नक्षत्रप्रकरण .
सर्वेषु कार्येषु हि शोभनेषु नक्षत्रशुद्धिं मृगयंति पूर्वम् ।
यत्कर्म यस्मिन्करणीयमुक्तं तत्तत्र देयं विदुषा विदित्वा ॥७२॥
सर्व शुभकृत्यांविषयीं प्रथम नक्षत्रशुद्धि पहावी , म्हणजे ज्या नक्षत्रांवर जें कर्म करणें उक्त आहे , त्याच नक्षत्रांवर तें कर्म करावें . नक्षत्रांचा संबंध आरंभस्थानाशीं आहे , म्हणून सायन व निरयन नक्षत्रविभाग भिन्न असतात .
आश्विनी भरणी चैव कृत्तिका रोहिणी मृगः ।
आर्द्रा पुनर्वसुः पुष्यस्तथाऽऽश्लेषा मघा ततः ॥७३॥
पूर्वाफाल्गुनिका तस्मादुत्तराफाल्तुनी ततः ।
हस्ताश्चित्रा तथा स्वाती विशाखा तदनंतरम् ॥७४॥
अनुराधा ततो ज्येष्ठा ततो मूलं निगद्यते ।
पूर्वाषाढोत्तराषाढा त्वभिजिच्छ्रवणस्ततः ॥७५॥
धनिष्ठा शतताराख्यं पूर्वाभाद्रपदा ततः ।
उत्तराभाद्रपदा चैव रेवत्येतानि भानि च ॥७६॥
‘ न क्षरति तत् नक्षत्रम् ’ जें ढळत नाहीं तें नक्षत्र . ग्रहांच्या गतीचें प्रमाण ठरविण्याकरितां क्रांतिवृत्ताचे नियोजित स्थिर आरंभस्थानापासून २७ समान विभाग कल्पिलेले आहेत . त्या विभागांपैकीं प्रत्येक विभाग चालून जाण्यास चंद्रास लागणारा जो काळ त्यास नक्षत्र म्हणतात . अमुक दिवशीं अमुक नक्षत्र आहे असें आपण म्हणतों त्याचा अर्थ असा कीं , त्या दिवशीं त्या नक्षत्रांत चंद्र असतो . निरयन पंचांगांतील अश्विनी नक्षत्र म्हणजे क्रातिवृत्तांतील स्थिर आरंभस्थानापासून १३ १ / ३ अंश किंवा ८०० कला . ( १३ १ / ३ x ६० = ८०० ) अश्विनी नक्षत्राच्या पुढील १३ १ / ३ अंश म्हणजे भरणी नक्षत्र होय . याच क्रमानें सर्व नक्षत्रें होतात . तात्पर्य , प्राचीन स्थिर आरंभस्थानापासून क्रांतिवृत्ताचे सारखे २७ भाग पाडले म्हणजे प्रत्येक भाग हींच निरयन नक्षत्रें होत . नक्षत्रें सत्तावीस आहेत . त्यांचीं नांवें - १ अश्विनी २ भरणी ३ कृत्तिका ४ रोहिणी ५ मृगशीर्ष ६ आर्द्रा ७ पुनर्वसु ८ पुष्य ९ आश्लेषा १० मघा ११ पूर्वा किंवा पूर्वाफाल्गुनी १२ उत्तरा किंवा उत्तराफाल्गुनी १३ हस्त १४ चित्रा १५ स्वाती १६ विशाखा १७ अनुराधा १८ ज्येष्ठा १९ मूळ २० पूर्वाषाढा २१ उत्तराषाढा २२ श्रवण २३ धनिष्ठा २४ शततारका २५ पूर्वाभाद्रपदा २६ उत्तराभाद्रपदा २७ रेवती . तिन्ही पूर्वा म्हणजे पूर्वा , पूर्वाषाढा आणि पूर्वाभाद्रपदा आणि तिन्ही उत्तरा म्हणजे उत्तरा , उत्तराषाढा आणि उत्तराभाद्रपदा असें समजावें . तिथींची क्षयवृद्धि मागें सांगितली आहे , त्याप्रमाणेंच नक्षत्रांची देखील क्षयवृद्धि कधीं कधीं होते .
अभिजित् नक्षत्राचा भोग्य काळ .
वैश्वांत्यपादः श्रुत्याद्यतिथ्यंशश्चाभिजिद्भवेत् ।
यत्राष्टाविंशतिर्भानां गण्योऽयं तत्र नान्यथा ॥७७॥
वैश्र्व म्हणजे उत्तराषाढा नक्षत्राचा चवथा चरण आणि श्रवण नक्षत्राचा पहिला पंधरावा अंश ( पहिला १ / १५ भाग ) मिळून अभिजित् नक्षंत्राचा विभाग मानितात . जेथें अठठावीस नक्षत्रें घेणें असतील तेथेंच अभिजित् नक्षत्र धरावें ; अन्यत्र ह्याचें ग्रहण करुं नये .
शुभाशुभ नक्षत्रें .
मघा मृगशिरो हस्तः स्वाती मृलानुराधयोः ।
रोहिणी रेवती चैव उत्तराणां त्रयं तथा ॥७८॥
आवाहे च विवाहे च कन्यासंवरणे तथा ।
वापयेत्सर्वबीजानि गृहं ग्रामं प्रवेशयेत् ॥७९॥
पुप्याऽश्र्विनी तथा चित्रा धनिष्ठा श्रवणं वसुः ।
सर्वाणि शुभकार्याणि सिध्यन्त्येषु च भेषु च ॥८०॥
मघा , मृग , हस्त , स्वाती , मूळ , अनुराधा , रोहिणी , रेवती , उत्तरा , उत्तराषाढा आणि उत्तराभाद्रपदा अशीं अकरा नक्षत्रें कांहीं शुभ कार्याचे आरंभास , विवाहास , कन्या वरण्यास , शेतांत बीं पेरण्यास , कांहीं वस्तूंचा संग्रह करण्यास , गृहप्रवेश आणि ग्रामप्रवेश करण्यास प्रशस्त मानिलेलीं आहेत . तसेंच अश्विनी , पुष्य , चित्रा , धनिष्ठा , श्रवण आणि पुनर्वसु हीं सहा नक्षत्रें देखील शुभ कार्यास उक्त मानिलेलीं आहेत . परंतु त्या नक्षत्रांवर विवाह मात्र करुं नये . यांशिवाय राहिलेल्या नक्षत्रांपैकी तिन्ही पूर्वा , ज्येष्ठा , आर्द्रा आणि शततारका हीं मध्यम नक्षत्रें होत . आणि भरणी , कृत्तिका , आश्र्लेषा , हीं तीन नक्षत्रें अत्युग्र होत . म्हणून हीं अत्युग्र नक्षत्रें शुभ कार्यांना सर्वथा वर्ज्य करावीं .