चौक १, चाल : मिळवणी
धन्य शिवाजी शिव अवतार, पराक्रमी फार,
राष्ट्र उद्धार, कराया हातीं धरिली तलवार ।
समर्थ कृपा ज्यासी अनिवार । कांपती यवन भूप सरकार ॥ध्रु०॥
धारिष्ट ज्याचें अलोट, छातीचा कोट, शाहिस्त्याची बोटं,
तोडितां दिल्लीपती हैराण । पहाडका चूवा शिवाजी नव्हे लहान ।
बडा रे बडा गनिम सैतान ॥ त्यासी धराया जयपुरवाला, जयसिंग भला,
त्याचे मदतिला दिल्लीरखान पठाण बहु बलवान् ।
धाडिला देऊन किताब सन्मान । सैन्य सरसकट मुसलमान ॥
वेढा पुरंदराशी दिला, अशा संधिला, आत्मबुद्धिला शिवाजी निश्चय करुनी छान ।
रघुनाथ पंडित बहु विद्वान । धाडिला तह कराया निर्माण ॥
चाल
त्या वकीलाचा सन्मान, केला उत्तम जयसिंगान ।
शिवाजीचा निरोप ऐकुन, झाला तल्लीन मन प्रसन्न ।
आम्ही कबूल तहा कारण, सत्य प्रमाण सांगा जाऊन ॥
चाल दुसरी
दिल्लीश्वर बादशहा बलाढय पृथ्वीपती ।
त्याजपुढें लढाईत यश न घडे सांप्रतीं ।
तुम्ही सख्य करुनी टाळावी आपत्ति ।
तुम्ही हिंदुधर्म स्थापितां मान्य मजप्रती ।
मी तुम्हासी अनुकूल घ्या सन्मती ।
देशकाळ प्रसंग पहावी सद्यस्थिति ।
बादशहाला शरण याल तरि मी तुम्हाप्रति ।
जहागिरी देवविन घ्या शपथ निश्चिती ॥
मोडते
रजपुत प्रतिज्ञा खरी, सत्य वैखरी, आणा लौकरी,
शिवाजीस भेटिस आम्ही तयार । हातावर हात वचन निरधार ।
एकदिल होतां हर्ष अपार ॥१॥
चौक २, चाल : मिळवणी
शिवाजी भेटतां जयसिंगास, आले रंगास, अंगअंगास,
लागतां हर्ष उभय चित्तांस । शिवाजी हात जोडुनी म्हणे त्यास ।
वडिल तुम्ही वंदितों मी चरणास ॥ जें मागाल ते गड देतों,
हुकूम झेलितो, निशाण चढवितों, परि यश देऊं नका यवनास ।
तुमचे माझे एक रक्त आणि मास । राज्य हें मूळ हिंदूचे खास ॥
हिंदू धर्म रक्षण करी, त्याच्या मी तरी, चरणावरी, लोळण घेईन होईन दास ।
आपण थोर पुरुष आत्म देशास । द्याल स्वातंत्र्य वाटे चित्तास ॥
चाल
ऐकुनी शिवाजीचे वचन, जागा झाला त्याचा अभिमान ।
तह करावया प्रेमान, दिले वचन जयसिंगान ।
माझ्या मदतीस दिल्लीरखान, यावें तुम्ही त्यास भेटुन ॥
चाल दुसरी
तह केला खानासी भेटुन आलियावरी ।
वीस किल्ले सोडिले जयसिंगाच्या करी ।
पंच हजारी सरदारी दिली संभाजीस बरी ।
शिवाजीची नदर आग्रहें जंजिर्यावरी ।
लिहुन कलमवार सही मोर्तब अक्षरीं ।
धाडिला आग्र्यासी तहनामा सत्वरीं ।
आलें उत्तर तिकडूनी भेटिस या लौकरी ।
देऊं समक्ष मग जंजिरा गोष्ट ही खरी ॥
मोडते
शिवाजीचें साह्य पाहुनी, औरंगजेब धनी,
निकड लावूनी, बोलवी भेटिस वारंवार ।
शिवाजी लडका हमे बहु प्यार ।
जलदिसे आग्रा आवो एकवार ॥२॥
चौक ३, चाल : मिळवणी
जयसिंग शिवाजी व्याघ्रास, म्हणे आग्र्यास,
जाऊन बादशहास, भेटुन यावें तुम्ही बिनखोट ।
तुमच्या अंगास लाविल कोण बोट । राज्य मी बुडविन हें अलोट ॥
मग झाली देवीची आज्ञा, जाई बा सुज्ञा,
कोणाची प्राज्ञा, साह्य मी करीन छातीचा कोट ।
भवानीस वाहुनी तोडे गोट ।
राज्यव्यवस्था करी कडेकोट ॥
वंदुनी समर्थपदा, घेउनि संपदा,
सैन्यामध्यें तदा, बांधिली नाहीं कोणाची मोट ।
तीन सहस्त्रांचा करुनियां गोट । एक मांडीचे वीर सडे सोट ॥
चाल
आग्र्यासी पुढें गेलें पत्र, उणे पडो नये तिळमात्र ॥
तिथे जयसिंगाचा पुत्र, रामसिंग स्नेहाचे सूत्र ॥
बरोबर संभाजी पुत्र, निळो रावजी राघो मित्र ॥
चाल दुसरी
दत्ताजी त्र्यंबक हिरोजी फर्जंद भला ।
मुख्य शिवाजी तारांगणीं चंद्र शोभला ।
कुच करित राहूच्या केंद्राकडे चालिला ।
दोन महिन्यानें आग्र्यास येऊन पोंचला ।
रामसिंग लवाजमा घेऊन सामोरा आला ।
स्वागत करुनिया शिवाजीस भेटला ।
बिनधोक महाराज नगरामध्ये चला ।
शिवपुरा नांवाचा बंगला तयार ठेविला ॥
मोडते
रस्त्यांत स्वारीला किती, टकमका पाहती,
लोक बोलती, जवान बडा दखनका सरदार ।
मुसलमिन बादशाहीको आधार ।
अल्ला तुम्हें रखे सलामत बहार ॥३॥
चौक ४, चाल : मिळवणी
मग सुमुहूर्त पाहुनी भला, निरोप धाडिला,
स्वतः भेटिला, उद्यां मी दरबारीं येणार ।
ऐकुनी झाला बादशहा गार । ठरल्या वेळीं दरबार केला तयार ॥
बादशहाला काळजी बडी, शिवाजी गडी, पचिस हात उडी, मारितो बेटा चपळ अनिवार ।
हुशार तुम्हीं असावे सब सरदार । गनिमका नही हमको इतवार ॥
पंचहत्यारी बादशहाजवळ, रक्षक निवळ,
शिपाई सोज्वळ, इतुक्यांत ललकारला भालदार ।
शिवाजी आये नजर रखो सरकार । चमके बडी नंगी भवानी तलवार ॥
चाल
पाहुनी सभा सारी दिपली, वीर वृत्ति वीरांची लपली ॥
कुरनीस रिवाज वेळ जपली, क्रिया नजराण्याची संपली ॥
क्षेम कुशल बोलण्यांत आपुली, दोन शब्दांत वेळ आटोपली ॥
चाल दुसरी
बादशहाचा हुकूम आपुल्या उजव्या हातीं ।
मारवाडचा राजा जसवंतसिंग भूपती ।
त्याच्या खालची जागा शिवाजीला सांप्रती ।
म्हणे शिवाजी या तरी अपमानाच्या रीती ।
माझ्या फौजेने याची पाठ पाहिली रण क्षितीं ।
त्याच्या खालीं नाहीं मी उभा राहणार निश्चितीं ।
रामसिंगास म्हणे द्या कटयार हरली मती ।
क्रोधाग्नी भडकला अवघ्यास पडली भीती ॥
मोडते
अशी गडबड ऐकुनी जरा, करुनिया त्वरा,
निरोप दिला खरा, बादशहानें खलास केला दरबार ।
शिवाजी बिर्हाडी गेल्यावर बहार ।
जीवात जीव आला झाला थंडगार ॥४॥
चौक ५, चाल : मिळवणी
राजदरबारीं येउनियां , मुसलमान स्त्रिया, पाहती शिवराया,
चिकांच्या पडद्याआड बसून । शाहिस्त्याची बायको आणि येक सून ।
धाय धाय रडे तोंड वासून ॥ त्यानीं बादशहाची राणी, तियेच्या मनीं, केली पेरणी,
शिवाजीस मारावे फसवून । नका बसूं त्यावरी विश्वासून, स्वप्नीं माझ्या येतो छाप्यापासून ॥
तिनें बादशहाचें मन व्यग्र, करिता अति शीघ्र, हुकूम दिला उग्र, पोलादजंग बोलविला त्रासून ।
शिवजीको अटक करो खेंचून । नरम करुं बहू जाचून जाचून ॥
चाल
बंदोबस्त करुनिया सारा । बाडयाभोवतीं ठेविला पहारा ॥
कपटाचा उलटा वारा । समजला शिव अंतरा ॥
मग रामसिंगाचें द्वारा । धाडिला निरोप अवधारा ॥
चाल दुसरी
स्वदेशीं जावया हुकूम व्हावा मला ।
वेळ प्रसंगीं राहिन हजर पहा दाखला ।
नातरी हुकूम द्या मम सैन्या सकला ।
येथील हवा पाणी सोसत नाहीं लोकाला ।
ऐकुनी बादशहा मनीं हर्षे चमकला ।
औषधाविण काय बरा होतो खोकला ।
काय करील शिवाजी सैन्याविण एकला ।
दिला हुकूम तात्काळ फौज हांकला ।
मोडते
कांहीं निवडक लोक ठेवून, समज देऊन, प्रसंग पाहून,
शिवाजी करी पुढिल सुविचार । ठकाला महाठक मी साचार ।
हातावर तुरी देउनी जाणार ॥५॥
चौक ६, चाल : मिळवणी
दरबारी लोकांच्या भेटी, स्वहितासाठीं, मिठाई वाटी, नजराणे झांकुनी पेटार्यांत ।
नित्य गुरुवारीं करी खेरात । अर्धसहस्त्राची साधु फकिरांत ॥
असा नित्य ठेऊन परिपाठ, विश्वास दाट, बिनबोभाट, आजारीपन पुकारिलें शहरांत ।
हकिम वैद्यांचे रुपये पदरांत । रोग उद्भवला म्हणती जोरांत ॥
संधिसाधुन एकदां छान, पुत्रासह जाण, पेटार्यांतून, निसटले दिवसा चौथ्या प्रहरांत ।
हिरोजी फर्जंद ठेउनी घरांत । गांठली मथुरा रातोरात ॥
चाल
मग हिरोजी फर्जंद भला । दुसर्या दिवशीं दुपार समयाला ॥
औषधास्तव अवघ्याला । राजरोस सांगुनी गेला ॥
पुढें तिसर्या प्रहरी गलबला । चोहोंकडे बोभाटा झाला ॥
चाल : दुसरी
बादशहाला वर्दी पोचतांच तत्घडी ।
पोलादजंगावरी वीज कोसळली बडी ।
कैसा गया गनिम तुझी भली रखवाली खडी ।
तैनात जप्त केली सजा दिली रोकडी ।
चोहोंकडे पळाले स्वार शिपाई गडी ।
परि शोध नाहीं कुठें जिव्हा पडली कोरडी ।
निशिदिनीं बादशहा मनामध्यें चरफडी ।
शहरांत शिवाजी गुप्त मारुन काय दडी ।
बडी दर्द हमकु दगा करिल वाटे हरघडी ।
मोडते
बादशहाचें अंतर खिन्न, वाटे दुश्चिन्ह, टाकलें अन्न,
झोप नाहीं दहशत बसली फार । शिवाजी बडा करामतगार ।
इतना क्या करना हुकूम अधिकार ॥६॥
चौक ७ : चाल : मिळवणी
हरी कृष्ण विसाजीपंत, रामदासी संत,
होते मथुरेंत, पेशव्यांचे मेहुणे स्नेह सूत्रास ।
त्याजकडे ठेवूनिया पुत्रास । बैरागी वेष धरिला नित्रास ॥
अंतर्वेदी प्रयाग काशी, गंगासागरासी, जगन्नाथासी, जाऊन शुद्ध केलें अंतरास ।
तेलंगणांतूनी करविर क्षेत्रास । बाराशें कोस भोगिला त्रास ॥
रायगडावरी शिवराय, जाउनि माय, जिजाइचे पाय, वंदितां पाणी आलें नेत्रास ।
भेटतां सकळ प्रधान मित्रास । आनंदी आनंद सर्वत्रांस ॥
चाल
हरी कृष्ण विसाजी जाण । संभाजीस आले घेऊन ॥
उज्जयनींत मुसलमान । त्यांना संशय आला पाहून ॥
हा मुलगा तुमचा कोण । सत्य सांगा शपथ वाहून ॥
चाल : दुसरी
ब्राह्मण म्हणती हा भाचा आमुचा खरोखरी ।
हें सत्य म्हणूं एका पात्रांत जेविल्यावरी ।
दही पोहे भक्षिले त्यांच्या सांगण्यापरी ।
निःसंशय करुनी आले रायगडावरी ।
पाहुनी शिवाजी हर्षभरित अंतरीं ।
एक लक्ष रुपये बक्षिस दिले सत्वरीं ।
विश्वासराव हा किताब मग त्यावरी ।
शके पंधराशे आठयांशीं संवत्सरीं ।
हे महा गंडांतर मराठी राज्यावरी ।
परि कृपा रामदासाची साह्य श्रीहरी ।
कवि रामकृष्ण करी जुळणी कृष्णेच्या तिरीं ।
प्रास यमक मधुरता पटे रसज्ञा खरी ॥
मोडते
गोविंद शाहीर तरि भले त्यांनी चांगलें,
प्रोत्साहन दिलें, म्हणूनी स्फूर्ती कवीला फार ।
वीररस येथुन पुढें अपार । सिंहगड तानाजी घेणार ॥७॥