कृष्ण म्हणे, “मुनिवर्या ! येथुनि जावूनि शक्रसदनातें, ।
उत्सव पाहुनि, मग तूं पूर्वील प्रभुसमीप वद नातें. ॥१॥
सांगुनि वंदन माझें, प्रार्थित मम अग्रजासि कळवावें, ।
स्तवपूर्वक मधुर वदुनि, पाहूनि सुखसमय, चित्त वळवावें. ॥२॥
‘श्रीकश्यपमुनिनिर्मितकल्पद्रुमपारिजातयश आर्या ! ।
ऐकुनि साधुमुखें या, वांछिति तद्दानपुण्य मम भार्या. ॥३॥
तरुसह दान अदितिनें स्वपति दिला, तोचि तें तिला सिकवी; ।
सौभाग्यार्थ शचीनें मग नगसह दान तूं दिलासि कवी. ॥४॥
तैसाचि रोहिणीनें दिधला पति, ऋद्धिनेंहि, धन्यांहीं ।
केलें ऐसेंचि, विभो ! वांछुनि सौभाग्यपुण्य अन्यांहीं. ॥५॥
यास्तव या स्तवनार्हा दे आर्या ! पारिजातनगराजा, ।
उत्सुक मति म्हणति, ‘तुझ्या जावें विनवावयासि नगरा ज्या. ॥६॥
धाडुनि द्याया स्ववधूकामास्तव तरुवरा वदान्या या ! ।
आर्या ! समर्थ अससी, दिधल्यावरि दान, निजपदा न्याया. ॥७॥
हें कार्य अगत्य करीं, वळवील न पाकशासना काचा, ।
‘नाहीं,’ म्हणेल भर्ता मिळतां यश बा ! कशास नाकाचा ! ॥८॥
बा ! पशुहि वळेल तुझे सुप्रिय सेवूनि बोल कानांहीं, ।
तुजसम तूंचि त्रिजगीं, देवर्षे ! अन्य बोलका नाहीं.” ॥९॥
देवर्षि म्हणे, “देवा ! विनविन शक्रासि, अर्पिला प्राण, ।
परि पारिजाततरु तो न सुखें देईल, निश्चयें जाण. ॥१०॥
पूर्वीं पयोधमथनीं जैसीं तीं कौस्तुभप्रमुख रत्नें, ।
देवांच्या असुरांच्या तरु त्यांत प्रकटला परमयत्नें. ॥११॥
प्रार्थी शिवा शिवा कीं, ‘हा मंदरसन्नगीं नग वसावा, ।
लोभ्या परा न, जैसा मणि वसता पन्नगीं न गवसावा.’ ॥१२॥
साहे, मंदरशैलीं तरु विभुनें प्रेषितां, न मघवा तें; ।
विनवि प्रभुतें, ज्याच्या निर्माल्याच्या उरे न अघ वातें. ॥१३॥
वरदवरा ! भगवंता ! शरणागतवत्सला ! तुझी भक्ता !
आहे पुलोमकन्या या वृक्षीं, त्वद्नुणीं तसी, सक्ता. ॥१४॥
तीच्या क्रीडोद्यानीं द्यावा लावावयासि पादप हा, ।
आहे अशा प्रसादीं या तरुहुनि अधिक साधुवाद, पहा. ॥१५॥
ज्या प्रभुपुढें असत्यें सहसा विधिचेहि वेद हरपावे, ।
तोहि, शचीचें करितां मिष, नाशायासि खेद हर पावे. ॥१६॥
देवीप्रियार्थ, सुयशें व्हाया जनही भवाब्धिनिस्तीर्ण, ।
करि पारिजातवन मग भगवान् गव्यूतिमात्र विस्तीर्ण. ॥१७॥
सगण प्रभु, देवी, कीं जातों मी त्या स्वयंप्रभ वनांत; ।
नाहीं प्रवेश अन्या, जेवि अपूतासु विप्रभवनांत. ॥१८॥
त्या पूर्व पारिजाताहुनि बहुगुण फळ असे सदा याचें, ।
जें इष्टवस्तुदानीं मातांचें, तेज तेंच दायांचें. ॥१९॥
ते मूर्तिमंत वृक्ष प्रभुची गणसे उपासना करिती; ।
धरिती प्रेम तयावरि देवी, पुत्रीं जसें, तयापरि ती. ॥२०॥
तेथें अंधकनामा, वरदर्पित, पापनिश्चय, क्रूर, ।
शिरला, वधिला प्रभुनें, वृत्राधिक दशगुणें बळी शूर. ॥२१॥
पाहोनि सर्वभूतावध्या त्या, होय अंधकार मला; ।
भगवान् स्वयंप्रभ वनीं देवीसीं, वधुनि अंधका, रमला. ॥२२॥
कृष्णा ! यास्तव म्हणतों, देयिल शतमख न पारिजातातें. ।
सर्वाधिक विषयरता त्याचें विषयप्रदत्व ताता ! तें.” ॥२३॥
कृष्ण म्हणे, “हरिला न द्रुम, युक्तचि होय तें महादेवा; ।
करुणा म्हणे, ‘पुढें स्त्री केली कीं, तीकडे पहा, देवा !’ ॥२४॥
तो देव सर्वभूतज्येष्ठ, श्रेष्ठा, स्वयें जगद्भर्ता, ।
करिता झाला लौकिकमर्यादोचितचि तें उमाभर्ता. ॥२५॥
त्या जेविं जयंत, तसा मी बंधु, कनिष्ठ लालनीय असें, ।
कीं, मोडिलें तदीय न ईशें, मोडील मन मदीय कसें ? ॥२६॥
यत्न करीं या कार्याविषयीं, आहेसि नारदा ! शक्त; ।
व्यक्त, ब्राम्हाण सज्जन जे, त्यांचा वासुदेव हा भक्त. ॥२७॥
सत्येसमीप केली ‘सुरतरु आणिन’ असी प्रतिज्ञा, ते ।
रक्षीन; भजति भग्ना पुरुषाप्रति कीं असीप्रति ज्ञाते ? ॥२८॥
म्यां त्यजिलें, तरि लोकीं लेशहि राहेल सत्य न मुने ! तें. ।
अनृत पुरुष संततितें दूषी, कालिय जसाचि यमुनेतें. ॥२९॥
सर्व सुरासुरराक्षस शकतिल माझ्या पणा न मोडाया, ।
आहेत समर्थ शर प्रबळा परपर्वताहि फोडाया. ॥३०॥
सामें मागत असतां, वृक्ष न देतां, यशासि जोडाया. ।
सांग स्पष्ट तया, कीं, ‘न चुकेन उरीं गदेसि सोडाया.’ ॥३१॥
भ्रातृप्रेम त्यजितां, रक्षीन न शतमखा अनगदात्या; ।
हाणिन उर:स्थळीं मी, मृदुहि कठिन करुनियां मन, गदा त्या.” ॥३२॥
प्रभुचा निश्चय ऐकुनि, नारद आला महेंद्रसदनातें, ।
पाहे परमोत्सव तो, प्रेमें वंदूंनि कामकदनातें. ॥३३॥
परमेश्वर गेल्यावरि, राजर्षि, सुरर्षि, जे पर महर्षी, ।
स्वस्वस्थाना गेले, हौनि परमोत्सवें परम हर्षी. ॥३४॥
तो उत्सव झाल्यावरि, जाय सुरसभेंत कीर्तिसदन मुनी, ।
स्वासनसमासन तया कल्पी वासव, ससभ्य पद नमुनी. ॥३५॥
नारद म्हणे, “महेंद्रा ! दूत श्रीकृष्णविष्णुचा झालों, ।
किंचित् कार्य प्रभुनें कथिलें सांगावया तुला आलों.” ॥३६॥
शक्र म्हणे, “चिरकाळें कृष्णें आम्हांसि आजि आठविलें, ।
बहु उत्तम, ऐकूं दे, वद, सांगुनि काय कार्य पाठविलें ?” ॥३७॥
देवर्षि म्हणे, “शक्रा ! तव अनुजा केशवा पहायाला, ।
गेलों द्वारवतीला, सरसीला गज जसा नहायाला, ॥३८॥
शक्रा ! सत्कुळदैवत रैवतकीं रुक्मिणीसहित पाहें; ।
नेत्रद्वय बहुमानी, पाहुनि त्या रुक्मिणीसहि, तपा हें. ॥३९॥
श्रीकृष्ण करित होता सप्रेम उमामहेश्वरस्तवन, ।
अतिमधुररवें झालें होतें तें चित्रसें समस्त वन. ॥४०॥
म्यां पारिजातपुष्प श्रीकृष्णाला, तदीय भार्यांतें ।
द्याया विस्मय, दिधलें; झालें बहु हर्षकारि आर्या ! तें. ॥४१॥
करितां श्रवण प्रेमें, भार्यांतें त्या अपारिजाताच्या, ।
अद्भुत गुण पुष्पाचे सांगावे कां न पारिजाताच्या ? ॥४२॥
कथिलें कश्यपतेजें झालें तें पारिजातजन्महि म्यां, ।
झाल्या विस्मितहृदया प्रभुदयिता आयकोनि सन्महिम्या. ॥४३॥
या तरुसीं पुष्पाच्या स्वकरें बांधूनि मान दामानें, ।
ऐकति, पतिदान अदिति दे मजला, हेंहि मानदा ! मानें. ॥४४॥
तूंहि दिलासि शचीनें, दिधले धनदादिही सुदारांहीं, ।
म्यां निष्क्रयप्रकारिहि, कथिला, तें ऐकिलें उदारांहीं. ॥४५॥
ऐकुनि, तव अनुजाची अतिदयिता एक सत्यभामाव्हा, ।
पतिस म्हणे, ‘पुण्यक मी करिन, तुम्ही या सहाय कामा व्हा.’ ॥४६॥
श्रीकृष्ण म्हणे, ‘भामे ! देतों आणूनि पारिजातातें, ।
मतिमति ! सति ! पतिसुरतरुदानें तूंही उजीव हातातें.’॥४७॥
इंद्रा ! करूनि हा पण आपण, तव अनुज मज म्हणे, ‘आर्या !’ ।
प्रार्थुनि मदग्रजाला, सिद्धिप्रति पाववीत या कार्या. ॥४८॥
आर्यासि वद, ‘वरांच्या तुजला मी बंधु लालनीय शतें; ।
बा ! तनुजपालनीं जें, देवेंद्रा ! अनुजपालनीं यश तें. ॥४९॥
हा सफळ तव वधूचा धर्ममनोरथ असा प्रसादानें ।
होय, शचीदेवीचा या तरुराजाचिया जसा दानें. ॥५०॥
नरलोकीं दुर्लभ हा, यातें पाहोत सर्वही मनुज, ।
अतुळप्रभाव होयिन या कर्येंकरुनि मी तुझा अनुज’,” ॥५१॥
या प्रभुसंदेशातें ऐकुनि, वासव म्हणे, “मुने ! आधीं ।
तूं बैस आसनीं, घे उत्तर मग, कार्य साध्य तें साधीं,” ॥५२॥
मुनि आसनिं बैसे, मग तदनुज्ञेनें महेंद्रही, राजा ! ।
वृत्रादिघन न शकले लेशहि भंगावयासि हीरा ज्या. ॥५३॥
इंद्र म्हणे, “ज्या दहनीं झाले परवीरराय कापूस, ।
देवर्षे ! मद्वचनें कुशल तया वृष्णिनायका पूस, ॥५४॥
सांग निरोप, मुने ! कीं, ‘कृष्णा ! स्वजनाधिरोगनासत्य ।
मजमागें त्रिजगाचा नि:संशय तूंचि नाथ नासत्य, ॥५५॥
हा पारिजात, रत्नें अणिकहि; जीं संग्रहांत आहेत, ।
सर्वस्व तुझें स्वर्गीं,तव दयितेचा पुरेल हा हेत. ॥५६॥
सुरकार्य करुनि, नाकीं यावें, भामा प्रियाहि आणावी, ।
पुण्यक घडेल, योग्या मर्यादा रक्षणासि जाणावी. ॥५७॥
स्वल्पार्थ न नरलोकीं न्यावीं स्वर्गोचितें महारत्नें; ।
हे विधिकृत मर्यादा संरक्षावीच सर्वदा यत्नें. ॥५८॥
तरु नरलोकीं जातां, किमपि न अस्मत्स्वरूप राहेल, ।
सुर नर समान होतिल, आम्हां कोणी न भाग वाहेल. ॥५९॥
अर्पील मानुषींला, देवींचें रूप जें, सुरतरुच तें. ।
न रुचेल, अप्सरांचें आजि नरांला जसें सुरत रुचतें. ॥६०॥
अद्भुत सुख नरलोकीं होतां, करितिल कशास जन यज्ञ ? ।
या कार्या अनुमोदन देतील अदीर्घ द्दष्टि अनयज्ञ. ॥६१॥
मर्यादा मोडितसे; झाला, भक्षूनि मांस, मत्त; पहा; ।
जरि म्यां क्षमा करावी, तरि देवर्षे ! म्हणेल मत्तप ‘हा !’ ॥६२॥
बहु अयश जगीं होयिल, कीं, ‘झाला स्त्रीस कृष्ण वश्य, पहा.’ ।
भलतेंचि कर्म करितां, कां न अदितिसह म्हणेल कश्यप ‘हा !’ ॥६३॥
सुज्ञ न सोसी, सोसो ज्ञातिकृता धर्षणा असुज्ञा ती; ।
व स्वर्गरत्न माझें, स्पष्ट ‘हरिन’ म्हणतसे ‘असु’ ज्ञाती. ॥६४॥
सुर, सुरतरु पाठवितां, ‘हा !’ म्हणतिल, करुनि आठवा, नाकीं. ।
विटुनि म्हणेल शचीहि, स्वपरिग्रह हाहि पाठवाना कीं !’ ॥६५॥
नेणें देवनगाचें नरलोकीं सर्वथा नव्हे युक्त;’ ।
सांग असें कृष्णाला; आहे बहुमत तया तुझें उक्त. ॥६६॥
जा, पावे तोष असें कथिलें हें नारदा ! वद भ्रात्या; ।
ज्या सुविवेका देती, बा ! जाणसि युक्ति तूं अदभ्रा त्या. ॥६७॥
मणिहार, अगरु चंदन, चित्रें वस्त्रें, वधूसिने त्याच्या. ।
नरयोग्य वस्तु घेउनि जा, जें येयिल मनासि नेत्याच्या. ॥६८॥
देतों दिव्यें वस्त्रें, देतों रत्नें, विभूषणें चित्रें, ।
न सुरप्रिय तरु देयिन, सांगावें युक्तिनें तुवां मित्रें.” ॥६९॥
नारद म्हणे, “महेंद्रा ! म्यां तुज हित तें अवश्य सांगावें; ।
समयीं चुकतां, कविंनीं ‘सर्वसुहृत साधु’ म्हणुनि कां गावें ?॥७०॥
कृष्णाला कथिलें म्यां, ‘हालाहल पिवुनि, जो न वमता तें, ।
त्वां त्या हराहि न दिला सुरतरुं, या जाणतों तव मतातें. ॥७१॥
ज्या माझ्या उपदेशा वेदासीं सर्व सुज्ञ हे तुकिती, ।
तो मी बहुतचि वदलों; न करावा हट, म्हणोनि हेतु किती ! ॥७२॥
‘मी अनुज लालनीय, द्रुम द्यावा अग्रजें’, असेंच वदे. ।
लोभीं विहित वचन न, द्रव्य मधुरहि ज्वरींतसें, चव दे. ॥७३॥
प्रभु हांसुनि वाक्यांतीं वदला, मज तें सरोषसें गमलें, ।
परिस तुला मी कथितों, ज्याच्या श्रवणींच मन्मन भ्रमलें. ॥७४॥
‘सर्व सुरासुरराक्षस शकतिल माझ्या पणा न मोडाया, ।
आहेत समर्थ शर प्रबळा परपर्वताहि फोडाया. ॥७५॥
सामें मागत असतां, वृक्ष न देतां, यशासि जोडाया, ।
सांग स्पष्ट तया, कीं, न चुकेन उरीं गदेसि सोडाया.’ ॥७६॥
इंद्रा ! उपेंद्रनिश्चय जाण असा स्पष्ट, नीति आठीव, ।
पुससिल मज तरि देवा ! देवतरु द्वारकेसि पाठीव.” ॥७७॥
इंद्र म्हणे, “देवर्षे ! जरि अग्रज निरपराध मी आहें, ।
अनुज मला लंघितसे, भ्राता म्हणवूनि सोसितों बा ! हें. ॥७८॥
बहु विप्रिय कृष्ण करित आला, आम्ही सहात आलों, बा ! ।
म्हणतो आम्हांसि, ‘अजाकंठस्तनसे वृथाचि’ हा ‘लोंबा’. ॥७९॥
आपण सारथि हौनि, करुनि पुढें मत्तनूज पांडव, हा ।
घन वारुनि, मजकरवीं म्हणवी, जाळूनि सर्व खांडव, ‘हा !’ ॥८०॥
गोपांची मति भेदुनि, अनव महोत्सव बळेंचि राहविला, ।
गोवर्धन धरुनि करीं, माझा सर्व प्रताप वाहविला. ॥८१॥
स्वसमत्व वदे, होय प्रबळारिवधीं सहाय हा न मज; ।
करुनि निजभुजबळाश्रय, वधिला म्यां वृत्र नारदा ! समज. ॥८२॥
देवासुरसंग्रामीं करितो स्वेच्छेंकरूनि हा युद्ध, ।
तरि मी, प्रेम त्यागुनि, होत नसें स्वानुजावरि क्रुद्ध. ॥८३॥
मी कलह करित नाहीं भ्रात्यासीं, तूंचि आज साक्षी, बा ! ।
‘हाणीन गदा’ म्हणतो, नाहींच विवेक या जसा क्षीबा. ॥८४॥
अदितिसह पिता कश्यप संप्रति उदवास करुनियां आहे, ।
तन्नंदनप्रतिज्ञा त्याला आधीं कथीन मी बा ! हे. ॥८५॥
अजितात्मा मद्भाता हो ! हा केवळ रजोगुणें मळला, ।
स्त्रीवक्यें मज गुरुतें वधितो, धिक, कामवश खरा कळला. ॥८६॥
‘स्त्रीपुत्रसहस्त्राहुनि अहिक भ्राता,’ असें मला माता, ।
तातहिम सांगे, ‘सोदर जो, तो आत्माचि, न विसरें ताता !’ ॥८७॥
कश्यपकुळांत किमपिहि निंद्य नसे नारदा ! अदिति झाली,।
तेंहि नव्हे राक्षसकुळ, कां कृष्णीं उग्रता असी आली ? ॥८८॥
ज्या कर्मीं स्वस्तव, तें न वदावें, बा ! परंतु हा समय; ।
देवर्षे ! अनवसरीं युक्तहि होतेंचि उक्त हासमय. ॥८९॥
शाङ्रर्गच्या झटक्यानें गुण तुटतां विष्णुचें उडे शिर, तें ।
म्यां जोडिलें प्रयत्नें, धरिलें देह स्वयें दयानिरतें. ॥९०॥
‘काय म्हणेल मज पिता, माता ?’ ऐसें मनांत आणून, ।
धरिलें शरीर याचें म्यां, बंधुप्रेम अधिक जाणून. ॥९१॥
‘सर्व त्रिदशांत,’ म्हणे हा, ‘मीच विशिष्ट, अन्य न विशिष्ट.’ ।
दर्पें धनुष्य चढवी, बापा ! हें जाणतात कवि शिष्ट. ॥९२॥
श्रावणभाद्रपदांतिल पूजा म्यां आपुली दिली याला, ।
बा ! लाज मला होत्ये, उद्धत मदनुज, पहा, कसा झाला ! ॥९३॥
यत्नें अवतारांत स्वशरीरातेविं यासि रक्षितसें, ।
स्वानुज म्हणुनि प्रेमें स्वात्म्यापरि मी सदैव लक्षितसें. ॥९४॥
या माझ्या भवनावरि रचिलें बहुरम्य आपुलें भवन; ।
न गणुनि अपमानातें, करितों स्नेहेंकरूनि मी अवन. ॥९५॥
धर्में अनुज भ्राता तो पुत्रचि लालनीय बाळकसा, ।
म्हणतों, ‘हा दुखवावा आपण, रागें भरूनि, बाळ कसा ? ॥९६॥
आवडतो ताताला, मातेला, बहु मलाहि आवडतो; ।
स्नेहें आश्रय केला, मार्कंडेयें जसाचि बा ! वड तो. ॥९७॥
‘करिन प्रहार,’ म्हणतो, यांत दिसे कीर्ति शुचितरा ज्याला, ।
तोचि करो आघात प्रथम, नव्हे स्पष्ट उचित राजाला. ॥९८॥
अहितें रणीं हटकितां, बहु ज्यचिं ज्ञान दभ्र मुरडेल, ।
पाहुनि अधैर्य पतिचें केवळ न शचीच, अभ्रमु रडेल. ॥९९॥
सांग तया दाजिता, ‘ये, उत्साहेंकरूनि हो पीन; ।
मी, जों अजित, तुला तों तरुचें पत्रार्धही न ओपीन.’ ॥१००॥
सांगु, ‘बसुनि गरुडीं ये, धरुनि गदा, शार्ङ्ग, चाप, चक्र, दर; ।
कपटें तरुवर न हरीं; धरिल पवि करीं, मनीं न शक्र दर’.” ॥१०१॥
ऐसें अविहित वदतां, एकांतीं तो सुरर्षि ने त्यातें, ।
बोध करी, देवांच्या सांगोनि रहस्य तत्व नेत्यातें. ॥१०२॥
“सांगावें राजाला शक्रा ! नं विचारितांहि जें विहित; ।
सुहृदुक्त युक्त कटुही, ओखद बाळासि होय जेंबि हित. ॥१०३॥
न करावें परिणामीं तापप्रद जें मनास देहास, ।
शक्रा ! ज्या कर्माचा आरंभचि रिपुजनास दे हास. ॥१०४॥
जो निर्गुण परमपुरुष नारायण, तोचि, वरुनि मायेतें, ।
झाला शिव, विष्णु, विभो ! प्रकृतीस्तव नामरूप या येतें. ॥१०५॥
चिच्छक्ति उमा देवी, अशें चिच्छक्ति रुक्मिणी देवी; ।
जे बीतमोह सुकवि, प्राप्त तयांलाचि होय हे ठेवी. ॥१०६॥
लीलेनेंचि महेंद्रा ! रचितो क्रीडार्थ कृष्ण विश्वास, ।
निश्वास वेद याचे, याचाचि असे कवींस विश्वास. ॥१०७॥
पूर्वीं सुतप करुनियां, अदिति सती सुचिरकाळ आराधी, ।
जीची योगपथीं नच निसरे, विसरेहि विश्व, सारा धी. ॥१०८॥
भेटे प्रभु तीस म्हणे, ‘माग, तुझ्या सुफळ इष्ट सुतपा हो.’ ।
अदिति वदे, ‘वरदेशा ! हे तुजसम सुगुण शिष्ट सुत पाहो. ॥१०९॥
देव म्हणे, ‘मीच तुझा सुत होतों, साध्वि ! अन्य मत्सम न.’ ।
सदुपासना भजकमन तृप्त करी, सुरभि जेविं वत्समन. ॥११०॥
झाला देव तव अनुज, मनुजहि सांप्रत धराभर हराया, ।
राया ! हा जगदीश्वर अवतरतो, बहु सुखी नत कराया. ॥१११॥
बा ! पललपिंड जेविं स्नेहें, कृष्णें प्रपंच हा सर्व ।
व्याप्त असे, देवेंद्रा ! यासीं कोणीं करूं नये गर्व. ॥११२॥
हा सर्वात्मा सर्वां देवांला पूज्य होय सद्वेष; ।
तरले न तयापासुनि, बहु मेले बळसमुद्र सद्द्वेष, ॥११३॥
हौनि शेष, धरेतें केशव आधार जाहला आहे.।
बा ! हे शक्ति तुज असे ? दंष्ट्राग्रीं, होय किटि, धरा वाहे. ॥११४॥
असुर हिरण्याक्ष महादारुण, त्यासीं रची वराह रण, ।
एकार्णवीं करी हा तत्प्राणांचें शचीवरा ! हरण. ॥११५॥
अत्युग्र हिरण्यकशिपु वधिला, हौनि नृसिंह, या अजितें, ।
अजि तें काय विसरला, कारुण्य प्रभुसि सदवनीं सजितें ? ॥११६॥
हौनि वामनु, हा मन निववी, भू हरुनि, बळिस आकळुन; ।
न कळुन जसें वदावें, तैसें वदतोसि काय गा ! कळुन ? ॥११७॥
तुझिया ठायीं श्रीपति बळिच्या श्रीतें हरूनि हा स्थापी; ।
याच्या कीर्तिसुधेतें साधुसभा, बहु धरूनि आस्था, पी ॥११८॥
दशवदनातें मारी, तारी देवांसि, होय हा राम, ।
निववी नतांसि, केवळ कल्पतरूंचा असा न आराम. ॥११९॥
कथितों भविष्य, ‘नेइल सुरतरुतें शत्रुकाळ केशव हा; ।
नगरत्न पदीं, जाणुनि यासि सकललोकपाळकेश, वहा, ॥१२०॥
‘बंधुस्नेहपराभव करिल, धरिल हात; बा ! तया पविनें ।
तूंतों न, गदेनें तुज हाणिल,’ म्यां भावि जाणिलें कविनें, ॥१२१॥
दे पारिजात सामें, द्यावा व वृथा करूनियां बभ्रा, ।
दभ्रा श्री; विटवावें न भ्रात्या त्या दयेचिया अभ्रा. ॥१२२॥
म्यां कथिलें नैकसि, तरि सचिवांतें देवनायका ! पूस, ।
कीं स्वमना, ‘वायुपुधें बळ धरुनि टिकेल काय कापूस ?”’ ॥१२३॥
शक्र म्हणे, “आयकिलें, कृष्णाचें कथिसि तूंहि थोरपण, ।
म्हणुनचि न देयिन द्रुम, ऐकुनि त्याचा तसाहि घोर पण. ॥१२४॥
कीं, तो महाप्रभाव, द्रुमवर हा स्वल्प अर्थ, याकरितां ।
क्रोध न धरील, कैसा परमपुरुष, कामकोप हे धरितां ।
स्पष्ट असावाचि सदा, जरि कृष्ण महाप्रभाव, सोसिक तो. ।
वृद्धाचें,’ सुपुरुष तों म्हणतो, ‘स्वमहाप्रभा वसो, सिकतो. ॥१२६॥
पाडील स्त्रीप्रार्थिततुच्छविषयकाम हा प्रभाव ढिला, ।
लंघाया वांछितसे, मळवाया का महाप्रभा, वढिला ? ॥१२७॥
जरि अदितिला दिला वर, आपण झाला कनिष्ठ हा तनय, ।
स्वज्येष्ठ भ्रात्याचें ऐको, साहो, न होचि हातनय. ॥१२८॥
योग्य महात्मा ज्येष्ठ भ्रात्यासीं व्हावयासि न विरोधी; ।
कवि रोधी मन कां, जरि परमपुरुष निजसुखींच न विरो, धी ? ॥१२९॥
पूर्वीं ज्येष्ठ न व्हाया कोणी कृष्णासि घातल्या आणा ? ।
वढिलपणाची वांछा, तरि तें आतांहि पातल्या आणा.” ॥१३०॥
‘द्यावा नच तरु,’ ऐसा निश्चय जाणोनि सुद्दढ शक्राचा, ।
जाय द्वारवतीतें नारद, धर्ता स्मरोनि चक्राचा. ॥१३१॥