उत्तरार्ध - अध्याय २५ वा

हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.


भूसत नरकाख्य असुर तो प्राग्ज्योतिषपुरीं वसे क्रूर, ।
देव ब्राम्हाण पीडी, दु:सह सर्वांसही जसा धूर. ॥१॥
करिता झाला तेजें लोकांतिल रत्नमात्र तो गोळा, ।
गंधर्वादि सुकन्या एकशत सहस्रही नृपा ! सोळा. ॥२॥
किंबहुना सर्वांला जी पूज्या अदिति माय शक्राची, ।
मणिकुंडलें तिचीं ने, वदवेना रीति फार वक्राची. ॥३॥
ये द्वारकापुरीतें शक्र प्रभुला स्वदू:ख सांगाया, ।
भेटोनि म्हणू, “कृष्णा ! न करिसि अद्यापि भस्म कां गा ! ॥?॥४॥
या गरुडीं बैस कसा, स्मरत्यांच्या नरकनाशना ! चाल. ।
वदलों सुरांसि, ‘गाउनि केशवकृत नरकनाश नाचल.’ ॥५॥
तुजवांचुनि सर्वांसहि नरकासुर हा अवध्य, घननीला ! ।
त्वां या अरिला मारुनि, सत्वर द्यावा प्रमोद जननीला. ” ॥६॥
पापाचारा नरका प्रभु माराया करी प्रतिज्ञा त्या, ।
ज्या रक्षाया नलगे पळ बा ! राया ! करीप्रति ज्ञात्या. ॥७॥
भूमिनिदेशें समरीं नरकासुर भूमिपुत्र माराया, ।
भूम्यंश सत्यभामा घे संगें सत्यकाम बा ! राया ! ॥८॥
‘गरुडीं सस्त्रीक प्रभु बसुनि नभीं जेविं, तेविं न निराजे ।
सौदामिनीसह कनकनगश्रृंगीं मेघ,’ म्हणति कविराजे. ॥९॥
कृष्णसुरेश व्योमीं रविविधुसे जाहले जना दिसतें, ।
जे देवर्षि, स्तविती त्या मायामानुषा अनादिस ते. ॥१०॥
शक्र स्वर्गीं जावुनि, चिंतित सुरकार्यसिद्धिला ठेला, ।
प्रभु, नीलवर्ण अर्णव जो, त्याच्या उत्तरीं तटीं गेला. ॥११॥
पाहे प्राग्ज्योतिष पुर, ज्याहुनि संपन्न नाक भासेना, ।
त्याच्या द्वारीं मोटी असुरांची देवदेवहा सेना. ॥१२॥
येतां निकट प्रभुवरि टाकी दानव महोग्र मुरु शक्ती; ।
खंडी क्षुरप्र सोडूनि, तत्काळ तितें मुकुंद उरुशक्ती. ॥१३॥
टाकी अत्युग्र गदा, तोडी तीतेंहि अर्धचंद्रसरें, ।
मुरुदानवशिर खंडी भल्लें जगदीश, जेविं पद्म करें. ॥१४॥
मुरुपाश षट्‌सहस्त्र च्छेदुनि, मारूनि तें महासैन्य, ।
कृष्ण शिलासंघातें लंघी, देवूनि दानवा दैन्य, ॥१५॥
असुर निसुंद महाबळ, उग्र हयग्रीवहीदुजा भारी, ।
रोधिति मार्ग निजबळें, ज्यांपासुनि होय भीत जंभारी ॥१६॥
बैसुनि निसुंद सुरथीं देवावरि उग्र बाण दश सोडी. ।
प्रभु सप्तति बाणांहीं शत्रुशरांतें न पावतां तोडी. ॥१७॥
त्याचे सैनिक दानव शरजाळें झांकिती, करुनि वेगा, ।
तत्सत्वें ह्रदयीं तो साधुखगांचा महातरु निवे, गा ! ॥१८॥
एकैका असुराच्या मर्मीं प्रभु पांच पांच शर हाणी, ।
योजुनि पर्जन्यास्त्रें, क्षतजें रंगेंतसेचि पर न्हाणी. ॥१९॥
मेले, बहुत पळाले, पाहुनि करि, म्हणुनि ‘हा !’ निसुंद रया, ।
झांकी शरजाळानें प्रभुसि रणीं, गणुनि हानि सुंदर, या. ॥२०॥
झांकुनि रविला, पाडी अरिकृत शरवृष्टि अंधकारा ती, ।
जोजी सावित्र प्रभु जेविं परीं चक्षु अंधकाराती. ॥२१॥
छेदुनि शरवृष्टीतें, विरथ करुनि तो निसुंद भल्लानें, ।
शिर हरुनि, पाडिला, हो ! पर मल्ल जसा प्रगल्भ मल्लानें. ॥२२॥
जो एकलाचि सर्वां देवांसीं रण सहस्त्रवर्ष करी, ।
साहे सुखें सुरांचें शरवर्ष, जसेंचि मेघवर्ष करी: ॥२३॥
पडतां निसुंद, धांवे असुर हयग्रीव, तो शिळा मोटी ।
लोटी प्रभुवरि; करिती तुकडे जगदीशशर तिचे कोटी. ॥२४॥
सैन्य हयग्रीवाचें वधिलें प्रभुनें अनेक शस्त्रांहीं; ।
भरिलें रजीं विभूषित रत्नांहीं जें अमूल्य वस्त्रांहीं, ॥२५॥
सैन्यविनाशें क्षोभे, तरु उपडी, स्थूळ जो दशव्याम, ।
त्या मर्दाया धांवे, ज्याचें काळासि भीति दे नाम. ॥२६॥
शतखंड महातरुतें करि हरि खर शर अनेक सोडून, ।
हाणी बाण प्रभु, तो जाय तयाच्या उरासि फोडून. ॥२७॥
सबळ हयग्रीवाच्या निधनें पावे अनंत हरिख पवी; ।
उग्र विरूपाक्ष असुर जो, त्यासि रणंगणांत हरि खपवी. ॥२८॥
प्राग्ज्योतिषपुरनिकट प्रभु दानव आठ लक्ष तो खपवी, ।
त्या शक्रारिविनाशें जडही पावे अपार तोख प वी. ॥२९॥
श्रीकृष्णें वाजविला, दानव मर्दूनि पांचजन्य दर. ।
खवळे नरक; न ज्याला मृत्युदर, असेल काय अन्यदर ? ॥३०॥
ज्यासि सहस्त्र हय, अशा स्वरथीं बैसे त्रिनल्वपरिमाणी, ।
ज्याचें दर्शन अमरीनयनीं ने अमरवदनगत पाणी. ॥३१॥
बहुलक्ष असुर वीर, प्रबलतर, अनेकवेषशस्त्रधर, ।
घेवुनि, नरकासुर ये प्रभुवरि, पविपाणिवरि जसाचि धर. ॥३२॥
रणतूर्यनादमिश्रित वीरांचे सिंहनाद, वाजींचे, ।
रथचक्रांचे, अगणित झाले ध्वनि मत्तहस्तिराजींचे, ॥३३॥
भूमिसुताच्या सेना, प्रभुवरि पावुनि जयासि हर्षाया, ।
लागति विविधें अमितें खर शस्त्रें एकदाचि वर्षाया. ॥३४॥
श्रीकृष्ण स्वाभिमुखा सर्वांही दैत्यदानवां खाणी, ।
तों तो निवोनि मारण, तप्त जसा शैत्यदान, वाखाणी. ॥३५॥
मेले बहु धन्य, पळुनि गेले अशुभावहा ललाटांचे. ।
प्रभुहेतिचा गुण गुरु, न अमृताब्धीच्या पहाल लाटांचे. ॥३६॥
निजसैन्यक्षयभंगक्षुब्ध नरक विष्णुसीं करी समर, ।
हरिसीं भिडतां, कवि कां न म्हणतिल प्राकृता करीस ‘मर.’ ॥३७॥
नाशति ज्याच्या नामें नरक अनेकहि, म्हणोनियां  ‘हाय !’ ।
त्या साक्षात् विष्णुपुढें करिल नरक एक बापुडा काय ? ॥३८॥
योजी नरक महास्त्र, प्रभुवर लीलेंकरूनि तें शमवी, ।
प्रेक्षकसुरमति मधुसा मधुसूदनसह भिडोनि तो भ्रमवी. ॥३९॥
कृष्णें बाणसहस्त्रें समरीं वधिले सह्स्त्र जे वाजी, ।
जाणों निश्चळ होतां, म्हणती ते प्रभुशरांसि ‘जेवा, जी !’ ॥४०॥
प्रभुनें सूत, शिर, ध्वज, कवचहि, खंडूनि, पाडिला उघडा,।
सुचलें, रुचलें, शूलग्रहणचि तेव्हां धरासुता सुघडा. ॥४१॥
टाकी प्रभुवरि रागें नरक ज्वाळाकराळशूळातें, ।
जो जाळाया क्षम सुरसैन्यातें, अग्नि जेविं तूळातें. ॥४२॥
शूल च्छेदुनि कृष्णें, केला नरकासुर द्विधा चक्रें; ।
पडला धडधड, जाणों वज्रें पर्वत विदारिला शक्रें. ॥४३॥
सुत पडतां, भूमित, पुढें ठेवुनि तीं कुंडलें, म्हणे हरिला, ।
“बाळकसा क्रीडसि, कीं त्वंचि दिला पुत्र, तो पुन्हां हरिला. ॥४४॥
त्वां जेविं लक्षिला हा, ऐसी याची प्रजा न लक्षावी, ।
प्रभुनें करुणा करुनि, प्रणता जनता सदैव रक्षावी,” ॥४५॥
भूमिप्रार्थित विभु दे भगदत्ता नरकनंदना राज्य; ।
धनरत्नराशिकन्या प्रेषी स्वपुरीप्रति प्रभु प्राज्य. ॥४६॥
मणिपर्वत पक्षिवरीं वाहुनि, तेथूनि जाय नाकातें, ।
शक्रातें बहु सुखवी, दूर तयाच्या करूनि धाकातें. ॥४७॥
स्वस्थानीं स्थापि प्रभु मणिपर्वत मेरुश्रृंग, भवनातें ।
शक्राच्या जाय, करी अत्युज्ज्वल अदितिगर्भभव नातें. ॥४८॥
देवुनि शक्रकरीं तीं मातेचीं कुंडलें, तयासहित ।
जाय अदितिच्या भवनीं, करुनि, हरुनि सर्वसुरभयास, हित. ॥४९॥
तीं दिव्य कुंडलें दे, कृष्णासह नमुनि शक्र मातेतें; ।
तीच्या हृदया द्रववी, लंघिति सत्पुत्र न क्रमा ते, तें. ॥५०॥
नमन करि सत्यभामा, करुनि पुढें त्या शचीस, सासुस; ती ।
दे आशी, नांदाया कांतसहित सुचिरकाळ सासु सती ॥५१॥
श्रीकृष्णातें शक्रें दिव्यांबरभूषणें दिलीं नव्यें, ।
दिधलीं पुलोमजेनें प्रेमें सत्राजितीसही भव्यें. ॥५२॥
आज्ञा घेउनि, कृष्णप्रभु येतां, नंदनीं वनीं पाहे ।
त्या पारिजाततरुतें, मणिवेदीसह खगेश्वरीं वाहे. ॥५३॥
ये द्वारकेसि भगवान्, संपादुनि विजय, हर्षवि स्वजन, ।
निववी हें चरित,  जसें गंगांबुजपत्रनिर्मित व्यजन. ॥५४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 01, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP