संत चोखामेळा - अभंग २१ ते ३०

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


२१) मज तो नवल वाटतसे जीवी । आपुली पदवी विसरले ॥१॥
कवणिया सुखा परब्रम्हा भुललें । गुंतोनी राहिलें भक्तभाके ॥२॥
निर्गुण होतें तें सगुण पैं झालें । विसरोनी गेलें आपआपणा ॥३॥
चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कृपाळ । दीनांचा दय़ाळ पंढरीये ॥४॥

२२) मुळींचा संचला आला गेला कोठें । पुंडलीक पेठे विटेवरी ॥१॥
विठोबा देखणा विठोबा देखणा । योगियांचा राणा पंढरिये ॥२॥
भाविका कारणें उभारोनि हात । वाट जो पहात अनुदिनी ॥३॥
चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कृपाळ । दीनांचा दयाळ पंढरीये ॥४॥

२३) विठोबा पाहुणा आला आमुचे घरा । निंबलोण करा जीवें भावें ॥१॥
पंचप्राण ज्योती ओंवाळुनी आरती । ओंवाळीला पती रखुमाईचा ॥२॥
षड्‌रस पव्कानानें विस्तारिलें ताट । जेवूं एकवट चोखा म्हणे ॥३॥

२४) व्यापक व्यापला तिन्हीं त्रिभुवनीं । चारी वर्ण बाणी विठू माझा ॥१॥
पंचप्राण ज्योती ओंवाळुनी आरती । ओंवाळीला पती रखुमाईचा ॥२॥
षड्ररस पव्कानानें विस्तारिलें ताट । जेवूं एकवट चोखा म्हणे ॥३॥

२५) सकळा आगराचें जें मूळ । तो हा सोज्वळ विठू माझा ॥१॥
वेदांचा विचार शास्त्रांची जे गती । तोचि हा श्रीपती विठु माझा ॥२॥
कैवल्य देखणा सिद्धांचा जो राणा । भाविकासी खुणा विठू माझा ॥३॥
चोखा म्हणे माझ्या ह्रदयीं बिंबला । त्रिभुवनीं प्रकाशला विठू माझा ॥४॥

२६) सर्वही सुखाचें वोतिलें श्रीमुख । त्रिभुवन नायक पंढरीये ॥१॥
कर दोन्हीं कटीं सम पाय विटे । शोभले गोमतें बाळरूप ॥२॥
जीवाचें जीवन योगियांचे धन । चोखा म्हणे मंडन तिन्ही लोकीं ॥३॥

२७) सुंदर मुखकमल कस्तुरी मळवटीं । उभा देखिला तटीं भीवरेच्या ॥१॥
मकराकार कुंडलें श्रवणीं ढाळ । देती गळां वैजयंती मुक्तमाळा ॥२॥
शंख चक्र गदा पद्म चहूं करीं । गरूडवाहन हरी देखियला ॥३॥
चोखा म्हणे सर्वं सुखाचें आगर । निरा भिवरा तीर विठ्ठल उभा ॥४॥

२८) श्रवणाचें श्रवण घ्राणाचें जें घ्राण । रसने गोडपण विठ्ठल माझा ॥१॥
वाचा जेणें उठी डोळा जेणें भेटी । इंद्रियाची राहाटी विठ्ठल माझा ॥२॥
प्राण जेणें चळे मन तेणें वोळे । शून्यातें वेगळें विठ्ठल माझा ॥३॥
आनंदी आनंद बोधा जेणें बोध । सकळां आत्मा शुद्ध विठ्ठल माझा ॥४॥
मुळाचें निजमूळ अकुळाचें कूळ । चोखा म्हणे निजफळ विठ्ठल माझा ॥५॥

२९) श्रीमुख चांगले कांसे पितांबर । वैजयंती हार रूळे कंठी ॥१॥
तो माझ्या जीवीचा जिवलग सांवळा । भेटवा हो डोळां संतजन ॥२॥
बहुतांचें धावणें केलें नानापरी । पुराणें ही थोरी वानिताती ॥३॥
चोखा म्हणे वेदशास्त्रांसी जो साक्षी । तोचि आम्हा रक्षी नानापरी ॥४॥

३०) श्रीमुखाची शोभा कस्तुरी मळवट । उभा असे नीट विटेवरी ॥१॥
कर दोनीं कटीं कुंडल झळकती । तेज हे फांकती दशदिशा ॥२॥
वैजयंती माळा चंदनाची उटी । टिळक लल्लाटीं कस्तुरीचा ॥३॥
चोखा म्हणे माझ्या जीवींचा जीवनु । पाहतां तनु मनु भुलोनी जाय ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP