श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते, गुरे राखीत होते; पण विठ्ठल नामानंदात लीन असत. संत चोखाबा गुरे राखीत असताना प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा तेथे येवून गुरे राखीत असे. संत चोखोबा मुळचे मंगळवेढयाचे पुढे ते पंढरीत स्थायिक झाले. संत नामदेवाच्या सहवासात आले तेव्हां संत नामदेवानी त्यांना शिष्यत्व दिले. गुरूकृपेने संत चोखोबा अभंग रचून ईश्वरनामाचा महिमा गाऊ लागले.
एकदा गावकूस बांधण्यासाठी ते मंगळवेढयास गेले तेंव्हा गावकूस कोसळून त्यात चोखोबा गाडले गेले समाधिस्थ झाले. तेव्हां पंढरीहून संत नामदेवराय तिथे गेले. तेव्हां ज्या अस्थितून श्री विठ्ठल श्री विठ्ठल असा ध्वनी येत होता त्या अस्थी गोळा करून पंढरीस आले व महाव्दारात मंदिराच्या समोरच संत नामदेवांनी आपले परमप्रिय शिष्य संत चोखोबांची समाधी उभी केली.