सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जो काळ जातो , त्यास आपण दिवस म्हणतों , त्याचें मान तें दिनमान होय ; व सूर्य मावळल्यापासून सूर्याचा पुनः उदय होईपर्यंत जो काळ जातो , त्यास आपण रात्र म्हणतों ; तिचें मान तें रात्रिमान होय . प्रचारांत अहोरात्र म्हणजे दिवस व रात्र मिळून एक दिवस समजतात . उदाहरणार्थ , एका आठ्वडयाचे दिवस सात , असें आपण म्हणतों ; पण समजतांना आठवडा म्हणजे सात दिवस व सात रात्री असें समजतों . यावरुन एका दिवसाचे जे दोन विभाग दिव्स व रात्र , यांचें मान सारखें असावें असें वाटणें साहजिक आहे परंतु तें सर्वकाळ तसें असत नाहीं . याचें कारण असें आहे कीं , सूर्याचें जाणें कांहीं दिवस उत्तरेकडे व कांहीं दिवस दक्षिणेकडे असल्यामुळें दिनमान व रात्रिमान कमी - अधिक होतें .
पृथ्वीच्या मध्यरेषेवर सूर्य आला म्हणजे दिनमान व रात्रिमान सारखें म्हणजे तीस तीस घटिकांचें असतें . मार्च महिन्याच्या सुमारें बाविसाव्या तारखेस सूर्य मध्यरेषेवर येतो , म्हणून दिवस व रात्र हीं त्या वेळीं सारखीं असतात . सूर्य मध्यरेषेपासून उत्तरेकडे जाऊं लागल्यापासून पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात रात्रीपेक्षां दिवस वाढत जातो . तो कर्कवृत्तावर जाईपर्यंत वाढत असतो . जून महिन्याच्या बाविसाव्या तारखेस सूर्य ककर्वृत्तावर जातो . म्हणून या वेळेस दिनमान वाढण्याची पराकष्ठा होते . या वेळेस मुंबई येथें दिनमान सुमारें ३२ घटिका ५० पळें असतें . कर्कवृत्तापासून सूर्य मागें परत जाऊं लागला कीं , दक्षिणायन सुरु होतें आणि दिनमान थोडें थोडें पुनः कमी होऊं लागतें , तें सप्टेंबरच्या तेविसाव्या तारखेस म्हणजे सूर्य मध्यरेषेवर आला कीं बरोबर पुनः तीस घटिकांचे होतें . मध्यरेषेपासून सूर्य दक्षिणेकडे जाऊं लागला कीं , पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात दिनमान रात्रीपेक्षां कमी होऊं लागतें , तें तो मकरवृत्तावर जाईपर्यंत कमी होत असतें . डिसेंबरच्या बाविसाव्या तारखेस सूर्य मकरवृत्तावर जातो , म्हणून या वेळेस दिवस अगदीं लहान असतात . या वेळेस मुंबई येथें दिनमान सुमारें २७ घटिका १० पळें असतें . दक्षिणेकडून मध्यरेषेकडे सूर्य पुनः परत येऊं लागला कीं उदगयन सुरु होतें आणि दिनमान वाढत जातें , तें मध्यरेषेवर येईपर्यंत वाढत असतें . मार्च महिन्याच्या बाविसाव्या तारखेस पुनः सूर्य मध्यरेषेवर येतो . या वेळेस दिनमान पुनः तीस घटिका असतें . ह्याप्रमाणें मकरवृत्तापासून कर्कवृत्तापर्यंत सहा महिने उत्तरेकडे व कर्क वृत्तापासून मकरवृत्तापर्यंत सहा महिने दक्षिणेकडे सूर्य जात असतो . उत्तरेकडे फिरण्यास त्यास जो काळ लागतो , त्यास उत्तरायण म्हणतात ; व दक्षिणेकडे फिरण्यास जो काळ लागतो ; त्यास दक्षिणायन म्हणतात . दिवस व रात्र मिळून साठ घटिका असतात , म्हणून साठ घटिकांतून दिनमानाच्या घटिका वजा केल्या म्हणजे बाकी राहील तें रात्रिमान समजावें , ज्या वेळीं दिवस मोठे , त्या वेळीं रात्री लहान असतात ; व ज्या वेळीं रात्री लहान , त्या वेळीं दिवस मोठे असतात .