संत चोखामेळा - अभंग १ ते १०

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


१) अनादि निर्मळ वेदांचें जें मूळ । परब्रम्हा सोज्वळ विटेवरी ॥१॥
कर दोन्ही कटी राहिलासे उभा । नीळवर्णप्रभा फांकतसें ॥२॥
आनंदाचा कंद पाऊलें साजिरी । चोखा म्हणे हरी पंढरीये ॥३॥

२) अनाम जयासी तेचं रूपा आलें । उभें तें राहिलें विटेवरी ॥१॥
पुंडलिकाच्या प्रेमा युगे अठ्ठावीस । समचरणी वास पंढरीये ॥२॥
चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कनवाळू । जाणे लळा पाळू भाविकांचा ॥३॥

३) अवघा प्रेमाचा पुतळा । विठ्ठल पाहा उघडा डोळा ॥१॥
जन्ममरणाची येरझारी । तुटे भवभय निर्धारी ॥२॥
ऐसा प्रताप आगळा । गाये नाचे चोखामेळा ॥३॥

४) अंगिकार करी तयाचा विसर । न पडे साचार तया लागीं ॥१॥
तो हा महाराज चंद्रभागे तटी । उभा वाळुवंटी भक्तकाजा ॥२॥
अनाथा कैवारी दीना लोभपर । वागवितो भार अनाथांचा ॥३॥
चोखा म्हणे माझी दयाळू माउली । उभी ती राहिली विटेवरी ॥४॥

५) आणिक दैवतें देतीं काय बापुडीं । काय याची जोडी इच्छा पुरे ॥१॥
तैसा नव्हे माझा पंढरीचा राजा । न सांगता सहजा इच्छा पुरे ॥२॥
न लगे आटणी तपाची दाटणी । न लगे तीर्थाटणी काया क्लेश ॥३॥
चोखा म्हणे नाम जपतां सुलभ । रुक्मिणीवल्लभ जवळी वसे ॥४॥

६) आपुलिया सुखा आपणचि आला । उगलाचि ठेला विटेवरी ॥१॥
तें हें सगुण रूप चतुर्भुज मूर्ति । शंख चक्र हातीं गदा पद्म ॥२॥
किरीट कुंडलें वैजयंती माळा । कांसे सोनसळा तेज फाके ॥३॥
चोखा म्हणे सर्व सुखाचें आगर । रूप मनोहर गोजिरें तें ॥४॥

७) उतरले सुख चंद्रभागे तटीं । पाहा वाळुवंटी बाळरूप ॥१॥
बहुता काळाचें ठेवणें योगियाचें । ध्येय शंकराचे सुख ब्रम्हा ॥२॥
जयालागीं अहोरात्र विवादती । तो भक्ताचिये प्रीतीं उभा असे ॥३॥
चोखा म्हणे सर्व सुखांचे आगर । न कळे ज्याचा पार श्रुति-शास्त्रां ॥४॥

८) करी सूत्र शोभे कटावरी । तोचि हा सोनार नरहरी ॥१॥
पायीं वाजती रूणझुण घंटा । तोचि नामयाचा नागर विठा ॥२॥
काम चरणींचा तोडरू । परिसा ऊठतसे डीगरू ॥३॥
दक्षिण चरणीचा तोडरू । जयदेव पदाचा गजरू ॥४॥
विठेवरी चरण कमळा । तो जाणा चोखामेळा ॥५॥

९) गोजिरें श्रीमुख चांगलें । ध्यानीं मिरवले योगीयांच्या ॥१॥
पंढरी भुवैकुंठ भिवरेच्या तीरीं । वैकुंठाचा हरी उभा विटे ॥२॥
राई रखुमाई सत्यभामा नारी । पुंडलिकें सहपरिवारीं आणियेला ॥३॥
वैजयंती माळ किरीट कुंडलें । प्रेमें आलिंगिलें चोखियानें ॥४॥

१०) चोखट चांग चोखट चांग । एक माझा पांडुरंग ॥१॥
सुख तयाचे चरणीं । अवघी सुकृतांची खाणी ॥२॥
महापातकी नासले । चोखट नाम हें चांगले ॥३॥
महाद्वारी चोखामेळा । विठ्ठल पाहातसे डोळां ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP