( चाल : प्रियकरा मी भुलले. )
जय आनंदे, विजयवरदे, उदय वंदे मातरम् ॥धृ०॥
ब्रह्मांडपिंडव्यापिनी, आदिप्रणवरुपिणी ।
तूं अचिंत्य, नित्य, आदिमध्य - अंत, सविस्तरम् ॥ उदय० ॥१॥
विष्णु, ब्रह्मदेव, शिव, देव, प्रकृति, पुरुष, जीव ।
तूंचि धरणि, तरणी, शशि, गगन, दिशांतरम् ॥ उदय० ॥२॥
अमर चवर वारिती, करिति पुजन आरती ।
सुगंध, गंध, धूप, दीप, पत्र, पुष्प, अत्तरं ॥ उदय० ॥३॥
मूळपीठनायके, हीच विनति आयके ।
त्रिविध ताप हारि तारि वारि विघ्न दुस्तरम् ॥ उदय ॥४॥
निजचरणिं ठाव दे भजनिं भाव दे वदें ।
विष्णुदास जिवशिवास तूं निवास निरंतरं ॥ उदय० ॥५॥