मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|शिवाजी महाराज|
धन्य जिजाबाई

शिवाजी महाराज पोवाडा - धन्य जिजाबाई

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो

धन्य मातोश्री धन्य जिजाई जन्म दिला तिनं शिवबाला ।

पारतंत्र्याची तोडून शृंखला स्वतंत्र करण्या देशाला ।

हिदुस्थानामध्यें हिरवं निशाण फडकू लागलं यवनांच ।

नाम निशाण मग मोडु लागलं स्थाईक हिंदु लोकांच ॥

जिकडे तिकडे जुलुम यवनाचा छळती हिन्दु लोकांना ।

भर रस्त्यामध्यें गाई कापिती । शिवबाला हे सहन होईना ।

हिंदु अबलांना पळवून नेती, लावती आपल्या ते कामा ।

बळजबरीने करती मुसलमान पढवित होते कलमा ।

थोर थोर लढवय्ये मराठे संरक्षक ते राष्ट्राचे ।

पारतंत्र बेडीने जखडले गुलाम बनले यवनांचे ॥

देश पसरले परकीय जाळे । हिन्दु बांधवांचा होतो छळ ।

जिकडे तिकडे हलकल्लोळ । शेतकरी झाले कंगाल ।

मुला बाळांचे होते हाल । आया बहिणी रडती खळखळ ।

किती भटकती रानोमाळ । अस पाहून जीजाईचा बाळ ।

अंतर्यामी सदा जळफळ । कधी देश स्वतंत्र होईल ।

जैसा मत्स्य तळमळ उदकावीण । तैसा शिवाजी ।

स्वातंत्र्यास्तव रात्रंदीन तळमळ ॥

यवनांचा हा जुलूम पाहून शिवराय करि गर्जना ।

मर्द मराठयांना म्हणे बंधुनो कसा साहिता धिंगाना ।

आया बहिणींची अब्रू घेती लाज कशी रे धराना ।

बोडून मिशा भरुन बांगडया लुगडी कारे नेसाना ।

हिन्दुभूमीचे लेक म्हणविता कुठे गेला तुमचा बाणा ।

मायभूमी रसातळाला चालली नेत्र कारे उघडना ।

ढाल तलवार घेऊन भाला हरहर महादेव बोला ।

शत्रुवरी करुन हल्ला देश आपुला जिंकु चला ।

शिवबाची ऐकुन ही गर्जना मावळा उतरला समररंगणा ।

शिवबाला म्हणती सारे धर्मासाठी अर्पू प्राणा ।

मायभवानी सदा यशदानी तलवार देई शिवबाला ॥

शिवरायाला कदा न विसरे सदा लटकली कमरेला ।

स्वातंत्र्यासाठीं सारा मावळा लढे संगरी जोमात ।

जिकडे तिकडे मग भगवा झेंडा फडकू लागला किल्ल्यात ।

सारा मावळा एकवट आला । लढू लागला रणांगणाला ।

धर्माचे रक्षण करण्याला देशासाठी अर्पिती प्राणाला ।

जर्जर करिती आपुल्या शत्रुला । किती तरी मग देश जिंकला ।

शिवाजीला राजा केला । सदा वंदिती जीजामातेला ।

अंबाभवानी कुल देवतेला । सुखी केलं आपल्या लोकाला ।

दिसती आनंदात मावळे मग दिसती आनंदात ।

मराठयांच भगव निशाण फडकु लागलं देशांत ॥

देशासाठी किती वीरांनी रक्त सांडूनी भूमीला ।

पारतंत्र्याची तोडूनी बेडी स्वराज्य केलं देशाला ।

शूरवीर नेताजी पालकर, उजवा हात तो शिवाजीचा ।

हिरोजी, बहिर्जी आणि सूर्याजी इंगा जिरवी शत्रूचा ।

मर्द मावळा शूर तानाजी सोडून पुत्राच्या लग्ना ।

स्वराज्यासाठी अर्पूनी प्राणा, घेतला कोंडाणा ।

मुरारबाजी मराठा पडला गड पुरंदरी लढतांना ।

शीर तुटलं पर धडानं कापलं त्यान तीनशे हो लोकांना ।

पावन खिंडीमध्यें शिकस्त केली सुखी पोहचण्या शिवराणा ।

पांच तोफांचे आवाज होता । मग बाजी प्रभु सांडी प्राणा ।

हंबीरराव मोहीते मराठा मर्द गडी तो खंबीर ।

शिव कार्याला सदा तय्यार असे त्याची हो तलवार ।

असा किती वीर कामी आला । देश आपला जिंकण्याला ।

शिवाजी सारखा पुढारी मिळाला । म्हणून देश स्वतंत्र झाला ।

सुखी केला आपुल्या लोकाला । धन्यवाद देती शिवबाला ।

सारे नमिती भगव्या झेंडयाला । सदा तय्यार शिवकार्याला ।

मराठे सारे ते हो वीर । शिवरायाचा वाढु लागला विस्तार ॥ध्रु०॥

स्वराज्य स्थापूनी शिवरायाने सारा मावळा एक केला ।

जो जो आडवा झाला त्याला उभा धरुनी चिरीयेला ।

कितीक तरी थोर थोर मराठे स्वराज्यात करिती फाटाफुट ।

परि शिवराय स्वातंत्र्याची करी हो एकजुट ।

बहु प्रयत्‍ने शिवरायाने देश आपुला जिंकिला ।

स्वातंत्र्याची मेढ रोवूनी धर्म आपुला रक्षियला ।

असा मोहरा महाराष्ट्राचा अभिमानी जो धर्माचा ।

दैव तयाला आड आले रोग झाला हो गुडघीचा ।

महाराष्ट्राचा हिरा हरपला तारा एकाएकी तुटला ।

मावळ देशाचा दिनमणी अंधार गडद पडला ।

धन्य शिवाजी धन्यच झाला । स्वराज्य स्थापिला ।

आपल्या देशाला पारतंत्र्याची तोडून शृंखला ।

देश धर्म आपुला रक्षिला । नाव अजरामर करुन भूमिला ।

शिवराय ते गेले स्वर्गाला । दुःखित केलं आपल्या जनतेला ।

किती वर्णु मी त्यांच्या गुणाला ?

शिवरायानं जन्म घेतला । म्हणूनच हिंदु धर्म राहिला ।

त्यांना रामदास गुरु मिळाला । तुकारामानं उपदेश केला ।

अशा संतांचा लाभ झाला । मराठे तय्यार वेळेला ।

मातोश्रीची मात सारी ही, मातोश्रीची मात ।

शाहीर विष्णुपंत कर्डक गातो कवनात ॥ध्रु०॥

N/A

References :

शाहीर : विष्णूपंत कर्डक

Last Updated : April 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP