संत चोखामेळा - उपदेश
श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते.
१५०) चंदनाचे संगे बोरीया बाभळी । हेकळी टाकळी चंदनाची ॥१॥
संतांचिया संगें अभाविक जन । तयाच्या दर्शनें तेची होती ॥२॥
चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा । नाहीं तरी भार वाहवा खरा ऐसा ॥३॥
१५१) जन्मला देह पोशिला सुखाचा । काय भरंवसा याचा आहे ॥१॥
येकलेंचि यावें येकलेंचि जावें । हेंचि अनुभवावें आपणाची ॥२॥
कोण हे आघवे सुखाचे संगती । अंतकाळी होती पाठीमोरे ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा । शरणजा सर्वेशा विठोबासी ॥४॥
१५२) जन्मांचे साकडें नाहीं माझे कोडें । जेंणें तुम्हां पडे वोझें देवा ॥१॥
कोणत्याही कुळीं उंच नीच वर्ण । हे मज कारण नाहीं त्याचें ॥२॥
कोण हे आघवे सुखाचे संगती । अंतकाळी होती पाठीमोरे ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा । शरण जा सर्वेशा विठोबासी ॥४॥
१५३) जन्मांचे साकडें नाहीं माझे कोडें । जेंणें तुम्हां पडे वोझें देवा ॥१॥
कोणत्याही कुळीं उंच नीच वर्ण । हे मज कारण नाहीं त्याचें ॥२॥
वैष्णवाचे घरीं लोळेन परवरी । करीं कधिकारी उच्छिष्टाचा ॥३॥
चोखा म्हणे जया घडे पंढरीची वारी । तयाचिये घरी पशुयाती ॥४॥
१५४) जया जे वासना तया ती भावना । होतसे जाणा आदि अंतीं ॥१॥
कामाचे विलग आवरावें चित्त । क्रोधाचा तो ऊत शांतवोनी ॥२॥
ममताही माया दंभ अहंकार । आवरावे साचार शांति सुखें ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरावा संग । तरीच पांडुरंग हाता लागे ॥४॥
१५५) डोळियाचा देंखणा पाहतांच दिठी । डोळाच निघाला देखण्या पोटी ॥१॥
डोळ्याचा देखणा पाहिला डोळा । आपेआप तेथें झांकला डोळा ॥२॥
चोखा म्हणे नवलाव झाला । देखणा पाहतां डोळा विराला ॥३॥
१५६) तुटला आयुष्याचा दोरा । येर वाउगा पसारा ॥१॥
ताकोनी पळती रांडा पोरें । अंती होती पाठमोरे ॥२॥
अवघे सुखाचे सांगती । कोणी कामा नये अंती ॥३॥
चोखा म्हणे फजितखोर । माझें माझें म्हणे घर ॥४॥
१५७) तुम्ही तों सांकडें बहुत वारिलें । आतां कां उगलें बोलूं देवा ॥१॥
आजीवरी पडिलों लिगाडाचे गुंतीं । तेणेंचि फजिती झाली दिसे ॥२॥
झाला दिसे मज मोकळा मारग । धिक्कारिती जग मागें पुढें ॥३॥
चोखा म्हणे ऐसें विपरीत देखिलें । तें साचचि संचलें मनीं माझ्या ॥४॥
१५८) देव म्हणे नारदासी । जाय निर्मळा तीर्थासी ॥१॥
तीर्थ निर्मळे संगमी । स्नान करी नारदस्वामी ॥२॥
नारदाची नारदी सरी । धन्य धन्य मेहुणपुरी ॥३॥
चोखा म्हणे हेंचि देई । स्नान घडो तये ठायीं ॥४॥
१५९) देह बुद्धीवेगळें जें आकारलें । निर्गुण तें सगुणपणें उभें केलें ॥१॥
देव पहा तुम्हीं देव पहा । तुम्हीं देव पहा तुम्हीं आपुले देहीं ॥२॥
उघडाचि देवो जगीं प्रकाशला । नागव्याक्तानें देव ग्रासीला ॥३॥
चोखा म्हणे नागवे उघडे झाले एक । सहज मीपण देख मावळले ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : July 10, 2014
TOP