उत्तरार्ध - अध्याय ४४ वा

हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.


शौनक पुसे, “प्रतिष्ठित हा पांडववंश कोणत्या भूपीं ? ।
सौत ! वद, या श्रवणीं बहु गोडी बा ! बुधा ! सुधारूपीं.” ॥१॥
सौति म्हणे, “जनमेजय भार्या काश्या, तिचे तनय दोघे, ।
सूर्यापीड ज्ञानी, जो चंद्रापीड, राज्यपद तो घे. ॥२॥
त्या चंद्रापीडाचे नंदन शत, सत्यकर्ण तो ज्येष्ठ; ।
त्या श्वेतकर्णनामा, सुगुणांहींकरुनि तो नृपश्रेष्ठ, ॥३॥
धार्मिकहि, अपुत्र नृपति; वृद्धपणीं मानलें तपोवन या. ।
स्त्री मालिना प्रसवली दैवबळें त्या तपोवनीं तनया. ॥४॥
त्या पुत्रातें यागुनि, पतिमागें द्रौपदीतसी जाय, ।
हाय स्वांतीं न म्हणे; पतिहूनि अधिक सतीस तें काय ? ॥५॥
मातृमहाप्रस्थानीं सुकुमार कुमार तो रडायाचा ।
गिरिकुंजीं वेग करी, बा ! झाला कंठ कोरडा याचा. ॥६॥
चळवळ करितां, शिशुचे दोनीही पार्श्व घांसले गा ! ते, ।
छाया घन करिति पुढें, त्यांचे धात्रींस हांसले गाते. ॥७॥
त्या पैप्यलादि कौशिक परम करुण आश्रमासि वेमाच्या ।
नेती, न शिवायाचें, न पहायाचेहि, राशि हेमाच्या. ॥८॥
वेमस्त्री अनपत्या, विधवा, मानूनि पुत्र बाळा या ।
पाळी, विधिनें केली धात्री त्या संकटांत पाळाया. ॥९॥
पार्श्व शिळाधृष्ट अजश्याम तयाचें, म्हणोनियां नाम ।
‘अजपार्श्व असें झालें, आलें त्यामाजि विष्णुचें धाम. ॥१०॥
ते पैप्यलादि कौशिक धरिति, करुनि बहु दया, सचिवरीती; ।
जी पौरवराजांची श्री, अजपार्श्वा तयासचि वरी ती. ॥११॥
स्वजरा स्वीकारी, बहु होय ययाति प्रसन्नमति, डोले; ।
“होइल अपौरवा भू न कधींच,” असेंचि तो वरद बोले. ॥१२॥
चंद्रार्कग्रहरहिता होइल, परि भू न पूरुकुलरहिता, ।
कथिली असी मुनिवरा ! हरिवंसकथा तुला सुजनमहिता.” ॥१३॥
विप्रवर म्हणे, “सौते ! ऐकुनि आख्यान, सर्प कंपवुनी, ।
जनमेजय भूप पुढें काय करी ? सांग सत्र संपवुनी.” ॥१४॥
सौति म्हणे, “जनमेजय हयमेधातें उपक्रमी आर्य, ।
सांगे हय सोडाया, प्रार्थुनि ऋत्विक् पुरोहिताचार्य. ॥१५॥
तो हयमेधोपक्रम जाणुनि, ये व्यास या पहायास; ।
नृप पूजुनि मुनिस, वदे, ज्याच्या सूक्तें चुके महायास. ॥१६॥
“सत्य महाभारत हें परमामृत, फार पावलों हर्ष, ।
श्रवणसुखांत स्वामी ! न कळत, गेलें निमेषसें वर्ष, ।
बा ! सर्वज्ञ प्रभु तूं, पुसतों, करुणा करूनि, सांग मला; ।
धर्मासि राजसूय क्षत्रक्षयहेतु कार्य कां गमला ? ॥१८॥
आइकतों मी, पूर्वीं केला हा राजसूय सोमानें, ।
संग्राम तारकामय झाला, कीं याचि आनुलोमानें, ॥१९॥
वरुणें हा केल्यावरि, देवासुरयुद्ध जाहलें मागें; ।
बहु भूतक्षय घडला अन्योन्यांच्या दुराग्रहें, रागें, ॥२०॥
यासि हरिश्चंद्रकरी, येणेंचि वसिष्ठ जाहला आडी, ।
ताडी गाधिज यातें, बक हौनि, विश्व संकटीं पाडी. ॥२१॥
त्या आडीबकयुद्धीं रिक्त यमाचे न राहिले पाश, ।
दोघांच्या पक्षींचे क्षत्रिय तेव्हांहि पावले नाश. ॥२२॥
आर्यें धर्में केला क्षत्रक्षयकर, असें असुन, यज्ञ; ।
सुनयज्ञ मन तयाचें, स्वामी ! झालें कर्सें असुनयज्ञ ? ॥२३॥
त्वां ज्ञानिवरें आप्तप्रवरें कां तो न वारिला राजा ? ।
माजा संशय वारीं, गुरुवर बहुमान्य तूं तयां आजा. ॥२४॥
पुसतों तुज हें भावें, कीं कां वरदा ! न वारिला गा ! तो ? ।
साधु जन तुला, जैसा जोडुनि कर दानवारिला, गातो.” ॥२५॥
व्यास म्हणे, “राजा ! तें केलें विपरीत सर्वही काळें, ।
न पुसति, मी न वदें; दे स्तन माता, वदन पसरितां बाळें. ॥२६॥
सांगत नव्हते काय ब्राम्हाण धर्मज्ञ पापरत वेना ? ।
काळाची गति उग्रा, कोणाहि भविष्य बा ! परतवेना, ॥२७॥
वदलों सत्य; प्रत्यय याया तुज, कथिन अर्थ, जो भावी, ।
जरि म्हणसि, पुरुषयत्नें, फिरवूनि भविष्य, कीर्ति शोभावी. ॥२८॥
‘हयमेध करिन’ म्हणसी, विघ्न करिल तुज, न शतमख वळेल, ।
त्यजुनि विवेक खवळसिल; कां नसतां दीप, न तम खवळेल ? ॥२९॥
हयमख पुढें न व्हाया, कारण होसील भा विटाळाया. ।
शंकसिल, तरि तूं टाळीं येणार निमित्त, भावि टाळाया. ॥३०॥
हयमेध राजमार्ग न लोकांत त्वन्निमित्त वाहेल, ।
तुजपासूनि पुढें हा वेदज्ञद्विज मनींच राहेल.” ॥३१॥
भूप म्हणे, “भ्यालों, मी होणार निमित्त यास्तव, नयज्ञा ! ।
बा ! करिल काय कोणीतरि न, परा जेंवि, या स्तवन यज्ञा ?” ॥३२॥
व्यास म्हणे, “द्विज काश्यप योगी प्रकटेल खाणितां क्षोणी, ।
तो एकमात्र हयमख करिल कलियुगीं, न याविना कोणी.” ॥३३॥
ऐसें सांगुनि, सांगे मुनिवर कलिधर्म घोरतम राया, ।
कीं जागो द्रुत, सेवुनि विषय जन, निजो न घोरत मराया. ॥३४॥
हित सांगुनि मुनि गेला, मग जनमेजय सुबुद्धहि भ्रमला, ।
आरंभुनि हयमेध, प्रत्युहेंकरुनि तो बहु श्रमला. ॥३५॥
यज्ञांत मारिताश्वस्थानीं काश्या वपुष्टमा देवी ।
जाय, बसे; तों तीतें, होऊनि सजीव अश्व तो, सेवी. ॥३६॥
त्या संज्ञप्तीं अश्वीं शिरला विघ्नार्थ तत्क्षणीं योगी, ।
जो गीष्पतिचा शिष्य, त्रिदशांचा नाथ, तो तितें भोगी. ॥३७॥
ऐसा विकार झाला सहसा, जनमेजयासि तो कळला; ।
पळ लागेना, तोंचि क्रोधें सुविवेक नृपतिचा मळला. ॥३८॥
अध्वर्युतें नृप म्हणे, “ध्वंस, असा अश्व काय मारित ? रे ! ।
माझा अरि न कधींही, जैसा ‘न’ म्हणोनि हा यमारि तरे.” ॥३९॥
ज्ञानी अध्वर्यु म्हाणे, “दूषी गौतमवधूसि जो विट, तो ।
तुरगीं शिरला राजा ! दुष्टपणा दुष्ट काय गा !  विटतो ?” ॥४०॥
राजा म्हणे, “मदांधा ! शक्रगजा ! जोडितों महात, पहा, ।
दुष्टा दंड न करितां, माझे न म्हणेल कां महाता ‘हा !’ ? ॥४१॥
यज्ञप्रजावनसुकृत माझें निर्मळ असेल, तरि, वक्रा ! ।
जयितिल न आजिपासुनि हयमेधें नृप पुढें कुमति शक्रा. ॥४२॥
जे ऋत्विक्, त्यांसि म्हणे, “व्यर्थ तुम्ही दुर्बळ, प्रभा वसती, ।
तरि दाखविती दुष्टा शक्रा, महिषा जसी प्रभव सती. ॥४३॥
असतां तुम्ही प्रतापी, देवाधम दूषिता न यज्ञातें, ।
जें अयशस्कर, अनुचित शुद्धयशोभूषिता नयज्ञा तें. ॥४४॥
जा, सर्व निघा येथुनि, माझ्या राष्टीं तुम्ही नका राहूं; ।
प्रस्थान करा आतां, ब्राम्हाणहो ! न करितां ‘न’ कारा, हूं !” ॥४५॥
‘जा ! जा !’ म्हणताम, ब्राम्हाण, सोडूनि तत्काळ नरवरा, गेले; ।
ते याचे, तेंवि कधीं ऐकुनि कटु अन्य न रव रागेले. ॥४६॥
राजा म्हणे स्त्रियांतें, “मत्सदनांतुनि वपुष्टमा जावी, ।
स्त्री श्रमरहिता भोगें देह बहु करुनि न पुष्ट माजावी. ॥४७॥
जें यज्ञानुष्ठानें, भूत्राणें, शुद्ध मद्यश, तपानें, ।
या कुकलत्रें गेलें, जावें जैसेंचि मद्यशतपानें.” ॥४८॥
गंधर्वाचा राजा विश्वावसु नृपतिला म्हणे, “परिस ।
परि सत्य, मान देसी स्वाश्रितलोहा सुरूप तूं परिस ।
यज्ञ त्रिशत नृपा ! त्वां केले, उत्कर्ष हा तुझा भारी, ।
यासि न साहे, बापा ! तापा पावे मनांत जंभारी. ॥५०॥
जरि, ‘अनुसरली’ म्हणसी, ‘कां महिर्षी काशिराजकन्या या ?’ ।
तरि हे रंभादेवी, स्पर्शीं पाहों नकोचि अन्याया. ॥५१॥
त्रिसवसतसुकृतभीतें शक्रें केली जपोनि हे माया, ।
लावुनि दोष, नकोचि त्यागूं तूं शुचिकलत्रहेमा या. ॥५२॥
हरि हरिदेहीं शिरला; काशीशसुता यथार्थ, परि रंभा; ।
आला देत इला तो प्रभु, देयीलचि पुढेंहि परिरंभा. ॥५३॥
तुजपासुनि बहुत जसा, विपांपासुनि तसाचि तो भ्याला; ।
शक्राला स्वपलाचा, वित्ताचा लोभ जेंवि लोभ्याला. ॥५४॥
तूं, तव ऋत्विक्‌, सर्वहि, एका कार्येंचि तत्क्षण स्पष्ट ।
क्रोधें मोहुनि, केला उत्कृष्टक्रतु महाफळभ्रष्ट. ॥५५॥
पाघोनि जयंताच, सुखवाया निजसभा, जनक विवर, ।
हे माया करि, परि बा ! याचें करिती सभाजन कविवर. ॥५६॥
बोलुनि नच विटवावी, स्त्रीरत्न वपुष्टमा, नव्हे असती; ।
कां शक्र भोगिता ? जरि भोगानुचिताचि सर्वथा असती.” ॥५७॥
ऐसा विश्वावसुनें राजा समजाविला, समजला, हो ! ।
समजावी स्त्रीस, म्हणे, “संप्राप्त इसीं विलास मजला हो.” ॥५८॥
मुन्युपदेशीं वसवी, प्रासादीं शंभु, तेंवि विश्वास. ।
कीं सत्य, आप्त, हित, हर, तो संतत परम मान्य विश्वास. ॥५९॥
कथिलें या सच्चरितश्रवणाचें फळ अनंत तज्ज्ञांहीं. ।
जें तीर्थसेवनांहीं, दानांहीं, सांगचीर्ण यज्ञांहीं. ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 01, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP