पद - तुम्हांला पावलि जगदंबा
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
( चाल : जमका अजब तडाखा बे. )
तुम्हांला पावलि जगदंबा । आम्हांला भलि लागलि बाबा ॥धृ०॥
तुम्ही पंचामृतस्नान घालितां उटणें लावुन अंगा ।
आमच्या नयनाच्या तुंब्यांतुन वाहे झुळझुळ गंगा ॥ तुम्हांला० ॥१॥
तुमची उंचिची नवि कंचुकि, साडी जरिकांठाची ।
अमुची वाकळ जुनि ठिगळाची सात - पांच बोटांची ॥ तुम्हांला० ॥२॥
तुम्ही घालतां गोठ - पाटल्या, बाळ्या - बुगड्या, कंठा ।
आम्ही वाजवित उगीच बसलों अनुहाताचा घंटा ॥ तुम्हांला० ॥३॥
तुमची साखर - पुरि, साटोरी, बर्फी, जिलबी, ताजी ।
अमुची कसची तरि गरिबाची वरण, भाकरी, भाजी ॥ तुम्हांला० ॥४॥
तुमच्या अरत्या परत्या होती पंक्ति, तुपाच्या धारी ।
बिनतेलाचा दिवा लावुनी बसतों अम्हिं अंधारीं ॥ तुम्हांला० ॥५॥
तुमची दक्षिणा, पान - सुपारी, अत्तर फूल चमेली ।
अमुची वासना वांझ बायको लटकी मायच मेली ॥ तुम्हांला० ॥६॥
विष्णुदास म्हणे, तुम्हीं तिला तरि इच्छित धन मागावें ।
आम्हिं तर डोळे लावुन पहावें तोंड मिटुनिया गावें ॥ तुम्हांला ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP