धनिष्ठापंचकं त्याज्यं तृणकाष्ठादिसंग्रहे ।
दक्षिणस्यां प्रयाणे च गृहाद्याच्छादने तथा ।
भवेत्पंचगुणं चात्र जातं लब्धं मृतं गतम् ॥१३७॥
धनिष्ठा नक्षत्राच्या उत्तरार्धापासून तों रेवती नक्षत्राच्या समाप्तीपर्यंत जीं पांच नक्षत्रें त्यांस धनिष्ठापंचक असें म्हणतात . दर महिन्यास हें पंचक असतेंच परंतु तें कोणी सदोष मानीत नाहीं . वैशाखकृष्णपक्षांत षष्ठी सप्तमीचे सुमारास जें धनिष्ठापंचक येतें , तें मात्र कित्येक ठिकाणीं सदोष मानितात . मुंबई प्रांतांत ह्या पंचकास मढेपंचक असें म्हणतात . धनिष्ठापंचकांत लांकडें किंवा गवत यांचा सांठा करणें , घर शिवणें , दक्षिणेकडे गमन करणें इत्यादि कृत्यें करुं नयेत . विवाहादि शुभ कार्यें पंचकांत करण्यास काहीं निषेध नाहीं , असें कित्येक ग्रंथकारांचें मत आहे , परंतु जसा देशाचार असेल त्याप्रमाणें करावें . धनिष्ठापंचकयोगावर जन्म , लाभ किंवा मृत्यु झाला तर पांच वेळ तसें होतें , असें मानिलेलें आहे . म्हणून धनिष्ठापंचकांत मृत्यु घडेल तर शांति केल्यानें दोषनिवृत्ति होते . कितीएक वैशाख कृष्ण पक्षांतील धनिष्ठानवकाचा म्हणजे धनिष्ठापासून रोहिणीपर्यंत ९ नक्षत्रांचा दोष मानितात .