( झंपा )
आतां तुझ्या धरीन पदरास ॥धृ०॥
मी हीन दीन म्हणुनि तुला जगदंबे, अंबे, दिनजननी,
समज मनीं, आणिन दारास ॥ आतां० १॥
शुभमंगळसौभाग्यधने, सुखसदने, शुभवदने, हे दुर्जय
रिपुभर्गे, जयदुर्गे, तूं पूर्णामृतकर चकोरास ॥ आतां० २॥
प्रिय आत्मज परि त्याग तुला, कां गमला, सांग मला,
संशयपट खोल, खरें मसि बोल, कां रुससी,
दुर बससी, मिटुन अधरास ॥ आतां० ३॥
तूं आई अशी, असून मसी, कसुन कसी,
बघसि कसी, उचित हें काय, तुजप्रति माय,
वसन पिवळें, ह्रदय कोंवळें, सदय घनरास ॥ आतां० ४॥
तुजविण त्रिभुवनीं मला, नच आसरा, पहा दुसरा,
म्हणे विष्णुदासचि सार, वारंवार, असूंदे याद, अशी
फिर्याद, अर्जी सदरास ॥ आतां० ५॥