संत चोखामेळा - नाम

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


१०९) अखंड नामाचें चिंतन सर्व काळ । तेणें सफळ संसार होय जनां ॥१॥
सर्व हें मायिक नाशिवंत साचें । काय सुख याचें मानितसां ॥२॥
निर्वाणी तारक विठोबाचें नाम । येणें भवश्रम दूर होय ॥३॥
चोखा म्हणे नाम जपें दिननिशी । येणें सदां सुखीं होसी जना ॥४॥

११०) अवघा आनंद राम परमानंद । हाचि लागो छंद माझे जीवा ॥१॥
हेंचि साधन निकें जगासी उद्धार । आणिक साचार दुजें नाहीं ॥२॥
क्रोधांचे न पडतां आघात । वाचे गातां गीत राम नाम ॥३॥
चोखा म्हणे ऐसा भरंवसा नामाचा । जेथें कळिकाळांचा रीघ नाहीं ॥४॥

१११) अवघ्या साधनांचे सार । रामकृष्ण हा उच्चार ॥१॥
येणें घडे सकळ नेम । वाचें नाम जपतांचि ॥२॥
भाग्यें होय संत भेटी । सांगू गोष्ट सुखाच्या ॥३॥
चोखा म्हणे मज आनंद झाला । जीवलग भेटला मायबाप ॥४॥

११२) आतां माझा सर्व निवेदिला भाव । धरोनी एक ठाव राहिलोंसे ॥१॥
जेथें काळाचाहि न पुरे हात । तयाचे पायीं चित्त समर्पिलें ॥२॥
भय नाहीं चिंता कोणता प्रकार । झालोंसे निर्भय नामबळें ॥३॥
चोखा म्हणे आतां लागलासे झरा । विठोबा दातारा याचि नामें ॥४॥

११३) आपुल्या स्वहिता वाचेसी उच्चारा । आळस न करा क्षणभरी ॥१॥
जाईल हा देह वाउगाचि उगा । अभ्रांची छाया जयापरी ॥२॥
असारा साराचे नक पडूं भरी । सार तेंचि धरी हरिनाम ॥३॥
चोखा म्हणे नाम हाचि मंत्र सुगम । नको आन श्रम जाय वांया ॥४॥

११४) आमुचें संचित जैसें जैसें आहे । तेथें तो उपाय न चले कांही ॥१॥
सुखें आठवीन तुमचें हें नाम । न होय तेणें श्रम जीवा कांही ॥२॥
कासया करूं जिवासी आटणी । नाम निर्वाणी तारीतसे ॥३॥
मागेही तरले पुढेंही तरती । चोखा म्हणे चित्तीं दृढ वसो ॥४॥

११५) आम्हां अधिकार उच्छिष्ट सेवन । संतांचे पूजन हेंचि बरें ॥१॥
सुलभ सोपारें विठोबाचें नाम । आणिक नाहीं वर्म दुजें काहीं ॥२॥
आवडीनें नाम गाईन उल्हासें । संतांच्या सहवासें खेळीं मेळीं ॥३॥
चोखा म्हणे माझी आवडी ही देवा । पुरवावी केशवा जन्मोजन्मी ॥४॥

११६) आम्हां न कळे ज्ञान न कळे पुराण । वेदांचे वचन न कळे आम्हां ॥१॥
आगमाची आठी निगमाचा भेद । शास्त्रांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥
योग याग तप अष्टांग साधन । न कळेची दान व्रत तप ॥३॥
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा । गाईन केशवा नाम तुझें ॥४॥

११७) केला अंगिकार । उतरिला माझा भार ॥१॥
अजामेळ पापराशी । तो ही नेला वैकुंठासी ॥२॥
गणिका नामेंचि तारिली । चोखा म्हणे मात केली ॥३॥

११८) कोणासी सांकडें गातां रामनाम वाचें । होय संसाराचें सार्थक तेणें ॥१॥
येणें दो अक्षरीं उतराल पैलपार । नाम निरंतर जप करा ॥२॥
अनंततीर्थराशि वसे नामापाशी । ऐसी साक्ष देती वेदशास्त्रें ॥३॥
चोखा म्हणे हेचि ग्रंथांचे पैं सार । राम हा निर्धार जप करीं ॥४॥

११९) गणिका अजामेळें काय साधन केलें । नामचि उच्चारिलें स्वभावतां ॥१॥
नवल हें पहा नवल हें पहा । अनुभवें अनुभवा देहामाजीं ॥२॥
उच्चारितां नाम वैकुंठीचें पेणें । ऐसें दुजें कोणें आहे कोठें ॥३॥
ब्रम्हाहत्या जयासी घडल्या अपार । वाल्हा तो साचार उद्धरिला ॥४॥
सुफराटें नाम न येचि मुखासी । मारा मारा ध्यासीं स्मरतां झाला ॥५॥
चोखा म्हणे ऐसा नामाचा महिमा । उद्धार अधमा स्त्री शूद्रां ॥६॥

१२०) त्रैलोक्य वैभव ओवाळोनि सांडावें । नाम सुखें घ्यावें विठोबाचें ॥१॥
आणिक साधनें आहेत बहुतांपरी । नामाची ती सरी न पवती ॥२॥
म्हणोनि सुलभ विठ्ठल एक नाम । गातां नाचतां प्रेमें मुक्ति तया ॥३॥
चोखा म्हणे माझा अनुभव उघडा । भवभय पीडा येणें वारे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP