उत्तरार्ध - अध्याय ५० वा

हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.


बदरींत रात्रिवृत्त प्रात:काळीं मुनीस आयकवी, ।
झाले ते बहु सात्विकभावपरिव्याप्त रम्यकाय कवी. ॥१॥
गरुडीं बैसोनि, निघे कैलासातें मुकुंद तो जाया; ।
“यावें.” ,म्हणे मुनींतें, कल्याणपथीं तयांसि योजाया. ॥२॥
गेला प्रभु कैलासीं,  जेथें धनपति उपासितो भर्गा, ।
जेथें मानससर, जें हंसाच्या पोषितें सदा वर्गा; ॥३॥
जेथें सिंहगजमृगव्याघ्र, सहजवैरभाव सोडूनी, ।
क्रीडति एकत्र सुखें, शाश्वत अन्योन्य सख्य जोडूनी; ॥४॥
जेथें गंगादि नद्या उत्पन्ना सागरंगमा झाल्या; ।
तप करुनि, साधकांच्या जेथें बहुकोटि निजसुखें धाल्या; ॥५॥
शिर जेथें ब्रम्हायाचें करितां अन्याय ईश्वर च्छेदी; ।
खेदी कोणीहि नसे जेथें, कीं त्रास काळही नेदी; ॥६॥
जेथें सुमुनिप्रार्थित हिमगिरि दे शंकरासि निजकन्या, ।
धन्या झाली पावुनि जगदीशा, जी न पावली अन्या; ॥७॥
शतपत्र पुष्करांहीं स्वनयनकमळेंहि पूजुनि शिवाला, ।
जेथें सुदर्शनातें पावुनि हरि, चिर उपासुनि, निवाला; ॥८॥
सस्त्रीक सिद्ध, किन्नर करिति मणिगुहांत निर्भय क्रीडा, ।
जेथें स्त्री,  प्रतिबिंब स्वविपक्ष गणूनि, पावती व्रीदा; ॥९॥
व्यसनीं पडला, ज्यातें जातां पौलस्त्य उद्धरायातें, ।
आसादिलें मुकुंदें नगरत्न हिमांशुशुद्ध राया ! तें. ॥१०॥
त्या कैलासीं जाउनि, रम्य स्थळ देवकीतनय पाहे, ।
मानस सरोवराच्या उत्तर तीरीं करीत तप राहे. ॥११॥
हरि संकल्प द्वादशवर्षेंपर्यंत करि तप कराया, ।
श्रीपंचाक्षर मनुजप धरि, अमृत जयापुढें सपक राया ! ॥१२॥
निष्कामचि जो झाला तो चीरी, वल्कली,  जटी, कामी, ।
भगवदभिप्रायाची स्पष्ट कराया शकें न टीका मी. ॥१३॥
प्रभु, शाकभक्ष, कृतजप, करि वेदद्ययत नित्य होमास. ।
ज्यांत तप:प्रारंभ श्रीशाचा, फाल्गुनाख्य तो मास. ॥१४॥
होमाकरितां काष्ठे, समिधा, आणूनि दे महापक्षी; ।
मूर्तिधर पांचजन्य प्रभुतें सर्वां दिशांत संरक्षी. ॥१५॥
वेंचूनि बिल्व, पुष्पे, दे पुभुला चक्राज आणून, ।
प्रभुची गदा तदा करि परिचर्या, न वदतांहि जाणून, ॥१६॥
तैसाचि मूर्त नंदक खडहि अत्यंत कुशल यानें त्या ।
आणुनि दे, दुष्टाच्या, समयीं नव मृदुल कुश, लया नेत्या. ॥१७॥
मूर्तिधर शार्ङ्ग चापहि, जोडुनि कर विभुपुढें उभा राहे; ।
बा ! हे ऐसी सेवा करिती, कीं ईंत शिव सदा आहे. ॥१८॥
होम करी व्याहृतिंहीं, प्रभु, संपादुनि घृतादि हव्यास; ।
ने मास एकभुक्तें पहिला, भजनींच फार हव्यास. ॥१९॥
दुसर्‍या मासीं दुसर्‍या दिवसीं शाकादि अल्प भक्षावें, ।
तिसर्‍या मासीं तिसर्‍या दिवसीं, हें एक वर्ष लक्षावें, ॥२०॥
मासीं द्वितीय वर्षीं शाकान्नें करि महातपा भुक्ती, ।
तिसर्‍या वर्षीं तिसर्‍या मासीं, जो दे पदानता मुक्ती. ॥२१॥
गुरु उत्तरोत्तर नियम धरि, आराधी जपोनि उग्रास; ।
‘शिव भोक्ता,’ म्हणवुनि घे तो शाकांचाहि होय सुग्रास. ॥२२॥
एकचि उरला, व्हावे क्रमितां संपूर्ण अब्द बारा ज्या; ।
लागों दिधला न यमा, नियमा, कांहींच शब्द बा ! राजा ! ॥२३॥
बैसुनि देवगजेंद्रीं, आला देखावयासि हरि हरितें; ।
महिषीं चढोनि यमही, ज्याचें दर्शन अघासि परिहरितें. ॥२४॥
हंसीं वरुण बसुनि ये, आले आदित्य, रुद्र, वसु, खांत, ।
गंधर्व, अप्सरा, सुर, मुनि, झाले सर्व उद्रव सुखांत. ॥२५॥
सुर म्हणति, “यदर्थ वरिति सुज्ञ महावृष्टि, हिम, महातप, तो ।
साक्षात सर्वार्थप्रद भगवान् कृष्ण स्वयें, पहा, तपतो. ॥२६॥
करितो ऐसेंचि नवल नव लक्ष्मीकांत हा, कवि तराया; ।
जीवांसि अर्थ सर्वहि देऊनियां, कीर्ति, हाक वितराया.” ॥२७॥
शंकर म्हणे, “प्रसादप्रासादा देव शौरिसुत पाया ।
रचितो, चाल, वोलोकूं, मागो तो इष्ट गौरि ! सुतपा या. ॥२८॥
शशिधवल वृषीं बैसुनि, साधूंच्या बुद्धिचा निवास हित, ।
सगण सधनद प्रभु ये प्रभुला, भेटावया शिवासहित. ॥२९॥
येतां प्रसन्नचित्तें गंगागौरीयुतें, शिवें, आद्यें, ।
गंधर्व गाति, नाचति सुरवेश्या, वाजती पुढें वाद्यें. ॥३०॥
सुर हरिजवळ मिळाले जे आटोकाट दाट, थाट तसे ।
पाहुनि, म्हणे शिव, “शिवे ! मज बहु आनंद आजि वाटतसें.” ॥३१॥
नियमांतीं भेटाया हरितें, शिव उतरला वृषावरुनी, ।
पाहोनि मानसातें, हंस नभांतुनि जसा तृषा वरुनी. ॥३२॥
श्रीहरिहरस्तुति करिति मुनि नारदपर्वतप्रमुख सर्व, ।
“जय विष्णो ! जय शंभो ! जय भगवन् ! जय मुकुंद ! जय शर्व ! ॥३३॥
जय अज ! भजदघहर ! जय पर ! जय वर ! जय प्रणतपाळ ! ।
जय देव ! सिंधुजाधव ! जय गिरिजाधव ! जय स्वरिपुकाळ !" ॥३४॥
इत्यादि बहु स्तविती कवि, ती श्रीहरिहरस्तुति नव सुधा, ।
सर्वार्थ दाखवी, दे आश्रय जीवां, रविद्युति, न वसुधा. ॥३५॥
श्रीकृष्ण पुढें पाहे प्रभुतें, जोडूनि कर, उभा राहे, ।
स्तुतिपुष्पांजलि वाहे, लाहे सुख, “रुचि,” म्हणे, “स्तवीं आहे.” ॥३६॥
भिन्न दिसे, परि पाहे भेदास द्वारकेश वास्तव न, ।
बहु आवडे शिवाचें,  धाया सद्द्वार, केशवा स्तवन, ॥३७॥
“भगवन ! सांब ! नमस्ते, शर्व ! नमस्ते, महेश्वर ! नमस्ते, ।
त्वं प्रभुरसि शिव ! जगति त्रातुं शरणागतानिह समस्ते. ॥३८॥
तेजस्विवर, सदयवर, वरदवर, त्रिभुवनांत तूं एक, ।
भक्तीं तुझा अनुग्रह दवदग्धदवीं जसा सुधासेक. ॥३९॥
शंभो ! दंबोलिधरप्रमुखां सकळांहि लोकपाळांतें ।
भर्गा ! स्वर्गादिपदें देता तूं विश्वनाथ बाळांतें, ॥४०॥
विघ्न न बाधति, साधति पुरुषार्थ सुखें समस्त तव भजनें, ।
यजनें जें, तें काय त्वन्नामजपेंचि जोडिलें न जनें ? ॥४१॥
देवा ! हरिहररूपा ! सर्वा ! तुजकारणें असो नमन, ।
आमघ्न तो, स्मरेना जो संसारी तुला, असोन मन.” ॥४२॥
स्तवनें प्रसन्न होऊनि शंभु, करें धरुनि कर, म्हणे, “बा ! हें ।
तप कां ? स्वयें तपाचें तप, कीं तूं काय अन्य मी आहें ? ॥४३॥
व्हावी तुला तपस्या ? पुत्रार्थ प्रार्थना तरि कशाला ? ।
चिंतामणिची वरितिल, विषयेच्छु अपूर्ण, ते बरिक शाला. ॥४४॥
पूर्वींच उचित पुत्र प्रेमें म्यां तुज दिला असे, कृष्णा ! ।
बा ! मी काम पुरवितों, प्रियजनहृदयीं न जन्मतां तृष्णा. ॥४५॥
तप उग्र कृतयुगीं मी कृष्णा ! होतों करीत, हे देवी ।
ताताज्ञेनें मातें, परिचर्या करुनि, सर्वदा सेवी. ॥४६॥
ऐशा समयीं भीत त्रिदशाधिप काम मधुसह प्रेषी, ।
शीघ्र मजप्रति आला श्रीकृष्णा ! शांतमानसद्वेषी. ॥४७॥
वरवर्णिनी, नगसुता, सुमति, उमा परमपुण्यरचिता हे ।
मजकारणें मुकुंदा ! जों प्रियपुष्पादिदान करिताहे, ॥४८॥
तों सहसा काम करी  मज निजशरलक्ष्य, सजलघननीला ! ।
ये दु:सह कोप मला, बा ! व्याघ्राच्या जसाच जननीला. ॥४९॥
येतां क्रोध निघे या भाळींच्या लोचनांतुनी ज्वाळा, ।
कामातें भस्म करी ती तत्काळचि, जगत्नयीपाळा ! ॥५०॥
आली दया मनीं, ती तद्नति पाहोनि बा ! दयालो ! कीं, ।
परवश तो, दीनवधें लेश नसे साधुवाद या लोकीं. ॥५१॥
शक्रचिकीर्षित कळलें, जें होतें ह्रदय पळ मतें मळलें, ।
तें विधिवचनें वळलें, रतिचें तपही दयाफळें फळलें. ॥५२॥
मन्नेत्राग्निज्वाळादग्ध मदन जो, त्वदीयकायज या ।
“हो,” ऐसें मी वदलों; होईल न मत्प्रसाद काय जया ? ॥५३॥
तव पुत्र ज्येष्ठ स्मर होइल लोकैकनायका ! महित, ।
करिल सुरांचें तेजें त्वतुल्यसुरम्यकाय काम हित,” ॥५४॥
ऐसें बोलुनि, शिव करि हरिला अंजलि पुन्हा वदायाला, ।
शक्रादि सुर, सुरर्षिहि जोडिति कर सर्वही तदा याला. ॥५५॥
शंकर म्हणे, “मुकुंदा ! तूंचि ब्रम्हांडसृष्टिचा  ! कर्ता, ।
भर्ता, तूंचि, श्रीशा ! तूंचि त्रैलोक्यनायका ! हर्ता, ॥५६॥
विधि तूंचि सृष्टिकाळीं, स्थितिकाळीं विष्णु तूंचि गा ! देवा ! ।
बा ! तूंचि रुद्र विश्वक्षयकाळीं, मुक्तिदा तुझी सेवा. ॥५७॥
‘शं’ सुख याचा कर्ता, यास्तव ‘शंकर’ तुला म्हणति सुकवी, ।
हरिसी सर्व प्रलयीं यास्तव ‘हरि’ नाम, हें व्याथा चुकवी. ॥५८॥
‘क’ ब्रम्हा, मी ‘ईश’ प्राण्याचा, या निजांगजातातें ।
वश करिसि, म्हणुनि ‘केशव’ तूं स्मरतां हरिसि सर्वघातातें. ॥५९॥
‘मा’ विद्या, ईचा तूं त्राता, दाता प्रभूत्तमा ! स्वामी; ।
यास्तव ‘माधव’ ऐसें नाम तुझें स्पष्ट जाणतों बा ! मी. ॥६०॥
लोकगुरू तूं ब्रम्हा, तूं अश्वत्थद्रुमांत, जो हा मी ।
रुद्रांत तूंचि, कृष्णा ! तूं चेवर्षींत नारदस्वामी; ॥६१॥
मी हा तुं, हा मी, शब्देंअर्थेंकरूनि कांहींच ।
तुज मज अंतर कृष्णा ! बा ! वंध्यापत्य तेंवि नाहींच. ॥६२॥
जीं लोकीं त्वन्नामें लाजविति गुणें सुधारस, ख्यातें, ।
माझींही तींच, करिति पळ मोक्षाच्या उधार सख्यातें. ॥६३॥
माझी उपासना बा ! तीच तुझी होय जलजनाभा ! जी; ।
त्वद्द्वेष्टा मद्द्वेष्टा; तवहि, ममहि, सुयश खळजना भाजी.” ॥६४॥
ऐसें वदुनि शिव म्हणे, “मुनि ! हो कथितों रहस्य, हें परिसा; ।
हरिसा हरिच त्रिजगीं, या स्पर्शावें मनें अयें परिसा. ॥६५॥
हेंचि परम वस्तु असे, याहुनि दुसरें नसे, जाणा, ।
परम तप:फल हेंचि, ब्राम्हाण ! हो ! निश्चयें मनीं आणा. ॥६६॥
हेंचि ध्येय, श्रेय; ज्ञाते ! हो ! हेंचि परम धन होय; ।
जन्मफळ हेंचि, जीवन हेंचि तुम्हांला, झषां जसें तोय. ॥६७॥
तुमचा पुण्याश्रम हा; जो शाश्वत मुख्य, हाचि तो धर्म; ।
सत्पथ हाचि तुम्हंला; मोक्षाभिध हाचि अर्पिता शर्म. ॥६८॥
जे ब्रम्हाज्ञ, स्तविती या कृष्णातेंचि ते, अहो ! मुनि ! हो ! ।
हेचि गति, यज्ञ, नेणुनि, कोणी कष्टी वृथा न होमुनि हो. ॥६९॥
घ्यावा हरि; प्रसन्न ध्यातांचि क्षिप्र होतसे चिप हा; ।
विधिहि म्हणे या, चातक जेंवि घना, विप्र ! हो ! तसेंचि, पहा. ॥७०॥
शुचि मन करा प्रयत्नें, शुद्धांत प्रकट तोचि हा सत्य, ।
यास, त्यागुनि लज्जा, गा: हाचि भवामयास नासत्य. ॥७१॥
‘या हरितें पावावें’ ऐसें वांच्छित असाल जरि सारे, ।
मदुपासना करावी, हें प्रिय, हित, सत्य सर्व परिसा, रे ! ॥७२॥
मी सुप्रसन्न, होतां, होतो हरि सुप्रसन्न, सन्मुनि ! हो ! ।
जो मोक्षेच्छु विवेकी, तो अस्मदभेदभक्त जन्मुनि हो. ॥७३॥
आम्हांत भेद करि जो, या होय न पात्र मदुपदेशाला, ।
त्या हा स्वभक्तिरूपा चिंतामणिची न यदुप दे शाला.” ॥७४॥
नमुनि मुनि म्हणति, “देवा ! विश्वगुरो ! तुज नमो, हरा ! हेती ।
हे तीव्रा अशनिपरिस भवदुक्ति, जिणें न मोह राहे ती. ॥७५॥
हें गहन तत्व न जना, तुमचा नव्हतां प्रसाद, समजावें; ।
भवदुपदेशें, तैसें न गुहेंतिल भास्करेंहि, तम जावें. ॥७६॥
आलों या कैलासा शैला साधुप्रियाश्रया सर्व ।
यास्तवचि, विश्वनाथा ! लक्षुनि हें मुक्तिचें महापर्व. ॥७७॥
झालों कृत्यकृत्य सकळ हे आम्ही, धन्य अन्य होतील, ।
शरणागतकर्णा हें परमामृत युष्मदनुग ओतील.” ॥७८॥
ऐसें म्हणुनि, नमिति ते सुमुनि  हरातें, तयाचि परि हरितें. ।
हें चरित हरिहरांचें श्रद्धावत्तापपाप परिहरितें. ॥७९॥
पुनरपि सर्व मुनींतें द्याया विस्मय असीम, हा देव ।
कृष्ण प्रसन्न व्हाया, प्रेमें स्तुति करि असी महादेव. ॥८०॥
“रविशशिविधिहररूपा ! बहुसंख्य असोत तव पदा नमनें, ।
तुज भक्तिचेंचि वरदा ! मागावें, मुक्तिचें न, दान मनें. ॥८१॥
चार किती वर्णाया ? न क्षम ते आठ वेद या लीला; ।
तुझिया अवनचि नतहितदक्षमनें आठवे दयालीला. ॥८२॥
गरळस्तन्य तुला दे, ती पावे पूतना महितकाय, ।
मग न करिसिल, ध्यातां, जपतां निज पूत नाम, हित काय ? ॥८३॥
स्पर्षें कौस्तुभपदवी देतीलचि पाय विगळाला हे, ।
मी पंचवदन वर्णूं किति करुणा ? मुक्ति पिंगळा लाहे. ॥८४॥
मजला प्रसाद वेडचि लावितसे तो, गजा मिळाला जो, ।
त्वन्नामपराङमुखमुख शुचि साक्षरही अजामिळा लाजो. ॥८५॥
आयकिलें साधुमुखें, कीं गति दिधली तुवां अघा बरवी, ।
त्यापासुनि पाप बहुहि बापा ! पापा जना न घाबरवी. ॥८६॥
नामचि घेतां, पोटीं घालुनि अपराध सकळ, वळलास; ।
करिसि अरिसि निजसम तूं, बा ! कंसीं काय न कळवळलास ? ॥८७॥
नमन तुला, श्रीकृष्णा ! हृतसत्तृष्णा ! तुला असो नमन, ।
नमन तुला, गोविंदा ! हो निश्वळ, तव पदीं वसोन, मन. ॥८८॥
बहु शोभे, त्वत्सद्नुण गाता जो साधु, भक्त, निष्कपट; ।
नसतां भवत्प्रसाद, न सुंदरहि धरूनि दिव्य निष्कपट. ॥८९॥
धर्म म्हणे दूतां, “जो न हरिजन, न यो समोर माज्या, ने. ।
प्रभुसम पूज्य मला तो, म्हणता ‘तुभ्यं नमो रमाजाने !’ ॥९०॥
हें किति गाउनि तुझिया वसुदेवा ! देव कानरा धाती, ।
कुंब्जाहि परमपूज्या, बा ! केवळ सेवका न राधा ती.” ॥९१॥
स्तवन करि बहु प्रभुचें, शिव म्हणुनि ‘नमो, नमो, नमो’, हा, तें ।
स्तोत्र म्हणे भावें, जो जन, त्याच्या दे उरों न मोहातें. ॥९२॥
श्रीशंभु म्हणे, “मुनि ! हो ऐसे विकसित करूनियां गाल, ।
या प्रभुतें सांजलि जरि, सुप्रेमरसें भरूनियां, गाला, ॥९३॥
तरि सर्व तराल सुखें, हा प्रभुवर, हा शरण्य, हा साचा. ।
श्रेयस्कर आश्रय या सर्वालाही जगन्निवासाचा.” ॥९४॥
इत्यादि वदोनि, प्रभु झाला गुप्त त्रिनेत्र बा ! राया ! ।
त्रिजगद्नुरु उपदेशी ऐसें सुमुनीस, जीव ताराया. ॥९५॥
श्रीकृष्णातें नमुनि, स्तवुनि, ध्यानीं धरूनियां मूर्तीं, ।
स्वस्थाता मुनि गेले, झाली नि:शेषकामनापूर्गी. ॥९६॥
हरिहर महंत, यांचे शक्रादिक लोकपाळ हे चेले, ।
शेले निदेश घेऊनि, नाकादिगुरुस्थळासि ते गेले. ॥९७॥
बैसुनि गरुडस्कंधीं, बदरीतें देव ये तदा सांजे ।
प्रभुचरण पूजिती मुनि, आले वर इष्ट देत दासां जें. ॥९८॥
जे मुनि धन्य कराया बदरींत स्वजनकल्पनग राहे, ।
मानितिल मनांत महामहिपतिंच्या कां न अल्प नगरा हे ? ॥९९॥

N/A

References : N/A
Last Updated : January 01, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP