भूप म्हणे, “श्रीकृष्णें वधिला दुसरा निकुंभ काय कसा ? ।
सांग मुने ! श्रोत्यांची वांच्छा, पुरविसि महर्षिनायकसा.” ॥१॥
वैशंपायन सांगे, कोणी आलें नृपा ! महापर्व, ।
पिंडारकासि यादव गेले स्नानार्थ सिंधुच्या सर्व. ॥२॥
वसुदेव, उग्रसेन, द्वारवतीमाजि राहिले अवना, ।
वरकड सर्वहि गेले, कीं यात्रोत्सव भजों न दे भवना. ॥३॥
बळ हरि जसे, निराळे करुनि निघाले अनेक लोक थवे; ।
अत्पद्भुत उत्सव जो, न सविस्तर कविजनासि तो कथवे. ॥४॥
शभुच्या इच्छामात्रें धरि सिंधु सुगंध अमृतसें तोय, ।
जानुप्रमाण कोठें, कोठे वक्ष:प्रमाण तो होय. ॥५॥
बळदेव रवेतीसीं मधुरसमुद्रोदकीं करी केली, ।
बहुदयितांसीं क्रीडा बहुरूपें केशवें बरी केली. ॥६॥
पभुसि भजुनि, मान करिति, साहुनि तपविघ्न सर्वही रमणी. ।
चढुनि शिरीं, धरिति न कां शाणघनोत्तीर्ण गर्व हीरमणी ? ॥७॥
जी ती चित्तांत म्हणे, ‘मीच बहु श्रीधरास आवडती;’ ।
संसारग्रीष्मपथीं पांथ अतिश्रांत कृष्ण हा, वड ती; ॥८॥
कृष्ण जसा स्ववधूंसीं, यादव यादवकुमारही व्रीडा ।
सोडुनि, कृष्णाज्ञेनें करिती मधुरोदकार्णवीं क्रीडा. ॥९॥
बहु विश्वकर्मनिर्मित नौका मणिहेममंडिता कोटी, ।
ज्यांत प्रासाद, वनें, आकृति इच्छेकरूनि लघु मोटी. ॥१०॥
क्रौंचमयूराकारा, नागाकारा, प्रकार अर्णव तो, ।
श्रीशप्रभुचा भलत्या बहुभाग्यविलास काय वर्णवतो ?॥११॥
निजतेजें आप्यायित केले स्त्रीपुरुषकाय ते अजितें, ।
बहु नवल, दिले त्यांला समयोचित सगुण आयते अजि, तें. ॥१२॥
कोणी स्त्री जळ सिंची, कोणी मज्जनभयें गळां पडली, ।
‘कोणी अबळांपासुनि परिभूति’ म्हणे, ‘गळां भली जडली.’ ॥१३॥
कोणी मीनाकारें उडुपें सिंधूंत, कच्छपाकारें, ।
क्रोडे, मकराकारें, स्त्री जाणे जेंवि धीवरी सारें. ॥१४॥
भूमितळीं, तेविं जळीं, क्रीडुनि गगनींहि, पावल्या हर्षा. ।
स्वजना प्रभुची करुणा, जेंवि मयूरांसि निवविती वर्षा. ॥१५॥
त्या सर्व यादवांसीं क्रीडाया अप्सराहि आठविल्या, ।
आल्या, प्रभुनें त्या त्या सांत्वुनि, त्यांत्यांसमीप पाठविल्या. ॥१६॥
कैलासमेरुमंदररूप प्रासाद देति शर्मातें ।
नौकांत, सत्य गमती, करि अद्भुत शिल्प विश्वकर्मा तें, ॥१७॥
अन्न चतुर्विध वांच्छित, नानाविध मद्य, मांस जेवाया; ।
गीतें, वाद्यें, नृत्यें, सर्वांसहि सिद्ध सर्व सेवाया. ॥१८॥
तो सिंधु अप्सरांहीं, चपळांहीं मेघ तेविं शोभविला; ।
वृष्णिजन न भी, नाकीं नेला भोगार्थ, सर्व लोभविला. ॥१९॥
इच्छित शीतोष्ण तयां, नाहीं चिंता, क्षुधा, तृषा, ग्लानी; ।
ध्यानीं आलें, सिद्धचि, मानी सन्मुक्तिसुखचि तें ज्ञानी. ॥२०॥
ऐसें करिती नादें, देहीं बहु हर्ष ये कचा, तुर्यें; ।
करि नवल विश्वकर्मा, बहु लाजवि अमृतसेक चातुर्यें. ॥२१॥
नौकेंत प्रासाद प्रभुचा ऐसा विराजला मोटा, ।
स्वपुरचि मानिति देवी, ज्यांत न कोणीहि वस्तुचा तोटा. ॥२२॥
वंदूनि रेवतीतें, देववधूंनीं करूनि सलगीतें, ।
आराधिला सुवाद्यें, नृत्यें तो राम पानकलगीतें. ॥२३॥
त्या प्रभुपुढें करिति त्या प्रभुचरितांच्या जपोनि अनुकारा, ।
जेणें नाहीं व्हावी, न सुटे जी तप तपोनि, तनुकारा. ॥२४॥
स्वस्वानुजचरितांच्या अनुकारांहीं प्रसन्न बळ झाला, ।
गावूं लागे प्रेमें, कीं तो स्वयशें स्वयेंहि बहु धाला. ॥२५॥
पानमदमधुरकंठ प्रभु लागे रेवतीसहित गाया, ।
जी देहीं वृत्ति, न दे आश्रय तो देव तीसहि तगाया. ॥२६॥
झाला निजचरितांच्या अनुकारांहीं प्रसन्न केशवही, ।
मग कशि धरिल यमाची जी वरचिल कर्मलेशलेख वही ? ॥२७॥
प्रभु सत्येसह आला, हरिण जसा ये भुलोन नादानें, ।
गाय स्वयेंहि सुस्वर, शिवचरितांचीं जयांत आदानें. ॥२८॥
बळभद्र रेवतीसह, सत्येसह कृष्ण लागला गाया; ।
कवि हो ! सुपथा धृतिच्या लागा या शीघ्र, लाग लागाया. ॥२९॥
आला होता यात्रेकरितां नरलोकवीर तो पार्थ, ।
गाय सुभद्राकृष्णांसह यश परपापगर्वलोपार्थ. ॥३०॥
प्रद्युम्न, सांब, सात्यकि, उद्धव, अक्रूर, हेहि गानाचा ।
करिति प्रसंग, सादर कवि हो ! तैसे तुम्हीहि गा नाचा. ॥३१॥
जों जों रंग, तसा तो गानाचा बहु समाजही वाढे, ।
तों तों वाढे नावहि, तीस स्वर तेचि मानले काढे. ॥३२॥
प्रभुगातामृत पुष्कळ नारद सज्जन सुराग आलापी, ।
मग आपणहि तयांत श्रीहरि हरयश सुराग आला पी. ॥३३॥
श्रीमुनि वीणा लावुनि, गावुनि हा, प्रेम डोलवी त्या तें, ।
करितें उमेश्वरा जें त्या विश्वाच्याहि लोल वीत्यातें. ॥३४॥
गानरसीं हास्यरस प्रकट करी हा नयज्ञ, समयज्ञ, ।
वदले श्रीबळ, कृष्ण प्रभुहि, ‘नसे गानयज्ञसम यज्ञ.’ ॥३५॥
बळ हांसविला मुनिनें, हांसविली रेवतीहि; अन्या या ।
सत्राजिती, सुभद्रा, हांसुनिही न करितीच अन्याया. ॥३६॥
सर्व स्त्रिया पुरुष ते वाहविले गानहास्यरसपूरें, ।
सूरें भवतिमिराच्या प्रभुभक्तिज्ञानदानबहुशूरें. ॥३७॥
त्या रासें बहु हर्षवि देवमुनि, तसा न पद्मनाभ रणें. ॥३८॥
जाणों शंकरहि म्हणे, “बहु सुखकर तुज उमे रुचो रास.” ।
क्षुद्रा न घेववे रस हा दिव्य, जसा सुमेरु चोरास. ॥३९॥
जो श्रवणही करावा शंकरदुर्गांचियाहि नवसांनीं, ।
प्रभु त्या राससवाच्या अवभृत करि सागरांत अवसानीं, ॥४०॥
दक्षिणकरीं मुनीतें भामेसह, धरुनि पार्य सव्यकरीं, ।
टाकी उडी समुद्रीं प्रभु, ज्यातें म्हणति साधु ‘भव्य करीं.’ ॥४१॥
सात्यकिला प्रभु सांगे, “एक फळी सागरांत आर्याची, ।
माजी दुजी फळी, या सिद्धि करावी तुवांचि कार्याची.” ॥४२॥
प्रांजलि सागर होतां, त्यासि म्हणे कृष्ण, “शीघ्र हो मधुर, ।
प्रसव प्राज्य सुगंध, प्रसवे जैसा पवित्र होमधुर. ॥४३॥
हो ग्राहरहित, मृदुमणिसैकत, तव तोय शर्करामधुर; ।
जलकेलिची वहातो, परविधुचा नित्य अर्कराम, धुर. ॥४४॥
वैडूर्यकनकमुक्तामणिचित्र असोत सौम्य मीन मनीं, !
कांहीं अप्रिय घडतां, नच होईन प्रसन्न मी नमनीं. ॥४५॥
नानाविध मद्याचे भरले, बहु दिव्यपरिमळा वरिते, ।
मणिकांचनमयघट भटतोषार्थ असोत तव जळावरिते.” ॥४६॥
सांगुनि असें जलधितें, कृष्ण किरीटीसवें करी क्रीडा; ।
प्रभुभावज्ञा भामा सिंची मुनिला, न ती धरी व्रीडा. ॥४७॥
तो राम, रेवतीतें धरुनि करीं, सागरीं उडी घाली, ।
झाली यादवसंहति तिकडे मग अर्ध हरिकडे आली. ॥४८॥
रामाकडील यादव ते धरिती चिन्हा वेगळें धीर, ।
कृष्णाच्या पक्षींचे लक्ष्म निराळेंचि वरिति ते वीर. ॥४९॥
जळवाद्यें वाजविती, उडविती जळयंत्रहस्त नीरातें, ।
गाती भाषागीतें, ताडिति सिंधूंत वीर वीरातें. ॥५०॥
जरि चंद्रसहस्त्रातें निर्मळ आकाश एकदा धरिल, ।
तरि वृष्णिसुरवधूमुखरम्य जलधिची बरोबरी करिल. ॥५१॥
प्रथम निघुनि बाहिर हरि, सर्वांतें कळवि हार, “हा निकर ।
होतो अभिमानास्तव, म्हणुनि न हो जळविहार हानिकर.” ॥५२॥
मदिरामत्त, महाबळ, मानी, यादव न भंग लव घेतें, ।
जळकेलींतहि मरते, कलह परस्पर करूनि, अवघे ते. ॥५३॥
यदुपति निघतांचि, निघुनि सर्वहि आले क्षणांत बाहेर; ।
असुनिहि तेज, नियमिले कैसें भासे क्षणांत, बा ! हेर, ॥५४॥
मग आपण घे, आधीं मुनिला अनुलेपनादि दे, वरद; ।
शोभाद शुद्ध द्विज मानी, निज तेविं तो न देव रद. ॥५५॥
कृष्ण म्हणे, “अवसर हा, यादव हो ! पानभोजनाचा, या;” ।
लागति, पावुनि हरिपद निजपदसोपान, भोज नाचाया. ॥५६॥
नानाविधें सदन्नें, मांसें, सेवित तसेचि आसव, ते ।
वासव तेज न साहे, अजिताचे जन जनांत बा ! सवते, ॥५७॥
उद्धव, अक्रूर, असे जे धर्मसहाय विष्णुचे भक्त, ।
व्यक्त श्रीविष्णुच ते, कीं विषयीं सर्वथा न ते सक्त. ॥५८॥
सेविति पायसगोघृतभक्तांतें संतराय साकांतें, ।
ऐसें जें बुडविल सुखसह, मळवुनि अंतरा, यशा, कां तें ? ॥५९॥
रात्रौ सभेंत बैसुनि, सांगे छालिक्य गेय योजाया, ।
ज्यातें म्हणति भजति जे, ‘स्वर्गादि पदार्थ हेय; यो जाया.’ ॥६०॥
छालिक्य गेय अद्भुत अति ऐक रेवती जधीं, कन्या ।
चारसहस्रयुगांतें मानी दिन एक तातसह धन्या. ॥६१॥
षट्ग्राम जयांसि, अशा रागांहीं दे जना समाधीतें. ।
मुनि वीणा घे, रुचली सुमहाविद्याधनासमा धीतें. ॥६२॥
वाजवुनि वेणुतें, जें गाणें नटणें बहुस्त्रियांसहित, ।
तें हल्लीसक वरितो विश्वोद्भारार्थ सत्सभामहित. ॥६३॥
हल्लीसक सादरिलें जेव्हां सप्रेम सर्वदेवाद्यें, ।
पार्थ मृदंगप्रमुखें सर्वांतें परम हर्ष देवाद्यें ॥६४॥
देववधू वाजविती अद्भुतगुणरूपराशि वाद्यांतें, ।
ज्या मान्या, देवांच्या करणार्या रू परा, शिवाद्यांतें. ॥६५॥
प्रथम प्रसन्नचित्तें ये रंभा देवनर्तकी रंगीं, ।
ती राम कृष्ण सुखवी, अभिनयनिपुर्णत्व बहु जिच्या अंगीं. ॥६६॥
ये उर्वशी मग महानिपुणा रंगीं, जसी सदा रंभा, ।
करिती मोमापरिणयनाटकरसरीतिच्या सदारंभा. ॥६७॥
तैसीच मिश्रकेशी, तिलोत्तमा, मेनिकाहि, हेमा, या ।
प्रभुतें त्या त्या रूपें सुखविति, ज्याची त्रिलोक हे माया. ॥६८॥
अनिरुद्ध, सांब, राम, प्रद्युम्न, प्रभु तसाचि कंसारी, ।
गाय स्वयें, रसें त्या होईल कसा न धन्य संसारी ? ॥६९॥
त्या त्या वाद्यें, नृत्यें, भरिला तो सर्व रंग रागानें. ।
छालिक्यें जीव निवे सकल, जसा देह अंगरागानें. ॥७०॥
छालिक्यें अत्यद्भुत गांधर्वें सर्व पाप, ताप, सरे; ।
चंद्रासि चकोराचा, रसिकाचा या रसासि ‘आ’ पसरे. ॥७१॥
छालिक्य सिंधु, तद्रस नरलोकीं एकबिंदुसा राया ! ।
प्रभुनें लेश उरविला, जनतापा, जेविं इंदु, साराया. ॥७२॥
छालिक्य परम मंगळ मुनिराजें वर्णिलें सविस्तर तें; ।
याच्या श्रवणेंहि भवीं श्रोत्यांचें वृंद बहु सुखें तरतें. ॥७३॥
भगवच्चरणासि नमन करुन सुरवधू, प्रसाद पावून, ।
गेल्या स्वस्थानातें; प्रभु निववि स्वजन कुतुक दावून. ॥७४॥