सायकतल्पशयानश्रीगंगानंदनें महाप्राज्ञा ।
कृष्णसखा, ‘वद धर्मा प्रभुचें माहात्म्य,’ केलि हे आज्ञा. ॥१॥
अर्जुन धर्मासि म्हणे, “गेलों संबंधिजन पहायाला ।
श्रीद्वारकेंत, राजा ! प्रभुसीं क्रीडत सुखें र्रहायाला. ॥२॥
प्रभु सोमयाग करि, घे दीक्षा राजा ! महामुनिस्तुत्या ।
सुत्यागवद्वरिष्ठा, ज्यामध्यें एक पात्र बा सुत्या. ॥३॥
त्या यज्ञमंडपीं प्रभु दीक्षित जों सुद्विजव्रजीं आहे, ।
तों “रक्ष, रक्ष,” ऐसें वदत, ब्राम्हाण पुढें उभा राहे. ॥४॥
कृष्ण म्हणे, “विप्रवरा ! भय न धरीं, रक्षितों, न हो लोल, ।
कोणापासुनि तुज भय काय ? कळोंदे मज, स्वयें बोल.” ॥५॥
“म्हणवितसे, मदपत्यें तीन तळीं करुनि शुष्क, राक्षस ‘हा !’ ।
‘प्रारब्धकर्म,’ न म्हणसि एक प्रभु तूंचि पुष्कराक्ष, ‘सहा.’ ॥६॥
मदपत्य चतुर्थ तरी श्रीकृष्णा ! त्वां जपोनि रक्षावें. ॥७॥
श्रीकृष्णा ! धांव कसा ! बहु निकट ब्राम्हाणीप्रसवकाळ, ।
बा ! चवथा, तरि रक्षुनि देचि मज, गिळो निशाचर न बाळ.” ॥८॥
मज देव म्हणे, “दीक्षा वरिली म्यां, व्रत कधीं न मोडावें, ।
सर्वांहि अवस्थांत ब्राम्हाण रक्षूनि, सुयश जोडावें.” ॥९॥
वदलों मी, “मज कृष्णा ! ब्राम्हाणसंरक्षणार्थ योजावें, ।
यश करिल, या सख्यातें त्वाम अजिता ! निजभुजांत मोजावें.” ॥१०॥
कृश्ण स्मित करुनि म्हणे, “विप्रातें रक्षिसील ?” हे वाचा ।
बहु लाजवी, नृपा ! कीं मी गोप सखा न वासुदेवाचा. ॥११॥
मज लज्जा झाली, हें जाणोन, प्रभु म्हणे, “न लाजावें, ।
अवनीं शकसिल, तरि तूं द्याया यश आपणा, मला, जावें, ॥१२॥
रामप्रद्युम्नांतें सोडुनि, वरकड कुरूत्तमा ! अवघे ।
युयुधानप्रभृति अहितसैन्यतृणाचे समागमें दव घे.” ॥१३॥
कृष्णाज्ञेनें घेवुनि वृष्णिबळ, पुढें करूनि तो विप्र, ।
गेलों तद्धामातें, धर्मा ! मी द्वारकेहुनी क्षिप्र. ॥१४॥
ग्रामाजवळि उतरलों, करुनी स्वस्था चमू समग्रा मी, ।
मग सात्यकिप्रमुख भट घेवुनि, शिरलों मनोरम ग्रामीं. ॥१५॥
तों उत्पात निशीथीं झाले, उल्का पडे नृपा ! मोटी, ।
सेना सिद्ध करविली, ती वेळा समजली मला खोटी. ॥१६॥
सर्व रथावरि चढलों, तों तो द्विज ये, म्हणे, “प्रसवकाळ ।
स्त्रीचा आतांचि असे, रक्षा सावधपणें सकळ बाळ.” ॥१७॥
बहु सावधान आम्ही झालों, राया ! मुहूर्त जों गेला, ।
“हरिला ! हरिला !” ऐसा आक्रोश द्विजगृहीं जनें केला. ॥१८॥
त्यामाजि दीनरोदनरव सहसा ऐकिला, अगा ! राजा ! ।
रक्षित होतों देउनि विप्राच्या अभय मी अगारा ज्या. ॥१९॥
तों सहसा आयकिलें आम्ही रोदन नभांत बाळाचें, ।
वपु देखिलें न शिशुचें, न तयाही विप्र्वंशकाळाचें. ॥२०॥
जेणें चवथेंहि बळें विप्राचें तोक जन्मतां हरिलें, ।
तो राक्षस रोधाया आम्हीं नभ तें शरव्रजें भरिलें. ॥२१॥
सर्व दिशा शररुद्धा केल्या, कोंडावयासि चोरा ज्या, ।
तेणें नेलाचि नभीं, न दिसों देवूनि, बाळ तो, राजा. ॥२२॥
विप्र करी आर्त स्वर, कार्तस्वरपटसखा मला गांजी, ।
कां जी ! धिक्कारीना ? ‘दुध देतों’ म्हणुनि अर्पितां कांजी. ॥२३॥
यादव हतसंकल्प, स्पष्टचि झालों विनिष्टचेतन मी, ।
त्या विप्रातें शापत्रासें, धिक्कृति दहांत घेत, नमीं. ॥२४॥
ब्राम्हाण म्हणे, “धनंजय हें जरिहि असत्य नामपद, लासी. ।
शिशु रक्षिला न, ‘रक्षिन’ ऐसें कैसें मृषाचि वदलासी ? ॥२५॥
आइक, रे ! तुज कथितों, जें तुजला योग्य, तेंचि; मन, पार्था ! ।
न तुझें शुचि, कीं करिसी प्रभुसीं स्पर्धा सदैव अनपार्था. ॥२६॥
तूं काय ! अमितकर्मा काय श्रीकृष्ण ! यासह स्पर्धा ! ।
तद्वामपदनखाचा गुणमहिमा न सगळा, नसे अर्धा. ॥२७॥
येता कृष्णप्रभु, तरि अत्याहित हें कधीं म आतळतें, ।
रे ! सुतशोककटाहीं अति मृदु मम मान, करूनि ‘आ,’ तळतें. ॥२८॥
‘रक्षिन’ म्हणोनि, रक्षी बुध, धर्माचें चतुर्थ फळ घेतो. ।
रक्षि न जो. अघगिरिच्या चवथ्या श्रृंगीं न काय वळघे तो ? ॥२९॥
‘रक्षिन’ म्हणुनि न रक्षण केलें, मज भरंवसा दिला लटिका. ।
व्यर्था तव प्रतिज्ञा, जसि पाकमिषें विभूतिची वटिका. ॥३०॥
निष्फळ गांडीव तुझें, व्यर्थ तुझें वीर्य, यश तुझें मोघ, ।
पोकळ वीराकार स्पष्ट तव, जसा मृगांबुचा ओघ.” ॥३१॥
किमपि न वदतां, आलों परतुनि, लाजुनि मनांत आपलिया; ।
निसटे यादवसेना, याद वसेना हृदांत तापलिया. ॥३२॥
समजे द्वारवतींत प्रभु, पाहुनि मन्मुखा अवनतातें; ।
समजावी, खेद हरी, यापरि केलें नसे अवन तातें. ॥३३॥
सांत्वन करि विप्राचें, स्वरथीं हरिराज योजवी, राया ! ।
अतुळ प्रताप हा, बा ! कोणासींही न मोज वीरा या. ॥३४॥
स्वरथीं सद्विज बैसे, वरि चढल्या दारुका तळीं उतरी, ।
मज सारथि करि, वरि जो मम सारथिता, भवांत जी सुतरी. ॥३५॥
दोघे सखे निघालों उत्तर दिग् धरुनि, तोहि होय तिजा, ।
ज्या विप्राचें सद्यश वदलें शरदिंदुलाहि “हो यति, जा.” ॥३६॥
गेलों क्षिप्र विलंघित बहु नग, विपिनें, सरोवरें, सरिता; ।
रूपी सागर वंदी, सत्कारि, स्तुतिहि फार जो करिता. ॥३७॥
परि कृष्ण म्हणे, “सिंधो ! निजतोयावरुनि शीघ्र दे वाट” ।
जलधि म्हणे, “तूं रक्षिसि मर्यादा, म्हणुनि सुर तुझें भाट, ॥३८॥
तूं लंघिसील, तरि नृप इतरहि लंघावया पहातील; ।
प्रभुनेंचि सेतुलंघन करितां, पर कां उगे रहातील ? ॥३९॥
यमुनेनें जेंवि दिली, देतों शोषोनि जळ, तशी वाट, ।
यादासि मदुदरीं तूं ‘आला भेटावया शशी’ वाट.” ॥४०॥
कृष्ण म्हणे, “नररत्नें नेणतिल, न पावसीत शोषातें, ।
सत्य असो मद्वरवच, कोणी लावू न यासि दोषातें. ॥४१॥
स्तंभित जळ करुनि, मला किंवा सुब्राम्हाणासि दे अयन, ।
नय नग्नत्वें न बुडे सुरतीं, धरि अणुहि न त्रपा नयन.” ॥४२॥
“जी जी आज्ञा प्रभुची, बहु मान्या मज,” असें वदे, तोया ।
स्तंभित करी, तिळभरिहि अजितरथभरें लवों न दे तो या. ॥४३॥
कैलास जयंत, तथा विजयंतहि, रजत, नील, नग, वाटे, ।
गिरि, चंद्रकूट, मेरुहि, भेटति; आश्चर्य कां न मग वाटे ? ॥४४॥
“किं कुर्म” असें पुसती, कृष्ण म्हणे “विवरमार्ग ओपावा.”।
देती रथपथ सप्तहि, कीं प्रभु वाग्लंघनें न कोपावा. ॥४५॥
नगपंक्तींत धडक रथ चाले, घनराजिमाजि जेंवि रवी; ।
स्पर्शें कळे असें तम मग लागे, तुरगतेज जें विरवी. ॥४६॥
कष्टें चालति वाजी, पंकसम तम क्षमावरा ! दाट, ।
वाट क्रमूं न दे तें, मन उपदेशा जसें, जया काट. ॥४७॥
लागे महानगाचा मग मार्गामाजि अंधकार गडी, ।
त्या चक्र तसें प्रभुचें, शूळ जसें काय अंधका, रगडी, ॥४८॥
चालविले तिमिराचळ भेदुनि, जे निष्प्रयत्न, ते वाजी; ।
चक्रद्युति बहु म्हणती हिमरजतकनकनगांसि, ‘तेवा जी !’ ॥४९॥
तम नाशुनि, प्रकाशुनि नभ, दाखविला हयांसि अच्छपथ; ।
चक्रापुढें तिमिर किति ? काळहि लंघील बा ! न तच्छपथ. ॥५०॥
मरण तमीं झालें, मग जन्म पुन्हा मतिस वाटलें होतें; ।
बाहेर तिमिर तैसें कश्मळ हृदयांत दाटलें हो ! तें. ॥५१॥
गेलों दूर पुढें; तों झालें आश्चर्य एक बापा ! हें, ।
मी अत्यद्भुत गगनीं शुचि पुरुषाकार तेज बा ! पाहें, ॥५२॥
आम्हांसि रथीं स्थापुनि, अमित चमत्कार आयते ज्यांत, ।
आर्या ! धर्मा ! सहसा त्या हा यदुराय जाय तेजांत. ॥५३॥
एक मुहूर्तें, तेजोनिधिमाजि शिंरोनि, हा निघे, राया ! ।
त्या विप्रातें न पुन्हा स्वप्नांतहि पुत्रहानि घेराया. ॥५४॥
रिक्त कवींच्या व्हाया, आणी द्विजभवचतुष्टया, दवती; ।
तप्त तद्द्टष्टि निववि शरणागतकवच तुष्ट यादव ती. ॥५५॥
हर्षे विप्र, प्रभुनें दिधलें नंदन विलोकितां अवघे; ।
माझें तो अतिविस्मित करुनि हरुनि ह्रदय रुक्मिणीधव घे. ॥५६॥
द्वारवतीतें परतुनि, अर्धहि दिन न भरतां, नृपा ! आलों, ।
झालों विस्मित मी, या प्रभुच्या चरितें महामृतें धालों. ॥५७॥
ब्रम्हाण्यें श्रीकृष्णें ससुत द्विज मंदिरासि आणून, ।
न्हाणून, अलंकारुन, जेवविला शंभुरूप जाणून, ॥५८॥
बाळांसि बाळलेणें देवुनि, करुनि प्रहृष्ट धनदानें, ।
फार निवविला ब्राम्हाण, जैसा चातक, मयूर, वनदानें. ॥५९॥
सुरथीं बसवुनि, विप्र, स्वग्रामातें नमूनि पाठविला, ।
महिमा दिसांत शतदा या प्रभुचा म्यां मनांत आठविला. ॥६०॥
पुसतां, मज कृष्ण कथी तो श्वेतद्वीपपतिमहायास, ।
शिशि हरुनि दे द्विजातें, परमाश्चर्या मला पहायास. ॥६१॥
जो यज्ञाचा भोक्ता श्रीश्वेतद्वीपति, तयाहि सदा ।
आश्चर्यभूत भगवान् कृष्ण, असें तत्व या कथेंत वदा.” ॥६२॥