उत्तरार्ध - अध्याय ३६ वा

हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.


सुपुरींच्या असुरांतें, “द्या गृहसाहित्य सर्व जें इष्ट.” ।
पविनाभ करी आज्ञा हे, कीं प्रतिकूल जाहलें दिष्ट. ॥१॥
भद्र महानट आला, झाला बहु हर्ष असुरवर्गांत, ।
स्वर्गांत तयाहुनि बहु, ज्याच्या गणनीं न शक्ति गर्गांत. ॥२॥
भेटति पुरवृंदें त्या बहुरत्नांचें उपायन वहातीं, ।
कीं परमानंदाचा आला अद्भुत उपाय नव हातीं. ॥३॥
भद्रा सुरारि सेविति, तेविं पिपीलिक रसा न सेव्याही, ।
व्याहया प्रिय तनयेच्या लग्नीं जपला तसा नसे व्याही. ॥४॥
ते वेषधारणार्थ श्रेष्ठ मणि स्वर्णभूषणें, वस्त्रें, ।
देती बहुमोलाचीं बहु, न मिळावीं कधींच जीं शस्त्रें. ॥५॥
पौरासुरवीरांहीं तन्नाटय पहांवयासि, आधीं तें ।
आरंभविलें विनवुनि, दारांसि पहावयासि आधींतें. ॥६॥
जें श्रीमद्रामायणनाम महाकाव्य नाटकीं रचिलें, ।
आरंभिलें नटें तें, सत्पदकचि सुगुणमणिगुणें खचिलें. ॥७॥
श्रीविष्णुजन्म आधीं, सोगें आणूनि, सोंग दाखविलें. ।
त्यां तें वेडचि लावी. जैसें बाळासि अमृत चाखविलें. ॥८॥
जें लोमपाददशरथ धाडुनि पटु गोपिकांसि शांतार्थ ।
विषयात ऋष्यश्रृंगा आणी, दावी समस्त शांतार्थ. ॥९॥
तें दाखविलें सुचरित सुरसभरित; परि तसें जनां झालें, ।
तृषिता मिळे सुरस जळ, पीतांचि सरे, न चित्त जों धालें. ॥१०॥
तो भद्र, राम, लक्ष्मण, शत्रुघ्न, भरत, सुनाटकीं दावी. ।
बा ! ऋष्यश्रृंग, शांता, त्या असुरांसहि नमावया लावी ! ॥११॥
नटवेषें दाखविती तत्तद्रूपा, असत्य परि सोंगा ।
त्या काळींचे दानव मानवले, हें गुरूक्त परिसों, गा ! ॥१२॥
वृद्ध सुविस्मित झाले, रावणवध, दशरथें दिले वर तें ।
दाखविलें. जाणविलें नाटक कीं अमृत हें इलेवरतें. ॥१३॥
ते असुर नाटकींचे सर्व चमत्कार अतुल पाहून, ।
नाटयविशेषीं देती भूषण, वस्त्र, स्वयें, न बाहून. ॥१४॥
जें कांहीं उत्तम,  तें ते  दानव दैत्य अर्पिती वस्तु, ।
स्वस्तुत्यादि न करिती, तद्वर्धनसक्त म्हणति ते ‘अस्तु.’ ॥१५॥
त्या असुरांतें स्तविती, तत्तद्वंशप्रवर्तका ऋषितें; ।
वर्धविति अरिजनातें, अंतीं कापावया जसें कृषितें. ॥१६॥
परकटक नटकविवरें प्रद्युम्नें प्रभुसुतें कुटिलकुटिलें ।
भुलवुनियां, श्रीरामायणनाटकरसवरासवें लुटिलें. ॥१७॥
कोणी दे कुंडलयुग, कोणी ग्रैवेय, मुद्रिका कोणी, ।
कोणी उष्णीष, पदक, हार, न पुरती नगां अयुत गोणी. ॥१८॥
“हा नट सत्काराया योग्य तुला दितिजदनुजपाळाला;” ।
सांगुनि पाठविलें हें पौरांहीं अहितकटककाळाला. ॥१९॥
दैत्य म्हणे, “आणावा.” नेती ते पौर पटु नटा कविला,।
न त्यजिला विषय जनें, दैवें जो कटु न झटुन टाकविला. ॥२०॥
शिरला, स्वीकारुनि नटवेष, पविपुरांत कृष्णसुत, राजा ! ।
सुरदुस्तरा सहस्रहि शंबरमाया रणांत सुतरा ज्या. ॥२१॥
त्या विश्वकर्मनिर्मित मंदिर दे दैत्यदेव उतराया, ।
सदहित बुडेचि, जपतप वर, हरहि जिणूनि, देवौ तराया. ॥२२॥
वेषार्थ शतगुणोत्तर तो दे साहित्य, भूषणें, वासें; ।
करवि महाकाळोत्सव, ज्या प्रभुच्या नुरति दूषणें वासें. ॥२३॥
रचवी स्थळ देखाया स्वस्त्रीपौराप्तवीरसमुदाया, ।
सांगे सचिवांसि, ‘नटा पूजुनि, घेवूनि धीरसमुदा, या.’ ॥२४॥
परिविश्रांत नटातें असुरप्रभु विपुल पाठवी रत्नें; ।
वेषग्रहणाकरितां आज्ञापी सचिव बुद्धिच्या यत्नें. ॥२५॥
आपण मुख्य स्थानीं सज्ञाति वसे नटासि देखाया, ।
मंत्री एकेक तबक मुख्य विडयांचें भटांसि दे खाया. ॥२६॥
असुरवरांत:पुरजन, करवुनि मणिरत्नजवनिका मुक्ता, ।
स्थिति करि साप्तसखीजन रत्नगवाक्षीं सुखें जसी युक्ता. ॥२७॥
सद्रक्षणार्थ यादव सुरशत्रुपुढें स्वयेंचि गानाचा ।
अधिकार घेति, म्हणते जे गंधर्वाप्सरांसि ‘ग, नाचा.’ ॥२८॥
नांदी करिती, स्तविती प्रभुतें विद्यानदीनगांतें हो ! ।
ज्याचें सद्यश म्हणतें, ‘कविकुळ मातें न दीन गातें हो.’ ॥२९॥
यादवनट वाजविती शिववीणावेणुतालमुरजांतें, ।
आलपिति रागांतें, वदले ऐकोनि साधु !’ सुर ज्यांतें. ॥३०॥
छालिक्यश्रवणामृत जें सुरगांधार, तें नटी गाती; ।
जाय समाधींत जसी, परमसुखाची तसी घटी गा ! ती. ॥३१॥
गंगावतरणगीतें नांदी करिती, धरूनि नटतेतें, ।
सर्वजनमनोहर तें, प्रकटिति सत्कुतुक भैम भट ते तें. ॥३२॥
रंभाभिसारनामक नाटक जें, करिति ते तदारंभा, ।
गद रावण होय, गणस्त्री मुख्य मनोवती तदा रंभा ॥३३॥
प्रद्युम्न होय तेथें नलकूबर, सत्य तो गमे आला. ।
झाला सांब विदूषक, हास्यरसें रंग सर्वही धाला. ॥३४॥
मायेनें कैलासा शैला सामर्थ्यसिंधु ते रचिती, ।
शोभा दाविति सर्वा, जी करिती अन्य अद्रि, येरचि ती. ॥३५॥
ज्या कर्में दशवदना कोपुनि नलकूबरें दिला शाप, ।
दाखवि, चाखवि सांत्वनरस, हरि रंभामन:स्थ जो ताप. ॥३६॥
रावणशापाल्हादें, जें पादोद्धरणनास, तें नृत्य ।
दाखविलें, त्या मुनिचें; ज्याचें सुप्रियचि सर्वही कृत्य, ॥३७॥
हें प्रकरण दाखविलें, असुरांत न भान भान लेश राखविलें; ।
बा ! त्यांत श्रीनारदरूपवरामृत यथेष्ट चाखविलें. ॥३८॥
रंभाभिसारनाटकसुरसीं, वर्षावनीं जसे रेडे ।
खेडेगांवींचेसे, पाहुनि ते असुर जाहले वेडे. ॥३९॥
देती मुख्यें वस्त्रें, देती रत्नें, अमूल्य आभरणें, ।
सानुगहि उदारपणें, रसिकपणें, अतुलवज्रनाभरणें, ॥४०॥
लुटिला कुटिलांनीं तो स्त्रीजनही, काय देय न गमो त्या ? ।
शोभार्थ जें उरे, त्या नाकींच्या, लाज देति नग, मोत्या. ॥४१॥
कोणी विमानही दे, कोणी दे दिव्य रथ गगनगामी, ।
हय, गज, चिंतामणिही, ‘सर्वाहि’ म्हणा न कां मग ‘नगा !’ मी ? ॥४२॥
परम वदान्या बळिचें प्रभु तो सर्वस्व जेंवि बटुरूपें, ।
त्या पविनाभाचेंही अरिकरिहरि हरिचि याहि पटु रूपें, ॥४३॥
घटजें सिंधु, तयापरि केले कामें अशेष अहित रिते, ।
भुलले महाप्रयोगें, भुलती मंत्रें, महोग्र अहि, तरि ते. ॥४४॥
हंसी स्वसखीस म्हणे, “प्रद्युम्ना प्रणतमानदा सांजे ।
देखसिल आजि, वरिसिल, ते, म्हणती चरण ‘मान’ दासां जे. ॥४५॥
तुज भेटतो प्रदोषीं, यदुप वदति गुरुपदा न ते लटिकें. ।
दीपकलिकेसि म्हणतें, बहु देवुनि हुरुप दान, तेल, ‘टिकें.” ॥४६॥
ती त्या हंसीस म्हणे, “मज मत्सदनांत धीर दे, वस, ये; ।
प्रथम समागम, भीतें मन, कीं तो वीर, धीर, देव, सये !” ॥४७॥
हंसी म्हणे, “सये ! मी सोडिन तुज पळहि न, सदना चाल, ।
भय काय ? तुम्हीं दोघें, पावुनि नव संग रसद, नाचाल.” ॥४८॥
हासवुनि तिला, तीसह जाय तिच्या विश्वकर्मकृतगेहीं. ।
संकेत करी सुदती, धरि सात्विक भाव ती सकळ देहीं. ॥४९॥
“प्रद्युम्नातें येत्यें घेवुनि,” ऐसें पुसोनि ती गेली, ।
ये फिरुनि, म्हणे, “प्रियसखि ! येतो प्रियतम करावया केली.” ॥५०॥
स्त्री माल्य नेत होती त्या राजसुतेकडे, तया पाहे, ।
प्रद्युम्न भ्रमरांत भ्रमरचि होवूनि तो, शिरे, राहे. ॥५१॥
माल्य प्रभावतीच्या सन्निध ने स्त्री, नमी पदा, स्थापी; ।
त्या पी अलिकुळ, हलिकुळंमणि तल्लावण्य, धरि तदास्था, पी. ॥५२॥
संध्याकाळीं गेले अन्य मधुप, मधुपकुळगुरुचि राहे, ।
कीं हा कविवर पद्मा जाणेम जाणति न या सुरुचिरा हे. ॥५३॥
होय प्रभावतीच्या येवुनि कर्णोत्पळांत तो लीन, ।
ततृहृदयपुंडरीकीं सिरल्या, यासींच यासि तोलीन. ॥५४॥
तों राजसुता पाहे, भी उदया पावतां हिमकरातें. ।
नच दत्यसुता भीती, मुख पसरुनि धावतांहि मकरातें. ॥५५॥
“जो होता हिमकर, सखि ! झाला अद्भुतचि अहिमकर तो कां; ।
मारूं, गिळूं पहातो, हा दितिजांच्याचि अहि, मकर तोकां. ॥५६॥
‘द्विजराज’ म्हणवितो जरि, अकरुण, हिमकर नव्हेचि, गरकर हा. ।
बाळा म्हणतिल, ‘होवुनि, या कर्में, दुर्यशांत गरक, रहा.’ ॥५७॥
झालें मुख शुष्क, हृदय उत्सुक, सखि ! तापलीं पहा अंगें. ।
कोण अनौषध गद हा ? दाह अधिक शीतवस्तुच्या संगें. ॥५८॥
मारुत सुगंध, सीतळ, मंदहि, देहास या दवा नळसा; ।
म्हण, ‘हे दमयंतीसी, भेटुनि दे हास यादवा ! नळसा.’ ॥५९॥
पूर्वीं न देखिला, श्रुतमात्र प्रिय वांछिलाहि कांपवितो, ।
तापवितो, न्यून नव्हे, प्रियसखि ! विरहापरीस का पवि तो ? ॥६०॥
धिक्कारातें लोकीं सखि ! होय स्त्रीस्वभाव हा पात्र, ।
गात्र व्याकुळ होतें, भ्रमतें मन, कांत ऐकिला मात्र. ॥६१॥
मरतीच हे तव सखी, मदुपेक्षा करु न कोप; हाडसला ।
काढीं प्रभुच्या म्हणती; मदनभुजग, करुन कोप, हा डसला. ॥६२॥
गेलें धैर्य, नव्हे स्थिर हें, जेंवि प्रथम वासरूं सुटलें; ।
घडिभरि दर्शन नव्हतां, सुमुखि ! समज, ‘सूत आयुचें तुटलें”. ॥६३॥
कामविकारें पवनें पावलि कंपा प्रभावती कदली, ।
वदली, बहुत असो तें, गावें जें काय बोलिला सदली. ॥६४॥
मदन मनिं म्हणे, “सुतनुसि हा मोह नसे, सुदंड हे बाळा, ।
शर ! हो ! खर होवुं नका, वश झालीस न  उदंड हेबाळा.” ॥६५॥
हंसीस म्हणे, “शुचिमुखि ! आलों मी हें सखीस कळिव, ‘रहा ।
स्वस्थ’, असें म्हण, सुंदरि ! जो तव कर्णोत्पळांत, अळिवर हा. ॥६६॥
‘वर्ती यथेष्ट मजसीं,’ हे करु आज्ञाहि मज अधीनातें, ।
देइल संपादुनि जें दयिता, विसरेल ममन धी नातें.” ॥६७॥
ऐसें वदत निघे, मग अलिरूप त्यजुनि, होय सुरुचिर हा, ।
भेटतिस म्हणे, “नलिनी तूं, हा रवि, भाग्य तोय, सुरुचि ! रहा.” ॥६८॥
प्रभुनंदनप्रकाशें सहसा सोमप्रकाश लोपविला, ।
स्वकुलजकृतें परिभवें शुद्धात्मा नविला, न कोपविला. ॥६९॥
प्रद्युम्नातें पाहुनि, वाढे सहसा प्रभावतीकाम ।
विधुतें विलोकुनि जसा सागर, अद्भुत तसेंचि तें धाम. ॥७०॥
राजात्मजा सलज्जा होवूनि, उभी अधोमुखी राहे, ।
साहे तेज न बाळा, मदनानन तिर्यगीक्षणें पाहे. ॥७१॥
स्पर्शे स्मर, देखाया मुख, वदवाया, प्रभावतीहनुतें. ।
रोमांचरूप कंचुक तो त्याचा स्पर्श लेववी तनुतें. ॥७२॥
“करुनि अधोमुख मुख, सखि ! मजसीं कांहींच तूं न कां वदसी ? ।
या दासाची उक्ति स्वीकारीं, काय चंद्र घे न दसी ? ॥७३॥
न करीं उपमर्द वदनशशिशोभेचा स्वयेंचि दाटून, ।
कष्टोत न ओष्ठांच्या प्रांता लोचनचकोर चाटून. ॥७४॥
झाला मनोरथांच्या प्राप्त तुज शतें करूनि हा, रमणी ! ।
प्राणांत मेळवावा घेवुनि, हारांत जेंवि हारमणी, ॥७५॥
भीरु ! भय त्यागावें, हा दास तुझा, मिळो अनुग्रह या, ।
प्रेमेंचि करिति कुलजा वश, सुखलीनें जसें अनुग्र हया. ॥७६॥
हो गांधर्वविवाहानुग्रह, अजलि करूनि, याचितसें; ।
यातें तुवां म्हणावें, सुवदान्यें, कर धरूनि, ‘याचि’ तसें.” ॥७७॥
ऐसें प्रभावतीतें  प्रार्थी, वदलों तदन्वयें हो ! मी, ।
मंत्र म्हणोनि मणिस्थितदहनीं पुष्पाहुति स्वयें होमी. ॥७८॥
रत्नाभरणविभूषित कर तीचा धरुनि विष्णुचा सुत तो ।
मणिवन्हितें प्रदक्षिण, करि; जो सत्कुलज काय तो उततो ? ॥७९॥
करितां प्रदक्षिण, मणिप्रवरीं प्रकटे स्वयें अनळ साचा, ।
कीं ती देवी नरजा, तोही सुत सदवनीं अनळसाचा. ॥८०॥
वरुनि वधूतें, सांगे द्वारीं स्वत्राणकाम सुखगीतें, ।
मग जें, तें वर्णावें लक्षेंही काय कामसुख गीतें ? ॥८१॥
दक्षिण कर धरुनि, स्मर शयनीं ने बैसवी तिला अंकीं, ।
चुंबी मुख, आलिंगी, मदनीं सुख बहु, धनें जसें रंकीं. ॥८२॥
रमवी प्रद्युम्न बहु प्रेमें, पाहोनि तदधिकार, तितें; ।
करि सुरत नवोढेसीं, जें दे तन्मतिस तदधिका रतितें. ॥८३॥
प्रात:काळीं कष्टें प्रद्युम्नातें प्रभावती सोडी, ।
गोडी लावुनि जाय; क्षणदा घटिका तसी गमें थोडी. ॥८४॥
अलिरूपें ये, राहे दिवसभरि नटांत तो गुरु नटांचा, ।
यज्जनकाच्या नुरविति मद, कालियफणिफणा चुरुन, टांचा. ॥८५॥
सायंकाळीं जावें, प्रात:काळीं नटालयीं यावें, ।
रात्रौ कामचकोरें मुखचंद्रामृत तिचें सुखें प्यावें. ॥८६॥
यापरि वसतां व्हावा, परि माया मायसीच बोभाट ।
होवूं देना, झाला त्याचा पर पौर सर्वही भाट. ॥८७॥
प्रेमें वेडचि लावी प्रद्युम्नास प्रभावती, राया ! ।
त्या रसतरंगिणीचा लागों दे न प्रभाव तीरा या. ॥८८॥
राहे नटांत अर्धें, अर्धें देहें प्रभावतीजवळ; ।
धवळच्छद संरक्षिति, घेतां तदधरमहासुधा कवळ. ॥८९॥
दक्षत्व, ऋजुत्व, विनय, विद्वत्ता, शील, सन्नति, सुलीला, ।
असुरमतिला बहु रुचे, अधनाच्या जेंवि भूषण मुलीला. ॥९०॥
भाषा आर्यत्वमृजा, सौगंध्यविलासरूपगुणशोभा, ।
इच्छिति नटस्त्रियांची सर्वा असुरस्त्रिया, धरुनि लोभा. ॥९१॥
बंधु सुनाभ महाबळ पविनाभाचा, नृपा ! तया तनया ।
दोघी होत्या, नामें चंद्रवती, गुणवती, अयातनया. ॥९२॥
चंद्रवती, सुगुणवती,दोघी जाणोनि उचित वेळा या, ।
भगिनी प्रभावतीच्या सदनीं जाती सदैव खेळाया. ॥९३॥
पुरुषवर प्राप्त तिला झाला, हें इंगितें तयां कळलें; ।
यश, जेविं मृगमदाचें, सुरतसुखाचें कधीं नसे मळलें. ॥९४॥
करुनि स्मित, एकांतीं विश्वासवतीस कृत्य नव पुसती, ।
कीं भगिनी झांकाया शकली कृतसुरतनृत्य न वपुस ती. ॥९५॥
सांगे, “ज्याच्या देती पुष्टि अनशनें, न नाश, देहा तीं, ।
श्रीदुर्वासा भगवान् तो, विद्यादिव्यपाश दे हातीं. ॥९६॥
सुर कीं असुर असो जो कांक्षित, विद्या जपोनि आणावा. ।
वरपुरुषसंग बायी ! ब्रम्हानंद स्त्रियांसि जाणावा. ॥९७॥
मी सुरसुत आणितसें, दाविन, झांका पर स्वसा ! हो ! तो; ।
प्राणाधिक दयित मना या चोराच्या परस्वसा होतो. ॥९८॥
प्रद्युम्ना देवसुता मोठया भाग्येंकरूनि आवडती ।
झालें भगिनीहो ! मी, जैसी रामेश्वरासि कावड ती.” ॥९९॥
दावी प्रिय भगिनीला, ज्यासीं गुप्त प्रभावती रातें. ।
स्तवि विद्येचे, नेती कामजलधिच्या, प्रभाव तीरा, ते. ॥१००॥
स्वप्रिय दावुनि, तन्मन करुनि बहुत आपणापरिस वेडें, ।
‘ऐसा देवसुत बरा कांत’, म्हणे, ‘सुपति, कुपति, पुर, खेडें.’ ॥१०१॥
सुर साधु, असाधु असुर, सुमति, कुमति; म्हणुनि देवसुत बरवा. ।
वरवा वरमतिकरवीं, पर खाजविला नखें जसा वरवा.’ ॥१०२॥
चंद्रवती तीस, म्हणे, “पतिस पुसुनि, सुवर तूंचि सांग मला, ।
तुज निजदेहाहुनि हा देह प्रिय, भगिनि ! भिन्न कां गमला ?” ॥१०३॥
ती गुणवती म्हणे, “गे ! सेव्य फळीं प्रथम पाहती गोडी ।
आप्तें, म्हणुनि म्हणावें काय सुहृत्प्रीति जाहली थोडी ?” ॥१०४॥
तद्योग्य वर पुसे ती प्रद्युम्नातें प्रभावती चतुरा, ।
कर्णासि यद्यशाहुनि सुरकुसुमाचाहि होय नीच तुरा. ॥१०५॥
काम म्हणे, “विद्येच्या सामर्थ्यें मी तसाचि आणावा ।
गद चंद्रवतीस, असे सांब गुणवत्नीस योग्य जाणावा.” ॥१०६॥
मग ती भगिनींस म्हणे, देवुनि विद्या, प्रभावती, ‘धन्या ।
कन्या सौभाग्यवती होय इणें, स्त्री असी नसे अन्या.’ ॥१०७॥
वंदिति मुनितें कन्या, ज्याची सर्वत्र सारिखी सत्ता, ।
इच्छुनि गदसांबांतें, जपती विद्या प्रभावतीदत्ता. ॥१०८॥
प्रद्युम्नें मायेनें ते कन्यारत्नलाभ जाणविले, ।
विद्याजपावसानीं, सहसा गदसांब वीर आणविले. ॥१०९॥
गांधर्वविवाहें त्या चंद्रवतीगुणवती तिंहीं वरिल्या, ।
धरिल्या कंठीं प्रेमें, त्यांच्या चित्तस्मरव्यथा हरिल्या. ॥११०॥
रमविति विचित्रसुरतें मन्मथगदसांब हे तिघे त्यांतें, ।
माराया असुरांतें जपले विजयार्थ हेति घेत्यांतें. ॥१११॥

N/A

References : N/A
Last Updated : January 01, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP