भूप म्हणे, “वाराहग्रादुर्भावहि अशेष आयकिव, ।
प्रणतीं जसि गुरुरसना, तसि तोकीं करिल माय काय किव ?” ॥१॥
वैशंपायन सांगे, जगदुपसंहार करुनियां कल्पीं, ।
जगदीश योगनिद्रा करिता झाला निजीं महातल्पीं. ॥२॥
स्त्रजिलें अंड हिरण्मय, तें भेदुनि, सृष्टि मग अजें रचिली. ।
पृथ्वी बुडे समुद्रीं बहुविपुलसपक्षनगशतें खचिली. ॥३॥
उच्छ्रित शतयोजन, दशयोजनविस्तीर्ण तोयदासम, हा ।
जलकेल्युचित वपु धरी, जें अद्भुत हेतु होय दासमहा. ॥४॥
होऊनि यज्ञवराह प्रभु सिंधूंतूनि उद्धरी महिला, ।
मग निजमुखभव विधितें प्रभुवर अधिकार दे जसा पहिला. ॥५॥
विधिरूपें दे राज्य, ज्येष्ठ अदितिपुत्र जो, तया हरितें; ।
ज्या श्रीश्रीकांताचें नाम स्मरतांचि भवभया हरितें. ॥६॥
असुरांचें राज्य प्रभु दैत्य हिरण्याक्ष जो, तया दे, हा ।
करि करुणा सर्वांवरि देव, धरुनि मंत्रमखमया देहा. ॥७॥
दिधलें ज्या ज्या जें जें, तो तो तें तें सुखें करी राज्य; ।
धर्मन्यायें वर्तति, भव्यप्रभ भाग्य भोगिती प्राज्य, ॥८॥
अद्रि हिरण्याक्षाच्या रम्यपुरातें उडोनियां गेले, ।
कलहार्थ कुमंत्र कथिति, देवावरि पूर्वदेव रागेले. ॥९॥
“जरि सुर कनिष्ठा, करिती विश्वाचें आधिपत्य; जे ज्येष्ठ, ।
ते सर्व अनीश तुम्ही,” म्हणति, ‘गुणांहीं असोनिही श्रेष्ठा.” ॥१०॥
राजा कनकाक्ष शिखरिवचनांतें श्रवण करुनियां, कोपे; ।
युवराज कनककशिपुहि; असुरजनविवेक विधिबळें लोपे. ॥११॥
दितिज, दनुज, भट झाले युद्ध करायासि सर्वही सिद्ध,।
इद्ध ज्वलन तसेचि त्रिदशहि, अन्योन्य करिति ते विद्ध. ॥१२॥
सामर शक्र बधे, त्या असुरांसीं करुनि तुमुल संगर; हा ।
कनकाक्ष कीं विधि म्हणे सर्वांसि, ‘उगेचि, वरुनि भंग, रहा.’ ॥१३॥
प्रकटे प्रभुवर सहसा, द्यासा परिभूति दैत्यचक्रातें, ।
तत्काळ, हिरण्याक्षें स्तंभित करितां रणांत सक्रातें. ॥१४॥
प्रभुदरनादें क्षोभे, द्दग्युग कनकाक्ष तो करी शोण, ।
पाहुनि, असुरांसि, म्हणे, “हूं, मारा, अरि अपूर्व हा कोण ? ॥१५॥
नानाविध शस्त्रांची वृष्टि करिति सर्व असुर हरिवरि ते, ।
जरि वर्षुनि घन, गिरिच्या भंगें, प्रभुच्या जयासि अरि वरिते. ॥१६॥
त्या अक्षत परपुरुषीं कनकाक्षें सोडिली महाशक्ती, ।
ज्याची, पुरुषार्थ सुखें साधुनि देती पदानता, भक्ती. ॥१७॥
ज्वलिता घोरा शक्ति प्रभुच्या भेदावया उरा लागे, ।
भंगे, द्रुहिण म्हणे, “तूं किति यातें, ज्यांत रविमुराला गे ?” ॥१८॥
बहु “साधु ! साधु !” ऐसें वदला चतुरास्य यज्ञवाराहा, ।
म्हणति “स्वरिपुघनांचा” ते सुर शक्रादि तज्ज्ञ “वारा हा.” ॥१९॥
स्तविला कविलास्यप्रदपद्म प्रभु परासि, चक्रानें ।
शिर हरुनि, पळें पाडी; भंगावें दुग्ध काय तक्रानें ? ॥२०॥
आधीं मूर्धा पडला कनकाक्षाचा, विशाळ मग काय; ।
मुनि वदले, “हा पविनें केला भिन्न प्रचंड नग काय ?” ॥२१॥
‘काय करावें ? ऐसे असती शक्रादि चरण लक्षूनी; ।
देव म्हणे त्यांसि, “असा स्वस्थ स्वस्वाधिकार रक्षूनी.” ॥२२॥
देउनि अभय सुरांतें अंतर्हित होय तोयदश्याम. ।
नाम स्मरतां ज्याचें, भक्ताचा पूर्ण होतसे काम. ॥२३॥
देवांसीं, असुरांतें शिकवूनि कुबुद्धि, लाविते कळहा, ।
त्यांचे पक्ष च्छेदी वज्रें सुरराज, म्हणति ते खळ ‘हा’ ! ॥२४॥
झाले, पावुनि पक्षच्छेदातें, पात्र सर्व तापातें; ।
बापा ! तें न जलधिच्या एका मैनाकपर्वता पातें. ॥२५॥
सुर म्हणति, “शरण आला, चुकला, परि न व्यथा जडाला हो.” ।
मैनाक पक्षरक्षणकाम धरुनि, सागरीं दडाला हो ! ॥२६॥
तरती प्रादुर्भावा गाउनि, ऐकोनि, सर्व वाराहा; ।
‘वारा हानि’, गुरु म्हणति, ‘गा या, अघ मेघ सर्व, वारा हा.’ ॥२७॥