संक्रांति .
पूर्वे परित्यज्य यदा ग्रहाणां राशिं परं प्रत्ययनं स कालः ।
संक्रांतिवाच्योऽयमतिप्रशस्तः स्नाने च दाने च रवेर्विशेषात् ॥१६१॥
कोणत्याही ग्रहाचें एका राशींतून दुसर्या राशींत जाणें यास संक्रांतिकाल म्हणतात . हा स्नानदानाविषयीं फार प्रशस्त मानिलेला आहे . त्यांतल्या त्यांत सूर्यसंक्रमणाचा काल विशेष पुण्यदायक आहे . मेष , वृषभ आदिकरुन सूर्याचे बारा संक्रांतिकाल आहेत . परंतु धर्मशास्त्रकारांनीं कर्क आणि मकर या संक्रांतींना इतर संक्रांतींपेक्षां विशेष महत्व दिलें आहे , त्यांतही मकरसंक्रमणाचा काल विशेष पुण्यदायक मानिला आहे .
संक्रांतीचा पर्वकाळ .
पुण्याः षोडश नाडयस्तु पराः पूर्वास्तु संक्रमात् ।
त्रिंशत्कर्काटके पूर्वाश्चत्वारिंशत्परा मृगे ॥१६२॥
अस्तादूर्ध्वं तु मकरे रात्रौ संक्रमणं रवेः ।
तदोत्तरदिनं पुण्यं मध्याह्रात्प्राक् प्रकीर्तितम् ॥१६३॥
सामान्यतः कोणत्याही संक्रांतीचा आरंभापूर्वी सोळा घटिका आणि नंतर सोळा घटिका एवढा पर्वकाळ समजावा . परंतु कर्कसंक्रांतीचा प्रवेश होण्यापूर्वी तीस घटिकांपर्यंत आणि मकरसंक्रांतीचा संक्रांतिप्रवेशानंतर चाळीस घटिकांपर्यंत पर्वकाळ असतो . कांहीं ग्रंथकार मकरसंक्रांतीचा वीस घटिकांपर्यंतच उत्तम पर्वकाळ असतो असें म्हणतात . सूर्यास्तानंतर रात्रीं केव्हांही मकरसंक्रांतीचा प्रवेश होईल तर दुसर्या दिवशीं सूर्योदयापासून माध्यान्हकालापर्यंत ( किंवा सूर्यास्तापर्यंतही ) पर्वकाळाप्रीत्यर्थ स्नानदानादि कृत्यें करावीं . दिवसा केव्हांही संक्रांतिप्रवेश झाला असतां त्या वेळेपासून सूर्यास्तापर्यंत पर्वकाळाप्रीत्यर्थ स्नानदान करणें हा उत्तम पक्ष होय . संक्रांतींच्या पर्वकाळाविषयीं धर्मसिंधु इत्यादि ग्रंथांत विशेष माहिती दिली आहे ती पाहावी .
संक्रांतींचीं शुभाशुभ फलें .
यस्य जन्मर्क्षमासाद्यतिथौ संक्रमणं भवेत् ।
तन्मासाभ्यंतरे तस्य वैरं क्लेशो धनक्षयः ॥१६४॥
संक्रांत्यधरनक्षत्राद्गणयेज्जन्मभावधि ।
त्रिकं षटं त्रिकं षटं त्रिकं षटं पुनः पुनः ।
पंथा भोगो व्यथा वस्त्रं हानिश्च विपुलं धनम् ॥१६५॥
रव्यादिवारतः संज्ञा घोरा ध्वांक्षी महोदरी ।
मंदाकिनी च नंदा च मिश्रा राक्षसिका क्रमात् ॥१६६॥
उग्रे क्षिप्रे चरे मैत्रे स्थिरे मिश्रे च दारुणे ।
ता एव संज्ञा गदिता नारदादिमुनीश्र्वरैः ॥१६७॥
गुरौ गच्छति पूर्वस्यां याम्यां भास्करशुक्रयोः ।
प्रतीच्यां भौमबुधयोरुदक् च शनिचंद्रयोः ॥१६८॥
अर्कौ शुक्रे मुखे पूर्वे सौम्ये भौमे च दक्षिणे ।
शनौ चंद्रे मुखं पश्चात गुरौ चैवोत्तरामुखी ॥१६९॥
जन्मनक्षत्रावर , जन्ममासांत किंवा जन्मतिथीवर संक्रांति झाली तर अनुक्रमें वैर , क्लेश आणि धनक्षय अशीं फळें त्या महिन्यांत होतात . तसेंच , पंचांगांत मकरसंक्रांतीचीं फलें सांगून त्याच्याखालीं ‘ अथ जन्मर्क्षवशात्फलम् । ’ या सदराखालीं सहा कोष्टकें दिलेलीं असतात . त्या सहा कोष्टकांत सर्व नक्षत्रें लिहिलेलीं असतात . आपलें जें जन्मनक्षत्र असेल तें सहा कोष्टकांपैकीं कोणत्या कोष्टकांत आहे हें पहावें . तें ‘ भोगः ’ ‘ वस्त्रं ’ ‘ विपुलं धनं ’ या कोष्टकांत असेल तर चांगलें फल , आणि ‘ पंथा ’ ‘ व्यथा ’ ‘ हानि ’ ह्या तीन कोष्टकांत असेल तर संक्रांतीचें आपल्याला वाईट फल आहे असें समाजावें . ज्या वाहनावर संक्रांति बसली असेल किंवा ज्या वस्तु संक्रातीनें धारण केल्या असतील , त्या सर्व वस्तु महाग होतात किंवा त्यांचा नाश होतो . संक्रांतीचीं वाहनें , उपवाहनें , भक्षणाचे व धारणाचे पदार्थ पंचांगांत लिहिलेले असतात , ते सर्व बव - बालवादि करणांवरुन ठरलेले आहेत . संक्रांति अमुक दिशेकडे जाते किंवा अमुक दिशेकडे पहाते , हें वारांवरुन ठरविलेलें आहे . म्हणजे रविवारीं किंवा शुक्रवारीं संक्रांति असतां दक्षिणेकडे , सोमवारीं किंवा शनिवारीं असतां उत्तरेकडे , मंगळ आणि बुध या वारीं पश्चिमेकडे आणि गुरुवारीं असतां पूर्वेकडे जाते असें मानिलेलें आहे . ज्या दिशेकडे संक्रांतीचें गमन असतें , त्याच्या समोरच्या दिशेकडून आगमन होतें आणि ज्या दिशेकडे गमन असतें , त्याच्या उजव्या हाताकडील उपदिशेकडे दृष्टि असते . उदाहरणार्थ , उत्तरेकडे गमन असेल तर दक्षिणेकडून आगमन आणि ईशान्येकडे अवलोकन असतें . संक्रांतीचीं घोरा , ध्वांक्षी , महोदरी , मंदाकिनी , नंदा , मिश्रा , राक्षसी अशीं रविवारादि सात वारांचीं अनुक्रमें करुन निरनिराळीं सात वारनांवें आहेत . म्हणजे रविवारीं संक्रांति असतां घोरा , सोमवारीं असतां ध्वांक्षी इत्यादि . हींच नक्षत्रनामें होत . तीं उग्र , क्षिप्र , चर , मैत्र , स्थिर , मिश्र आणि दारुण ह्या सात प्रकारच्या नक्षत्रांचीं सात नांवें समजावीं . उदाहरणार्थ , उग्रनक्षत्रीं संक्रांति असतां घोरा , क्षिप्रनक्षत्रीं असतां ध्वांक्षी , चरनक्षत्रीं असतां महोदरी इ ० उग्र - क्षिप्रादि नक्षत्रें कोणतीं हें मागें नक्षत्रांच्या विशेष संज्ञा लिहिल्या आहेत , त्यांत सांगितलें आहे . शिवाय पुढील कोष्टकांत ही सर्व माहिती दिली आहे .
१ ) संक्रांतीची वारनामें व गमनादि दिशा
१
वार - रवि
नावें - घोरा
आगमन - उत्तर
गमन - दक्षिण
दृष्टी - नैऋत्य
मुखदिशा - पूर्व
२
वार - सोम
नावें - ध्वांक्षी
आगमन - दक्षिण
गमन - उत्तर
दृष्टी - ईशान्य
मुखदिशा - पश्चिम
३
वार - मंगळ
नावें - महोदरी
आगमन - पूर्व
गमन - पश्चिम
दृष्टी - वायव्य
मुखदिशा - दक्षिण
४
वार - बुध
नावें - मंदाकिनी
आगमन - पूर्व
गमन - पश्चिम
दृष्टी - वायव्य
मुखदिशा - दक्षिण
५
वार - गुरु
नावें - नंदा
आगमन - पश्चिम
गमन - पूर्व
दृष्टी - आग्नेयी
मुखदिशा - उत्तर
६
वार - शुक्र
नावें - मिश्रा
आगमन - उत्तर
गमन - दक्षिण
दृष्टी - नैऋत्य
मुखदिशा - पूर्व
७
वार - शनि
नावें - राक्षसी
आगमन - दक्षिण
गमन - उत्तर
दृष्टी - ईशान्य
मुखदिशा - पश्चिम
२ ) नक्षत्रांवरून संक्रांतीचीं नावें
१
नावें - घोरा
नक्षत्रे - उग्रन ० , ३ पूर्वा , भरणी , मघा .
२
नावें - ध्वांक्षी
नक्षत्रे - क्षिप्रन ० , पुष्य , अश्विनी , अभिजित् , हस्त .
३
नावें - महोदरी
नक्षत्रे - चरन ० , स्वाती , श्रवण , धनिष्ठा , शतता ० , पुनर्वसु .
४
नावें - मंदाकिनी
नक्षत्रे - मैत्रन , मृग , चित्रा , अनुरा ० , रेवती .
५
नावें - नंदा
नक्षत्रे - स्थिरन , रोहिणी , ३ उत्तरा .
६
नावें - मिश्रा
नक्षत्रे - मिश्रन , विशाखा , कृत्तिका .
७
नावें - राक्षसी
नक्षत्रे - दारुणन ० , ज्येष्ठा , आर्द्रा , आश्लेषा , मूळ .
३ ) संक्रांतीच्या वाहनवस्त्र -- भक्षणादि वस्तु
करण - १ बव
वाहन - सिंह
उपवाहन - गज
वस्त्र - शुभ्र
लेपन - कस्तूरी
पुष्प - चंपक
भक्षण - अन्न
आयुध - भुशुंडी
जाति - देव
वय - बाला
भूषण - पोंवळें , नूपूर
स्थिती - बसले .
करण - २ बालव
वाहन - व्याघ्र
उपवाहन - अश्व
वस्त्र - पीत
लेपन - कुंकूं
पुष्प - जाई
भक्षण - पायस
आयुध - गदा
जाति - भूत
वय - कुमारी
भूषण - मौक्ति ० , कंकण
स्थिती - बसले .
करण - ३ कौलव
वाहन - डुक्कर
उपवाहन - बैल
वस्त्र - हिरवें
लेपन - चंदन
पुष्प - बकुळी
भक्षण - भक्ष्य
आयुध - खड्ग
जाति - सर्प
वय - मुग्धा
भूषण - रौप्य , मोतीं
स्थिती - उभी .
करण - ४ तैतिल
वाहन - गर्दभ
उपवाहन - मेंढा
वस्त्र - पांडुर
लेपन - गोपी ०
पुष्प - केवडा
भक्षण - अपूप
आयुध - दंड
जाति - पक्षी
वय - तरुणी
भूषण - हिरे , पोंवळें
स्थिती - निजले .
करण - ५ गर
वाहन - हत्ती
उपवाहन - खर
वस्त्र - तांबडें
लेपन - गोसे ०
पुष्प - बेल
भक्षण - दूध
आयुध - धनु
जाति - पशु
वय - प्रौढा
भूषण - गोमेद , मुकुट
स्थिती - बसले .
करण - ६ वणिज
वाहन - महिष
उपवाहन - उंट
वस्त्र - निळें
लेपन - आळता
पुष्प - रुई
भक्षण - दहीं
आयुध - तोमर
जाति - मृग
वय - वृद्धा
भूषण - नीळ , मणि
स्थिती - बसले .
करण - ७ विष्टि
वाहन - घोडा
उपवाहन - सिंह
वस्त्र - काळें
लेपन - हळद
पुष्प - दूर्वा
भक्षण - चित्रान्न
आयुध - भाला
जाति - विप्र
वय - वृद्धा
भूषण - सोनें , गुंजा
स्थिती - बसले .
करण - ८ शकु ०
वाहन - श्वान
उपवाहन - वृषभ
वस्त्र - चित्र
लेपन - काजळ
पुष्प - कमळ
भक्षण - गूळ
आयुध - पाश
जाति - क्षत्रि ०
वय - वंध्या
भूषण - शिसें , कवडी
स्थिती - उभी .
करण - ९ चतु ०
वाहन - मेंढा
उपवाहन - वृषभ
वस्त्र - कंबल
लेपन - शेंदूर
पुष्प - मोगरा
भक्षण - मध
आयुध - अंकुश
जाति - वैश्य
वय - वंध्या
भूषण - कांसें , नीळ
स्थिती - निजले .
करण - १० नाग
वाहन - बैल
उपवाहन - व्याघ्र
वस्त्र - नग्न
लेपन - अगरु
पुष्प - पाटला
भक्षण - घृत
आयुध - अस्त्र
जाति - शूद्र
वय - पुत्रेच्छु
भूषण - तांबें , पाच
स्थिती - निजले .
करण - ११ किंस्तु
वाहन - कोंबडा
उपवाहन - वराह
वस्त्र - निळें
लेपन - कर्पूर
पुष्प - जास्वंद
भक्षण - शर्करा
आयुध - बाण
जाति - संकर
वय - संन्या .
भूषण - लोखंड , कनक
स्थिती - उभी .
संक्रांतीचा दानविधि .
यः कांस्यपात्रे कनकार्कबिंबं तिलाज्यपूर्णे विधिवत्प्रपूज्य ।
सदक्षिणं वेदविदे प्रदद्यात् संक्रांतिकाले स लभेदभीष्टम ॥१७०॥
तिलतैलेन दीपाश्च देया विप्रगृहे शुभाः ।
उत्तरे त्वयने विप्रे वस्त्रदानं महाफलम् ॥१७१॥
तिलस्नायी तिलोद्वर्ती तिलहोमी तिलोदकी ।
तिलभुक् तिलदाता च षट् तिलाः पापनाशकाः ॥१७२॥
मकरसंक्रांतीच्या पर्वकाळांत कांस्यपात्रांत तीळ व तूप भरुन , त्यावर सुवर्णप्रतिमा ठेवून व त्याची विधियुक्त पूजा करुन विद्वान् , कुटुंबवत्सल अशा सदाचरणी ब्राह्मणाला तें कांस्यपात्र दान द्यावें , व दानसांगतेसाठीं दक्षिणा द्यावी . उदगयनप्रसंगीं तिळाच्या तेलाचे दिवे ब्राह्मणाला घरीं लावावे . वस्त्रदानाचें फलही विशेष सांगितलें आहे . मकर संक्रांतीचे दिवशीं १ अंगाला तीळ लावणें , २ तिलोदकानें स्नान करणें , ३ तिळांचा होम , ४ तिलोदकानें पितृतर्पण , ५ तिलदान , व ६ तिल भक्षण करणें अशा सहा प्रकारांनीं तिळांचा उपयोग करावा .
करीचे दिवस .
होलिकाग्रहणभावुकायनं प्रेतदाहदिवसोऽत्र पंचमः ।
तत्परं च करिसंज्ञकं दिनं गर्हितं सकलकर्मसूभयम् ॥१७३॥
ग्रहण , होळीचा दिवस , अयनदिवस ( म्हणजे सायन कर्क व मकर या दोन संक्रांतींचे दिवस ) प्रेतदहनविधि झालेला दिवस आणि भावुका दिन म्हणजे वैशाखमासाची अमावास्या या दिवसांच्या दुसर्या दिवसाला करीचा दिवस म्हणतात . म्हणून हे उभय दिवस म्हणजे करीचा दिवस व त्याचा पूर्व दिवस असे दोन्ही दिवस शुभ कर्माला निंद्य आहेत . म्हणून त्या दिवशीं प्रयाण किंवा कोणतेंही मंगलकृत्य करुं नयें .
गतसंक्रांतीवरुन नूतन संक्रांतिकाल .
वारे रुपं तिथौ रुद्रा नाडयः पंचदशैव तु ।
जीर्णपत्रप्रमाणेन संक्रांतीर्नूतना भवेत् ॥१७४॥
पूर्वसंवत्सराच्या संक्रांतींच्या वेळांवरुन चालू वर्षातील कोणत्याही संक्रांतीची वेळा काढावयाची असेल तर गतवर्षीच्या संक्रांतीच्या वाराच्या अनुक्रमांकांत १ मिळवावा . शुक्ल प्रतिपदेपासून तिथि मोजून त्या तिथींमध्यें ११ मिळवावें . ( ह्या बेरजेचा अंक तिसांहून जास्त असल्यास तो तिसांमधून वजा करावा .) घटिकांमध्यें १५ मिळवावे . ( हा मिळवणीचा अंक साठांहून अधिक असल्यास तो साठांतून वजा करावा . ) म्हणजे चालू वर्षीं कोणत्या वारीं कोणत्या तिथीला सूर्योदयापासून किती घटिकांनीं संक्रांतिप्रवेश होईल तें कळतें . उदाहरण - शके १८५५ ह्या संवत्सरांतील मकरसंक्रांति पौष कृष्ण १४ ला रविवारीं सूर्योदयापासून ४८॥ घटिकांनीं होती , म्हणून रविवारचा अंक १ यांत १ मिळविला . १ + १ = २ म्हणजे सोमवार होय . तिथीमध्यें ( शुक्लपक्षांतील १५ व कृष्णपक्षांतील १४ = २९ ) अकरा मिळविले म्हणजे २९ + ११ = ४० तिथी झाल्या . ह्या तिसांतून वजा करितां शेष १० म्हणजे दशमी तिथि झाली . संक्रांतिप्रवेश ४८॥ घटिकांनीं होता . त्यांत १५ मिळविले . ४८॥ + १५ = ६३॥ हे साठ घटिकांतून वजा जातां बाकी ३॥ घटिका राहिल्या . म्हणून १८५६ संवत्सरांतील मकरसंक्रांति पौष शुद्ध दशमीला सोमवारीं सकाळीं ३॥ घटिकांचे सुमारास असेल . संक्रांतीच्या पंधरवडयांत तिथीची क्षयवृद्धि असतां एक दोन प्रहरांचा क्कचित् फरक पडण्याचा संभव आहे .