उत्तरार्ध - अध्याय ४५ वा

हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.


पुष्करसंभव अमृतचि, वाटेना काय हो ! मला गावा ? ।
परि, बहु विस्तर होतां भाषाग्रंथीं, न गोड लागपवा. ॥१॥
दुर्जनचोरांपासुनि संरक्षायासि तत्व हें रत्न, ।
केलें परोक्ष भावें कथ, मुनिवरें करूनियां यत्न. ॥२॥
प्रथमाध्यायीं तत्त्वप्रश्नोत्तर रम्य वर्णिलें आहे, ।
ऐसें पुष्करनाम प्रादुर्भावांत साधुधी पाहे. ॥३॥
ज्ञानपरमसाधन जें वैराग्य, तदीय सिद्धिला दुसरा, ।
अध्याय वदे, सेविति या, हंस जसेचि मानसा सुसरा. ॥४॥
सर्वहि द्दश्य विनाशि, श्रद्धावान् नाशरहित पद लाहो, ।
म्हणवुनि योग तिसरिया अध्यायांत द्विजेंद्र वदला, हो ! ॥५॥
मार्कंडेयसमाधि व्यास चतुर्थांत जाहला कथिता, ।
निववाया परतत्वामृतरसपानें भवव्यथाव्यथिता. ॥६॥
जो ब्रम्हाज्ञ ब्राम्हाण, तो शुद्ध ब्रम्हा होय, या भावें ।
मुनि आपवादिजन्म व्यक्त कथी पंचमांत, हें गावें. ॥७॥
मुनिनें, बाहयाभ्यंतर विश्वातें भेद लेशही नाहीं, ।
षष्टांत वर्णिलें हें, समजावें दुरुपदेशहीनांहीं. ॥८॥
तामस, राजस, दोघे जे लय, विक्षेप, सातव्यामाजी ।
मधुकटैभरूप वधी सत्त्वमहाविष्णु, करुनियां आजी. ॥९॥
ईश्वरसूत्रात्मविराटभाव त्यागूनि, चिति उरे शुद्धा; ।
तीपासुनि सृष्टि पुन्हा, हें कळवी व्यास अष्टमी बुद्धा. ॥१०॥
सांख्याचें, योगाचें, देणार रहस्य आशु भव्यास, ।
तद्विस्तरार्थ कथिता, झाला नवमाख्य हा शुभ, व्यास. ॥११॥
मुनिराज सांख्ययोगात्मक सांगे ब्रम्हायज्ञ दशमांत, ।
सांख्यब्रम्हाविचार स्तवि, जीव पडे जयास्तव शमांत. ॥१२॥
कर्मफळपरिच्छेदा मुनि वर्णी भोगभूमितें, जाणा; ।
सम योगयाग अक्षरलाभा, एकादशीं मनीं आणा. ॥१३॥
योगोपसर्ग कथिले श्रीमुनिनें द्वादशांत समजावे, ।
कीं तें पर वैराग्यें वितळुनि, वातें पयोदसम, जावे. ॥१४॥
मुनिनें त्रयोदशीं मग कथिल्या सर्वाहि धारणा व्यक्ता, ।
दाविति महाचमत्कृति भुलविति ज्या, सुंदरी जशा सक्ता. ॥१५॥
देती बहु भीति पृथग्भूताच्या धारणा, जशा कारा; ।
यास्तव चतुर्दशीं मुनि सांगे सूत्रात्मधारणा सारा. ॥१६॥
जीवन्मुत्तयर्थ कथी मुनि आधीं ब्रम्हातत्त्व, चवदा हीं, ।
बा ! राही धर्मक्रम मुक्तयर्थ, जसा पयोद दवदाहीं. ॥१७॥
पंचदशीं, ज्या ब्रम्हाज्ञान नसे, त्या महत्तमें कर्में ।
विधिलोकच्युत करिती, हें सांगे द्यावया बुधा शर्में. ॥१८॥
कथिलें श्रीमुनिनाथें जें सनिवृत्तिप्रवृत्तिधर्मफळ, ।
निकळ प्रवृत्तिनिष्ठस्थिति सोळाव्यांत, जावयास मळ. ॥१९॥
सप्तदशीं अध्यायीं, म्हणती ज्या ‘द्विभुज हरि’ असें तज्ज्ञ, ।
तो प्राणयज्ञ सांगे चित्तजयावह, दुजा हविर्जज्ञ. ॥२०॥
अष्टादशांत कथिलें, वपु भेदाया अशक्त जे, त्यांहीं ।
अविमुक्तांत करावें निजधर्माचरण चित्तजेत्यांहीं. ॥२१॥
कामादिविघ्न आहे श्रौतीं यज्ञींहि; विष्णुभक्ति बरी; ।
मुनिवर एकुणिसाव्या अध्यायामाजि हेंचि सिद्ध करी. ॥२२॥
मोहें देहीं निगडीं आत्मा बांधोनि पाडिला आहे, ।
उद्धरिजे सत्त्वबळें; विंशीं हें वर्णिलें कृती पाहे. ॥२३॥
सत्वें मोह निवटितां, गुरुशास्त्रप्रमुख विश्व जें आहे, ।
पाहे हार्द ब्रम्हीं; एकविसाव्यांत हें कृती लाहे. ॥२४॥
द्वाविंशीं विष्णादिहि योगें ऐश्वर्य पावले मोटें, ।
श्रद्धार्थ वदे धरिला सत्यवतीच्या मुहूर्त जो पोटें. ॥२५॥
कर्म करावें योगप्रत्यूहशमार्था, हें त्रयोविंशीं. ।
मुनि पूर्वकल्पकथनें सांगे, व्हायासि सन्मनें हिंसीं. ॥२६॥
श्रीव्यास चतुर्विंशीं सांगे हें, कीं, समानही कष्ट, ।
योगफळा मोक्षातें, सात्विक पावति, न तामस स्पष्ट. ॥२७॥
तम सिंधु, मनिचि मंदर कथिलें, शमकाम जे, सुरासुर ते, ।
अभ्यास हेंचि मंथन, युक्ति सुधा, जाणती सुधी पुरते. ॥२८॥
जो कूटशिष्य, तोही काळें साधुत्व पावतो तज्ज्ञ, ।
श्रीव्यास पंचविंशीं कथि, सांगुनि कनककशिपुचा यज्ञ. ॥२९॥
श्रीमंत मत्त होतो, तद्धन, करुणा करूनि, हरि हरितो. ॥३०॥
षडिंवशीं, द्रोही जो दक्ष, तया शंभु सत्पथीं लावी, ।
मग काय बल्यनुग्रह सांगावा ? व्यास तत्व हें दावी. ॥३१॥
ईशद्रोहीं कृत जो धर्म, असे सर्वथा महाबळ तो; ।
मुनि दक्षनिग्रह कथी, यास्तव हा भाव साधुला कळतो. ॥३२॥
ऐसें रहस्य पद्मप्रादुर्भावांत वर्णिलें कविनें, ।
सत्यवतीपुत्रानें, श्रीहरिहरजनसभाब्जिनीरविनें. ॥३३॥
तज्ज्ञा मोह न लंघी, नकुळाच्या गरळधर बिलाग्रास. ।
होतो तृप्त पिता, जरि, बाळानें एक भरविला ग्रास. ॥३४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 01, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP