संत चोखामेळा - उपदेश
श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते.
१७०) बैसोनि निवांत करीन चिंतन । काया वाचा मनसहित देवा ॥१॥
नामाचा आठव हेचि सोपें वर्म । अवघें कर्माकर्म पारूषती ॥२॥
या परतें साधन आन कांहीं नेणें । अखंड वाचे म्हणे रामकृष्ण ॥३॥
सुलभ हा मंत्र तारक जीवासी । येणें भवासी उतार होय ॥४॥
चोखा म्हणे मज सांगितलें कानीं । राम कृष्ण वाणीं जप सदा ॥५॥
१७१) याचिया छंदा जे लागले प्राणी । त्याची धुळधाणी केली येणें ॥१॥
याचा संग पुरे याचा संग पुरे । अंतरी ते उरे हांव हांव ॥२॥
स्वार्थ परमार्थ घातिलासे चिरा । किती फजीतखोरा बुझवावें ॥३॥
न जावें तेथें हाटेची जाय । करूं नये तें करीं स्वयें न धरीं कांही ॥४॥
चोखा म्हणे तुज तुझीच आण । होई समाधान घटिकाभरी ॥५॥
१७२) लिहिलें संचितीं न चुके कल्पांतीं । वायां कुंथाकुंथीं करूनी काय ॥१॥
जन्ममरण सुखदु:खाचें गांठोडें । हें तों मागें पुढें बांधलेंसे ॥२॥
निढळींची अक्षरे साच तेचि खरे । आतां वोरबार करील कोण ॥३॥
चोखा म्हणे आमुची जैशी कां वासना । तैशीच भावना होत जात ॥४॥
१७३) वाढलें शरीर काळाचें हें ग्वाजें । काय माझें तुझें म्हणतोसी ॥१॥
बाळ - तरुण दशा आपुलेच अंगीं । आपणची भोगी वृद्धपण ॥२॥
आपुला आपण न करी विचार । काय हे अमर शरीर याचें ॥३॥
चोखा म्हणे भुलला मोहळाचे परी । मक्षिके निर्धारी वेढियेला ॥४॥
१७४) वांया हांव भरी गुंतले कबाडी । करिताती जोडी पुढीलाची ॥१॥
ऐसे तें वोंगळ देख आंधळे । भोगिताती बळें सुख दु:खं ॥२॥
नाशिवंत अवघे मानियेलें साच । करिती हव्यास जन्मोजन्मीं ॥३॥
चोखा म्हणे यासी काय उपदेश । भोगी नर्कवास कल्पवरी ॥४॥
१७५) वांया हांव भरी नका घालूं मन । चिंतावे चरण विठोबाचे ॥१॥
हेंचि साधन साराचें सार । येणें भवपार उतरती ॥२॥
न करी आळस नामाचा क्षणभरी । कामक्रोध दुरी पळे येणें ॥३॥
दया क्षा शांति संतांची संगती । यां परती विश्रांती दुजी नाहीं ॥४॥
चोखा म्हणे दृढ धरावा विश्वासा । नामाचा निजध्यास सर्वकाळ ॥५॥
१७६) संतांचा अनुभव संतची जाणति । येर ते हांसती अभाविक ॥१॥
नामाचा प्रताप प्रल्हादचि जाणें जन्म मरण जेणे खुंटविलें ॥२॥
सेवेचा प्रकार जाणे हनुमंत । तेणें सीताकांत सुखी केला ॥३॥
सख्यत्वें पूर्णता अर्जुना बाणली । ऐक्य रूपें चाली मिरवली ॥४॥
चोखा म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार । तेथें मी पामर काय वानूं ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : July 10, 2014
TOP