमान पाहिजे असल्यास प्रतिपदेच्या दिनमानाच्या घटिका पळांच्यामागें मानाव्या . चवदा , पंधरा आणि सोळा ह्या कोष्टकांत अनुक्रमें भारतीय , पारसी , मुसलमानी , व इंग्रजी तारखा लिहितात . सतराव्या व अठराव्या कोष्टकांत अनुक्रमें रवीच्या उदयाचे व रवीच्या अस्ताचे तास व मिनिटें हीं दिलेलीं असतात . एकोणिसाव्या कोष्टकांत त्या दिवशीं कोणत्या राशीचा चंद्र असतो , तें लिहितात .

हीं कोष्टकें संपल्यानंतर त्यांच्यापुढें बर्‍याच रूंदीचें एक कोष्टक असतें , त्यांत ज्या दिवशीं जें विशेष असेल त त्या दिवसाच्या पुढें लिहितात . उदाहरणार्थ , ‘ संकष्ट ४ ’ ‘ प्रदोष ;’ ‘ शिवरात्रि ;’ ‘ मिथुनेऽर्कं :’ इत्यादि . तसेंच , या पुस्तकाच्या प्रथमावृत्तींत सूचना केल्यावरून म्हणा किंवा कांहीं अन्य कारणामुळें म्हणा , पंचांगांत ज्ञानदेव , तुकाराम वगैरे साधुपुरुषांच्या , व शिवाजीसारख्या प्रसिद्ध कर्तृत्ववान् पुरुषांच्या पुण्यतिथीचे दिवस दाखविण्याचा प्रघात पंचांगकारांनीं पाडिला ही गोष्ट फार सोयीची झाली आहे . तसेंच मुक्तेश्वर , श्रीधर , मोरोपंत आदिकरून कवींच्या पुण्यतिथींचे दिवस पंचांगांत लिहिले असतांही महाराष्ट्रीयांस सोयीचें होईंल .

पंचांगाच्या उजव्या बाजूस वरच्या कोंपर्‍यांत एक कोष्टक असर्ते , त्यांत रवि , चंद्र वगैरे ग्रहांचीं नांवें संक्षेपानें देऊन प्रत्येक ग्रहाच्या खालीं कांहीं अंक लिहिलेले असतात . हे अंक पंधरवडयाच्या शेवटच्या दिवशीं सूर्योदयसमयीं आकाशांत ते ते ग्रह कोणत्या ठिकाणीं आहेत , हें दाखवितात . उदाहरणार्थं , रवीच्या खालीं १।२३।३८।३२ असे आंकडे आहेत , अशी क्ल्पना करा . याचा अर्थ असा कीं , रवीनें पंधरवडयाच्या शेवटच्या दिवशीं सूर्योंदयीं एक राशि पूर्ण भोगून दुसर्‍या राशीपैकीं २३ अंश ३८ कला आणि ३२ विकला भोगिल्या आहेत , म्हणून कुंडलींत तो दुसर्‍या राशीस दाखविलेला असेल . याचप्रमाणें इतर ग्रहांचें जाणावें . या आंकडयांच्या खालीं दुसरे आंकडे दिलेले असतात . ते ग्रहांच्या दैनिक गतीचें प्रमाण दाखविणारे आंकडे असतात . उदाहरणार्थ , रवीच्या खालीं ५७।१२ असे अंक आहेत , याचा अर्थ असा कीं , रवीची त्या दिवसाची गति ५७ कला व १२ विकला इतकी आहे . कित्येक ग्रहांच्या खालीं हे गतीचे अंक देऊन शिवाय ‘ व ’, ‘ मा ’, ‘ अ ’, ‘ उ ’ यांपीकीं अक्षरें लिहिलेलीं असतात . त्यांचे अर्थं असे आहेत -‘ व ’= वक्री , ‘ म ’= मार्गी , ‘ अ ’= अस्तंगत आणि ‘ उ ’= उदय पावलेला . वक्री म्हणजे सूर्यसांनिध्यामुळें तो ग्रह मागें येत असतो . मार्गी म्हणजे पुढें जात असतो . अस्तंगत म्हणजे सूर्यसांनिध्यामुळें तो ग्रह अद्दश्य झालेला असतो , आणि उदय पावलेला म्हणजे द्दश्य आकाशांत दिसूं शकणारा असें समजावें .

पंचांगांत उजव्या बाजूस खालच्या कोंपर्‍यांत बारा गृहांचें एक चतुष्कोण चक्र असतें , त्यास कुंडली म्हणतात . ही पंधरवडयाच्या शेवटच्या . दिवसाच्या सुर्योदयकालची असून त्यांत त्याच काळचे ग्रह लिहिलेले असतात . सूर्य ज्या राशीस असेल त्या राशीचा अंक कुंडलींतल्या पहिल्या गृहांत लिहितात , व त्याच्यापुढील सारे अंक डाव्या हाताकडील क्रमानें प्रत्येक गृहांत लिहितात , कुंडलीसंबंधीं ह्या पुस्तकाच्या तिस‍र्‍या प्रकरणांत अधिक विचार केलेला आहे , म्हणून त्याविषयीं येथें विशेष लिहीत नाहीं .

पंचांगांत आणखी अनेक गोष्टींचा समावेश असतो , त्यांपैकीं मुख्य येथें लिहितों , पंचांगांत आरंभीं वर्पफलें दिलेलीं असतात , त्यांत त्या वर्षाचा राजा कोण , मंत्री कोण , वगैरे सांगितलेलें असतें , त्याचा नियम असा आहे कीं ,---

चैत्रादौ मेषकर्कार्द्रातुलाकार्मुकवासरा : ।

नृपो मन्त्री धान्यतोयरससस्याधिपा : क्रमात् ॥१७६॥

म्हणजे चैत्रशुक्लप्रतिपदेस जो वार असेल तो त्या वर्षाचा राजा , मेषसंक्रांति ज्या वारीं होईल तो मंत्री , कर्कसंक्राति ज्या वारीं होईल तो अग्रधान्येश , आर्द्राप्रवेश ज्या वारीं होईल तो मेघेश , तुलासंक्रांति ज्या वारीं होईल तो रसेश , धनुसंक्रांति ज्या वारीं असेल तो पश्वाद्धान्येश , याप्रमाणें जाणावें , अमक्याचा स्वामी अमुक असतां अमुक प्रकारची फलप्राप्ति होते , हें राजावलि आणि कल्पलतानामक ग्रंथांत दिलें आहे . त्यांत चंद्र , बुध , गुरु आणि शुक्र यांचीं फलें चांगलीं असतात , व बाकी ग्रहांचीं फल वाईट असतात , असें लिहिलें आहे .

‘ अथ विंशोपका :’ या सदराखालीं पदार्थांचीं व विकारांचीं वगैरे १०५ नांवें देऊन त्यांच्यापुढें कांहीं आंकडे मांडलेले असतात . ते सर्व विसांच्या आंतले असतात . याचें करण असें आहे कीं , प्रत्येक पदार्थाची किंवा विकाराची इयत्ता वीस विभाग कल्पून त्यांपैकीं चालू वर्षांत त्या पदार्थाची किंवा विकाराची किती उत्पत्ति असते , हें त्या अंकांवरून समजावें . उदाहरणार्थ , वृष्टि १५ याचा अर्थ असा कीं , पावसाच्या इयत्तेचे वीस विभाग ठरविलेले आहेत , परंतु त्या विसांतून १५ हिस्से वृष्टि होईल , म्हणजे पाऊस जितका पडणें योग्य आहे , त्याच्या तीनचतुर्थांश पडेल . याचप्रमाणें इतर पदाथाचें समजावें . प्रत्येक पदार्थ विसांनीं विभागला असल्यामुळें याला ‘ विंशोपक ’ असें म्हणतात . वाचतांना वृष्टि १५ विश्वे , धान्य ११ विश्वे , असें वाचण्याचा प्रचार आहे .

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP