संत चोखामेळा - करुणा
श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते.
५६) आतां कासया हा दाखवितां खेळ । म्यां तंव सकळ जाणितला ॥१॥
जेथें ब्रम्हादिक वेडे पिसे झाले । न कळे वहिलें तयांलागीं ॥२॥
कोणासी हा पार न कळे तुमचा । काय बोलों वाचा कीर्ति तुमची ॥३॥
चोखा म्हणे तुमचा अवित हा खेळ । भुललें सकळ ब्रम्हांडचि ॥४॥
५७) आतां कणकण न करी वाउगी । होणार तें जगीं होउनी गेलें ॥१॥
दारीं परवरी झालोसे पोसणा । तुम्हांसी करुणा न ये कांहीं ॥२॥
होयाचें ते झालें असो कां उदास । धरोनिया आस राहों सुखी ॥३॥
चोखा म्हणे मज हेंचि बरें दिसे । न लावीं पिसें जीवा कांही ॥४॥
५८) आतां याचा अर्थ (संग) पुरे पुरे देवा । येऊं द्या कनवाळा तुम्हांलागी ॥१॥
गुंतलोंसे काढा यांतोनी बाहेरी । माझें तो हरि कांही न चाले ॥२॥
वारंवार करुणा करितों देवराया । कां न ये कनवाळा तुम्हां लागीं ॥३॥
चोखा म्हणे आतां न करा उदास । पुरवावी आस मायबापा ॥४॥
५९) आतां कोठवरी । भीड तुमची धरूं हरि ॥१॥
दार राखीत बैंसलों । तुम्ही दिसे मोकलिलों ॥२॥
ही नीत नव्हे बरी । तुमची साजे तुम्हा थोरी ॥३॥
चोखा म्हणे काय बोलों । आमुचे आम्ही वायां गेलों ॥४॥
६०) आतां कोठवरी करूं विवंचना । कां हे नारायणा तुम्हां न कळे ॥१॥
सांपडलों जाळीं गुंतलोंसे गळी । जीव हळहळीं वाऊगाचि ॥२॥
कामक्रोधांचे सांपडलों हातीं । बहुत फजीति होय तेणें ॥३॥
नेणों कैसें दु:ख पर्वतायेवढें । सुख राई पाडें झालें मज ॥४॥
चोखा म्हणे तुमचें नाम न ये वाचे । बहु संकल्पाचें वोझें माथा ॥५॥
६१) आन साधनें सायास । कांहीं न करीं आयास नामाचाचि उल्हास । ह्रदयीं वास असावा ॥१॥
हेचि मागतसे देवा । हीच माझी भोळी सेवा । पायांसी केशवा । हाचि हेवा मानसीं ॥२॥
जन्म देई संताघरीं । उच्छिष्टाचा अधिकारी । आणिक दुजी थोरी । दारीं परवरी लोळेन ॥३॥
नका मोकलूं दातारा । विनंती माझी अवधारा । अहो रुक्मादेवीवरा । आवरा पसारा चोखा म्हणे ॥४॥
६२) आपुल्या आपण सांभाळोनी घ्यावें । आहे नाहीं ठावें तुम्हां सर्व ॥१॥
वायांचि करणें लौकिकाचा गोवा । कोठवरी देवा बोलणें हें ॥२॥
अंगा नाहीं आलें तंव तें साहालें । खादलें पचलें तरी तें हित ॥३॥
चोखा म्हणे तुमचें तुम्हासी सांगणें । माझें यांत उणें काय होतें ॥४॥
६३) आम्ही कोणावरी सत्ता । करावी बा पंढरीनाथा । होईल साहाता दुजा । तत्त्वता तो सांगा ॥१॥
तूंचि बळिया शिरोमणि । आहेसि या त्रिभुवनीं । देवाधिदेव मुगुटमणि । कींव भाकणें यासाठीं ॥२॥
केला माझा अंगिकार । आतां कां करितां अव्हेर । तुमचा तुम्ही साचार । करा विचार मायबापा ॥३॥
जन्मोजन्मींचा पोसणा । तुमचाचि नारायणा । भाकितों करुणा । आना मना चोखा म्हणे ॥४॥
६४) इतुकेंचि देई रामनान मुखीं । संतांची संगती सेवा सार ॥१॥
निरंतर घोष जयाचे मंदिरीं । तयाचिये घरी सुखे मज ॥२॥
उच्छिष्ट धणिवरी पोटभरी घाये । दुजी नको सोय देवराया ॥३॥
चोखा म्हणे माझी पुरवावी आळी । माय तूं माउली कृपाळु देवा ॥४॥
६५) करोनियां दया । सांभाळा जी देवराया ॥१॥
मी तो पतीत पतीत । तुमचाचि शरणांगत ॥२॥
लाज येईल तुमचे नांवा । मज उपेक्षितां देवा ॥३॥
आपुलें जतन । करा अभय देवोन ॥४॥
चोखा म्हणे हरि । आतां भीड न धरीं ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : July 10, 2014
TOP