मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|शिवाजी महाराज|
प्रतापगडचा रणसंग्राम

शिवाजी महाराजांचा पोवाडा - प्रतापगडचा रणसंग्राम

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.


धन्य ! धन्य ! शिवराय जाहला धर्मरक्षणा अवतार ।

कपटभाव वळखिला खानाचा, केला त्याचा मग संहार ॥ध्रु०॥

चौक १

चंद्रराव मोरे ठार करविला, जावळी जोडली मुलखाला ।

बाई कर्‍हाड सुभे आदिलशाहाचे हळुहळु आले कबजाला ॥

बातमी कळली ही आदिलशहाला मोठी धडकी भरली त्याला ।

म्हणे "बडा सैतान मत्त हुवा ! क्या करना अल्ला ! अल्ला !! " ॥

आदिलशाहानं लौकर तेव्हां मोठा दरबार भरवीला ।

बडे अमीर उमराव जमविले कितिक हिंदु सरदारांला ॥

कर्नाटकांतुन जल्दी बोलावुन आणलं शहाजी राजाला ।

"धाक घालुन बापाला बंदोबस्त करिन"" आशा ही अल्लीला ॥

चाल

जरि होता शहाजी शाहाचा मसबदार ॥

तरी तोच होता खरा, शहा , मोठा शिरजोर ॥

त्याच्या हुकमावीण एक नव्हतं पान हलणार ! ॥

चाल

बादशाहा शब्द दुभंगला । बाद शाहा झाला ।

शहाजी शहा झाला ! । एवढी त्याची होती फौज तय्यार ।

अल्ली आदिलशाहा झाला गारेगार ! ।

उसना पर आणला जोर त्यानं फार ॥

चाल

आदिलशहा बोलला शाहाजीला । "तुम्ही आमचे नोकर झाला ।

पोरानं पुंडावा केला । कल्याणचा खजिना पळविला ।

वाई, कर्‍हाड, बेजार केला । हा आमचा अपराध झाला ! ।

दोन गोष्टी सांगा पोराला । बरं वाईट होईल जीवाला" ।

मग बोलला शहाजी शाहाला । "किती सांगू, हुजूर ! कारटयाला ? ।

काय म्हणता ? लुटलं खजिन्याला ? । हा मोठा अपराध झाला ।

पण पोरटा हूड फार झाला । ऐकेना माझ्या शब्दाला ।

म्हणून ठेवला दूर मी त्याला ! । पुणें प्रांतीं जाहगीरिला ।

आमचंच बापलेकांचं आधीं पटेना एकमेकांला । मग सांगूं काय मी त्याला ? ।

खावंद ! आपण आणावं त्याला वठणीला ! लावावी वेसण नाकाला ।

दरदर ओढुन आणावं आपल्या सदरेला ॥ मग दोन शब्द सांगावे त्याला" ।

असं बोलला आदिलशाहाला । मग शाहा बोलला सदरेला ।

शाहाजीचा उपाय सारा थकला । कोण कैद करील हो त्याला ? ।

"मैं जाता हूँ; क्या बात है !" असा नाद आला कानाला ।

मग शाह बोलूं लागला । "जिता धरुन आणावं सदरेला" ।

पैजेचा विडा मांडला । सारा लोक बसला जागेला ।

पर एक कोणी जाऊन घेईना पैजेला ॥ मैं मैं ! करणं काम तोंडाला ।

वैं ! वैं ! करावं लागेल जीवाला ॥ म्हणून कोणी नाहीं उठला ।

पर जरा वेळ गेल्यावर आला । एक वजीर, धिप्पाड झाला ।

अफझुल्ला म्हणति हो त्याला । त्यानं लावला हात पैजेला ।

अन्‌ बोलला काय सदरेला । "मैं गिरफदार करता हूँ " विडा उचलला ! ॥

या अल्ला ! अल्ला ! शब्दाचा गजर जाहला ॥

चाल

शाहाजी राजानं लिहिलं शिवबाला "असा घडला हा प्रकार ।

गाफिल कधीं रे राहूं नको, करि फौजफांटा तूं तय्यार" ॥१॥

चौक २

पान उचललं हिरवं पैजेचं, पिकला परि अफझुलखान ।

’आपल्या हातानं मरण ओढवलंस’ बोललं सदा मन जोरानं ॥

उंट, घोडा, पायदळ जमविलं, बारा हजार खानानं ।

विजापूरहून खान चालला दौड मोठया सरंजामानं ॥

वेशीबाहेर अपशकुन जाहला हत्त्ती बीनीवरचा मेला ।

निशाण पडलं ! ऊर धडधडलं, बेत अल्लाचा ना कळला !॥

धीर धरुन पर पुढं चालला, लागलं गांव पंढरपूर ।

तुकडे केले विठ्ठल मूर्तीचे, नाहीं कुणाचा दरकार ॥

चाल

खान आला तुळजापुरला । छिन्नभिन्न केलं देवीला ।

जात्यानं भरडलं तिला । देवीचा कोप जाहला ।

जगदंबामाई शिवबाच्या गेली सप्नाला ॥ काय बोलली ऐका राजाला ।

"बत्तीस दातांचा बोकड कांपावा मला ॥ रक्तानं त्याच्या माखावं माझ्या अंगाला ॥

मुंडक्याचा नारळ बांध माझ्या देवळाला" ॥ इकडं खान पुढं चालला ।

जातां जातां फोडेलं त्यानं अशा कैक मूर्तीला ! ॥ बाटवले कैक लोकाला ।

घरंदारं लुटली कैकांची त्रास लोकाला ॥ किती बळी पडले चैनीला ।

कितिकांची नरडीं उडविलीं, डोळा काढला ! ॥ कितिकांच्या बायका पळविल्या ।

दारुचा पाट चालला । गुडगुडी लावती तोंडाला । देहभान नव्हतं कोणाला ।

ब्राह्मणाच्या धरती शेंडीला । अन् बांधती उंच झाडाला ।

अंगात्‍नं खुपसती भाला । असं हाल करती जीवाला ! ।

अशा अशा करुन खेळाला । खान आला वाई गांवाला ।

तळ दिला वाईला पुढचा बेत करण्याला ! ॥

चाल

भरली घडी खानाची मृत्युच्या आला जवळ जो अफझुल्ला ।

पतंग विसरुन देहभानाला झडपी जोरानं वणव्याला ॥२॥

चौक ३

एके दिवशीं दोन घटका रात्रिला किल्ल्याच्या गच्चीवरती ।

सभोंवार सरदार, शिवाजी राजे होते मध्यावरती ॥

नीलनभाच्या हृदयावरती फुलली चंद्राची कोर ।

स्फटिकासम चांदण्या चमकती शीतळ वेळिं सभोंवार ॥

सह्यगिरीच्या हृदयावरि ’शिवचंद्र’ शोभला सुकुमार ।

नेता पालकर, ताना मालुसरे, तारे झळकती रणवीर ॥

सह्यगिरीवर जणु शिव बसले घेउनियां निज परिवार ।

प्रळयकाळ यवनांचा आला ! झाला महिवर अवतार ॥

रानफुलांचा गंध पसरला मंजुळ वार्‍याच्या लहरी ।

प्रतापगडच्या किल्ल्यावरुनी यश राजाचें ललकारी ।

गडबड धडपड आरडाओरड रड भूमिवरची सरली ।

सर्व शांत जग झालं ऐकली पर वाघाची उरकाळी ! ॥

चाल

करवंदी झाडी कांटेरी कुंप करणार ।

धबधबे खळाळत नित्य गाणं गाणार ।

चाल

उंच उंच अति उंच धांवली आभाळांतुन शिखरं किती ।

चित्रं काढलीं जणुं शिखरांचीं नभोमंडळाच्या वरती ॥

चाल

अशा वेळिं एक हेर किल्ल्यावरती चालला ॥

झपझपा चढुन गड राजाजवळ पोंचला ॥

मग बोलला शिवरायाला । "रामराम ! ऐका खबरेला ।

विजापूरच्या ऐकलं बातमीला । कां आपण वाई प्रांत घेतला ।

कल्याणचा खजिना पळविला । म्हणून बादशहा लालेलाल झाला ॥

घेण्याला आपल्या सूडाला । त्येनं धाडलं अफझलखानाला ।

बारा हजार घेऊन फौजेला । आतां येईल वाई प्रांताला ।

अशी बातमी आली कानाला" । असं बोलून हेर तो गेला ! ।

तय्यारीचा बेत मग केला । गडाखालीं मावळा सरदार सारा उतरला ॥

रातोरात पल्ला मारला । एक चालला बंदोबस्ताला ।

एक चालला फौज तय्यार खडी करण्याला ॥ एक दारुगोळा बघण्याला ।

असा सारा मावळा सरदार लागला कामाला ॥

चाल

शरदऋतूच्या निळ्या नभामधीं कडकडाट हा बिजलीचा ।

झाला एकदम जीवघातकी खेळ कळेना दैवाचा ! ॥३॥

चौक ४

वाईगांवाहून त्वरित धाडला कृष्णाजी भास्कर वकिल ।

प्रतापगडला अफझुल्लानं, सांगतो पत्र काय काय लिहिलं ॥

"द्यावा मुलुख परतून शाहाचा, घ्यावी भेट या वजिराची ।

म्हणाल ’नाहीं’ तर मग आतां आशा सोडावी जीवाची" ! ॥

चाल

कृष्णाजी भास्कर प्रतापगडिं पोचला ।

संदेश खानाचा शिवाजीस कळविला ।

त्या रात्रीं कृष्णाजी प्रतापगडिं राहिला ।

चाल

मध्यरात्रीचा वेळ जाहली रात्रहि बुडली झोपेंत ।

शिवरायानं त्या वकिलाला नेलं अंबेच्या देवळांत ! ॥

देवी भवानीपुढं बोलला राजा कृष्णाजी पंतास ॥

"सांगा बेत खानाचा, घातली शपथ देवीची तुम्हांस ॥

चाल

या भूवरचे तुम्हांस म्हणति भूसुर ।

आम्ही नित्य ठेवावं मस्तक चरणावर ।

कां पाप जोडतां बनुन यवन नोकर ? ।

केसानं कांपतां गळा सोडा अविचार ।

चाल

मस्तक चरणावरी ठेवतों सांगा बेत त्या खानाचा ।

देवी भवानी असे साक्षिला घात करुं नका स्वजनांचा ।

चाल

कृष्णाजीपंत भास्कर । विरघळले झाले मनिं गार ॥

चाल

डबडबला पाण्यानं डोळा । अंगीं कंटाळा ।

कंप देहाला । मोहाचा कडा पार कोसळला ।

विवेकाचा डोळा उघडला । अभिमान आला । बोलला शिवबाला ॥

चाल

"जय नमोऽस्तुते जगदंबे पदरीं घे मला ॥

शिवराया ! धन्य तूं, यश येईल रे तुला ॥

देहभान नव्हतं रे मला । रोग जडला होता दृष्टीला ।

अंजन भेटलं डोळ्याला । स्वातंत्र-बुद्धि-कोकिला ।

आनंद देती जीवाला । महाराज ! जीव वाहिला आपल्या चरणाला ॥

खानाचा कपटभाव झाला । जिता मेला धरणं तुम्हाला खानाचा मानस झाला ॥

म्हणून त्याला एवढा भेटीचा आला उमाळा" ॥

असं बोलला कृष्णाजीपंत शिवरायाला ॥

शिवराय बोलला मावळ्याला । "हा पेंच आला जीवाला ।

काय करावं सांगा या वेळा" । तानाजी बोलूं लागला ।

"महाराज ! बोलवा खानाला । किल्ल्याच्या खालच्या बाजूला ।

’भ्यालो’ असं दाखवावं त्याला । मग करुं खानाचे तुकडे उडवु मुंडक्याला !" ॥

शिवराय बोलले लोकांला । "हा सल्ला योग्य नाहीं झाला । असं करणं योग्य नाहीं मला !

शत्रु मित्र कोणी जरी झाला । तरी न्यायमार्ग थोरांनीं पाहिजे घेतला ॥

पर आणूं त्याला भेटीला । मी जाईन भेट घेण्याला ।

जर रंग घाताचा आला । तर असा सज्ज युद्धाला ।

नाहींतर जाऊं दे खान आपल्या देशाला" ॥

असं बोलला राजा मावळ्याला । पंताजी गोपिनाथ वकिल त्यानं नेमला ॥

चाल

काय निरोप धाडला खानाला सांगिन पुढच्या चौकांत ।

वीर मर्दाचा गुण गौरव करि कवी आपल्या कवनांत ॥४॥

चौक ५

पंताजी गोपीनाथ चालला खानाच्या वकिलासहित ।

आला वाईला पत्र राजाचं दिलं खानाला सदरेंत ॥

रघुरायाचा अंगद जैसा शिवरायाचा पंताजी ।

भला सराईत, मिठ्ठा बोलका, नाहीं ठाव कधीं इतराजी ! ॥

पत्र लिहिलं जें शिवरायानं तेव्हा अफझुलखानास ।

सांगतो आज मी तें तुम्हांला, जाग करावं कानास ॥

"पर्वत कुणीकडं ? कुठं मातीचा कण ! सिंधु तो कुठं नाला !!

कुठं सूर्य कुठं मशाल साधी ! कुठं वाव त्या बेडकाला ! ॥

कुठं इंद्राचा ऐरावत तो कुठं शाम्भटी तट्टाणी ।

कुठं सिंह, कुठं उंदिर झाला ! मोठी शाहाची अमदानी ॥

चाल

खानसाहेब घ्यावा मेरा सलाम द्यावं अभयाला ।

मोठी धडकी भरली जीवाला । वाई प्रांतिं पुंडावा केला ।

हा मोठा अपराध झाला । सारा मुलुख देतों शहाला ।

पण द्यावं जीवदानाला ! । डोई लावतों आपल्या पायाला ।

नुसतं नांव ऐकल्यावर आला घाम अंगाला । मग कोण करिल दोन हात बोला ? ।

आज चुकलों, शरण तुम्हांला" । असा निरोप धाडला खानाला ।

खानाला संतोष झाला । दाढीवरनं हात फिरविला ।

गांजाचा झुरका मारला । आणि खान बोलूं लागला ।

"अहमदुल्लिला ! बंदे का क्या रोब है !

मेरा सिरफ नाम ही सुनकर उसका पसीना पसीना हो गया !

वाहवा अफझलखानबहादर !" । कृष्णाजीपंत बोलला !

"जंवा बातमी ऐकिली कीं, आपण आला युद्ध करण्याला ।

आणि आणलं इतक्या फौजेला । तवा टाकलं अंग धरणीला ।

त्यानं लावले डोळे आकाशाला । जसं भूतखेत झडपावं तसा जाहला ।

मग आणलं त्याला ताळ्याला । त्याचा वाण सारा बदलला ।

तो येणार नाहीं भेटिला । तर आपण जावं त्याच्या भेटिला ।

अन साधावं आपल्या बेताला" । "अच्छा है" खान बोलला ।

तसा निरोप धाडला शिवबाला । खानानं तळ हालवला ।

पसरणीच्या घाटावरनं चालला प्रतापगडाला ॥

चाल

जा खाना, जा दुष्टा, जल्दी जा, ओढवलं सत्वर मरण ।

मृगपंचानन सह्यकंदरी करिल तुझी रे धुळदाण ॥५॥

चौक ६

भेट घेण्याला अफझुल्लाची मंडप श्रीशिवरायानं ।

प्रतापगडच्या खालीं सजविला नाहीं तिलोकीं उपमान ।

निळा चांदवा दिला छानदार चंद्रतारका त्यावरती ।

झालर तांबुस सभोंवार ती शोभा देई घडी घडीवरती ॥

हंडया झुंबर किती लटकती लौलक झळके त्यावरती ॥

आरसे टांगले किती मनोहर, काय राजाला हो कमती ॥

नीलमण्यांचे खांब बनविले, लोंबती मोतियांचे घोस ।

शिवरायानं क्षुद्र खानाचा किती पुरवावा तो सोस ! ॥

वेलबुटया काढल्या भिंतीवर चित्रं काढलीं रंगाचीं ।

इंद्रधनुष्या रंग लाजवित, अपार शोभा मंडपाची ॥

चाल

जमखाने शुभ्र हांतरले शोभे भरजर ।

गाद्या गिरद्या तिवासे तक्के ठेविले त्यावर ।

गालीचे पसरले उंची कैक त्यावर ॥

चाल

कुबेर अलकापुरी घेऊनी जणूं वाटला तो आला !

रत्‍नाकर करिं रत्‍न घेउनी, विष्णु सोडि वैकुंठाला ॥

कुणी कधी ऐकला असा हा विष्णुशिवांचा हो मेळा ।

छत्तीस आंकडा सदैव त्याचा गब्बार एक दुसरा दुबळा ॥

उडती फवारे कारंजांचे बाग फुलली हिरवीगार ।

यज्ञभूमी श्रीशिवरायानं केली जणूं काय तय्यार ! ॥

चाल

आधींच पर्वतावरचा देखावा गोड ।

त्यात असा सजविला मंडप नव्हती तोड ।

किती कसब शिवाचं होतं मोठं बिनजोड ।

चाल

मंडप झाला, खानहि आला, झाला भेटिला तय्यार ।

पण तो आला फौज घेऊनी हत्यारबंद दीड हजार ॥

चाल

मग निरोप धाडला शिवबानं अफझुलखानाला ॥

"फौजेचं काय काम कळलं नाहीं हो मला ॥

जर आणतां एवढया फौजेला । तर कसला भेटू तुम्हाला ।

आत्ताच जीव आला घाईला । जर एकटे याला भेटिला ।

तर कसं तरी भेटणं तुम्हाला !" । खानाला वाटलं ते वेळा ।

शिवाजी शिवाजी तो केवढा ? । सहज घेइन खाकुटींत त्याला ।

अन् चिरडीन त्याच्या नरडयाला ॥ भेटिला एकटं जाण्याला ।

कृष्णाजी पंतांनी ही सल्ला जेव्हां त्याला दिला । तवा खान चालला भेटिला ।

शिवाजीनं ठेवली बडदास्त मोठी ते वेळा ॥ मग खान आला सदरेला ।

मानमरातब घेऊन गारेगार झाला ॥ वर हांसरा चेहरा केला ।

पर आंता ’दगा’ राहिला । ’कधी भेटिन एकदां मी’ असं झालं हो त्याला ॥

चाल

आला आला ! रे सर्जा शिवाजी खाना !

आतां तू सांभाळ । नागसापापर चपळ जाहला घेईल चावा तो काळ ॥६॥

चौक ७

आला भेटिचा दिवस सकाळिंच केली पुजा जगदंबेची ।

हात जोडुनी शिवरायानं करुणा भाकली अंबेची ॥

"आई ! संकटीं कोण तुझ्याविण सोडविणारा दीनाला ।

देइ आशीर्वाद आज माय ! तूं घेई पदरिं या लेंकराला !" ॥

डोळे झांकले शिवरायानें, चमत्कार, दिसला त्याला ।

जगदंबा पुढं उभी राहिली, वर्णूं कसं त्या स्वरुपाला ! ॥

किरिट डोक्यावर, केंस पाठीवर, लांबलचक काळे भोर, ।

कुंकुम शोभे रुंद कपाळीं, कंठीं मोतियाचा हार ॥

शंख चक्र करि पद्म घेतलं त्रिशूळ भाला तलवार ।

सिंहावर होती बसलेली खालीं होता महिषासूर ॥

जबडा लाला सिंहाचा, डोळेही लाल, पंजेही लाल अती ।

दिला पोटावर पाय सिंहानं त्या दैत्याच्या---अशी मूर्ती ॥

एका हातामधिं महिषासुराचं डोकं धरलं जगदंबेनं ।

थेंब रक्ताचे टपटप गळती पट चालला भूवरनं ।

हंसरं तोंड देविचं जाहलं बोलली देवी शिवरायाला ।

"आशीर्वाद हा दिला लेंकरा । होशिल भारी कळिकाळा ॥"

चाल

देविनं शिवाच्या शिरीं मुगुट घातला ।

असुराच्या रक्ताचा टिळा त्यास लावला ।

हा असा देखावा शिवाजीनं पाहिला ॥

चाल

डोळे उघडले, गुप्त जाहली देवी, दिला साक्षात्कार ।

नंतर शिवराजानं जमविले सर्व मावळे सरदार ॥

मोरो, शाम, रघुनाथ पेशवे, नारो शंकर माणकोजी ।

इंगळ्या सुभानजी, शूर जिवाजी, पिलाजी, नेता, तानाजी ॥

चाल

मग बोलला राजा गहिंवरुन सार्‍या मावळ्याला ॥

"काय सांगू तुमच्या प्रेमाला ? ही राहिली तुमची आठवण जन्मोजन्माला ॥

राखायला माझ्या जीवाला । तुम्ही सोडलं सार्‍या सुखाला ।

घरदारं सोडली वार्‍याला । उतराई होऊं कसा बोला ।

काय सांगूं वेळ कशि येईल कोणत्या वेळा ? ॥

जगलों वाचलो येईन भेटिला । नाहींतर----" ।

शिवबाचा कंठ दाटला । पाण्यानं डोळा दाटला ।

ढळढळा सारा मावळा रडूं लागला ॥

प्रेमाचा दोर भला मोठा खंबीर झाला ।

पर दांत लावेना कमळाला । जवा कमळामाजिं आडकला ! ।

प्रेमाचं कोडं समजेना ब्रह्मदेवाला ! ॥ "जगलों वाचलों येईन भेटिला ।

नाहींतर राज्य हें द्यावं उमाजीराजाला ॥

रामराम दादांनो घ्यावा आतां या वेळां " ॥

मग सारा मावळा बोलला । हुंदक्यानं आला उमाळा ।

"जाऊं नको राजा ! भेटिला ! तो खान कपटी बघ झाला ।

बरं वाईट होईल जीवाला !" मग तान्या बोलूं लागला ।

"मी जातो शिवा म्हणुनशान त्याच्या भेटीला ॥

अन् उडवतों त्याच्या मुंडक्याला " । पर राजा त्याला बोलला ।

"फसवणं कधीं खपणार नाहीं देवाला ॥ मी जातों त्याच्या भेटिला ।

तुम्ही असा जाग जागेला । कमजास्त झालं तर यावं घुसुन त्या वेळा" ॥

चाल

जागो जागेला मावळ ठेवला दर्‍याखोर्‍यांतुन तय्यार ।

शाहिर पुढच्या चौकीं सांगणार पुढं घडलेला प्रकार ॥७॥

चौक ८

पोशाख केला कसला राजानं सांगतो आतां मी तुम्हांला ।

वर्णन कधिं कां शिवरायाचं शिणविल माझ्या वदनाला ॥

टोप शिरीं पांढरा शोभला, तुरा मोत्याचा, त्यांत हिरा ।

शिवमौलींतुन शुभ्र चालला ओघ गंगेचा काय खरा !

खांद्यांतून जणु गुप्त जाहली शिवरायाच्या सुरगंगा ।

उजव्या हातिं तलवार रुपानं प्रगट जाहली धवलांगा ! ॥

आंत पोलादी सील, पांढरा झगा शोभे अंगावरती ।

मुसेजरी सुरवार पायाला बंद लोंबती त्यावरती ॥

उजव्या हातामधिं बिचवा, वाघनख होत राजाच्या पंजाला ।

पट्टा जिवा म्हाल्यानें घेतला, तलवार लटके कमरेला ॥

जिजाबाईच्या भेटिस गेला ठेवलं डोकं पायावरती ।

शिवनेत्रांतुन टपटप गळले थेंब पायावर, धन्य सती ! ॥

हळुच उठवलं शिवरायाला, अवघ्राण मस्तकिं केलं ।

जिजामाईनं शिवबाळाला गालबोट तें लावियलं ! ॥

जिजा बोले, "कां शिवबा ! डोळे आले पाण्यानं भरभरुन ।

शूर पुत्र तूं, जा प्रेमाचा बंध तोडुनी हौसेनं ॥

क्षत्रियकुळी मी जन्म घेतला, तूंहि तसा क्षत्रियपुत्र ।

आशीर्वाद हा दिला बाळका ! काय करिल अफझुल कुत्रं ? "

दृष्ट काढली शिवरायाची, दहीं साइचं तळहातीं ।

दिलं आईनं; शिवबाळानं चाटुन खाल्लं गोड अती ! ॥

किल्ल्यावरच्या उंच तटावर फडफड करि भगवा झेंडा ।

फडफड करुनी त्यास बोलला , ’फाड ! फाड ! रे तो मेंढा’ ! ॥

चाल

आठवलं मनीं शिवबानं रामदासाला ।

चुचकारलं कृष्णेला वरती स्वार मग झाला ।

धडधडा सात तोफांचा नाद जाहला ।

चाल

दुपारची भरवेळ जाहली, सूर्य छत्र धरी किरणांचं ।

वार्‍यापर वेगानं चालला राजा, दैव त्या खानाचं ! ॥८॥

चौक ९

कृष्णी चपळ बहु शिवरायाची मोठी लाडकी ती झाली ।

चालली घोडी चौफेर सारखी, लाज वार्‍याला ही आली !! ॥

टाप घोडिची कणखर मोठी, जमीन भ्याली दणक्यानं ।

झाडंझुडपं किति टकमक बघती पळति मागंमागं भीतीनं ॥

मंडप आला, राजा उतरला, नेली घोडी दूर हुजर्‍यानं ।

शिवबा बोले त्या हुजर्‍याला, "जपा घोडीला प्रेमानं !" ॥

दबकत दबकत सर्जा शिवाजी चालला भेटिच्या मंडपांत ।

आनंदाच्या उकळ्या उसळती वेडया खानाच्या हृदयांत ! ॥

शिवरायानं सलाम केला खूष जाहला मनिं खान ।

म्हणे शिवाला, "असा शाहाला नाहिं कधीं मिळला मान" ! ॥

खान उठुन राजाला बोलला, "शिवा ! एक आशा मजला ।

मुलासारखा तूं मला वाटतोयस कडकडून भेटावं तुला" ॥

"ठीक ! ठीक ! शिवराय बोलला, हरकत नाहीं मुळिं आतां ।

वडिलही तुम्ही मला जाहला, नसे मनाला मुळिं चिंता" ॥

चाल

खानानं हातीं कवटाळलं शिवरायाला ॥

खान केवढा धिप्पाड ! शिवबा पोर वाटला ॥

खानानं कवळ मारली शिवबा दचकला ! ॥

शिवबाचं मुंडकं त्यानं दाबलं डाव्या बगलेला ॥

प्रसंग जीवावर आला । पर शिवबा चपळ फार झाला ।

ओळखलं त्याच्या बेताला । अन् हिसडा मारला त्याला ।

वाघनखं भिडली पोटाला पंजा मारला ! ॥

खानाची आंतडीं काढलीं, फाडलं पोटाला !

खान हत्ती फार खवळला । पर करतो काय सिंहाला ?।

नानं केला वार जिरेटोप छाटला ॥

पर इकडं सर्जानं पट्टा वेगिं चालवला ॥

जणुं नारसिंह प्रगटला । खांद्यात्‍नं चिरलं खानाला ! ।

"खान ’लवा लवा’ बोलला ! " । खान ’पट्टा पट्टा’ बोलला ।

आतां कंचा पट्टा ? सर्जानं घातल्म झडपेला ! ॥

बघा झालीं त्याचीं दोन छकलें आला भूमीला ! ॥

एक मुंगी मोठया हत्तीच्या घेइ जीवाला ॥

मुंगसाचं पिल्लु करि ठार नागसापाला ॥

अभिमन्युबाळ करि जेर कितिक लोकाला ॥

श्रीकृष्ण मारी कंसाला । रामचंद्र मारी रावणाला ।

सर्जाची खूण लोकांला । लगबगीनं जमला मावळा ।

बंडा सय्यद करतो वाराला । पर जिवा म्हाल्यानं बंडा सय्या पुरा केला ॥

घनघोर केलं युद्धाला । रक्ताचा पाट चालला ।

शिवराय वेगानं आला । खानाच्या छाटलं मुंडक्यांला ।

अन् मुंडकं घेऊन शिवराय किल्ल्यावर गेला ! ॥

रक्तानं माखलं देवीला । मग मुंडकं टांगलं बुरजाला ।

यवनांचा मोड पुरा झाला । पळ काढला यवनी फौजेनं, आनंद झाला ! ॥

दुंदुभी झडूं लागल्या कर्णा वाजला ! ॥ नऊ तोफा झडल्या, लोकाला आनंद झाला ! ॥

गुढया तोरणं घरदाराला । उभी केली उत्साव केला ।

’धन्य धन्य अवतारी राजा’ डंका गाजला ! ॥

चाल

मागं रचला अज्ञानदासानं शिवरायाचा पोवाडा ।

भाग्य त्याचं राजानं दिला एक तोडा सोन्याचा आणि घोडा ॥

कोण मला देणार सोन्याचा तोडा शेराचा आणि घोडा ? ।

दाता गेला ! आज फार तर पायिं घालतिल हो खोडा ! ॥

ये शिवराया ! पुन्हां कधीं तूं येशिल तोडा देण्याला ! ॥

नित्य उभा कर जोडुनि तुमच्या ’पांडुरंग’ हा कवनाला ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP