उत्तरार्ध - अध्याय २८ वा

हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.


ज्याच्या शरणागतिनें सर्वांची होय अत्यभा माया, ।
द्वारवतींत उपासित होती स्वगृहांत सत्यभामा या. ॥१॥
भामेसि प्रभु बोले, परि चिंती मानसांत तें कार्य, ।
ज्याकरितां पाठविला जिष्णुकडे विश्ववंद्य तो आर्य. ॥२॥
तेथें ये प्रणतांला देता भवसिंधुपारदान मुनी, ।
सामोरा जाय प्रभु, पूजी विध्युक्त नारदा नमुनी, ॥३॥
होतां विश्रांतु, पुसे हांसुनि वृत्तांत विभु तया तरुचा, ।
मुनि सर्व विचार कथी शक्राचा स्नेहवारिच्या मरुचा. ॥४॥
ऐकुनि शक्रोक्त म्हणे केशव, “अमरावतीस बा ! जातों, ।
मुनिवर्या ! विदित असे निश्वय तुज हा अभंग माजा तों.” ॥५॥
सिंधुतटीं एकांतीं मग देव म्हणे, “पुन्हा मुनिवरा ! जा, ।
इच्छीनाचि सुरांचा कीर्तिमहाशारदी पुनिव राजा ? ॥६॥
सांग नमन आर्याला आधीं, मग, ‘मजपुढे नको राहूं, ।
कीं म्यां न म्हणावें तुज पौलोमीवदनशशिचकोरा ‘हूं’. ॥७॥
जाण खरा मम निश्चय निश्चळ तव पारिजातनानयनीं, ।
क्रोध न यावा, आला जरि, संकोच न उरेचि मग नयनीं,”’ ॥८॥
घेवुनि आज्ञा प्रभुची, स्वर्गातें तो पुन्हाहि जाय कवी, ।
देवेंद्रातें भेटुनि, कृष्णें कथिलें तसेंचि आयकवी. ॥९॥
इंद्र गुरुसि तें सांगे, तो त्यासि म्हणे, “कळों दिला न मला, ।
केला अविचार कसा ? तुज कार्य ज्ञातिभेद कां गमला ? ॥१०॥
गेलों ब्रम्हासभेतें, तों त्वां आरंभिलें कसें भलतें ? ।
जें नयविरुद्ध केलें, तें हृदयीं कर्म सर्वदा सलतें. ॥११॥
अथवा निजदैवातें लंघी ऐसा कृती नसे कोणी; ।
जरि वृष उडतो, पडतो, तरि त्यावरि वैश्य लादितो गोणी.” ॥१२॥
इंद्र म्हणे, “आचार्या ! कार्य पुढें काय ? सांग, तूं सुकवी, ।
बा ! गुरु उरुप्रताप प्रारब्धातेंहि युक्तिनें चुकवी.” ॥१३॥
सुरगुरु उगाचि राहे, पाहे सदुपाय, मग म्हणे, “बा ! हे ।
रक्षीं कृत प्रतिज्ञा, रणचि उचित आजि विष्णुसीं आहे. ॥१४॥
ससुतें त्वाम श्रीहरिसीं आजि करावेंचि युद्ध धीटपणें, ।
साधिनचि कार्य: जाणे जें वकतेम हाहि शुद्धधी टपणें,” ॥१५॥
सुरपतिस असें शिकवुनि, जीव क्षीरोदसागरा गेला ।
सांगे कश्यपमुनिला, तो त्याचें स्मरुनि आग रागेला, ॥१६॥
कश्यप म्हाणे, “सुरगुरो ! करुनि अहल्याव्रतक्षयें पाप ।
हा कामी गौतममुनिपासुनि अत्युग्र पावला शाप. ॥१७॥
‘आपण सुरपति, मानुष हा काय ?’ असें मनांत आणून, ।
माझी अवगणना त्वां, जरि केली स्वाधिकत्व जाणून, ॥१८॥
तरि मानुषाचिपासुनि परम भय प्राप्त तुज असो, पापा !” ।
शापा देता झाला यापरि, पावोनि मुनि महातापा. ॥१९॥
ज्याच्या शांत्यर्थ असा हा म्यां उदवास मांडिला, परि तो ।
दोष पहा आलाचि, ध्रुव कर्मविपाक वश जना करितो. ॥२०॥
येयिन अदितिसह, उभा दोघांमध्यें रणांत राहेन; ।
अनकूल दैव होयिल, तरि, सुत वारूनि, भव्य पाहेन, ॥२१॥
त्यातें हे आणावी, सिद्धिसि नेसील या महाकार्या.” ॥२२॥
म्हणुनि ‘अवश्य’, विसर्जी स्वसुतकलहशांतिसादरा जीवा, ।
कश्यप सदार वंदी कैलासीं शंभुपादराजीवा. ॥२३॥
मारीच स्तवुनि म्हणे, “शंभो ! शरणागतास मज पावें, ।
अतिवत्सलें तुवांचि प्रणता जननीशतासम जपावें,” ॥२४॥
शुंभु म्हणे, “देतों मी, चिंती जें इष्ट आत्मजनता, तें. ।
त्वां देखिजेल गौतमशप्तहि अक्षेम आत्मज न तातें, ॥२५॥
जें पहिलें, न प्रेम त्यजितिल दोघेहि भक्त मम ते तें; ।
समजतिल, पुन्हां धरितिल अन्योन्य गुरूक्तसक्त ममतेतें,” ॥२६॥
दे अभय वर प्रभु, जो पुरुषार्थांच्या समर्पितो वर्गा, ।
भर्गा नमुनि, न मुनि तो धरि चिंता, जाय कश्यप स्वर्गा. ॥२७॥
श्रीकृष्ण म्हणे, “शक्र त्यागुनि नयधर्म सत्य काचा हो.” ।
मृगयेचें मिष करुनि, स्वरथीं घे पुत्र सत्यकाचा, हो ! ॥२८॥
प्रद्युम्नातें ‘तूं ये’ ऐसें सांगूनि,  रैवतीं गेला, ।
स्थापुनि दारुक तेथें, त्यासीं संकेत केशवें केला. ॥२९॥
स्मरतां ये गरुड, बसे त्यावरि सात्यकिसमेत कंसारी, ।
‘भक्तीं प्रेम बहु,’ असें जाणे तो धन्य होत संसारी. ॥३०॥
प्रभु जाय स्वर्गातें, ज्या घेती साधु दास्य मागून; ।
प्रद्युम्न गगनगामीं स्वरथीं चाले नभंत मागून. ॥३१॥
गेलें निमेषमात्रें श्रीसगुणब्रम्हा नंदनवनीं तें, ।
पुत्रप्रेमें पोषी स्वोच्छिष्टें ज्यासि नंद नवनीतें. ॥३२॥
तेथें नानायुधधर होतें सुरवीरसीन्य, हरि त्यातें ।
न गणुनि, उपडुनि, गरुडीं घे सुरतरु, मान्य होय हरित्या तें. ॥३३॥
तो पारिजात, हौनि विग्रहवान्, विष्णुला करी नमन, ।
त्यातें अभय प्रभुवर दे, व्हाया तन्मनोव्यथाशमन. ॥३४॥
हाका मारित, सांगों गेले, सोडूनि शक्रवन, माळी, ।
रक्षकही जावूं दे, न करी निज चक्षु वक्र वनमाळी. ॥३५॥
त्या पारिजाततरुतें स्पर्शुनि, वाहूनि खगवरीं, उजवी, ।
श्रीकृष्ण निघे तेथुनि, घालुनि अमरावती पुरी उजवी. ॥३६॥
तरु नेला हें कळतां, सुरपति ऐरावतीं गजीं चढला, ।
कढला क्रोधज्वलनें, सांगहि जरि वेद गुरुमुखें पढला. ॥३७॥
ज्या स्यंदनरत्नाचें बहु भय धरि अरिसमाज, यंता तें ।
आणी सिद्ध करुनि, दे कर, घे वरि हरिसमा जयंतातें. ॥३८॥
मागें सुत, शक्र पुढें, धांवत ये, कल्पतरुहरा पाहे, ।
कीं श्रीकृष्ण सुरपुरद्वाराचिपुढें नभीं उभा राहे. ॥३९॥
इंद्रासि उपेंद्र म्हणे, “आर्या ! मी अनुज करितसें नमन.” ।
दिसलें प्रभुचें निष्ठुर बहु बाहिर, आंत परि तसें न मन. ॥४०॥
सुरतरु पाहुनि गरुडीं, क्षोभे तो भेदधी म्हणे, ‘हाय ! ।
मग विभुतें शक्र वदे, “कृष्णा ! वद, हें प्रवर्तलें काय ?” ॥४१॥
कृष्ण स्मित करुनि म्हणे, “परमोदारा ! सुरेश्वरा ! आर्या ! ।
हा वृक्ष तव वधूच्या नेतों मी पुण्यकाभिधा कार्या.” ॥४२॥
शक्र म्हणे, “मद्वाणी आयिक तूं पुष्करेक्षणा ! आधीं, ।
साधीं कृत प्रतिज्ञा, ज्ञाते न इच्या प्रवर्तती बाधीं. ॥४३॥
मजसीं युद्ध न करितां, योग्य नससि तूं वरागमा न्याया. ।
बा ! पण आपणचि कसा लंघिसि ? यावा न राग मान्या या. ॥४४॥
देवर्षिजवळ केली स्वपणोक्ति तुवां मनांत आणावी, ।
स्वगदा जगदाधारा ! आधीं माझ्या उरांत हाणावी. ॥४५॥
माझ्या देहासि करीं तूंचि प्रथम प्रहार यदुपा ! या ।
गुरुकीर्तिच्या समजसी सर्वज्ञ गुरुप्रहार सदुपाया.” ॥४६॥
ज्याची आज्ञा विधिला बहुमान्या, होय अग्रजाज्ञा त्या; ।
बाणांहीं हाणावें लागे समरांत अग्रजा ज्ञात्या. ॥४७॥
कृष्णाचे शर तोडी, आपणही शक्र बाण बहु सोडी, ।
झोडी त्याला, प्रभु जो नखरेंच खरेंच दिव्य यश जोडी. ॥४८॥
सोडी या हरिवरि तो, त्या हरिवरि हाहि, जें शरपटळ, तें, ।
पडतेंच वैर, तरि बा ! तपना न म्हणावया ‘करप; टळतें. ॥४९॥
वाखाणितें शचीच्या ‘बडु वत्सळ’ म्हणुनि देवरा जग ज्या, ।
तो भगवान् रिपु बाणीं हाणी बहु बाण देवराजगजा. ॥५०॥
गरुडातें हरि हाणी, पावे तो वीर अणुहि न त्रास, ।
तद्वहुमानाकरितां सोडी एकैक रम्य पत्रास. ॥५१॥
गरुडस्थ तरु हराया शक्रसुत जयंत तो करी लगट, ।
प्रद्युम्नासि हरि म्हणे, “वारों या, हा यशा करील गट.” ॥५२॥
दारुण संगर करिती प्रद्युम्नजयंत हे चुलत भावू; ।
कीं रणदर्शनरत जो, स्वनयनयुग धन्य तो डुलत भावू. ॥५३॥
जो सर्वावध्य तपें संपादि स्वर्गलोक विप्रवर, ।
हरिसख वृक्ष हराया ये भार्गवशिष्य तो कवि प्रवर. ॥५४॥
प्रभु सांगे सात्यकिला त्या प्रवरा वाडवास वाराया, ।
ज्याचें सख्य सुखप्रद अमृताहुनि वाड वासवा राया. ॥५५॥
युयुधानप्रवरांचें युद्धहि बहु उग्र काय सांगावें ? ।
यां सोडुनि, सिंहगजां, तरि, हंसां त्यजुनि, वायसां गावें. ॥५६॥
सात्यकितेम हाणुनि खर शर साठ प्रवर विप्र तो भेदी; ॥५७॥
युयुधान म्हणे, “प्रवरा ! चाप कशाला ? कशास हे बाण ?।
अहितहि अवध्य भूसर यदुवीराला, यथार्थ हें जाण.” ॥५८॥
प्रवर म्हणे, “क्षांति पुरे, मी भार्गवशिष्य यादवा ! आहें, ।
बा ! हें ऋष्ण सख्याचें वाराया युद्ध, सत्व तूं पाहें.” ॥५९॥
शस्त्रास्त्रांतें योजिति दोघेही कुशळ, शुद्ध, समयज्ञ. ।
प्रेक्षक सुर मुनि म्हणती, ‘लोकांत नसेचि युद्धसम यज्ञ.’ ॥६०॥
शक्रसुताच्या अस्त्रें प्रद्युम्नाचा जळोनि रथ गेला, ।
बहुदेव मंडळीला झालें आश्चर्य गगनपथगेला. ॥६१॥
प्रद्युम्न म्हणे, “ऐसे रथ मी निर्मीन लक्ष मायावी; ।
केली क्षमाचि पाहुनि जिष्णुकडे, जरिहि न क्षमा यावी. ॥६२॥
हा तव बळप्रवाहीं, नसता जरि गुरुपदा नत, वहाता. ।
येयिल यावरि वृक्ष स्पर्शायाही कदा न त्व हाता.”॥६३॥
अस्त्रें चार चहुंकडे, एक वरिहि अस्त्र, शक्रसुत सोडी; ।
शमवुनि पांचहि अस्त्रें, प्रभुनंदन साधुवाद बहु जोडी. ॥६४॥
प्रवरधनुष्य पुन्हाही, सात्यकि परम त्वरा करी, खंडी. ।
हरिदत्ता चापलता धरि तो परकंपदा, जसी थंडी. ॥६५॥
शैनेयाच्या तोडी मग विप्र प्रवर तो धनुष्यातें; ।
देवचि तो शक्रसखा; कैंचें सामर्थ्य बहु मनुष्यातें ? ॥६६॥
युयुधान नव धनुष्यें सोडी शरनिकर; आड वारा या ।
येवूं न शके; वेधी मर्मीं लक्षूनि वाडवा, राया ! ॥६७॥
म्हणुनी अन्योन्यातें, क्षतजें दोघेहि वीर ते न्हाले, ।
झाले पुष्पित किंशुकसम समरीं, देव देखतां भ्याले. ॥६८॥
द्विज अष्टधार बाणें माधवकार्मुक पुन्हाहि तो तोडी; ।
सोडी तीन शर, नृपा ! सात्यकिचें मर्म हरिसखा फोडी, ॥६९॥
करितां सज्ज नव धनु, प्रवर गदेनें उर:स्थळी ताडी, ।
युयुधान चर्म अंसि घे, खङगहि तोडूनि विप्र तो पाडी. ॥७०॥
विप्राच्या उत्कर्षें क्रोधावेशें  उरांत उलत्यातें ।
प्रद्युम्न स्वकरींचा समयीं दे दिव्य खङ्ग चुलत्यातें. ॥७१॥
तो त्याही खङ्गातें प्रवर च्छेदी, तयाहि चर्मातें; ।
मग शक्ति उरीं हाणी, झोंबे व्याळीतसीच मर्मातें. ॥७२॥
सात्यकितें विकल असें जाणुनि, तरुरत्न यशहि तो धवळ ।
प्रवर हराया भिडवी स्वरथातें त्या खगाधिपाजवळ. ॥७३॥
तों उदवी पक्षाच्या सरथ प्रवरासि पक्षरथ वातें, ।
विघ्नेश्वर विघ्नातें, त्या पापा रामनाम अथवा तें. ॥७४॥
तो सरथ प्रवर द्विज उडूनि पडे दोन कोस दूरवर, ।
त्यातें स्वरथीं, धांउनि, घेता झाला जयंत शूरवर. ॥७५॥
आश्वासिला जयंतें, तो प्रद्युम्नेंहि आपुला चुलता, ।
अत्यभ्दुत रणरस हा नसता, तरि रसिक सर्व कां भुलता ? ॥७६॥
कुर्वाळी सात्यकितें वत्सळवर विभु मुखावरुनि हातें, ।
गेलें कश्मळ सहसा सर्वहि, सोडुनि तया, करुनि ‘हा !’ तें. ॥७७॥
तरुच्या दक्षिण  पार्श्वी राहे प्रद्युम्न वीर रक्षाया, ।
वामीं सात्यकि; न शके प्रवर जयंतरि तयासि लक्षाया. ॥७८॥
एकरथस्थित वीर प्रवर जयंतहि नगार्थ जे आले, ।
झाले झड घालया सिद्ध खगेंद्रीं, न लेशही भ्याले. ॥७९॥
त्यातें देवेंद्र म्हणे, “येवूं देयिल न हा निकट कांहीं, ।
यापासुनि अनुभविली अहितांच्या प्राणहानि कटकांहीं. ॥८०॥
या, माझें पार्श्वद्वय रक्षा, सावध रहा, पहा युद्धा, ।
वृद्ध द्विजराज पुन्हा उडविल; यश मीच जोडितों शुद्ध.” ॥८१॥
ऐसें सांगुनि सुरपति झांकी गरुडासि सायकासारें, ।
बा ! सारें व्यर्थचि तें, जलनिधिचें होय काय कासारें ? ॥८२॥
न गणुनि शक्रशरांतें गांठी पक्षींद्र देवराजगजा, ।
दोघांचेहि स्वामी हरि, म्हणतें भजुनि ‘दे वरा’ जग ज्या. ॥८३॥
हांसुनि शक्रशरातें. जाउनि भिडलाचि तो सुरगजातें; ।
तेज प्रकटी, भीती स्मरुनि स्नप्नांतही उरग ज्यातें. ॥८४॥
गरुडावरि वेग बहु, व्यापारुनि हात कान, नीट करी ।
घीट करीश्वर, हाणी त्या वज्रा जेविं काननीं टकरी. ॥८५॥
शक्रेंही गरुडावरि कोपुनि तो नागराज बा ! हुलिला; ।
वेगांत पहात्यांच्या दिसला स्थानाविना न बाहुलिला. ॥८६॥
दंतकराघातांतुनि, हाणुनि मर्मस्थळांत चंचु, निघे; ।
कंठ असाया ओला, जाणों तद्रक्त, त्यासि वंचुनि, घे. ॥८७॥
करिती फारचि अद्भुत युद्ध गजेंद्र द्विजेंद्र दोन घडी; ।
प्रभुकेलि मोहरी ती व्यास कवि, क्षुद्र अन्य हो ! न घडी. ॥८८॥
हाही हस्ती हाणी शुंडादंडें धबाधब तयातें ।
देवर्षि म्हणे, ‘पुण्यें सामर्थ्य दिलें अबाध बत ! यातें ?’ ॥८९॥
हा हाणी पक्षांचे बहु फडफड पक्षिराज फटकारे; ।
तेव्हां देवर्षि म्हणे, ‘साधु ! सखे ! साधु ! दैत्य फटका, रे !’ ॥९०॥
नखरांकुशधरचरणें गरुड द्विरदासि मस्तकीं ताडी; ।
त्या पारियात्रगोत्रीं सहसा मूर्च्छित करूनि तो पाडी. ॥९१॥
स्वर्गापासुनि पडताम देवगजातें न वृत्रहा सोडी, ।
गोडी त्याच्या सुगुणीं बहु, ऐसी प्रीति आश्रिती, थोडी. ॥९२॥
काळहि देना, पीतां यन्नामा सिद्धपारिया, त्रास; ।
त्या खगवर घेउनि ये, पडतां गज विद्ध पारियात्रास. ॥९३॥
त्या पारियात्रगोत्रीं होतां तो सावधान शुद्ध करी,  ।
पुनरपि शस्त्रास्त्रांहीं जगदीशासीं सुरेश युद्ध करी. ॥९४॥
वज्रेंकरुनि करी तो जों जों शक्र प्रहार रागानें, ।
तों तों पत्र खगानें सोडावें एक भूरिभागानें. ॥९५॥
सर्वावध्य महाबळ पक्षीश्वर एक पत्र जें सोडी, ।
तें पविबहुमानार्थचि; थोरा परमानरक्षणीं गोडी. ॥९६॥
गरुडें गिरि आक्रमितां धरणींत शिरे, महाभरें दडपे; ।
जेविं जळीं नाव बुडे, शिखरसहित लोपले कडे खडपे. ॥९७॥
किंचित् शेष विलोकुनि गिरितें, प्रभु गरुडसह नभीं राहे, ।
प्रद्युम्नासि म्हणे, “जा, दारुक रथयुक्त रैवतीं आहे. ॥९८॥
जा द्वारकेंत सत्वर, भेटुनि कुकुराधिपास आर्यास, ।
सांग, ‘उद्यां येइन मी जिंकुनि सुरपतिस, करुनि कार्यास.’ ॥९९॥
दारुकसह रथ घेउनि ये, मत्तेजेंकरूनि हो युक्त.” ।
प्रद्युम्न निघे सत्वर, ऐकुनि निजजनक विष्णुचें उक्त. ॥१००॥
गेला क्षणांत, आला उक्त करुनि, वर रथासि आणून, ।
बसला स्वरथीं भगवान, गरुडभरें भिन्न अद्रि जाणून, ॥१०१॥
जेथें बसुनि गेला यदुनायक पारियात्रगोत्रास. ॥१०२॥
अद्रि म्हणे, “प्रभुरथ सुखगति हो; न घडो प्रभुप्रभावज्ञा;” ।
धरि शाणपादसमता; बहुमानी त्या प्रभु प्रभावज्ञा. ॥१०३॥
प्रभुमागें गरुड नभीं, त्यावरि तो पारिजात रक्षाया ।
वैदर्भीसुत, सात्यकि, कोणी न क्षम जयासि लक्षाया. ॥१०४॥
अस्तातें रवि गेला, तरि पाहुनि शक्र संगरा सिद्ध, ।
योजी युद्धोपरमा प्रभु जाणुनि देवनाग तो विद्ध. ॥१०५॥
इंद्रासि म्हणे, “आर्या ! याचि गरेचा धरूनि संग, रहा, ।
रवि मावळला, झाला विद्ध गज, उद्यां घडेल संगर हा.” ॥१०६॥
शक्र ‘अवश्य’ म्हणे, मग उतरे पुष्करसमीप तो रात्री ।
जींत वसें, सावरणा करि गिरिंनीं ती सभोंवतीं धात्री. ॥१०७॥
ब्रम्हा, कश्यप, अदिति, त्रिदश सकळही, तया स्थळीं आले; ।
तेहि मिळाले तपते, सेवुनि जळ, वात, वाळले पाले. ॥१०८॥
श्रीकृष्ण पारियात्रीं राहे, त्या पुण्यपर्वता पावे, ।
जडही नम्र निवावे, ज्ञातेहि अनम्र सर्व तापावे. ॥१०९॥
“हो परमरम्यकानन; हिमगिरिपुण्यार्धकीर्तिपद लाहें; ।
हो शाणपादनामा;” त्या गिरिला देवदेव वदला हें. ॥११०॥
देवुनि बहु वर गिरिला, ज्या ध्याता जन कधीं न भंगे, तें ।
शिवपदकमळय़ुग नमुनि, अच्युत चिंती मनांत गंगेतें. ॥१११॥
आली श्रीविष्णुपदी, श्रीकृष्णें जी मनांत आठविली; ।
“आलों’ हें कळवाया प्रथम प्रभुनेंचि काय पाठविली. ॥११२॥
गंगेंत स्नान करुनि, गंगोदक बिल्वपूजनें स्थापी, ।
बा ! पीतपट प्रभु त्या चिंती, ज्याच्या यशें तरे पापी. ॥११३॥
सर्वेश्वरेश्वर प्रभु झाला बिल्वोदकांवरि प्रकट, ।
वरदवर, दयासागर, देणारा सर्व आपणासकट. ॥११४॥
ज्याहुनि न शिवा सदया; काय म्हणावें मग ‘प्रसू नाहीं ? ।
श्रीशिवभक्त श्रीपति पूजी त्या सुरनगप्रसूनांहीं. ॥११५॥
“तव हेतिकीर्ति अतुळा, करिति जना पूर्ण काम रुद्रा ! ज्या. ।
नसतासि परम वत्सळ, करितासि न चूर्ण कां मरुद्राज्या ? ॥११६॥
आघातें सांकळतें, त्वद्रक्त न तत्समान सांकळलें; ।
वत्सलगुरु तूं; हें, तव कीर्ति सुरभि, वत्समानसा कळलें. ॥११७॥
झालासि नीलकंठ प्रभु तूं; जड सुकवि म्हणु न कां पविला ? ।
लोकीं स्वयश उराया जेणें तव कंठ अणु न कांपविला. ॥११८॥
मी, ब्रम्हा, अदितितनुज, दनुज, मनुजतनु, जगत्पते ! सर्व ।
झाले तुजपासुनि; बा ! किंबहुना तूंचि विश्व हें सर्व.” ॥११९॥
दक्षिण कर करुनि पुढें, शंकर भगवान् म्हणे, “स्वनगरा जा, ।
होसिल सिद्धमनोरथ; नेसिल तूं पारिजातनगराजा. ॥१२०॥
मज बहु रुचतें भाषण भक्ताचें; भक्त कीर, मैना कीं; ।
तूं मत्प्रसाद वांछुनि, पूर्वीं तपलासि धीर मैनाकीं. ॥१२१॥
‘अजित, अवध्य, मजपरिस शूरतर त्रिभुवनांत होसील,’ ।
मैनाकीं वर दिधले; सत्यचि यश मत्प्रसाद पोसील.’ ॥१२२॥
सिद्धोपयाचन प्रभु नामें ‘बिल्वोदकेश्वर’ ख्यात, ।
मी या देशीं वसतों, ताराया भक्तजन असंख्यात. ॥१२३॥
होयिल या गंगेचें ख्यात ‘अविंध्या’ असें जगीं नाम; ।
स्नातांचे पुरविल हे, दूर करुनि पाप, सर्वही काम. ॥१२४॥
धरणींत दानवांचें नामें ‘षट्‌पुर’ वसे महानगर, ।
स्पष्ट ज्येष्ट गमे हें, याहुनि दु:सहपणें लहान गर. ॥१२५॥
हे दानव देवांला ब्रम्हावरास्तव अवध्य आहेत; ।
नररूपें देवांचा तूं पुरवीं ‘हे मरोत’ हा हेत. ॥१२६॥
स्मरुनि वर, स्थैर्य धरीं; गातिल सुर हे तुतें; विशंक रहा. ।
चातकतृप्तिस मेघ, श्रिततृप्तिस हेतु तेविं शंकर हा.” ॥१२७॥
ऐसें श्रीकृष्णातें साधूंचा साधु सोयरा शिकवी, ।
आलिंगुनि, गुप्त नृपा ! होय कृपाकीर्तितोयराशि कवी. ॥१२८॥
प्रभु गिरिसि म्हणे, “पिडिले सुर असुरांनीं तुझ्या अध:स्थांनीं; ।
तूं रोधिलासि, बापा ! त्यांचा या व्हावया वध स्थानीं. ॥१२९॥
देवावध्य असुर हे ब्रम्हाघरें मत्त जाहले असती, ।
द्वारनिरोधें कोंडुन, केली म्यां या तुझ्या शिरीं वसती. ॥१३०॥
चढुनि तव शिरीं, जन जे मद्रूपातें नगा पहातील, ।
गोदानसहस्त्राच्या शुभ पुण्य फळासि ते लहातील. ॥१३१॥
पूजील तव शिळेची करवुनियां भक्तिनें जरि प्रतिमा, ।
जनता पावेल सुखें मद्नति, जसि पावली हरिप्रति मा.” ॥१३२॥
हा वर जाणुनि, सुकृती प्रतिमा या पुण्यकीर्तिपात्राच्या ।
करवुनि भजति शिळांच्या वैकुंठोत्कंठ पारियात्राच्या. ॥१३३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 01, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP