उत्तरार्ध - अध्याय ४९ वा

हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.


जनमेजय नृपति पुसे, “कृष्णप्रभु शंकरासि आराधी, ।
तें सांग मुने ! माझी इच्छितसे याहि आजि सारा धी. ॥१॥
आराध्यें आराधक हर कां आराधिला ? सदाराध्या ।
या पूर्णा याचें मन कां प्रेरी ? कीं शिवा सदारा ध्या.” ॥२॥
श्रीव्यासच्छात्र म्हणे, श्रद्धेनें पुससि, म्हणुनि तुज राजा ! ।
कलासाचळयात्रा कथितों सद्भजनमार्ग उजराया. ॥३॥
हरिहर हे सर्वोत्तम एकचि, बा ! यांत लव नसे भेद. ।
वेद प्रमाण येथें, याचि ज्ञानें नृपा ! सरे खेद. ॥४॥
ज्वलनीं ज्वलन, जळीं जळ, तेंवि हर हरींत, हरि करीं जाण. ।
देहद्वय धरि योगी जैसें, तैसेंचि हें, तुझी आण. ॥५॥
कोठें ईश्वरता हे, कोठें धरितात जीवता, राया ! ।
भजती अन्योन्यातें, लीलेनें दास, जीव ताराया. ॥६॥
हरि तो हर, हर तो हरि, एकचि पर पुरुष नित्य, नव दोन; ।
ह्रदयीं तत्व धरावें, मंदापासीं कदापि न वदोन. ॥७॥
हरिहरवृत्त महाद्भुत, परिस, नृपा ! सांगतों तुला आतां, ।
पापें सरती, तरती सर्वहि जन, ज्यासि ऐकतां, गातां, ॥८॥
नरकाद्यसुर, नृपहि, बहु वधितां, थोडेचि राहिले असतां, ।
श्रवैदर्भी प्रार्थी कृष्णातें द्वारकापुरीं वसतां, ॥९॥
“स्वपदाश्रितकल्पतरो ! तुज सर्वहि अर्थ भक्तजन याची, ।
आहे वांच्छा त्वत्सम सद्नुणसंपन्न साधु तनयाची.” ॥१०॥
कर जोडुनि, एकांतीं, सुयश:कर्पूरपूरिता कदली, ।
पदलीनद्दष्टि, साध्वी, देवी, ती रुक्मिणी असें वदली. ॥११॥
कृष्ण म्हणे, “देवि ! तुला देइन सुतरत्न, यत्न करुन, सती ! ।
आराधिन शंभुचरण, ऐसे कल्याण कल्पतरु नसती. ॥१२॥
जो सुखदायक, धरणीधरनायक, साधुसेव्य कैलास, ।
प्रभुतें आराधाया जातों त्या पुण्यपुंज शैलास. ॥१३॥
आर्जविन सिद्धिसद्में, करूनि सुतपा, तीं; ।
पावसिल, पाहतां जो स्तब्ध करिल, मन हरूनि सुत, पातीं. ॥१४॥
करिल प्रसाद भक्तीं प्रभुहि, प्रभुचीहि ती उमा रमणी, ।
देइल तुज सुजनप्रियकर शंकर वांछिला कुमारमणी. ॥१५॥
वंदुनि सांबशिवातें, बदरींत तपेन, परिस, रसना मी ।
योजिन गुणगण गाया, प्रभुच्या अमृताहिपरिस रस नामी.” ॥१६॥
ऐसें बोलुनि रात्रौ निजला निजला निजलाभपूर्ण पर्यंकीं, ।
जेणें स्त्रीश्री उतरुनि, मुक्ति बसविली बळेंचि अर्यंकीं. ॥१७॥
प्रात:काळींच करी स्नान, जप, ध्यान, दान, जें कार्य; ।
प्रस्थानप्रारंभीं प्रभु पूजि द्विज, तपोनिधी, आर्य, ॥१८॥
आस्थानमंडपीं मग बैसे, बळभद्र, उग्रसेन, तथा ।
कृतवर्मा, सात्यकि, हे बाहे, ज्यांची जगत्पवित्र कथा. ॥१९॥
उद्धवा शुद्ध वदाया, बहु पटु, परह्रदय जो विदाराया, ।
त्यातें आणवि, जाणवि पुररक्षण, नीतिकोविदा ! राया ! ॥२०॥
“परिसा हो ! आर्य ! बळप्रमुख तुम्ही, उद्धवा ! बुधा ! परिस, ।
जाणतसां बाळपणापासुनि मम यत्न मारितां अरिस. ॥२१॥
साक्षी सर्व अहां त्या तैशा अत्युग्रपूतनागतितें, ।
होते भयंकरत्वें ‘स्वगुरु’ म्हणत काळदूत, नाग,  तितें. ॥२२॥
अघ, बक, अरिष्ट, केशी, कंस, वदुनि, मग धराज मारविला, ।
वधिला शृगाळ, नरकहि, जो लावी ‘हा !’ म्हणावया रविला. ॥२३॥
उरला अद्यापि सखा नृप पौंडक वासुदेव नरकाचा; ।
हा द्रोणशिष्य भार्गवसम, या साहेल कोण नर काचा ? ॥२४॥
संतत माझा द्वेष्टा, अतिकुशळ, ब्राम्हा अस्त्र जाणतसे, ।
याचे जसे, न सांप्रत कोणाचेहि महोग्र बाण तसे. ॥२५॥
छिद्र सदैव पहातो माझा अत्यंत शत्रु हा नीच, ।
पावेल रंध्र जरि, तरि होईल द्वारकेसि हानीच. ॥२६॥
सिद्ध असा, पर जेणें यदुवंशाश्रयपुरा न बाधे या, ।
कीं आधारा होतें जें भय, तत्काळ तेंचि आधेया. ॥२७॥
मी तों कैलासातें जातों श्रीशंकरा पहायाला, ।
कांहीं काळ ध्यानीं स्थिर किंचित्कारणें रहायाला. ॥२८॥
मी नाहीं यांत, असें कळतांचि प्रबळ बहु बळासहित ।
येऊनि निर्यादव पुर करिल, हरिल यश, असाचि तो अहित. ॥२९॥
यत्त असा रात्रिदिवस, शिव सतत मनीं स्मरा,धरा कवच, ।
नव चतुरंग बळ उभें राहो, विसरा कदापि हें न वच. ॥३०॥
एक असो वागाया, बहुत बरीं द्वारकेसि न द्वारें, ।
वर्तावें एकेंचि, श्रुत्युक्तमतेंचि जेंवि सद्वारें. ॥३१॥
त्या हो जाणें येणें, राजाची प्राप्त होय ज्या मुद्रा, ।
क्षुद्राहि परा भ्यावें, मग बुध ! हो ! कोपल्या न कां रुद्रा ? ॥३२॥
मी ये, तों वीरांची जी क्रीडो न पतिसीं सुरामा ती, ।
न प्राशावी कोणीं, ज्ञानाची करितसे सुरा माती. ॥३३॥
युयुधाना ! जी निजजनसंरक्षा, तीच सत्क्रिया संध्या, ।
वीरांत ख्याति तुझी, धर्मधनुर्निपुणता न हो वंध्या, ॥३४॥
मृगया, भलती क्रोडा, रमष्ट करावी कधीं न बाहेर, ।
वार्ता अरिच्याचि परिस, आहेत तुझ्या अधीन बा ! हेर.” ॥३५॥
सात्यकि वदला, “देवा ! भय नाहीं त्वज्जनासि काळाचें, ।
सेवेसि असें सादर, मी वचन करीन कामपाळाचें. ॥३६॥
तुज नय कथितां, लज्जा तातसखा उद्धवा, मला, होती, ।
सुज्ञा ! जी अहिताची जययुक्ति, कधीं फळा न लाहो ती.” ॥३७॥
उद्धव म्हणे, “प्रभो ! तूं मजवरि करुनि प्रसाद, हें वदसी, ।
मन्नीति स्वीकारिसि सर्वज्ञ गुरुहि, शशी त्यजी न दसी.” ॥३८॥
रामासि म्हणे, “आर्या ! राहो तुझिया गदा सदा हातीं, ।
ज्यां अमृतकर त्राता, पावति कुमुदें कदा न दाहा तीं, ॥३९॥
किति हें पुर ? आर्या ! तूं सुसमर्थ त्रिभुवनाहि राखाया, ।
लागे उपहासास्तव बा ! मानधना जना हिरा खाया.” ॥४०॥
राम म्हणे, “मन कृष्णा ! स्वस्थ शिवाराधनीं असो, आधीं ।
चिंतीं त्यातेंचि स्थिर चित्तें तूं, तत्प्रसाद जा साधीं. ॥४१॥
आहेत पुष्ट, दृष्टक्षयपटु हे भुज, गदा, मुसल, हल कीं, ।
किति नरसुरासुरबळें ? तेजें सकळेंहि रविपुढें हलकीं,” ॥४२॥
प्रभु नमुनि गुरुजनातें, बैसोनि निघे स्मृतागतीं विवरीं, ।
जाय बदरिकेसि, म्हणे, ‘जीं जीं विषयज सुखें, न तीं विवरीं.’ ॥४३॥
गगनीं स्तविति सुर मुनि, सामोरें येऊनि  त्रिजगदाद्या; ।
म्हणती, “तोखद ओखद घ्या, हानि सचक्षु हो ! निजगदा द्या.” ॥४४॥
प्रभु दीपिकाप्रकाशितपथबदरींत प्रवेश करि सांजे, ।
श्रीचरण पूजिती मुनि, दिसले दैवें उदंड वरिसां जे. ॥४५॥
जेथें चिर तप केलें शक्रें, रामेंहि, जावया हत्या, ।
अत्याश्रर्या बदरी, कीर्ति सुगतिदा असी जिची सत्या. ॥४६॥
पूर्वस्वतप: स्थानीं गंगेच्या उत्तरीं तटीं अजितें ।
धरिला सभाधि, भासे तद्देह निवातदीपसें अजि ! तें. ॥४७॥
अत्याश्वर्य हरिचरित, परिपूर्णहि बैसला तप कराया; ।
“प्रभुयशचि” म्हणति कविवर, “परम मधुर, अमृत तें सपक, राया ! ॥४८॥
धरि हरि समाधि चित्तीं, निरुपाधिक तत्व चित्रसम यांत, ।
तो मृगयासंबंधी शब्द उठे घोर रात्रिसमयांत. ॥४९॥
“श्वान प्रेरा, मारा मृग, मांसें खा, पिऊनि रक्तातें, ।
या, देव शार्ङ्गधन्वा उद्धरितो भलतशाहि भक्तातें. ॥५०॥
रोधा गज, न विलंघूं द्यावें हें लेश वप्र, सादानें ।
भिववा, निववा स्वात्मा रक्तरसें केशवप्रसादानें. ॥५१॥
करिल प्रसाद यादव, या दवदेशी वराह रोधावे. ।
हे कृष्ण भक्तवत्सल ! गेले इकडेचि शल्य शोधावे. ॥५२॥
मर्दा मदमत्त द्विपपति, हा माधव मनांत आणावा, ।
हाणावा शशसंघहि, भगवान् कृष्ण प्रसन्न जाणावा. ॥५३॥
हे अज ! हे गजराजप्राणत्राणप्रवीण ! हे विष्णो ! ।
हे कृष्ण !  हे जनार्दन ! हे माधव ! हे मुकुंद ! हे जिष्णो !” ॥५४॥
ऐसें सिंहाव्याघ्रद्विपमऋगनादांत मिसळले शब्द, ।
त्यांत रव श्वानांचे, वाटे कल्पांत, खवळले अब्द. ॥५५॥
कोलाहल लोला हलभृदनुजविभुवृत्तितें नृपा ! करि, तो ।
सोडी समाधि, परिसा कैसी शरणागतीं कृपा करितो ! ॥५६॥
सोडुनि निश्वास, प्रभु विस्मित होऊनि, म्हणे मनीं, “कां हीं ।
होताति गर्जितें बहु ? जेविं करावीं रणीं अनीकांहीं. ॥५७॥
शब्द मम स्तुतिमिश्रित कोणाचे काय ? काय हें आहे ?” ।
वाहे विस्मय भगवान्, पाहे आशा, उगाचि जों राहे, ॥५८॥
तों सर्व वनेचर ते प्राणी त्या भगवदाश्रमीं भरले, ।
सरले ताप जयाच्या नामें, बहु जीव यद्यशें तरले. ॥५९॥
शुचि जी क्षिणि तपानें, शोणितपानें करीत, तीमाजी ।
भूत, पिशाच, निशाचर भरले, ते लंघितीच सीमा जी. ॥६०॥
हाराति, नाचति, गाती, चरचर मृगमांस सेविती हिरवें, ।
आश्रमपद कांपविती, गज, सिंह, पिशाच, भूत, तेहि रवें. ॥६१॥
जो तोही सत्वातें,  होऊनि जठरानळास वश, हाणी; ।
हिंसेविषयीं यांची मति, कोणाचीहि तेंवि न शहाणी. ॥६२॥
आले भीत प्राणी प्राणत्राणार्थ केशवानिकट; ।
दोघे मुख्य पिशाचहि, खरशूलप्रोतनरशिरें विकठ. ॥६३॥
प्रभु हृदयांत म्हणे, “हे कोणाचे भूत भृत्य आहेत ? ।
मज सादर स्तवावें, कोणाचा या अशांत हा हेत ? ॥६४॥
मन्नामें जींत, असी कोणाची भव्यभूषिता उक्ती ? ।
युक्ति श्रेष्ठा सुचली, रुचली कोणा महाजना मुक्ती ? ॥६५॥
कोणाच्या काय मनीं या प्रेम्याची असी वसे लहरी ? ।
कोणा सद्नुरुवचनें ह्रदयीं हा प्रकटला असेल हरी.” ॥६६॥
ऐसें प्राकृतसा प्रभु चित्तीं चिंतन करीत जों राहे, ।
तों दोघे उग्राकृति आले सहसा पिशाच तो पाहे. ॥६७॥
ते उच्च, अंत्रवेष्टित, पिंगलरोमे, सुदीर्घजिव्हतनू, ।
लंबकच, विरूपनयन, सुकृशोदर, विकृतमुख, विशालहनू. ॥६८॥
नरमांसरक्त सेवित, शवशत कर्षीत, भूमि कंपवित, ।
रद खात, गाल चाटित, आले श्वापदसमूह संपवित. ॥६९॥
सर्व पिशाचवरांच्या किति वर्णूं बहुभयावहाकारा ? ।
त्यांचा सत्व उरों दे कोणाच्याही मनीं न हाकारा. ॥७०॥
त्यांच्या उपडुनि पडती तरु ऊरूत्पन्नलेशवातें हो ! ॥७१॥
वृष्णीसि न जाणुनि, ते पुसती, “तूं मर्त्यु, सांग, गा ! कवण ? ।
श्रवण करूं दे, मर्त्या ! त्वद्वृत्तीं आमुचें मन प्रवण. ॥७२॥
तूं सुकुमार, श्यामल कामललितरूप विष्णुसा गमसी; ।
श्रमसी कां घोर वनीं ? कां अस्मद्दर्शनेंहि न भ्रमसी ?” ॥७३॥
कृष्ण म्हणे, “जन म्हणती क्षत्रिय मज, यदुकुळांत मी झालों, ।
मी लोकनाथशास्ता कैलासीं शिव पहावया आलों. ॥७४॥
मद्रृत्त असें, सांगा, कोण तुम्ही ब्राम्हाणाश्रमीं आलां ? ।
भ्यालां न मनीं कांहीं, न कव्यक्षतजसेवनें धालां. ॥७५॥
मृगयास्थान नव्हे हें, पुण्या हे पुण्यरतमता बदरी; ।
न दरिद्र एक येथें; वसति तपोधन, न या स्थळीं सदरी. ॥७६॥
मुनिराजपदत्राणहि जेथें दूर प्रवेशतां उतरे, ।
त्या या पुण्यस्थानीं घेऊनि आलां कसे शवें, कुतरे ?॥७७॥
श्वापद न करिति हिंसा, करितां पुण्याश्रमीं कसी मृगया ? ।
ब्राम्हाणतेज सुदु:सह, झाला कीं सरट लंघितां नृग या. ॥७८॥
न पुढें जावें; नसतां, गुरु देती करुनि बाळका समज; ।
नातरि कास कसावी लागेल स्थानपाळकास मज. ॥७९॥
कोण तुम्ही ?  कां आलां ? कोठें जातां ? खरें, रहा, बोला, ।
मुनिसिंहदरी बदरी, वृत्ति नसावीच या स्थळीं लोला.” ॥८०॥
ज्याला अमृताहुनि बहु भगवद्नुणनाम दिननिशीं चव दे, ।
जो घोर, दीर्घबाहुक, दोघांतिल एक तो पिशाच वदे. ॥८१॥
“मर्त्या ! श्रवण कराया इच्छिसि, तरि परिस सावधान मनें, ।
निजवृत्त तुला कथितों, करुनि श्रीकृष्णविष्णुला नमनें, ॥८२॥
‘मी घंटाकर्णाभिध, धनदानुग, काळसा महाघोर; ।
मदनुज पिशाच दुसरा, क्रूरत्वें मृत्युहूनि हा थोर. ॥८३॥
हें श्वकुळ कटक माझें, मृगया हे विष्णुपूजनाकरितां, ।
कैलासाहुनि आलों ऐसा मी; द्वेष विष्णुसीं धरितां, ॥८४॥
कर्णांत बांधिल्या म्यां घंटा, कीं विष्णुनाम नायकणें, ।
बहु कृष्णनामवर्णें चित्तीं, नयनांत ताप काय कणें ? ॥८५॥
संपादिला बळेंचि श्रीविष्णुद्वेष हा असा मोटा, ।
तोटा ज्यांत स्वसुखा, मर्त्या ! मी आत्महा महाखोटा, ॥८६॥
नाशिति ह्रत्तम, ह्रदयामाजि सदा जो धरूनि तपन, मुनी, ।
आराधिला सुचिर शिव, कैलासीं म्यां करूनि तप, नमुनी. ॥८७॥
झाला प्रसन्न भगवान्, ‘वर माग’ म्हणे, तदा पदा नमुनी, ।
म्यां मुक्ति याचिली, ज्या याहुनि मागति दुजें न दान मुनीं. ॥८८॥
शंभु म्हणे, ‘मुक्तिप्रद विष्णुचि, देईल, जा बदरिकेला; ।
तेणें मुक्त, स्मरतां, द्वेष्टा कंसादिही सदरि केला.’ ॥८९॥
श्रीशिववचनें जाणुनि परम श्रीविष्णुतेंचि, मर्त्या ! तें " ।
वैर त्यागुनि, गेलों शरण मनें त्याचि विश्वकर्त्यातें. ॥९०॥
मागाया मुक्ति तया नवसतडिद्धनसमानसद्वेषा ।
आलों, आतां माझें स्पर्शे त्याच्या मनस द्वेषा. ॥९१॥
तो द्वारकेंत, करितो, ज्यातें गाऊनि, भर्ग लास्याला; ।
शरणागता नसे त्या प्रभुपासीं, जेंवि अर्गला स्याला. ॥९२॥
मनुजा ! ‘ननु जा’, म्हणती ब्रम्हादिक, ‘विष्णु तो पाहायास.’ ।
जातों, गातों, ध्यातों, सरतिल तद्दर्शनें महायास. ॥९३॥
प्रकट प्रभु असतां, जें न पहाणें, या असा अनय नाहीं, ।
जावें काय, पहावें, काय, तयां पंगुंहीं, अनयनांहीं ? ॥९४॥
जी पिंगळाभिधाना वेश्या, प्रभु उद्धरी तितें गा ! तो; ।
प्रभु पूतनाहि तारी, व्यास असा शुद्ध रीतितें गातो.” ॥९५॥
स्वाभिप्राय प्रकटुनि बहु यश वर्णुन, म्हणे, “अगा ! मर्त्या ! ।
जा येथुनि तूं, करितों नित्य नियम, चिंतितों रमाभर्थ्या.” ॥९६॥
बोलुनि असें, यथेष्ट क्रव्यस्त्रधिर सेवुनि प्रथम, राया ! ।
आचमन करुनि, मांडी सुकुशासन, सुविधिनें जप कराया. ॥९७॥
श्वगणातें वारूनि, ध्यान धरुनि, तो पिशाच बसला हो ! ।
प्रेमें घ्याया, पावुनि जगदीश्वरदर्शनातिरसलाहो. ॥९८॥
तो अष्टाक्षर मंत्र प्रथम जपे, द्वादशाक्षरहि भावें; ।
प्रांजलि पिशाच बोले, “विष्णो ! शरणातास मज पावें. ॥९९॥
त्वच्चरणज गंगेचें सर्वां जीवांसि सुमति दे वारी, ।
चक्रें हें शिर खंडीं, उद्धरिले, वधुनि कुमति देवारी. ॥१००॥
बा ! जगदीशा ! भ्रमतें मन अनुदिन बहु दहा दिशा चपळ; ।
या अळि शको कराया तवपदपद्मांत हा पिशाच पळ. ॥१०१॥
सदया ! दावानळ हो, जाळीं पापा वना, नता पावें; ।
तुज हस्त जोडिल्यावरि दीनें बा ! पावना ! न तापावें.” ॥१०२॥
प्रार्थी बहु, नासाग्रीं द्दष्टि करि, प्रणवजप असा ध्याया, ।
बैसे पिशाच शुचिमति भक्त, कवण सिद्धि मग असाध्या या ? ॥१०३॥
त्या तैशाहि पिशाचीं निजनामाच्या हरि द्रवे गानें, ।
निववावाचि सुरनगें तो, आला जो  दरिद्र वेगानें. ॥१०४॥
ध्यातां पिशाचहृदयीं प्रकटे श्रीकृष्ण, दाखवी मूर्ती. ।
त्याची तत्काळ करई करुणार्णव सर्वकामनापूर्ती. ॥१०५॥
श्रीमूर्ति मनीं पाहे तो, बहु कृतकृत्यता नृपा ! लाहे, ।
ध्यान धरुनि चिर राहे; “धन्य” म्हणे “कोण मज असा आहे ?”; १०६॥
हो समाधिविरत, मग पाहों लागे पिशाच बाहेर, ।
तों देखे तें सन्मतिकन्येचें जें सभाग्य माहेर. ॥१०७॥
जेंवि समाधींत, तसा भूभागीं कृष्ण देखितां, हर्षे, ।
“हा हरि, हा विष्णु” म्हणे, प्रेमाश्रु पिशाचपाळ तो वर्षे. ॥१०८॥
नाचे, हर्षे हांसे, “जो विष्णु विलोकिला समाधींत, ।
बाहेरहि तोचि,” म्हणे, “हार्चि वसे सत्सभारमाधींत. ॥१०९॥
आदिपुरुष नारायण, हा यज्ञवराह, मीन, कच्छप, हा; ।
होतों पिशाच पापी, झालों भाग्यें परंतु अच्छ पहा. ॥११०॥
वधुनि हिरण्यकशिपुतें, ह्तदर्प करी सुरारिचक्रातें, ।
जो नारसिंह, तो हा, देता सुरराज्यदान शक्रातें. ॥१११॥
बळिचें सर्वस्व हरी, जो लीलेनें धरूनि वामनता, ।
हा मन तापहर निववि, होय न, दोष स्मरूनि, वाम नता. ॥११२॥
सर्वक्षत्रक्षयकर परशुधर, श्रीहरप्रियच्छात्र, ।
हा त्रस्ताखिलशूरक्रूर, करी कश्यपा धरापात्र. ॥११३॥
भस्म कराया शकला, दंड करीं धरुनि, ज्या न कीनाश; ।
याच्याचि करें पावे तो रावण, हरुनि जानकी, नाश. ॥११४॥
तो कीं हा कृष्ण, करी जो स्पर्शुनि तीर्थ पूतनाकाया, ।
ज्याच्या नामरतांतें सुर म्हणति, “करल पूत नाका या.” ॥११५॥
गति देता झाला हा कृष्ण अरिष्टा, बका, अघा, बरवी, ।
शरणागतासि याच्या रचित महापापही न घाबरवी. ॥११६॥
केला आनंदचि या कृष्णें, जो पाप कंस तापावा, ।
याचीच कीर्तिगंगा म्हणती काकांसि “हंसता पावा”. ॥११७॥
अवतारचरित्र असें बहु बहु वर्णुनि, पिशाच तो लास्य, ।
हास्यहि, फार करि, पडे, पोट धरुनि, करुनि विस्तृत स्वास्य. ॥११८॥
मग तो हतविप्राचें नव शव करुनि द्विधा, त्वरा सांडी, ।
प्रोक्षुनि उदकें, पात्रीं स्थापुनि, सप्रेम विभुपुढें मांडी. ॥११९॥
अंजलि करुनि, सविनय प्रभुसि म्हणे, नमुनि, “आज देवा ! हें ।
भक्षावें, आवडि मज म्हणती, ‘टाकूनि लाज दे, वाहें.’ ॥१२०॥
सुब्राम्हाणशव नव हें शुचितम, म्हणवूनि तुज शुचितमास ।
प्रेमें दिधलें, कृष्णा ! भक्षावें, होय बहु उचित मास. ॥१२१॥
न कळे काय मज दिजे देवाला; जो पदार्थ अनसुट, तो ।
स्वप्रियवस्तु निवेदुनि, भवपाशांतूनि भक्तजन सुटतो.” ॥१२२॥
होय प्रसन्न भगवान् भावप्रिय, भक्तवत्सला गावा ।
प्रभुद्दष्टि वशचि, येतां कासेला भक्तवत्स लागावा. ॥१२३॥
देव स्वमनांत म्हणे, “हा परमस्नेह, परमकारुण्य, ।
प्रेमचि मज वश करितें, कामिजना जेंवि सुतनुतारुण्य.” ॥१२४॥
द्रवुनि, दयालुवर वदे, “वत्सा ! मज पावलें, पुरे, शव न ।
स्पर्शावे म्यां, निववी प्रेम तुझें, नच असें सुरेशवन. ॥१२५॥
बा ! ब्राम्हाणवध न बरा, ब्राम्हाणहंता रडे, पडे नरकीं; ।
ब्राम्हाण पूज्य जगद्रुरु, हे आम्ही यांस जोडितों कर कीं. ॥१२६॥
जो भक्ति करी, होतों क्षिप्र भवतमोरवि प्रसन्न तया. ।
भक्ता नीचाहि म्हणति, जाऊनि समोर, विप्र सन्नत ‘या’. ॥१२७॥
अंत:करण शुचि तुझें झालें मद्भक्तिनें, अगाधा या ।
पावाया, हेचि करिति कवि अविलंबें, अजा अगा ! धाया. ॥१२८॥
सुखधाम नामकीर्तन केलें त्वां आदरें अनवरत, रे ! ।
येणें घंघाकर्णा ! अवरहि, होऊनियां अनवर, तरे.” ॥१२९॥
ऐसें बोलुनि निववी, जो कुब्जा तत्क्षणींच उजरीत, ।
करि दिव्य पिशाचातें; बा ! प्रभुची कथिन काय तुज रीत ? ॥१३०॥
प्रभु अंग पिशाचाचें, मृदुल करें स्पर्श करुनि, कुरवाळी; ।
सुंदरता वरि, जाणों तेंचि शुचि शरीर देवपुर वाळी. ॥१३१॥
न बुधें, न अश्विनीच्या गणिलें निज रम्य अंग लेकांहीं, ।
अद्यापि न सुरमणी ? पाहुनि अत्यद्भुता सुरमणी ‘या’. ॥१३३॥
भुलतिल कां न  सुरमणी ? पाहुनि अत्यद्भुता सुरमणीया; ।
प्रभु सुप्रसन्न ज्या, त्या म्हणतिल शक्रादिही सुरमणी ‘य’. ॥१३३॥
प्रभु त्यासि म्हणे, “जों हरि, तोवरि भोगीत भोग, वस नाकीं, ।
तुज वांच्छिती सुरसभा, जीभ रसा, स्त्री नगा सुवसना, कीं. ॥१३४॥
शक्राच्या अवसानीं तूं मत्सायुज्य मत्प्रसादानें ।
पावशिल; जसा देतो हा, काय स्वर्गतरु असा दानें ? ॥१३५॥
त्वद्भाता हाहि सुरस्वर्गीं, जों देवराज, राहेल, ।
पाहेल प्राज्य सुखें, सद्नतितें मज भजोनि लाहेल. ॥१३६॥
साधो ! बाधो न तुला माया, गावूत यश तुझें शिष्ट; ।
वर माग सुदुर्लभही, देतों, बा ! तुज गमेल जो इष्ट.” ॥१३७॥
तो घंटाकर्ण म्हणे, “वरदा ! जो आठवील संगम हा, ।
व्हावी तद्भक्ति तया, त्याच्या स्पर्शो कधीं न भंग महा. ॥१३८॥
करिल मदुद्धारांचें श्रवणपठण रसिक जीव जो भावें, ।
शोभावें शुद्ध यशें तेणें गतिनें तयासि लोभावें.” ॥१३९॥
हे विज्ञप्ति परिसुनि श्रीकृष्ण म्हणे, “तथास्तु,” तराया. ।
ऐसी मज मद्नुरुनें, म्यां तुज कथिली कथा स्तुता राया ! ॥१४०॥
दिव्यालंकारांहीं प्रभु, हरुनि पिशाचता, अळंकारीं, ।
करुनि प्रसाद, तारी, बा ! हाचि महायशा कळंकारी. ॥१४१॥
त्या प्रभु म्हणे, “पहातो स्वर्गाचा ससुरवृंद वाट पती, ।
जा, शक्रातिथि हो, तुज देखाया देवदार बा ! टपती.” ॥१४२॥
ऐसें परिसुनि, मस्तक त्या भक्तें पदरजांत लोळविला, ।
प्रभुनें भ्रात्यासह तो स्वर्गातें, उद्धरोनि, बोळविला. ॥१४३॥
तो ब्राम्हाणहि उठविला, ब्रम्हाण्यें केशवें महाकरुणें; ।
झाला असा सुतेजा, लाजाबें ज्यासि भास्करें तरुणें. ॥१४४॥
त्यासि म्हणे, “स्वस्थाना जा, बा ! हो तूं बुधा ! न दीनमना.” ।
प्रभुद्दष्टिकारणें कां न करिल दासी सुधानदी नमना, ॥१४५॥
श्रीहरिहरभक्तिरसिकसेव्या भव्या कथा यथाबुद्धी ।
लिहिली भक्त मयूरें, विनयें पावावया मन:शुद्धी. ॥१४६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 01, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP