उत्तरार्ध - अध्याय २९ वा

हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.


बिल्वोदकेश्वरातें नमुनि, रथीं चढुनि, अजित हरि हरितें ।
हटकी, अठवि न नातें, निज शार्ङ्गधनुष्य सजित, हरि ! हरि ! तें. ॥१॥
स्वरथीं ससुत हरि चढे, हौनियां युक्त अमरसेनांहीं; ।
नारद म्हणे,“समिति ! तुजसम कुतुक अनन्यसमरसे ! नाहीं.” ॥२॥
प्रभु शरपटलें झांकी गुरुसि, म्हणे, “मलिन हा; पतिद्रोहें ।
पाहोंना; तूं न तसा, घडली माझी तुला गति द्रो ! हे.” ॥३॥
शक्रहि तेव्हां कोपे, झांकी प्रभुच्या रथासि रोपांनीं; ।
कवि म्हणति, ‘यत्कथांच्या चित्त, धरुनि सत्पथा, सिरो पानीं.’ ॥४॥
याची त्या, त्याची या, हेति न, उरवावया न यश, हाणी; ।
जाय जवें, हळुच सिवे, सुकवीचा जाणती नय शहाणी. ॥५॥
शक्राच्या एकैका हाणी दश दश सुबाण अश्वास; ।
असते कुबाण, तरि ते घेऊं देते तयांसि न श्वास. ॥६॥
शैब्यादि भगवदश्वप्रवरांतें शक्र शरगणें ताडी, ।
तो सरळ सुवृत्त,  सुगति, हरिवाहकहरिशरीररज झाडी. ॥७॥
हरिहय म्हणति हरिशरां, “यन्नासमें नित्य पाप लक्ष तरें, ।
तत्संश्रिताम्सि म्हणतां केविं, ‘करूं, धरुनि चापल, क्षत’? रे !” ॥८॥
कोणी रक्तहि काढी शर, तो बहुमानिला तिहीं व्यक्त, ।
तें अर्थिदान; हरिचे जे, त्यासि अभक्तही जसा भक्त. ॥९॥
प्रभु देवगजीं, अचळीं जेविं जलद जळ, तसेचि शर विखरी. ।
झाला मदांत वश; यश बुडवाया, हा अनीति करवि खरी. ॥१०॥
परि करुणा; नाहीं तरि लागति केव्हांचि अभ्रमु रडाया; ।
घे अभिमुख प्रहारहि, चुकता मागें न दभ्र मुरडाया. ॥११॥
स्पर्शुनि पवित्र झाले, जे शक्रें प्रेषिले बळें पत्री. ।
पत्रीश्वरापुढें किति ? न त्रिजगीं विप्रवर जसा अत्री. ॥१२॥
भूगतहरिसमरींचा दिवस गमे जेविं एक हायन, हो ! ।
मुनि जपति, म्हणति, लोकीं शोकमहागरळसेक हाय ! न हो.’ ॥१३॥
भूकंपप्रमुख परम भयद महोत्पात जाहले शतशा, ।
कीं न प्रवर्तले ते निकरा गजपक्षिवाह लेश तशा. ॥१४॥
तों विधि म्हणे, “म्हणो न त्रिभुवन, विसरुनि वचा शुभा चिर, ‘हा !’ ।
जा, कश्यपा ! वधूसह पुत्राच्या अंतरीं उभाचि रहा.” ॥१५॥
कश्यप म्हणे, “अवश्य”, स्त्रीसह ठाके सुतांचिया मध्यें, ।
ज्यां दोघां परिपाल्यें साधुकुळें, खळकुळें सदा वध्यें. ॥१६॥
स्वरथांवरुनि उतरले, ठेउनि धनु, पाहतांचि पितरांतें; ।
अत्यद्भुत भाग्य जगीं बा ! त्यांचें जें, नसेचि इतरां तें, ॥१७॥
इंद्रोपेंद्र पित्यातें मातेतें वंदिती; तयां आशी ।
दे कश्यप, अदिति सती, भव्याच्या ज्यांत नांदती राशी. ॥१८॥
अदिति, कर धरुनि, बोले, “सुज्ञाचे वत्सहो ! तुम्ही राय, ।
स्वल्पार्थ असोदरसे का करितां कलह ? योग्य हें काय ? ॥१९॥
ताताचें, मातेचें, ऐकावें, धर्म होय तनयाचा; ।
तरि अस्मत्सूक्त करा. बा ! यांत नसेचि लेश अनयाचा. ॥२०॥
सुतहो ! तुम्हां म्हणोत ‘व्यसनीं अन्योन्य उद्धरा’ होरे. ।
द्या आम्हां हें अस्मत्‌प्रीत्यर्थ, व्यर्थ युद्ध राहो, रे !” ॥२१॥
नारद म्हणे, “म्हणा ‘हूं’. स्वगुरुवचन होय मत नयशतातें. ।
द्यावें वचनकराला प्रेमें सर्वस्व, वतन, यश, तातें.” ॥२२॥
म्हणुनि ‘तथास्तु,’ कलहमति तत्काळचि विष्णु जिष्णुही, सोडी. ।
करुनि दिली मातेनें किंवा श्रीशिववरोक्तिनें गोडी. ॥२३॥
प्रिय कश्यपादि यांचा ज्या देशीं सिद्ध जाहला काम, ।
‘प्रियसंगमन’ असें त्या स्थानाचें सुमुनि ठेविती नाम. ॥२४॥
गंगास्नान कराया जातां श्रीविष्णुसीं वदे शक्र, ।
‘देवुनि सुरराज्य मला, बापा ! होतोसि तूं कसा वक्र ? ॥२५॥
गंगेंत स्नान करुनि, येवुनि पितरांसमीप, वनमाळी ।
अभय हरिस दे. कंटकदोषें सुकवील काय वन माळी ? ॥२६॥
ब्रम्हाद्यमरगणासीं भेटुनि, मग पितृनिदेशवशचित्तें ।
अग्रजसहितें केलें तातविमानेंचि यान मुनिवित्ते. ॥२७॥
स्वर्गातें प्रभु गेला, कैसा ‘नाहीं’ म्हणेल मातेतें ? ।
गुर्वाज्ञागीतिहरिण होतें सदपत्य, जें न माते, तें. ॥२८॥
एक दिवस झाल्यावरि, अदिति म्हणे वासवानुजा कृष्णा, ।
‘ने पारिजात; बा ! तव दयितेची पुण्यकें पुरो तृष्णा.’ ॥२९॥
जनकातें, जननीतें, देव नमी, जिष्णुतें, सचीतेंही; ।
ख्याति जगीं, भक्ता जें प्रिय सगुण ब्रम्हा, तें रचीतें ही. ॥३०॥
प्रार्थुनि शक्रासि, शची प्रभुच्या सोळा सहस्त्र भार्यांतें ।
दिव्यांबर भूषण दे, जें प्रियकर योग्य होय आर्यां, तें. ॥३१॥
आला रैवतकाला, कालाहिमदघ्न राहता झाला, ।
धाडी सात्यकिस पुरीं, कळवाया विजयवृत्त हें त्याला. ॥३२॥
सात्यकि पुरासि जावुनि, भगवद्यश कथुनि हर्ष देवून, ।
पुनरपि रैवतकीं ये, सर्वहि यादवकुमर घेवून. ॥३३॥
उष्णकर न झांकावा द्वारवतीमाजि कां पताकांहीं ? ।
वैकुंठलोकही, ती शोभा पाहोनि, कांपता कांहीं. ॥३४॥
द्वारवती बहु शोभासंपन्ना जेविं नृपतिची महिला, ।
तींत सुरद्रुम घेवुनि गरुड प्रद्युम्नसह शिरे पहिला. ॥३५॥
त्यामागें प्रभु चाले, मग सात्यकि, सांब, हे तयामागें. ।
जन म्हणति, “हरिच सुरतरु, हृदया ! हो पूर्ण हेत, या मागें.” ॥३६॥
जन आनर्तनिवासी हर्षे पाहोनि दिव्य नग, नाचे; ।
जयजयकारें तेव्हां भरले अवकाश गेहगगनाचे. ॥३७॥
तो कल्पतरु पहातां, वृद्धांची तत्क्षणीं जरा गेली; ।
अंधा गंधानें ये द्दष्टिहि, तन्नियतिही न रागेली ॥३८॥
कर्माचें तरुगंध न बंधन उरवी जना सरोगातें;।
नीरोग करि, म्हणे, “जें इष्ट न वाटे मना, सरो गा ! तें.” ॥३९॥
देवांसीं स्पर्धाया वृद्धहि, होवुनि युवा, सजे. पिक ते ।
शुभ्र तया वृक्षावरि, अन्यत्र सकळ सुवास जे पिकते. ॥४०॥
झाले जन वाद्यांहीं रोमांचितरुचिरकाय गेयांहीं; ।
देवी म्हणति, “कळेना केलें तप सुचिर काय गे ! यांहीं. ॥४१॥
पितरांतें, राजातें. प्रभु सुखवी, पाय नमुनि, रामातें; ।
दे यश सतीस चुकुनिहि, बहु पावे काय न मुनिरामा तें ? ॥४२॥
ती नमुनि म्हणे, “प्रभुजी ! दास्यचि, तारावयासि सत्या, द्या. ।
श्रीचरणांहीं केली हे धन्या, जेविं शक्ति सत्याद्या.” ॥४३॥
‘आच्छादी पुर केव्हां, केव्हां तरुराज होय करहार्य, ।
अंगुष्ठमात्र केव्हां प्रभुसंकल्पें,’ असें कथिति आर्य. ॥४४॥
जय मेळविला, ज्याच्या सुगदेसीं करुनि समर, न गदांनीं, ।
तो प्रभु सहाय, मग कां न धरिल ती हृदय अमरनगदानीं ? ॥४५॥
सत्या अत्याद्दतमति वदली, ‘साहित्य पुण्यकाचें हो.’ ।
प्रभुनें सर्वहि केलें. काय तिचें पूर्वपुण्य काचें ? हो ! ॥४६॥
द्याया निजदान, प्रभु चिंती श्रीनारदा सुपात्रास; ।
होय अलेपा शिवतां, न सलेपा वंशजा सुपा त्रास. ॥४७॥
स्मरतांचि सुधर्मज्ञ प्रकटे मुनिराज नारद नयज्ञ, ।
ज्याचे शुचि फळ देती स्वसम दयाभाजना रदनयज्ञ. ॥४८॥
पूजुनि मुनि, भामेसह विभुनें प्रार्थुनि सदन्न जेवविला, ।
त्याकारणें स्वसह तरु सत्येकरवीं यथोक्त देवविला. ॥४९॥
त्या सुरतरुसीं बांधुनि तत्पुष्पांच्याचि मान दामानें, ।
देवी देती झाली देवाद्या दान मानदा मानें. ॥५०॥
तिळ, सर्व धान्य, कांचन, रजत, सुमणि, पर्वत द्रुमासहित, ।
ती गोसहस्रही दे, जन्महित जगांत जेंचि सन्महित. ॥५१॥
मुनितिलक ज्या मुहूर्तीं आला, त्या साधुजन घबाड वदे; ।
करुनि विनोद, क्षण भय सत्येला परम अनघ बाड वदे; ॥५२॥
मुनि संप्रहृष्ट होय, स्त्रीबद्धा त्या त्रिलोकभर्यातें ।
लीलेनें मुक्त करी, आपण जीवासि मुक्त कर्त्यातें. ॥५३॥
प्रभुसि  म्हणे, “कृष्णा ! तूं भामेनें मज दिलासि जोडून ।
बहुतांसमक्ष विधिनें, संकल्प करून, उदक सोडून. ॥५४॥
बा ! यावरि तूं माझ, ये मजमागून, सद्धना ! चाल. ।
जीवांसि म्हणेन, ‘सुटा, किति हौनि विषयबद्ध नाचाल ? ॥५५॥
जें सांगेन तुला मी स्वामी, तूं तें समग्र कार्य करीं. ।
होसिल याहूनि सुखी, भाग्यें आलासि आजि आर्यकरीं.” ॥५६॥
देव म्हणे, “साधूंची आलों सेवा करीत सेवकसा, ।
हेंच मज रुचे, स्वामी ! दावा कैलासवासि देव कसा.” ॥५७॥
करि तें तें देव, म्हणे, “चित्ता ! हें यशचि, एवमस्त, सहा.” ।
आज्ञा करूनि, नेववि, घेववि, मुनि पादुकादिवस्तुस हा. ॥५८॥
तो ज्ञानि भक्त गुरुवर विश्वाच्या भाग्यपुण्यपुंजातें ।
द्वारापावेतों ने, जेविं उपाध्याय सोडमुंजातें. ॥५९॥
क्षणभरि करुनि विनोद, प्रभुकंठांतील काढिलें दाम, ।
ज्याचे म्हणति, ‘यशा दे; वेडयांनीं अमृत जोडिलें दाम.’ ॥६०॥
“झाले दश पुत्र जनकगुण, कन्यारत्न भव्य अकरावें, ।
स्वस्थचि रहा, पहालहि, दत्तपुनर्ग्रहण काय न करावें ? ॥६१॥
कपिला धेनु सवत्सा नुचली पद दोह चारदां करितां; ।
दे तिलपूर्ण सकांचन कृष्णाजिन आत्मनिष्क्रयाकरितां. ॥६२॥
हा निष्क्रय जगदीशें श्रीरुद्रें योग्य कल्पिला आहे, ।
बहु नि:संगोपासन दुष्कर तुज युक्ति सोडवू बा ! हे.” ॥६३॥
भक्तिवश श्रीवल्लभ, सांगे मुनिराज, तीच गोठि करी. ।
सत्कीर्ति कृष्णकीर्तिस रुचि दे, कथिकेसि जेविं ! हो ठिकरी. ॥६४॥
श्रीकृष्ण द्रवुनि म्हणे, “बा ! तूं मत्प्रीतिकोलिसदन मुनी, ।
दुर्लभ वर मगुनि घे, देतों, ज्या त्यजि न कीर्ति, पद नमुनी.” ॥६५॥
नारद म्हणे, “मुकुंदा ! ‘मागचि’ म्हणतोसि ‘वर’ मला काय ? ।
‘भेदव्यवहार नसो, साधूंचा यांत वरमला काय. ॥६६॥
तव सालोक्य घडो, हो विप्र अयोनिज,’ असाच वर दे हा. ।
ब्रम्हाज्ञ सार्वभौम न हें स्वीकारिल कसा चवर देहा ?” ॥६७॥
श्रीकृष्ण म्हणे, “सुज्ञा ! जें आवडलें, दिलें असोंदे हें. ।
बा ! आम्ही सर्वस्वें जैसेतैसे तुझे असों देहें. ॥६८॥
आमंत्रुनि सत्येनें सर्व श्रीकृष्णदार जेवविले, ।
दिव्यपटालंकार स्वकरें हरिदत्त त्यांसि लेवविले. ॥६९॥
सुरतरुसंपत्कौतुक देखाया कृष्ण सोयरे बाहे, ।
ते आप्त म्हणति, “योग्या रीति तुझी तुजचि होय रे ! बा ! हे.” ॥७०॥
पुत्रस्नुषांसह पृथा आली, तेही श्रुतश्रवा ससुता. ।
भीष्मकहि ससुत ये, ते आले सुहृदां जयां दिली असुता. ॥७१॥
श्रीकृष्न प्रभु सार्जुन सांत:पुर बहु सुखें सदा रमला, ।
गमला मंदरसुरतरुवनविहितविहार हर सदार मला ॥७२॥
कृष्णें नेला स्वर्गीं तरुवर ठेवूनि एक वत्सर तो, ।
अदिति म्हणे, “बा ! याच्या संपत्तीसीं महेंद्र वत्स रतो. ॥७३॥
बंधुत्वीं वर्धिष्णु स्नेह असो.” प्रभु म्हणे, “महाभागे ! ।
करिल, जसें म्हणसी तूं, गुर्वाज्ञा वाहतां न हा भागे.” ॥७४॥
आज्ञा घे पितरांची, निघतां तेथूनि, करुनियां नमना, ।
नमुनि पुसे स्वभुजांहीं कृष्ण ज्येष्ठासि धरुनि यानमना. ॥७५॥
कशव शक्रासि म्हणे, “आज्ञा केली शिवें मला कांहीं, ।
ज्याच्या कीर्तिमराला लाजावें परयशोबलाकांहीं, ॥७६॥
त्या पारियात्रशैलाखालें भूमींत असुर आहेत, ।
विधिवरमत्त वधावे ते म्यां, श्रीशंभुचाचि हा हेत. ॥७७॥
मानुष देव असावा एक, दुजा देवपुत्र, तन्मरणा. ।
प्रवरजयंतसहाय प्रेमें धावो मदीयजन्म रणा.” ॥७८॥
म्हणुनि ‘अवश्य’ सुरेश्वर, अमृतसमुद्भव किरीट दे हरितें, ।
तैसेंचि सुकुंडलयुग; कृष्णार्चनहीन गेहदेह रितें. ॥७९॥
प्रभुयोगें स्वर्गाहुनि बा ! सरस द्वारकापुरावास. ।
‘एकचि’ म्हण ‘अमितही वासर’ सद्वार ‘कापुरा वास’. ॥८०॥
श्रीरुक्मिणी पुसे, मुनि सांगे पुण्यक, कथूनि उत्पत्ती; ।
कीं तो वर कवि, पर कवि. मारुति होईल काय उत्पत्ती ? ॥८१॥
“देवी उमा भगवती प्रगटी सद्व्रतविधि स्वयें पहिला, ।
आमंत्रिल्या तिणें त्या आल्या समयीं पतिव्रता महिला; ॥८२॥
दक्षसुता अदितिदितिप्रमुखा, तैसीच ती शची देवी, ।
जो रोहिणी प्रियतमा सोमाची पतिपदें सदा सेवी; ॥८३॥
जी रेवती गुणवती, जी पूर्वाफल्गुनी तप:सक्ता, ।
जी शतभिषा, मघा, या सर्वाहि पतिव्रता उमाभक्ता. ॥८४॥
गंगा, सरस्वती, रविकन्या, वेणा, तसीच ती गोदा, ।
वैतरणी, पुण्यनदी सुजना जी गंडकीहि दे मोदा, ॥८५॥
अन्याहि नदी आल्या. लोपामुद्रा पतिव्रता आली, ।
अद्रिसुता, वन्हिसुता, प्रकट स्वाहाहि ते स्थळीं झाली. ॥८६॥
आली श्रीसावित्री, धनदाची स्त्री, तसीच वरुणाची, ।
आली यमधर्माची महिषी देवी अपारकरुणाची. ॥८७॥
वसुभार्या ही, श्री, धृति, मति, आशा, प्रीति, कीर्ति, मेधा, या ।
ख्यातिहि, सन्नतिहि, तयां श्रीदेवी सुबहुमान दे धाया. ॥८८॥
देवुनि रत्ननग, मला अवसानीं स्वव्रताचिया आर्या, ।
देवर्षिसिंधुपर्वत यांच्या पूजी पतिव्रता भार्या. ॥८९॥
व्रतविषयकथा त्यांत प्रथम निघाली, पतिव्रता सर्वा ।
म्हणती अरुंधतीतें, ‘पूस, कथिल तत्व भगवती सर्वा.’ ॥९०॥
व्रतविधि अरुंधतीनें पुसिल्ला, सांगे स्वयें उमा पतिचा ।
मुख्य प्रसाद, पुण्यकविधिही, प्रेमा व्रतीं उमाप तिचा. ॥९१॥
‘बायी ! अरुंधति ! सदा सर्वज्ञा मी पतिप्रसादानें ।
दे पतिच; सतीस इतर सर्वार्थांचीं न दे असा दानें. ॥९२॥
प्रभुनें व्रतविधि कथिला, म्यांहि ज्ञानें विलोकिला भव्य, ।
श्रवण करीं, तुज कथितें, व्रतविधि हा प्रकट जाहला नव्य.’ ॥९३॥
देवर्षि म्हणे, “रुक्मिणि ! जें तत्व उमा अरुंधतीस वदे, ।
तें श्रवण मला घडलें, श्रवणेंही पुण्य जें जसा सव दे.” ॥९४॥
ऐसें म्हणोनि, नारद आपणही रुक्मिणीस आयकवी, ।
तें मूळींच पहावें विस्तर भाषेंत करिल काय कवी ? ॥९५॥


Last Updated : January 01, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP