विष्णुहतसुता दिति किति दिवस शिवसमा सुवृष्टिकर्त्यातें ।
बहु आराधी, मागे सर्वसुरावध्य पुत्र भर्त्यातें. ॥१॥
कश्यप म्हणे, “प्रिये ! तुज आलय संपन्महाविलासाचा, ।
एका रुद्रावांचुनि सर्वसुरावध्य सुत दिला साचा. ॥२॥
तो देवदेव भगवान्, सति ! माझें बळ तयापुढें नचले, ।
खचले गिरि तत्तेजें, ज्याला विषकाम हे दहन पचले.” ॥३॥
ऐसें बोलुनि कश्यप मुनिवर्य स्पर्शला जया बोटें, ।
पोटें धरिला गर्भ; ब्राम्हाणसामर्थ्य सर्वथा मोटें. ॥४॥
झाला सहस्रमस्तक, अत्यद्भुत सुत सहस्रबाहु तिला, ।
द्विसहस्रेक्षण, तावच्चरण, गिळाया शिखीच आहुतिला. ॥५॥
अंध नसोनि, मदालस तो मीलितनेत्र अंधसा चाले, ।
यास्तव ‘अंधक’ ऐसें नाम तया लोक ठेविते झाले. ॥६॥
आपण अवध्य ऐसें जाणे, जाची उदंड लोकांतें. ।
कामी, लोभी, निर्भय हरिल, जगीं रत्न जें, न तो कां तें ? ॥७॥
स्त्रीरत्नें, हरिरत्नें, करिरत्नें, या जगांत जीं रत्नें, ।
हरिलीं, निजबाहुबळें, जीं ज्यांहीं जोडिलीं महायत्नें. ॥८॥
देवासुरराक्षसनरनागमुनिहि जरिहि म्हणति ‘ननु,’ गांजी; ।
कोणासहि प्रतिष्ठा नाहीं, त्याच्यासमीप अनुगां जी. ॥९॥
परदारापहरण, पररत्नविलोपन, करी सदा मोहें, ।
झाला सिद्धा, ‘करावा विश्वविजय,’ धरुनियं मनीं तो हें, ॥१०॥
तें जाणुनि, तातातें शक्र म्हणे, “अंधकें असें कार्य ।
आरंभिलें, करावें आम्हीं जें काय, सांग तूं आर्य.” ॥११॥
योग्य नव्हेचि कनिष्ठें केला ज्येष्ठा व्यतिक्रम सहाया, ।
वधितां इष्ट सुत, करिल रोष दिति, म्हणुने वधी प्रभु न हाया. ॥१२॥
कश्यप शक्रासि म्हणे, “शतमन्यो ! भद्रमस्तु ते तात ! ।
वारीन अंधका मी; आयु असलिया गुरूक्त घेतात.” ॥१३॥
दितिसहर कश्यपमुनि तो हरिकीर्तिधरावराह वीरा या ।
वारी बहु कष्टें, परि तत्संकल्पा न राहवी, राया ! ॥१४॥
अंधक, निवारिला, तरि पीडा देवांसि सर्वदाहि करी, ।
उच्चै:श्रव:सुतातें, दिगिभसुतातेंहि, तो बळेंचि हरी. ॥१५॥
देवोद्यानें भंगी, विध्वंसी सर्वसाधुजनयज्ञ, ।
कनककशिपु जेविं, तसा सत्पथ चालों न देचि अनयज्ञ, ॥१६॥
तपन तपे इच्छेनें त्याच्या, उगवे शशी, पवन वाहे; ।
त्या दितितनयापासुनि धरिती संत्रास बा ! नवनवा हे. ॥१७॥
सुर ऋषि दु:खित झाले, होतां वेदक्रतुक्रियालोप; ।
ते म्हणति, “या खळाचा यावा जगदीश्वरा ! तुला कोप.” ॥१८॥
देवब्राम्हाण चिंतातुर, त्यांतें गुरु म्हणे, “अहो ! युक्ति ।
स्फुरली, या, श्रीनारद विनवूं, हा देतसे नता मुक्ति. ॥१९॥
देवद्विजकंटक तो, न हरावांचुनि परा मरायाचा, ।
सहय प्रभुचा शर या, जेविं दशमुखा न रामरायाचा. ॥२०॥
साधु असाधूंपासुनि रक्षावे, त्यांत सर्वथा विप्र; ।
प्रभुचें व्रत हें, कळतां, स्वजनाचा ताप वारिल क्षिप्र. ॥२१॥
कळविल, मन वळविल, घन करुणेचा हा बरे उपाय सखा ।
प्रभुचा जाणे, जीवां म्हणतो, ‘शिवयश अरे ! सुपायस खा.’ ॥२२॥
मुनि कथिल, प्रभु करिलचि तुमचें अश्रुप्रमार्जन स्वकरें.” ।
हें ऐकोनि, विनविला श्रीनारदमुनि सुरद्विजप्रकरें. ॥२३॥
नारद म्हणे, “अवश्य स्वस्थ रहा, करिन यत्न, हें माजें, ।
प्रभुपासीं शिशु शब्दएं करि, कार्य, न होय रत्नहेमा जें. ॥”२४॥
इतिकर्तव्य विचारुनि, भगवान् देवर्षि मंदरा गेला, ।
प्रभुचा वयस्य नारद, असुरा जाणोनि मंद, रागेला. ॥२५॥
मुनि एकरात्र राहे श्रीशंभुसमीप, फार सुख लाहे, ।
भगवतप्रसादसुरतरुपुष्पांचें दाम तो गळां वाहे. ॥२६॥
मंदारवनीं प्रभुतें नमुनि, निघे, भेट दे तया काळा ।
तो मुनिस पुसे, “कोठिल वर्णें, गंधेंहि, अद्भुता माळा ? ॥२७॥
मी पारिजात पुष्पग्रथिता माळा, सदा, तुरे, गजरे ।
भोगितसें; परि हें बहु, सांग तरुस्थान, नारदा ! मज रे !” ॥२८॥
देवर्षि म्हणे, “ज्यांच्या पुष्पांची ही विनिर्मिली माळा, ।
ते मंदरीं महेश्वरनिर्मित मंदार, असुरभूपाळा ! ॥२९॥
या मंदाराचें बा ! अद्बुत गव्यूतिमात्र वन आहे, ।
ज्यांत प्रमथगणाचें पावे शोकाग्निची न मन आहे. ॥३०॥
त्या पारिजातवृक्षाहुनि याचा बा ! अनंत महिमा गा, ।
योग्या भक्ता देतो, देयिलहि, पहा, अनंत महि, मागा. ॥३१॥
स्त्रीरत्नें, मणिरत्नें, अन्नें, वस्त्रें, विभूषणें, वाद्यें, ।
गीतें, नृत्यें, सर्वहि रस देते तरु विनिर्मिले आद्यें. ॥३२॥
नाम ‘स्वयंप्रभ’ असें मंदाराच्या प्रसिद्ध सुवनाचें, ।
स्वर्गाचा स्वर्ग खरा, मूर्त महावैभव त्रिभुवनाचें. ॥३३॥
न तपे तेथें रवि, मग कोण परी असुरनायका ! पुसतो ? ।
त्राते स्वयंप्रभाचे गण दहनचि, अन्य काय कापुस तो. ॥३४॥
आधिव्याधि नसे बा ! तेथें, ग्लानि, क्षुधा, तृषा, नाहीं, ।
तेंचि सुखाचें सुख वन, म्हणती ‘इतरें सुखें मृष्णा कांहीं.’ ॥३५॥
एकहि दिन जो कोणी मंदारद्रुमवनांत राहेल, ।
बा ! त्रिभुवनविजयश्री स्वशिरीं तच्चरणरेणु वाहेल. ॥३६॥
तेथें क्रीडे भगवान्, भलत्यास पहावया कसें मिळतें ? ।
पर आखु, प्रमथगणव्याळाचें होय अंधका ! बिळ तें. ॥३७॥
ज्या श्रीस्वयंप्रभवनीं नित्य श्रीसांब अंधका ! रमला, ।
तेथें प्रकाश लोकीं, वाटे अन्यत्र अंधकार मला. ॥३८॥
भगवद्रूपचि केवळ, सुमनोहर, परम रुचिर, मंदर तो ।
जोंवरि न देखिला, बा ! तोंबरि विषयांत सुचिर मंद रतो.” ॥३९॥
नारदवचनें अंधक असुरचमूसहित मंदरा गेला,।
सधनीं अभाग्य तैसा, सांबशिवीं अहित मंद रागेला. ॥४०॥
रूपी मंदर भेटे, त्यातें जंधक म्हणे, “अगाधमते ! ।
समयज्ञा ! तूं साधु, व्यर्थ इतर जे जगीं, अगाधम ते. ॥४१॥
मी नाथ, रत्नेभोक्ता, मज वश हे सर्व लोक आहेत, ।
मंदारवन पहावें, झाला आहे मनांत हा हेत. ॥४२॥
कश्यपमुनितातवरें सर्वांसि असें अवध्य, कां ठावें ।
हें तुंज नसेल ? अचळा ! दावुनि वन, यश विशुद्ध गांठावें. ॥४३॥
मजसीं युद्ध कराया कोणीच पुढें अगा ! धसेना, गा ! ।
माझी अगाध शक्ति क्षोणिधरा ! तूं अगाध सेना गा. ॥४४॥
मंदाराचें सामें मजला जरि दाविसील तूं न वन, ।
तरि पाडिन तुजला मी, कोण करिल संकटीं तुझें अवन ?” ॥४५॥
अंतर्धानचि केलें, किमपि न बोलोनि, मंदरागानें; ।
ऐसें बोले, पेटुनि अंधक अत्यंत मंद रागानें :--- ॥४६॥
“मम वीर्य पहा, जेणें अरि पावुनि सर्व ताप, हारे, तें. ।
मच्छक्तितें अरे ! तूं किति ? पापड पर्वता ! पहारेतें. ॥४७॥
उपटी श्रृंग, करी, जें वदला, तें वीयतोयराशि खरें; ।
चुरि एक श्रृंग त्या तो संपत्तीचा कुसोयरा शिखरें. ॥४८॥
गडबडला तो जग, मग जगदीश्वर शंभुच्या वरें झालें. ।
शिखरयुग प्रकट, तया पहिल्याहुनि फार रम्यपण आलें. ॥४९॥
बहुयोजन शिखरें जें बहुयोजन शिखर असुर चूर्ण करी, ।
नाहीं होय,प्रकटे; बुडुनि सरीं, द्दश्य जेंवि तूर्ण करीं. ॥५०॥
जें जें श्रृंग नगाचें उपडुनि, ते असुर उडविती दूर, ।
तें तें मागें लागे, त्या दैत्यांची चमू करी चूर. ॥५१॥
जे दैत्य हात जोडुनि होते, ते मर्दिले न शिखरांहीं; ।
मुक्ताफळें शिवयशें, सज्जनहंसापुढेंचि विखरा हीं. ॥५२॥
स्वबळक्षयकुपित असुरराज म्हणे, “कोण तूं वनस्वामी ? ।
हो प्रकट, च्छट न करीं, भ्रमवूं देयीन नच मन:स्वा मी. ॥५३॥
उक्ति ऊचो, छळ न करीं; हें अनुचित; ये समोरसा: राहें, ।
अहित अहितसें, यांची शूर धरुनि नेस मोरसारा ! हे.” ॥५४॥
ऐसें गर्जुनि, अंधक बाहे जों, तोंचि पावला भर्ग, ।
स्वर्गप्रद यश त्याचें, साधूंचे ज्या उपासिती वर्ग. ॥५५॥
वृषभावरि बैसोनि प्रभुवर कर्पूरगौर, तूळातें ।
वात, तसा उडवाया, आला तोलीत दिव्यशूळातें. ॥५६॥
‘हिमनगशिखरीं शारद सोम, तसा’ कां म्हणेन ‘भासो’ मी ? ।
वृषभीं ती न हिमनगीं; जी जगदीशीं, तसी न भा सोमीं. ॥५७॥
चरणकिरणपटुगुण हररवि; अंधक अंधकार किति काय ? ।
यत्तेजें चैतन्यब्रम्हादि पिपीलिकान्त जिति काय. ॥५८॥
झाले उत्पात, मुनि ब्रम्हपरिस्फूर्तिशांतिमुद्रहित. ।
शूळें अंधक जाळुनि, विश्वाचें करि पळांत रुद्र हित. ॥५९॥
देवगण, मुनि, तपोधन, बंदीजन, तो तया सम स्तविती, ।
पुरुषार्थ प्रणतप्रियकामें ज्याची दया समस्त विती. ॥६०॥
सुर पुष्पवृष्टि करिती, गाती गंधर्व शंभुचें कृत्य, ।
वाजति दुंदुभि गगनीं, प्रकटिति सर्वहि वराप्सरा नृत्य. ॥६१॥
झालें स्वस्थ त्रिभुवन, धालें, भगवद्यशोमृतीं न्हालें; ।
भ्यालें होतें बहु, परि आलें बहु धैर्य सुखकराखालें. ॥६२॥
‘पाव’ असें म्हणतांचि, प्रणतांच्या पावलाचि हाकेला; ।
प्रकट प्रताप न, सुखें जगदीशें पावलाचि हा केला. ॥६३॥
प्रभु वधुनि अंधकातें, निजनिर्मित पारिजातवन सेवी; ।
ते वीतमोह करित्ये लीला स्मरतां, जसी शिवा देवी. ॥६४॥
शक्रप्रमुख सकळही केले सुर सुप्रचार लोकांत, ।
प्रभु वात्सल्य बहु करी विश्वांत, जसाचि तात तोकांत. ॥६५॥
असुरें जो क्षोभविला मंदरगिरि, तो विशेष शोभविला, ।
लोभ विलासीं या बहु, तरिच स्वगुणीं हरीहि लोभविला. ॥६६॥