पद - रेणुके
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
( चाल : श्रीविधि हरिहर )
आई जगदंबे । तुला रेणुके । माझि दया यावी ।
प्रपंच खोटा फासेपारधी, मोठा मायावी ॥धृ०॥
याच अरण्यामधें चोरटें चहुंकडुनि उठले ।
परिपाठाच्या वाटा मोडुन, कैकाला लुटले ।
कइकांचे गळे कापुनि गिळिले कैकांचे खटले ।
काका काकी पणजे आजोबा बाबाही आटले ।
परंतु याचें पीट भरेना मोठा खायावी ॥ प्रपंच० १॥
विकल्पना वासना अशा घरबुडव्याच्या रांडा ।
इक्षूदंडापरी खावया लाविति एरंडा ।
विश्वामित्रासहि गुंगविलें मारुनि मुर्कुंडा ।
साठ सहस्त्र वर्षांचें घातलें पुण्य मुत्रकुंडा ।
मग अज्ञानी इतर जनांची, काय दशा व्हावी ॥ प्रपंच० २॥
ब्रह्मज्ञानी षट्शास्त्रांचीं धुंडाळिति तिपडें
भीष्मादिक शरपंजरिं पडले विर उपडे तिपडे ।
जटा वाढवुनि मठांत बसले, बदलुनियां रुपडें ।
कित्येक काळे हिरवे भगवे, रंगविती कपडे ।
परंतु त्यासीं बळेंचि ओढी, गळिं लावुनि दावीं ॥ प्रपंच० ३॥
त्या रामानें पहा निःक्षत्रिय, पृथ्वीतळ केला ।
या रामानें रावण वधिला, जाउनि लंकेला ।
हिरण्यकश्यपु विदारुनि नर, - हरिनें जिंकियला ।
महिषासुर मर्दिला तुझाही, प्रताप ऐकियला ।
परंतु शत्रू अजिंक्य पडला, हा आमुच्या डावीं ॥ प्रपंच० ४॥
या दृष्टानें फांसे मांडिले, पहा रस्तोरस्तीं ।
तुजकडे येतां बळें मार्गामधें, करि दंगामस्ती ।
हा कमजास्ती बोलुं देइना, केवढि जबरदस्ती ।
सुस्ति नको करुं सत्वर याची करि बंदोबस्ती ।
विष्णुदास म्हणे शरण आलों तुज, चरणकमल दावी ॥ प्रपंच० ५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP