संत चोखामेळा - करुणा

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


९६) मजचि कां करणें लागला विचार । परी वर्म साचार न कळे कांही ॥१॥
कैशी करुं सेवा आणिक ते भक्ति । न कळे विरक्ति मज कांही ॥२॥
आणिक तो दुजा नाहीं अधिकार । कैसा हा विचार करूं आतां ॥३॥
चोखा म्हणे बहु होती आठवण । कठिण कठिण पुढें दिसे ॥४॥

९७) माझा मी विचार केला असे मना । चाळवण नारायणा पुरें तुमचें ॥१॥
तुम्हांवरी भार घातिलेंसें वोझें । हेंचि मी माझें जाणतसें ॥२॥
वाउगें बोलावें दिसे फलकट । नाहीं बळकट वर्म आंगीं ॥३॥
चोखा म्हणे सुखें बैसेन धरणा । तुमच्या थोरपणा येईल लाज ॥४॥

९८) माझा तंव अवघा खुंटला उपाय । रिता दिसे ठाव मजलागीं ॥१॥
करितोचि दिसे अवघेचि वाव । सुख दु:ख ठाव अधिकाधिक ॥२॥
लिगाडाची माशी तैसी झाली परी । जाये तळीवरी सुटका नव्हे ॥३॥
चोखा म्हणे अहो दीनांच्या दयाळा । पाळा कळवळा माझा देवा ॥४॥

९९) माया मोहोजाळे गुंतलोंसे बळें । यांतोनी वेगळें करीं गा देवा ॥१॥
न कळेचि स्वार्थ अथवा परमार्थ । बुडालोंसे निभ्रांत याचमाजी ॥२॥
न घडे देवार्चन संतांचें पूजन । मन समाधान कधीं नव्हे ॥३॥
नसतेचि छंद लागती अंगासी । तेणें कासावीस जीव होय ॥४॥
चोखा म्हणे याही चोरें नागविलों । माझा मीचि झालो शत्रु देवा ॥५॥

१००)  मी तो विकलों तुमचिये पायीं । जीवभाव सर्वहि अर्पियेला ॥१॥
माझा मीच झालों उतराई देवा । तुमचें तुम्हीं पाहा आम्हांकडे ॥२॥
नव मास माता वोझें वाहे उदरीं । तैसीच ही परी तुमची माझी ॥३॥
अपत्य आपुलें फिरे देशोदेशीं । ही लाज कोणासी चोखा म्हणे ॥४॥

१०१) यातीहीन मज म्हणती देवा । न कळे करूं तुमची सेवा ॥१॥
आम्हां नीचांचे तें काम । वाचें गावें सदां नाम ॥२॥
उच्छिष्टाची आस । संत दासाचा मी दास ॥३॥
चोखा म्हणे नारायण । पदरीं घेतलें मज दीना ॥४॥

१०२) वारंवार किती करूं करकर । माझा तंव आधार खुंटलासे ॥१॥
न बोलावें आतां हेंचि शहाणपण । होउनी पाषाण पडो द्वारीं ॥२॥
केव्हां तरी तुम्हां होईल आठवणे । हाचि एक भाव धरूं आतां ॥३॥
चोखा म्हणे मग येशील गिवसित । तोंवरी चित्त दृढ करूं ॥४॥

१०३) श्वान अथवा सुकर होका मार्जार । परी वैष्णवाचें घर देईं देवा ॥१॥
तेणें समाधान होय माझ्या जीवा । न भाकीं कींव आणिकासी ॥२॥
उच्छिष्ट प्रसाद सेवीन धणिवरी । लोळेन परवरी कवतुकाने ॥३॥
चोखा म्हणे कोणी जातां पंढरीसी । दंडवत त्यासी घालीन सुखें ॥४॥

१०४) समर्थांसी रंकें शिकवण जैशी । माझी वाणी तैशी बडबड ॥१॥
शुभ हें अशुभ न कळे बोलतां । परि करीं सत्ता लंडपणें ॥२॥
उच्छिष्टाची आशा भुंकतसे श्वान । तैसा मी एक दिन आहें तुमचा ॥३॥
चोखा म्हणे एका घासाची चाकरी । करितों मी द्वारीं तुमचीया ॥४॥

१०५) साच जें होतें तें दिसोनियां आलें । आतां मी न बोले तुम्हां कांहीं ॥१॥
तुमचें उचित तुम्हींच करावें । आम्हीं सुखें पाहावें होय तैसें ॥२॥
विपरीत सुपरीत तुमचीय़े घरीं । तुमची तुम्हां थोरी बरी दिसे ॥३॥
चोखा म्हणे ऐसा हा नवलाव । न कळेचि भाव ब्रम्हादिका ॥४॥

१०६) सुखाचिया लागीं  करितों । तो अवघेंचि वाव येतें ॥१॥
करितां तळमळ मन हें राहिना । अनावर जाणा वासना हे ॥२॥
अवघेचि सांकडें दिसोनियां आलें । न बोलावें तें भलें कोणा पुढें ॥३॥
चोखा म्हणे मी पडिलों गुर्‍हाडीं । सोडवी तातडी यांतूनीयां ॥४॥

१०७) संसाराचें नाहीं भय । आम्हां करील तो काय । रात्रंदिवस पाय । झालों निर्भय आठवितां ॥१॥
आमुचें हें निजधन । जोडियेले तुमचे चरण । आणि संतांचें पूजन । हेंचि साधन सर्वथा ॥२॥
कामक्रोधादिक वैरी । त्यांसी दवडावे बाहेरी । आशा तृष्णा वासना थोरी । पिडिती हरी सर्वदा ॥३॥
आतां सोडवी या सांगासी । न करीं पांगिला आणिकांसी । चोखा म्हणे ह्रषिकेशी । अहर्निशीं मज द्यावें ॥४॥

१०८) हीन याती माझी देवा । कैसी घडे तुझी सेवा ॥१॥
मज दूर दूर हो म्हणती । तुज भेटूं कवण्या रीती ॥२॥
माझा लागतांचि कर । सिंतोडा घेताती करार ॥३॥
माझ्या गोविंदा गोपाळा । करूणा भाकी चोखामेळा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP