राजा म्हणे, “मुनींद्रा ! सूचविला जो मला निकुंभवधीं, ।
तो वज्रनाभवध, वद, कामें केला कसा ? तसाच कधीं ?” ॥१॥
वैशंपायन सांगे, मेरुनगीं वज्रनाभ तो तपला, ।
लुब्ध जसा वित्ताला, बहु यमनियमासि सर्वदा जपला. ॥२॥
“देवावध्य असावें” वरदा धात्यासि असुर मागे हें, ।
“वज्रपुर पुर, धरावें तेणें बहु जेंवि वसु रमागेहें, ॥३॥
माझ्या आज्ञेवांचुनि जाया सुसमर्थ हात, शिर, काया, ।
अक्षम हो, किंबहुना मम वज्रपुरींत वात शिरकाया. ॥४॥
चिंतन केलें नसतां, कामाची प्राप्ति नित्यहि असावी, ।
मद्वज्रपुराभंवती शाखानगरालि सुंदर वसावी. ॥५॥
अतिरम्य आसमंतात् मंडल नंदनतसें उपवनाचें, ।
त्यांत असावें तांडव सर्वर्तूंचें सदा, सुपवनाचें.” ॥६॥
ब्रम्हा म्हणे, “दिलें हें.” झालें तैसेंचि सर्व वरदानें, ।
पुरवुनि काम, उरविला चिंतामणिचा न गर्व वरदानें, ॥७॥
ख्याति वराची झाली राया ! लोकत्रयांत ती मोटी; ।
आणुनि रत्नोपायन, दैत्यांच्या त्यासि भेटल्या कोटी. ॥८॥
प्रमुदित रत्नसमृद्धीं वज्रपुरीं वज्रनाभ तो राहे, ।
त्रैलोक्यस्वामित्वप्राप्तीचा काम मानसीं वाहे. ॥९॥
स्वर्गीं जाउनि, भेटे तो शक्रातें, म्हणे, “तुवा’ प्राज्य ।
त्रैलोक्याचें केलें, कश्यपसुत मीहि, करिन हें राज्य. ॥१०॥
दे राजा, हो निराळा, कीं मजला दे सुरेश्वरा ! युद्ध.” ।
सात्वुनि तया, हरि वदे सुरगुरुनें शिकविलें तसें शुद्ध.” ।
“सत्र करितसे कश्यप मुनि, तुमचा आमुचा पिता आर्य; ।
तें सत्र संपल्यावरि, तोचि करो, बा ! असेल जें कार्य.” ॥१२॥
शक्रासि पुसुनि गेला तो, देवांतें करूनि सत्रास. ।
भेटे कश्यपमुनितें, जेथें होता वरूनि सत्रास. ॥१३॥
“हें सत्र होय, तोंवरिं जा वज्रपुरीं सुता ! असायास; ।
मग युक्त तें करिन मी.” तो तात निदेश करि असा यास. ॥१४॥
ऐसी सुरुची आज्ञा होतां, तो वज्रनाभ मग, राजा ! ।
गेला, त्या आपुलिया, वातहि लंघी स्वयें न नगरा ज्या. ॥१५॥
जाय द्वारवतींत, प्रभुतें तो वज्रनाभवृत्तांत ।
कळवी एकांतीं, जो चिंतेनें फार वज्रभृत् तांत. ॥१६॥
श्रीकृष्ण म्हणे, “आर्या ! करिताहे अश्वमेध तात, न, या ।
सोडुनि, जावें, गीता जेंवि हरिण, साधु वेधतात नया. ॥१७॥
हा हयमख झाल्यावरि मारीन झटोनि वज्रनाभातें, ।
संपादाया आळस कोण करिल सुज्ञ कीर्तिलाभातें ? ॥१८॥
परि वज्रपुरीं त्याच्या इच्छेवांचून वासवा ! राया ! ।
नाहीं प्रवेश कोणा, भीतो घ्यायासि वास वारा या. ॥१९॥
त्या पविपुरप्रवेशीं चिंतावी म्यां तुवांचि बा ! युक्ती, ।
सामर्थ्यें लंघावी कैसी त्या आत्मयोनिची उक्ती ?” ॥२०॥
अभयवर प्रभुपासुनि पावुनि, अति दुर्लभाहि नमनातें, ।
गमनातें करि हरि, दे चिंतूं युक्त्यंतरास न मनातें. ॥२१॥
त्यावरि वसुदेवाचा तों हयमेध प्रवर्ततां, आला ।
अतिनिपुण भद्रनामा नट तेथें, प्रियं मुनीश्वरां झाला. ॥२२॥
मुनि सुप्रसन्न झाले, वदले ते त्या नटासि, “वर मागें, ।
अस्मत्प्रसादमित्रें वरिली भा भक्तपूर्वचरमागें.” ॥२३॥
देवेंद्रश्रीकृष्णप्रभुसंकल्पेंचि नाटकीं धाले, ।
कीं त्या सुमानसीं बहु हरिहरगुण हंस आदरें आले. ॥२४॥
बोले सरस्वतीनें प्रेरित तो भद्रनट असें. नमुनी; ।
भावी चित्तीं ‘याचा पुत्रचि जन्मांतरीं असेन मुनीं.’ ॥२५॥
भद्रनत म्हणे, “मुनि ! व्हावें सर्व द्विजांसि मी भोज्य, ।
वाटावा साधूंला स्वप्रियसंपादनार्थ हा प्रोज्य. ॥२६॥
तुमचा प्रसाद, तोका सज्जनक, तसा मला जडा वाहो; ।
सप्तद्वीपांत सुखें संचारहि सर्वदा घडावा, हो ! ॥२७॥
सकळां भूतांला हा नित्य असावा अवध्य, सन्मुनि ! हो ! ।
गगनगति, अरोग, अजर, मर्त्यांतहि हा अमर्त्य जन्मुनि हो. ॥२८॥
जो वर्तमान, जो मृत, जो होणारहि, तसाचि वेषानें ।
व्हावें, ख्याति वहावी शुद्धें म्यां, जेंवि भूमि शेषानें. ॥२९॥
द्या सुगुण, तिहीं व्हावे मजवरि बहु सुमुनि अन्यही तुष्ट; ।
मित्रकरें शशिमंडळ, हो यश तुमच्या वरें तसें पुष्ट.” ॥३०॥
वदले ‘तथास्तु’ मुनि ते, झाला भद्र प्रसिद्ध, तो हर्षें ।
हिंडे सप्त द्वीप, प्रेक्षी त्यांतील सर्वही वर्षें. ॥३१॥
सन्मुनिवरप्रसादें सत्कृति सर्वत्र भद्रनट पावे. ।
त्या उत्तरकुरु भजले, कोण पहायासि भद्र न टपावे ? ॥३२॥
पर्वीं पर्वीं ये तो भद्रनट द्वारकेस, उद्धव दे, ।
करि नाटकप्रयोग ब्राम्हीशुकपतिपरीस शुद्ध वदे. ॥३३॥
शक्र म्हणे हंसांतें, “सुरकार्य करा प्रियंवद, भ्राते ।
कश्यपपुत्र तुम्ही शुचि; कीर्ति करिति, कुलज जे, अदभ्रा ते. ॥३४॥
सर्वत्र तुम्ही सत्कृत, जा वज्रपुरांत वज्रनाभाच्या, ।
क्रीडा वापींत करा, स्मरुनि उपायासि कीर्तिलाभाच्या. ॥३५॥
झाली आहे त्याला श्रीमद्नौरीप्रसादजा कन्या, ।
धन्या त्रैलोक्यांतहि तैसी नाहीं मराळ ! हो ! अन्या. ॥३६॥
शोभे सरसी तुमच्या, तेविं गुणाच्या प्रभावती व्रातें; ।
मृदुतें तीव्र कराया क्षम, मृदुहि जिचा प्रभाव तीव्रातें. ॥३७॥
अंत:पुरवापींत क्रीडा करितां प्रभावती रमणी, ।
भाग्यें पहा तुम्ही ती, व्हा अर्थिसुविप्रभावतीरमणी. ॥३८॥
कर्णीं प्रद्युम्नाच्या पेरा तद्रूपशीलगुणबीजा ।
पिकवा प्रेम, करा त्या, अनलस यत्नासि करिति कुणबी ज्या. ॥३९॥
मुख, नेत्र, कर्ण, तीचे, प्रद्युम्नाचे, तुम्ही स्वयें, जा, व्हा; ।
तीस तयाची, त्यासहि तीची, सुतृषितसुधाचि हो आव्हा. ॥४०॥
वृत्तांत मला कळवा प्रतिदिवस, तसाचि तो मदनुजातें; ।
श्रुतिहि म्हणे अतिवत्सल, परि अतिवत्सल म्हणे न दनु ज्यातें. ॥४१॥
तूं गंधवाह, नलिनी ती, तद्नुणगण सुवास, अळिवर तो, ।
भेटो प्रभावतीसीं हंससमाजांत, दिष्ट कळिव, रतो. ॥४२॥
देवावध्य असुर तो ब्रम्हावरें बहुत वाहतो दर्प, ।
क्षीरें पोषुनि, जैसा मत्त करावा निजाहिता सर्प. ॥४३॥
देवसुतप्रद्युम्नप्रमुखीं हंतव्य थापटुनि रसिकीं, ।
उन्मूळुनि युक्तीनें विचलित दंत, व्यथा पटु निरसि कीं, ॥४४॥
भद्रनटाचा, त्याच्या परिवाराचाहि, वेष धरितील, ।
कृष्णकुमार पविपुरीं प्रद्युम्नादि प्रवेश करितील, ॥४५॥
पवनहि शिरे पविपुरीं आज्ञेवांचूनि न पविनाभाच्या, ।
युक्ति करा, जीणें तो रुक्म्याच्या दैत्य खपविना भाच्या. ॥४६॥
त्या शंबरासुराच्या पूर्वीं मायावती जसी भवनीं, ।
तुमची युक्ति असावी प्रद्युम्नाच्या तसी रता अवनीं. ॥४७॥
यावी प्रभावतीही, ती दमयंती जसीच, आर्यकरा. ।
हें, काश्यप हो ! आम्हां निजबंधूंचें जपोनि कार्य करा.” ॥४८॥
शक्रप्रेरित, निपुण प्रथम तसे हंस अरिपुरा गेले, ।
अंत: पुरवापींतहि, शुभदर्शन म्हणुनि, न रिपु रागेले. ॥४९॥
त्या वापींत सुरम्यें, कनकाचीं, स्पर्शनक्षमें, कमळें; ।
अमळें, अमृतसमरसें, सीतसुगंधें, यथेप्सितें, कमळें. ॥५०॥
वापी नाकीं न तशा बहुरम्या, रत्नरसनसोपाना; ।
यदमृत पिवुनि, म्हणावें तृषितें, “पीयूषरस नसो पाना.” ॥५१॥
त्यातें पविनाभ वदे, “स्वर्गींचे शुद्ध खग तुम्ही वसते ।
आलां, बरें, सुखें या, गृह तुमच, घ्या, अभीष्ट जे रस, ते. ॥५२॥
येत असावें उत्सवसमयीं हृदयीं धरूनि विश्वास, ।
मंगळ मिळतें तुमच्या दर्शनलाभेंकरूनि विश्वास.” ॥५३॥
ऐसी आज्ञाहि दिली त्या पविनाभें; सुखें मग मराल ।
अंत:पुरींहि शिरले, म्हणति मनीं, “पीडितां जग, मराल.” ॥५४॥
युक्तीनें उपडाया द्दढमूळा जिष्णुच्या अरिचयातें, ।
दैत्यांच्या दयितांसीं करिती कवि हंस ते परिचयातें. ॥५५॥
गीर्वाणदेशभाषानिपुण कथिति हंस कवि कथा राया ! ।
स्वर्गीं सुरांसि, दैत्या शत्रूचें हरुनि भविक, थाराया. ॥५६॥
हंस प्रभावतीतें कथुनि कथा, करिति परिचिता, राया ! ।
जाणों त्या रतिस शिवावाक्यें ते सिद्ध वरिति ताराया. ॥५७॥
हंसी एक शुचिमुखी, तीस करि सखी प्रभावती, राया ! ।
प्रद्युम्नाचा वर्णी स्वजना म्हणता प्रभाव ‘तीरा या.’ ॥५८॥
प्रथम कथा कथुनि, म्हणे, “यौवन न सखी प्रभावति ! मिरासी, ।
करिगि असें वर्थ कसें वपु ? हरि ज्याचा प्रभाव तिमिरासी. ॥५९॥
वर न वरिसि, बंधूंनीं तूं केलीस स्वयंवरा धन्या; ।
बहु अननुरूप गणिले, गेले सुर असुर, न भजसी अन्या. ॥६०॥
कामोपभोगतुल्या प्रीति जगीं स्त्रीजना नसे दुसरी, ।
पतिच्या संगावांचुनि सर्व स्त्रीच्या वृथा कळाकुसरी. ॥६१॥
सुंदरि ! सुंदरवर वर येतां प्रद्युम्न जरि पहातीस, ।
श्रीविष्णुला जसी श्री, त्याला सर्वस्व तूं वहातीस. ॥६२॥
परि तो कशास येइल येथें जगदेकवीर ? सुंदर हा ।
अमृतनद म्हणे, ‘घ्या, जननयनें ! हो ! वाढवूनि तुंद, राहा.’ ॥६३॥
सखि ! नारींचा धीर प्रद्युम्नातें विलोकितां गळतो, ।
स्त्रीजन मीनचि वाटे, त्याचा रूपादि सगुण जो, गळ तो. ॥६४॥
देवांत देव, सुंदरि ! योग्यगुणें दानवांत दानव तो, ।
सखि ! मानवांत मानव, या नवल करूनि सर्व मानवतो. ॥६५॥
सर्व जगत्सार करुनि एकत्र, अनंग जो सुचिर काय, ।
केला सांग प्रभुनें तो, जैसा आपुला रुचिर काय. ॥६६॥
यदुवंशीं अवतरला विष्णु तयाचाचि हा कुमारमणी; ।
श्रीरुक्मिणीसुत, तसा सुत वांछी शंभुची उमा रमणी. ॥६७॥
त्रैलोक्यांतिल गुरु गुण या प्रद्युम्नींच वसति एकवट, ।
जाणों ग्रीष्मव्याकुळ पांथचि ते, तोहि वसति एक वट.” ॥६८॥
इत्यादि प्रद्युम्नस्तुति ऐकुनि, ती प्रभांवती वदली, ।
“सखि ! तात वदे, ‘प्रसवलि अद्भुत कर्पूर देवकीकदली.’ ॥६९॥
श्रीकृष्ण विष्णु साक्षात्, सर्वेश्वर, दैत्यदानवाराती; ।
ज्याची कीर्ति, सुरांच्या तप्ता दे शैत्यदान वारा ती. ॥७०॥
वृद्ध म्हणति, ‘असुरांनीं कृष्णासीं तों कधीं नसे साम, ।
जनककुळाहुनि पतिकुळ अधिक असावें असा वधूकाम. ॥७१॥
आज्ञप्त असति दैत्य श्रीकृष्णविनिग्रहार्थ मत्तातें, ।
हा त्यातें भंगाया बहु जपतो, तोहि या प्रमत्तातें. ॥७२॥
स्मरतें याचें त्याचें अनुदिन अन्योन्यवैर आग मन, ।
या वज्रपुरीं कैसें प्रद्युम्नाचें घडेल आगमन ? ॥७३॥
व्हापा भर्ता प्राप्त प्रद्युम्न मला, मनांत सदुपाया ।
योजुनि, सांग, सये ! जो द्रववुनि आणील शीघ्र यदुपा या. ॥७४॥
प्रद्युम्नोत्पत्तिकथा सर्वा वृद्वस्त्रियांत आयकिली, ।
मी म्हणतसें मनीं कीं, ‘या सुखनिधिची मिळेल काय किली ?’ ॥७५॥
हें कार्य कराया, त्या प्रभुसूनुकडे तुवांचि सखि ! जावें; ।
राज्ञीनेंही, देतां जीवन रुग्णानुगेसि, न खिजावें. ॥७६॥
हे तव अनुजा, तनुजा, अथवा दासीच, म्हण, न आलि; सये !
या कार्याहि, न व्हाया कोणा उपकारगणन, आलिस, ये.” ॥७७॥
हंसी म्हणे, “करिन, तो प्रभु तुज नेईल सुदति ! शयनातें. ।
मज, साधुसभेसहि, सखि ! तुमचें देयील मुदतिशय नातें. ॥७८॥
घालिति, परार्थचि, धवलतर यश लक्षुनि, न आंग, जन कास, ।
परि मम कथाकुशलता, स्वहितार्थ जपोनि, सांग जनकास.” ॥७९॥
तीची तातासि कथाकथनकुशलता प्रभावती कळवी, ।
श्रवण कराया त्याच्या चित्तातें रसिकतास्तवें वळवी. ॥८०॥
तो त्या हंसीस पुसे, “शुचिमुखि ! कांहीं अपूर्व सांग मला, ।
मीहि कथारस जाणें, स्त्रीजनचि तुला रसज्ञ कां गमला ?” ॥८१॥
ती हंसी मधुर वदे; “असुरेंद्रा ! शांडिली सती मोटी ।
म्यां देखिली, सुपुण्या कीर्ति जिची सेविती सुधी कोटी. ॥८२॥
हे सुमति मेरुगिरिच्या पर्श्विं वसती; असीच बा ! दुसरी ।
ती सुमना कौशल्या; तनु ज्यांची वाळली जसी उसरी. ॥८३॥
या प्रियसखी शिवेच्या करुनि सदा सर्वभूतहित राया ! ।
जीचा प्रसाद नव्हतां, योग्य भवातें न पूतहि तराया. ॥८४॥
ज्याचें सुर, सज्जनही, सप्रेम पहावया वदन टपती, ।
तैसाचि देखिला मुनिदत्तवर सुसक्र्तियापद नटपती, ॥८५॥
द्विजभोज्य, कामरूपी, सर्वद्वीपांत हिंडतो, याचें ।
शुचि गीत, नृत्य मधुरहि, मित्र न देऊनि खिंड तोयाचें.” ॥८६॥
पविनाभ म्हणे, “चारणसिद्धमुखें ऐकिला असे नट तो, ।
नाना कौतुक करितो, सर्वद्वीपांत सर्वदा अटतो. ॥८७॥
शुचिमुखि ! हंसि ! अनुभवुनि सुरगंधर्वादि, काम हा वाहें ।
चित्तांत सर्वदा मी, ‘सद्नुणनिधि भद्रनट पहावा’ हें.” ॥८८॥
हंसी म्हणे, “म्हणतसें भद्रा ‘बुधतोष हेंचि’ भद्र ‘सिकें,’ ।
सर्वेंहि देखिला हो ! तो नटगुण हार्य आर्यसद्रसिकें. ॥८९॥
‘तूं सुगुणज्ञ प्रभु,’ हें कळतां येईल आपणचि राज्या. ।
वांछी रसिक नवाज्या, करितो न पवोनि आपण चिराज्या. ॥९०॥
लोकांत गुणी जन, ते सगुण ज्ञाते स्वयेंचि हुडकीती, ।
गुणवत्ता एक, दुजी, ज्ञात्याची साधुउक्ति, कुडकी ती.” ॥९१॥
असुरेंद्र म्हणे, “हंसि ! त्वरितचि यो भद्रनट पुरा, तनया ।
कथिती कुशलपण तुझें, हंसत्वा स्तविति कवि पुरातन या. ॥”९२॥
पविनाभें असुरेंद्रें हंस शुचिमुखीसमेत बोधूनी. ।
पाठविले, आणाया भद्रनटातें जगांत शोधूनी. ॥९३॥
त्या त्याही हरिस कथिति स्वर्गीं. सागरपुरीं, सुख गमाया, ।
सुरसाधुशत्रुनाशाकरितां करिती असी सुखग माया. ॥९४॥
प्रभुनें आज्ञा करितां होय प्रद्युम्न भद्र नटपाल, ।
सुचवि, ‘उलाल सदहितें, जरि कीं व्हाया स्वभद्र न टपाल. ॥९५॥
पद्युम्न होय नायक, सांब विदूषक, तसाचि गद राहे ।
श्रुतिधर हौनि, भगवन्मायेनें पावतीच न दरा हे. ॥९६॥
निपुणा वेश्या सजिती, वेषें होवूनियां नटीकाया, ।
भरतकृत ग्रंथचि हे, नाटयांच्या होति कां न टीका या ? ॥९७॥
मायारचितविमानीं ते प्रद्युम्नादि सर्वही बसले, ।
छळुनि, अरिस बुडवाया गेले, कीं अनय का मनीं न सले ? ॥९८॥
वज्रपुराच्या शाखानगरीं ते नट नभ:पथें गेले, ।
ठेले, जेथें असुरप्रवर बहुत नगरपाळ जे केले. ॥९९॥