उत्तरार्ध - अध्याय ४२ वा

हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.


फणिशरबद्ध प्रभुचा पौत्र घडायासि आपणा मुक्ती, ।
युक्ति मनीं योजी, तों सुचवी गुरुची शिवास्तवा उक्ती. ॥१॥
नमुनि, मनांत म्हणे तो, “इंद्रोपेंद्रानुजे ! महामाये ! ।
तूं स्वाश्रितवत्ससुरभि, तव महिमा त्रिभुवनीं न हा माये. ॥२॥
भगवति ! शंकरदयिते ! महिषादिमहासुरांतदायिकरे ! ।
तूं म्हणसी प्रणतांच्या दूर्विधितें, ‘होचि दूर, आयिक, रे !”’ ॥३॥
झाली प्रसन्नचित्ता शरणागतवत्सला, स्वयें आली; ।
व्याली शिशुच्या साध्वससमयींच, जसी, तसी उडी घाली. ॥४॥
नक्रापासुनि जेंवि प्रभुनें केला क्षणांत मुक्त करी, ।
अहिशरबंधविमोचन करुनि, तसें त्यासि बोधयुक्त करी. ॥५॥
“हरि ये, तों, मुक्तहि तूं, वत्सा ! या बंधनीं असाचि रहा; ।
प्रभु बहु कोपेल न, तरि हा बाण म्हणेल बा ! कसा चिर ‘हा !’ ॥६॥
ज्ञानी असोनि, दिसतो संसारिजनांसि जेंवि संसारी; ।
मुक्तहि दिस बद्धतसा, जों ये शोणितपुरासि कंसारी. ॥७॥
बाणभुज च्छेदील, स्वपुरा नेईल तुज सदारास, ।
गातील रण प्रभुचा, प्रेमें गाती जसे सदा रास.” ॥८॥
करुनि दया, देवीनें यापरि अनिरुद्ध सुखविला साचा, ।
याच्या जाया रड्ती, कीं झाला नास सुखविलासाचा. ॥९॥
नेला अनिरुद्ध, असें तद्दयितांच्या कळे विलापानें ।
ताप  द्वारावतिला या वृत्ताच्या पुन्हा दिला पानें. ॥१०॥
व्हा सिद्ध, असें कळवी दुंदुभि गर्जोन उग्रसेनमतें; ।
‘गमतें अनिष्ट मोठें,’ जन म्हणती, ‘बहु भयें मन भ्रमतें.’ ॥११॥
यादव धांवुनि आले, म्हणती अन्योन्य, “काय हा निकर ? ।
अनिरुद्ध हरूनि, दिला अहितें ह्रदयांत घाय हानिकर.” ॥१२॥
कोणासि किमपि न सुचे, चिंता यादव समस्तही करिती. ।
धरि तीच स्थिति हरिही, मौनादि गुणें करूनि जी न रिती. ॥१३॥
विपृथु म्हणे, “श्रीकृष्णा ! शक्राचीही मनोव्यथा हरिसी, ।
श्रितयादवचिंतामणि तो तूं चिंता स्वयें कसा करिसी ?” ॥१४॥
कृष्ण म्हणे, “विपृथो ! मी या कार्याच्याचि चिंतितों गतितें, ।
परि पावेंना; न कळे, कोणें केला अनर्थ हा, मतितें. ॥१५॥
श्रवण करुनि हे वार्ता, मानितिल अशक्त आहुका राजे, ।
मज ते उपहास जगीं, हृतरत्ना होति साहुकारा जे. ॥१६॥
सप्तम दिवसीं पूर्वीं सहसा प्रद्युम्न शंबरें हरिला, ।
परि तो शिवप्रसादें आला, वधुनि स्वयें तया अरिला. ॥१७॥
शाल्वें नेला होता या नगरींतूनि आहुक वळून, ।
परि सोडविला आम्हीं, जिरविल रवि  काय राहु कवळून ? ॥१८॥
अनिरुद्धहरण सुविषम वाटे माज्या मनासि यादव ! हो ! ।
आतां श्रीशिवचरण स्मरणचि चिंतावनासि या दव हो.” ॥१९॥
सात्यकि म्हणे, “करावा, चार प्रेषूनि केशवा ! शोध.” ।
प्रभु आहुकासि सांगे, तो चार, तसेचि पाठवी योध. ॥२०॥
सैन्यपति अनाधृष्टि प्रभुसि म्हणे “केशवा ! तुवां हरिला ।
परिभवुनि, पारिजात स्वर्द्रुम पूर्वीं, न अर्पितां, हरिला. ॥२१॥
या वैरें शक्रानें हरिला अनिरुद्ध, मज असें गमतें, ।
न शमे दायादाचें, इतरांचें ह्रदय तापलें शमतें.” ॥२२॥
कृष्ण म्हणे बळपाला, “देवांची प्रकृति बा ! नव्हे क्षुद्रा, ।
आंत कलुष कीं निर्मल, तें सुज्ञजनासि कळविती मुद्रा. ॥२३॥
अकृतघ्न, भक्तवत्सल, अक्षुद्रप्रकृति, सर्व सुर समज; ।
वाटे वासवशीलचि उच्च, जरिहि अमृत खर्व सुरस मज. ॥२४॥
माझा तों बा ! घेउनि गेली या पुंश्चली असा तर्क, ।
अर्क प्रिय नलिनीस, स्त्रीस रुचिर, शूरमतिस तो कर्क.” ॥२५॥
अक्रूर म्हणे, “हौनि मानुष, याचेंचि साधितों कार्य; ।
संरक्षितो महेंद्रा, तोही आम्हांसि रक्षितो आर्य. ॥२६॥
‘गंधर्व, यक्ष,राक्षस, यांतुनि’ तो प्रभु म्हणे, ‘नसे हरिला,’ ।
प्रद्युम्न पुंश्चलीने नेला, हें वाटतें मला, हरिला. ॥२७॥
दितिजांच्या, दनुजांच्या, नाना मायाविचक्षणा रामा, ।
त्यांहीं बहुधा हरिला, त्या चुकतिल सर्वथा न या कामा.” ॥२८॥
सर्वत्र शोध केला, आले ते सर्व चार परतोन, ।
वदले उपश्रुति कुशळ, कथिती दिसला कुमार पर तो न. ॥२९॥
यापरि गडबड करितां, रात्रि युगसमा जसीतसी सरली, ।
प्रात:काळींच सकळ यदुवीरांहीं महासभा भरली. ॥३०॥
तों ये पारद नारद, फार दया यादवांवरि कराया; ।
संशय सर्व हराया, तत्वज्ञ समर्थ हा बरिक, राया ! ॥३१॥
स्वीकारुनि सत्कार, स्वस्थ बसुनि आसनीं, पुसे तो, कीं, ।
“दिसतां सचिंत, शिरलें यादव ! हो ! आजि चित्त कां शोकीं ?” ॥३२॥
कृष्ण म्हणे, “देवर्षे ! प्रद्युम्न जसा, तसाचि तत्तनय ।
अनिरुद्धहि बा ! नेला; बुडति, तदपि बुडवितात मत्त नय. ॥३३॥
श्रुत, द्दष्ट, असेल तुला जरि हा वृत्तांत, सांग ताराया.” ।
ऐसें ऐकुनि हांसे श्रीमुनि, मग होय सांगता, राया ! ॥३४॥
“बळिसुत बाण महेशप्रियपुत्रचि होय, तत्सुता ऊषा, ।
बा ! ती तद्वंशाची, शैलकुलाची जसी शिवा भूषा. ॥३५॥
अनिरुद्ध तिणें नेला, धाडुनि निपुणा वराप्सरा दूती, ।
कुचकुंकुम नयनजळें अत्युष्णें आजकाल ती घूती. ॥३६॥
त्या पंक्तिशतभुजासीं करिता झाला कुमार शुद्ध रण, ।
शक्रहृदयशल्याचें करितचि होता सुवीर उद्धरण. ॥३७॥
भंगुनि मारित होता शत्रु पराभूतिदक्ष मायावी, ।
कन्यादूषण गमलें बा ! ज्यास, तयास न क्षमा यावी. ॥३८॥
धर्मनयज्ञें सचिवें कुंभांडें प्राण रक्षिले यत्नें, ।
समरें सुटो,न सोडिल याच्या भारें समर्पिता रत्नें. ॥३९॥
ऊठ त्वरित अरितमस्तपना ! हा समय होय अवनाचा, ।
म्हण कृष्णा ! स्वजनातें, “प्रेमें गाऊनि विजय नव, नाचा.” ॥४०॥
आहे धैर्यें, कंठीं प्राण धरुनि, नागबद्ध अनिरुद्ध; ।
युद्धश्रांत पहातो त्वत्पथ, घे सोडवूनि यश शुद्ध.” ॥४१॥
बळ कृष्ण प्रभु झाले सिद्ध द्रुत सर्व यादवांसहित, ।
पुनरपि मुनि सांगे अरिकक्षीं व्हायासि या दवांस हित. ॥४२॥
“बाणाचें शोणितपुर तें एकादशसहस्र योजन कीं, ।
गरुडें घडेल जाणें; ऊषेच्या भंग शीघ्र यो जनकीं.” ॥४३॥
त्या मुनिवचनें कृष्ण प्रभु गरुडाचें मनीं करी स्मरण, ।
तों तो प्रकटे, वंदी जगदीशाचें नतें शिरें चरण. ॥४४॥
गरुड वदे, “‘धन्य !’ म्हणें, ज्याप्रति तूं करिसि वरद यात्रा, त्या. ।
कवणा मारिसि ? तारिसि ? सांगुनि, मजवरिहि कर दया, त्रात्या !” ॥४५॥
गरुडातें वृत्त कथी प्रभु, वर्णी तत्प्रताप, जो समर ।
केला अमृताहरणीं, लीलेनें सर्व जिंकिले अमर. ॥४६॥
दास्यापासुनि माता सोडविली तें वदे, म्हणे, “गातां ।
त्वद्यश, मद्यशतहुनि भुलवी, तैसेंचि बा ! करीं आतां. ॥४७॥
शोणितपुरासि आम्हां घेउनि तूं शीघ्र चाल, नागांनीं ।
अनिरुद्ध रुद्ध सोडिव, कवि या बांधोत पालना गानीं, ॥४८॥
अनिरुद्धमोक्षणानें बा ! वैदभीं, तव स्नुषा, हर्षो, ।
अश्रुपदीं हे नगरी, लाजकुसुमराशि तव शिरीं, वर्षो.” ॥४९॥
हर्षे गरुड, म्हणे, “बा ! दासाते तूंचि फार गौरविसी, ।
तरिच यश सुधांशुपरिस कोटिगुणें विमळ, मधुर, गौर, विसी.” ॥५०॥
प्रद्युम्न, राम, कृष्णप्रभु, वाहुनि, पक्षिपति उडें तूर्ण, ।
वृष्णिसुरांचे विजयें सर्व मनोरथ करावया पूर्ण. ॥५१॥
निजरूप प्रकट करुनि, गेले कृष्णादि हे तिघे, राया ! ।
उत्सुक अरीस, घेउनि चक्रहळाद्युग्रहेति, घेराया. ॥५२॥
राम म्हणे, “श्रीकृष्णा ! अस्मत्तनुवर्ण पीत का गमला ? ।
सहसा चवघेहि असे झालों, या हेतु कोण ? सांग मला.” ॥५३॥
कृष्ण म्हणे, “शोणितपुरपालाहवनीयतेज हें आलें, ।
वाटे त्याच्या द्युतिनें वर्णाचें वैपरीत्य हें झालें.” ॥५४॥
राम म्हणे, “जरि निष्प्रभ झालों आतांचि पावतां जवळ, ।
कैसें होइल ? कृष्णा ! अग्निबळ करो न आमुचा कवळ.” ॥५५॥
कृष्ण म्हणे, “पक्षिपते ! घडतें शोणितपुरीं कसें गमन ? ।
न मन व्यग्र तुझें, बा ! करिसिल तूं एक वन्हिचें शमन.” ॥५६॥
प्रभुवचनें विनतेचा सुत तो सहसा सहस्रमुख होय, ।
घनसा शरीर सत्वर पोषी, शोषी नभोनदीतोय. ॥५७॥
बषे प्रलयजलदसा, त्या आहवनीय वन्हिला शमवी; ।
प्रभुचें मन निजचरितें, प्रभु विश्वाचें जसें, तसें रमवी. ॥५८॥
वर अंगिरा जयांत, श्रीरुद्रानुचर अग्नि ते आले, ।
झाले भग्न, न कांहीं तत्तेज प्रभुपुढें रणीं चाले. ॥५९॥
तो अंगिरा महात्मा प्राण हराया त्रिशूल जें सोडी, ।
त्या, अर्धचंद्र सायक सोडुनि, मधुसूदन स्वयें तोडी. ॥६०॥
स्थूणाकर्णें बाणें छेदुनि उर, अंगिरा महातेजा ।
प्रभुनें मूर्छित केला, मेला जन बोलिले पहाते ज्या. ॥६१॥
अग्निपराभव करितां देवर्षि म्हणे, “जनार्दना ! बा ! हें ।
बाणाचें शोणितपुर, यांत श्रीरुद्र नांदतो, पाहें.” ॥६२॥
हास्य करुनि कृष्ण म्हणे, “देवर्षे ! आठवूनियां भक्ती, ।
बाणत्राणा येतां श्रीरुद्रासीं भिडों यथाशक्ती.” ॥६३॥
शोणितपुरनिकट प्रभु दरवर गगनांत वाजवी, राजा ! ।
खिजवी, त्यास न सोसें, बाहूंची फार खाज वीरा ज्या. ॥६४॥
शोणितपुरांत शिरतां, प्रभुवरि बहु कोटि जीं महासैन्यें ।
प्रमथगणसहित आलीं, वधिलीं, वरिलींहि राहिलीं दैन्यें. ॥६५॥
अग्न्यस्त्र प्रभु योजी, तेणें किन्नरबळ प्रथम मोडी, ।
प्रमथासुरबळ बळ हळमुसळें, मेघांसि वातसा, झोडी. ॥६६॥
रामें, मेघश्यामें, प्रद्युम्नें, सैन्य भंगितां सर्व, ।
त्रिशिरा, त्रिपाद, आला, नवनेत्र, ज्वर धरूनियां गर्व. ॥६७॥
तो भस्ममुष्टि टाकी बळभद्राच्या उरीं, उडे वातें ।
कांहीं कनकनगाच्या शिखरीं जाऊनियां पडे वा ! तें. ॥६८॥
त्या भस्माच्या स्पर्शें मेरुनगशिखर गळे, जळे सगळें; ।
मग हळधरधैर्यातें, पडुनि उरीं, तें म्हणेल कां न ‘गळें ?’ ॥६९॥
राम म्हणे, “कृष्णा ! मी जळतों, अत्यंत तापला काय; ।
अभयंकरा ! उपेक्षसि अतिकष्टीं बंधु आपला काय ? ॥७०॥
ताप शमेल कसा ? रे ! तूं स्पर्शुनि काय, बा ! पहा, हातें; ।
कृष्णा ! न घडो, शोकें म्हणतिल जें मायबाप ‘हा ! हा !,’ तें. ॥७१॥
स्मित करुनि, “न भेतव्यं” ऐसें बोलोनि, पापहर पावे; ।
त्यातें आलिंगी प्रभु, यत्स्मरणें तीन ताप हरपावे. ॥७२॥
स्नेहें दाहापासुनि रामातें सोडवूनियां, हरि तो ।
माहेश्वर ज्वरातें बाहे जो मृत्युभीतितें हरितो. ॥७३॥
त्या तैशा भस्माच्या टाकी प्रभुवरिहि दोन तो मुष्टी, ।
होय प्रदीप्तगात्र, प्रभु एक मुहूर्त दे तया तुष्टी. ॥७४॥
प्रभुदेह ज्वाळाकुळ साक्षात् कर्पूररशिसा गमला, ।
भ्रमला न लेशहि प्रभु, पेटोनि मुहूर्त वन्हि तो शमला. ॥७५॥
मद्यार्द्र पदार्थ जसा, दीप्तें भस्में तसाचि तो धडके, ।
धड केशव, परि राहे, कीं तत्कंठीं अनंत हा अडके. ॥७६॥
मधुसूदनास मग तो उग्र ज्वर वज्रमुष्टिंनीं ताडी, ।
पाडी प्रभुहि तयातें, तद्भान क्षण दिगंतरीं धाडी. ॥७७॥
शिरुनि करि बहूपद्रव, खळ जेंवि निरंतरोत्सवीं गेहीं, ।
मूर्च्छित करितां, अंशें प्रभुच्या ज्वर तो मनोहरीं देहीं. ॥७८॥
पूर्व ज्वरावरि ज्वर निर्मी, धृति धरुनि, तो अरिसभारी; ।
जी बळभद्रावस्था, होय प्रंभुचीहि तीपरिस भारी. ॥७९॥
तों वैष्णव ज्वर जिणुनि आणी, माहेश्वर ज्वरा धरुनी, ।
मान नभोवाणीतें प्रभु दे, सोडी तया, दया करुनी, ॥८०॥
धरि पाय, जाय शरण ज्वर हरिस, म्हणे, ‘दयासुधासुसरा ! ।
म्यांचि असावें लोकीं, नच हा जो निर्मिला तुवां दुसरा.” ॥८१॥
कृष्ण म्हणे, “हेहि दिलें, माझ्या ठायीं दुजा असो लीन, ।
शरणागतवत्सल मी; प्रभुवरही शर्करा न सोलीन.” ॥८२॥
पावुनि अभयवर, ज्वर विनती, कीं, “करिन मी वचन कथिलें, ।
कीं सिद्धपारदाचें श्रेयस्कर लंघिजे वच न कथिलें. ॥८३॥
देव म्हणे, “श्रद्धेनें श्रवण करिल हें चरित्र जो ज्वरित, ।
सोडावा, द्विज गरुडें, तैसा माहेश्वरें तुवां त्वरित.” ॥८४॥
शासन वाहोनि शिरीं, चरणद्वयहि, प्रदक्षिणा करुनी, ।
गेला माहेश्वर तो, रूप मनीं, नामही मुखीं, धरुनी. ॥८५॥
ज्वर गेल्यावरि, करिती असुरबळक्षय पुन्हाहि ते चवघे, ।
उरले प्रमथ पळाले, हतशेष सुरारि धाकले अवघे. ॥८६॥
बाण म्हणे, “दैत्यकुळीं जन्मुनि घेतां लघुत्व कां पळतां, ।
मळतां अयशें, परता, भट ! हो ! करितां अधर्म, हें कळतां ? ॥८७॥
मी असतां कां पळतां ? आश्रय ईश्वर असोनि, कां चळतां ? ।
परता, रे ! परता, रे ! भट ! हो सद्नति घडे, रणीं गळतां ? ॥८८॥
कुंभांडही म्हणे, “रे ! भट हो ! मुरडोनि, पळ विशंक रहा; ।
हा बाण, हा गुह, पहा, काळव्याळाहि पळवि शंकर हा.” ॥८९॥
फिरतील कसे ! ज्यांचे गेले पहिलेचि निघुनि आवांके; ।
जोतोही भीतिभरें कश्मळपंकांत, करुनि ‘आ,’ बांके. ॥९०॥
वर देउनि, आपणचि श्रीहर रक्षावयासि बाणातें ।
श्रीहरिसीं ये समरा, कारण या प्रेम शुद्ध जाणा तें. ॥९१॥
अग्निरथीं हर चढला, सारथि नंदीश्वर स्वयें झाला, ।
प्रभुवरि नानारूप प्रमथमहाभटसमाजही आला. ॥९२॥
गरुडीं चढोनि आला श्रीरुद्राभिमुख अजितही, राया ! ।
कोपें नाराचशतें वेधी तो देवदेव वीरा या. ॥९३॥
पर्जन्यास्त्र प्रकटी श्रीविष्णु, नृपा ! कृपानिधिहि कोपे, ।
उत्पात फार झाले, ज्ञानिजनीं धृति, विवेकही, लोपे. ॥९४॥
अग्न्यस्त्र रुद्र योजी, तों चवघांचेहि पेटले काय, ।
सुर म्हणती, “हे दहना दहनचि होऊनि भेटले काय ?” ॥९५॥
सुरशत्रु “दग्ध झाला कृष्ण,” म्हणति, हृष्ट गर्जती हरिसे, ।
सामरमुनि विधि आला, निजलोकीं सिंहनाद ते परिसे. ॥९६॥
प्रभु वरुणास्त्रें शमवी अग्न्यस्त्रातें, मुहूर्त साडून; ।
‘स्वास्त्र प्रतिहत केलें,’ ऐसें त्या संगरांत पाहून, ॥९७॥
पैशाच, रौद्र, राक्षस, आंगिरस, अशीं महेश्वरें चार ।
अस्त्रें केलीं प्रकट, क्रूरत्व जयांत सर्वदा फार, ॥९८॥
अस्त्रें पाहोनि म्हणे, “जरि उग्र असेल अन्य, तरि यो, जी !” ।
सावित्र, आणि वासव, मोहन, वायव्य, चार हरि योजी. ॥९९॥
वारी चारी अस्त्रें, मग वैष्णव अस्त्र विष्णु तो टाकी; ।
भग्न प्रमथहि झाले, भ्याले शक्रादि सर्वही नाकी, ॥१००॥
तों आला श्रीकृष्णप्रभुसीं संगर करावया बाण, ।
रणसाहित्य तयाचें भुजसम अद्भुतचि सर्वही जाण. ॥१०१॥
वैष्णवतेजें समरीं व्यापुनि बहु कामकाल तापविला, ।
त्रिपुरघ्न शर करीं घे, ज्याची साजे न बाळता पविला. ॥१०२॥
पाहे त्रिपुरांतक शर जोडाया सत्प्रभापद पिनाकीं, ।
तों प्रभुसि जृंभणास्त्रें प्रभु मोही, भय शिरे तदपि नाकीं, ॥१०३॥
तो सशरचाप जृंभित होय, न संज्ञा मुहूर्त हर पावे, ।
ज्याच्या चरणस्मरणें भक्ताचे मोह ताप हरपावे. ॥१०४॥
मोहुनि जगदीशातें, वाजविला पांचजन्यदर अजितें, ।
भ्रर्मलें सुरमुनिमन, कीं नेणें त्याहूनि अन्य दर अजि तें. ॥१०५॥
जृंभित होतां, प्रभुच्या निघति मुखांतूनि भडभडा ज्वाळा, ।
जेंवि विषज्वलनाच्या, मंत्रभरें भारितां महाव्याळा, ॥१०६॥
ब्रम्हयातें भूमि म्हणे, “मी हरिहरबळभरा सहायाला ।
न शकें, मशकें व्हावें क्षम गरुडभरा कसें वहायाला ?” ॥१०७॥
ब्रम्हा म्हणे, “धरे ! त्वां धैर्य धरावें मुहूर्त, होसील ।
स्वस्था शीघ्र, तुजविना कोणी सर्वंसहे ! न सोसील.” ॥१०८॥
प्रभुसि म्हणे, “वर देउनि, खाज भुजांची रणीं परिहराया, ।
संरक्षिसि तूंचि कसा, वरदा ! त्याचा धणी, परि हरा ! या ? ॥१०९॥
तूं कोण ? कृष्ण कोण ? ध्यानांत पहा, रुचे न समर मला; ।
तुमचा भक्तहि न अशा खेदीं, भेदीं, त्यजूनि शम, रमला.” ॥११०॥
आणी, ‘आपण हरिहर एक,’ शिव विचार हा असा ध्यानी, ।
व्हावें पुरुषार्थांनीं सुखसाध्य यदाश्रीता असाध्यांनीं. ॥१११॥
शंभु म्हणे, “सत्यपते ! स्वस्था हो भारपीडिता क्षोणी, ।
केलें युद्ध पुरें, त्वां, साध्वस चित्तीं धरूं नये कोणीं.” ॥११२॥
मग हरिहर अन्योन्य प्रेमें आलिंगिती, न दोघांसी ।
अंतर दिसे, फुटोनिहि पुनरपि मिळतां जसें सदोघांसी. ॥११३॥
विधि कथित नारदसहित मार्कंडेया, “रहस्य तें परिसा,
परि सात्विक ! हो ! रक्षा यासि, विसंबों नये जसें परिसा. ॥११४॥
मंदरगिरिच्या पार्श्वीं जी नलिनी अतिमनोहरा आहे, ।
मंद, सुगंध, शुशीतल, जेथें पवमान सर्वदा वाहे, ॥११५॥
तेथें रात्रि स्वप्नीं मी भाग्येंकरुनि एकदा बा ! हें ।
अद्भुत हरि हररूपें, हर हरिरूपें, मुनीश्वरा ! पाहें, ॥११६॥
पीतांबरधर दरकर चक्रगदापाणि देखिला भर्ग, ।
चर्मत्रिशूलपट्टिशधर हरि, जो अर्पिता चतुर्वर्ग. ॥११७॥
गरुडध्वज हर भगवान्. वृषभध्वज हरि, विलोकिला व्यक्त, ।
कथिलें रहस्य तुज, कीं कथिसिल तूं त्यांसि, जे भले भक्त.” ॥११८॥
मार्कंडेय हरिहरस्तवन करी, अनुसरोनि वेदातें, ।
खेदातें जीवच्या नाशाया भग्न करुनि भेदातें. ॥११९॥


Last Updated : January 01, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP