पद - धांव ग
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
( चाल : धाव रे रामराया )
धांव ग, धांव आतां धांव, परम स्नेहाळे
रेणुके, रेणुके, तूं दिनजननि दयाळे ॥धृ०॥
विश्वाची जननी तूं जगदंबे, लेंकुरवाळे
येउं दे माझी कांहीं तुला करुणा कनवाळे ॥ धांव ग० ॥१॥
निष्ठुर मन केलें मजवरती आगळें
तुझेचि खेळ सारे, आलें कळून सगळें ॥ धांव ग० ॥२॥
बहुत मी काय बोलूं, जीव माझा हा अरबळे
तुलाचि भांडतों मी माय, तुझ्याचि बळें ॥ धांव ग० ॥३॥
तुज कुणि नेसावया आणलें वसन पिवळें
पाठमोरी करुणेची गंगा पुनरपी वळे ॥ धांव ग० ॥४॥
बसलिस जेवावया तूं नेसुन सोवळें
असेल परि द्रवलें मन खचित कोवळें ॥ धांव ग० ॥५॥
कां न येसी मजवर आलें संकट दयाळे
गुंतलीस माउली तूं काय पाजावया बाळें ॥ धांव ग० ॥६॥
आकांत दुःख माझें कां न येवढें कळे
कानांत बसली कीं मळ - मातिची ढेकळें ॥ धांव ग० ॥७॥
हांका न ऐकुं देती दुष्ट दुरित कावळे
करती कलकलाट तुजभोंवतीं सांवळे ॥ धांव ग० ॥८॥
श्रमलिस काय एकविरे अजिंक्य विशाळे
उपेक्षीतां लागेल कीं निळरंग कविशाळे ॥ धांव ग० ॥९॥
जघन्य ह्रदय - सरोवर मानसमराळे
राहुं नको तरि आई, मजपासून निराळें ॥ धांव ग० ॥१०॥
चिंतितां संकटाची सेना सकळ मावळे
विष्णुदास म्हणे म्हणती तुझे भक्त नामावळे ॥ धांव ग० ॥११॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP