पद - आदिश्रीजगदंबा गिरिजा
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
( चाल : माझा कृष्ण देखिला )
आदिश्रीजगदंबा गिरिजा । जानकीरुप धरी ॥ध्रु०॥
हरिणामागें बळेंचि पिटाळी । तिच्यासाठीं तरु कवटाळी
पडला मायेच्या घोटाळीं । तो मनिं चिंती मदनारी ॥१॥
वाहति नेत्रांतुनि जळधारा । हिंडे धुंडित जंगल सारा
दावा म्हणे मज माझी दारा । हा हा नारी ! हा नारी ! ॥२॥
यास्तव आतां हे विरुपाक्षा । पहाते जाउन त्याची परिक्षा
ऐसी कल्पुनि चित्तिं अपेक्षा । आली वनामधें श्रीगौरी ॥३॥
आपण जातां दुर वनिं रामा । मागें राक्षस येउनि धामा
नेतां मजला श्रीघनश्यामा । झाले वनांतरिं श्रम भारी ॥४॥
बोले जनकाचा जांवाई । येथें कोठें सांग तुकाईं
विष्णुदास म्हणे तुळजाबाई । ये लवलाही, मज तारी ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP