संत चोखामेळा - करुणा

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


६६) कवणावरी आतां देऊं हें दूषण । माझें मज भूषण गोड लागे ॥१॥
गुंतलासे मीन विषयाचें गळीं । तैसा तळमळी जीव माझा ॥२॥
गुंतला हरिण जळाचिया आशा । तो गळां पडे फांसा काळपाश ॥३॥
वारितां वारेना सारितां सारेना । कितीसा उगाणा करूं आतां ॥४॥
चोखा म्हणे ऐसा पडलों प्रवाहीं । बुडतसों डोहीं भवाचिया ॥५॥

६७) कशासाठीं तुम्हां शरण रिघावें । आमुचें वारावें सुख दु:ख ॥१॥
आमुचें संचित भोग क्रियामान । तुमचें कारण तुम्हीं जाणा ॥२॥
आमुचा तों येथें खुंटलासे लाग । न दिसे मारग मोकळाचि ॥३॥
चोखा म्हणे काय करूं आतां । तुमची हे सत्ता अनावर ॥४॥

६८) कळेल तैसे बोल तुजचि बोलेन । भीड मी न धरीन तुझी कांहीं ॥१॥
काय करूं देवा दाटलों जाचणी । न या चक्रपाणी सोडवण्या ॥२॥
कोठवरी धांवा पोकारूं केशवा । माझा तंव हेवा खुंटलासे ॥३॥
चोखा म्हणे आतां पुरे चाळवण । आमुचें कारण जाणों आम्हीं ॥४॥

६९) काय हें दु:ख किती ह्या यातना । सोडवी नारायणा यांतोनियां ॥१॥
जन्मावें मरावें हेंचि भरोवरी । चौर्‍यांशीची फेरी भोगाभोग ॥२॥
तुम्हांसी करुणा न ये माझी देवा । चुकवा हा गोवा संसाराचा ॥३॥
चोखा म्हणे माझा निवारावा शीण । म्हणोनी लोटांगण घाली जीवें ॥४॥

७०) काय हें मातेसी बाळें शिकवावें । आपुल्या स्वभावें वोढतसे ॥१॥
तैसाच प्रकार तुमचीये घरीं । ऐसीच निर्धारी आली वाट ॥२॥
तेचि आजी दिसे वोखटें कां झालें । संचिताचें बळें दिसे ऐसें ॥३॥
चोखा म्हणे हा तो तुम्हां नाहीं बोल । आमुचें सखोल कर्म दिसे ॥४॥

७१) कांहो केशिराजा दूजे पैं धरितां । हें तों आश्रर्यता वाटे मज ॥१॥
एकासी आसन एकासी वसन । एक तेचि नग्न फिरताती ॥२॥
एकासी कदान्न एकासी मिष्टान्न । एका न मिळे कोरान्न मागतांचि ॥३॥
एकासीं वैभव राज्याची पदवी । एक गांवोगांवीं भीक मागे ॥४॥
हाचि न्याय तुमचें दिसतो कीं घरीं । चोखा म्हणे हरी कर्म माझें ॥५॥

७२) कांहीं तरी अभय न मिळे उत्तर । ऐसे कां निष्ठुर झालां तुम्ही ॥१॥
मी तों कळवळोनी मारितसे हांक । तुम्हां पडे धाक कासयाचा ॥२॥
बोलोनी उत्तरें करी समाधान । ऐवढेंचि दान मज द्यावें ॥३॥
चोखा म्हणे माझी पुरवावी आस । न करी उदास माझे माये ॥४॥

७३) किती धांवाधांवी करावी कोरडी । न कळें कांहीं जोडी हानि लाभ ॥१॥
जे जे करितों तें तें फलकट । वाउगेंचि कष्ट दु:ख भोगी ॥२॥
निवांत बैसोनी नामाचें चिंतन । करूं जातां मन स्थिर नाहीं ॥३॥
दान धर्म करूं तो नाहीं धन पदरीं । जन्माचा भिकारी होउनी ठेलों ॥४॥
चोखा म्हणे ऐसा करंटा मी देवा । काय तुझी सेवा करूं आतां ॥५॥

७४) कोण माझा आतां करील परिहार । तुजवीण डोंगर उतरी कोण ॥१॥
तूं वो माझी माय तूं वो माझी माय । दाखवीं गे पाय झडकरी ॥२॥
बहु कनवळा तुझिया गा पोटीं । आतां नको तुटी करूं देवा ॥३॥
चोखा म्हणे मज घ्यावें पदरांत । ठेवा माझें चित्त तुमचें पायीं ॥४॥

७५) जगामध्यें दिसे बरें की वाईट । ऐसाचि बोभाट करीन देवा ॥१॥
आतां कोठवरी धरावी हे भीड । तुम्हीं तो उघड जाणतसां ॥२॥
ब्रीदाचा तोडर बांधलासे पायीं । त्रिभुवनीं ग्वाही तुमची आहे ॥३॥
चोखा म्हणे जेणें न ये उणेपण । तेंचि तें कारण जाणा देवा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP