कुलिकः कालवेला च यमघंटश्च कंटकः ।
वाराद् द्विघ्ने क्रमान्मंदे बुधे जीवे कुजे क्षणः ॥१४१॥
प्रत्येक वारीं दिवसामध्यें कांहीं घटिका वाईट असतात , त्यांना कुलिक , कालवेला , इत्यादि नांवें आहेत . हे दुर्मुहूर्त समजण्याची रीति अशी आहे कीं , ज्या बाराचा कुलिकयोग आपणांस काढावयाचा असेल , त्या वारापासून शनिवारपर्यंत वार मोजून जे अंक येतील , त्यांची दुप्पट करावी . आणि तो दुपटीचा अंक कुलिकनामक दुर्मुहूर्त होय , असें समजावें . उदाहरणार्थ , आपणाला गुरुवारीं कोणती वेळा कुलिक आहे हें पहावयाचें आहे , म्हणून गुरुवारापासून शनिवारापर्यंत दिवस मोजले असतां ३ होतात व त्याची दुप्पट ६ होते . म्हणून सहावा मुहूर्त हा गुरुवारीं कुलिक झाला . दिनमानाचे समान १५ भाग करुन प्रत्येक भागाला दिवसाचा मुहूर्त म्हणावें . याच रीतीनें इष्ट वारापासून बुधवारापर्यंत मोजून दुप्पट केली म्हणजे कालवेला होते . गुरुवारापर्यंत मोजून दुप्पट केल्यानें यमघंट होतो . आणि मंगळवारापर्यंत मोजल्यानें कंटक होतो . ह्या दुष्ट वेळा विवाहादि सर्व शुभ कार्यास वर्ज्य कराव्या . दिवसाचे जे कुलिक सांगितले आहेत , त्यांतून १ वजा करावा म्हणजे रात्रीचे कुलिक मुहूर्त होतात . रात्रिमानाचे समान १५ भाग करुन त्या प्रत्येक भागाला रात्रीचा मुहूर्त म्हणावें .