मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|शिवाजी महाराज|
शाहिस्तेखानाचा पराभव

शिवाजी महाराज पोवाडा - शाहिस्तेखानाचा पराभव

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.

चाल १

धन्य धन्य शिवाजी छत्रपती, दिगंती कीर्ती,

सुजन वर्णिती, कराया दुष्टांचा संहार,

धरियली हातीं भवानी तलवार, कांपती यवन वीर सरदार ॥ध्रु०॥

विजापुरच्या अफझुलखानाला, ठार बघा केला,

दिल्लीपती भ्याला, म्हणे कोण जाईल शिवाजी वरतं,

करील कोण त्याचा बंदोबस्त, चिंतेनं ग्रासलं त्याला पुरतं ॥

औरंग्याचा मामा शास्ताखान, बोलला गर्वानं, क्षणांत लोळवीन,

शिवाजी, शिवाजी क्या है बडी बात,

रणीं मी करीन त्याच्यावर मात, विडा पैजेचा घेतला हातात ॥

चाल कटाव

एक लाख सैन्य संग घेऊन शास्ताखान, हत्ती, उट,

घोडेजाण, तोफखाना बलवान, खजिन्याला नव्हती वाण,

झाली प्रजा हैराण, लुटालूट करीत खान आला ।

सारा मुलुख बेचिराख केला, पुण्याजवळ तळ ठोकला ॥

चाल २

सर करित प्रांत तो सगळा । शास्ताखान पुण्यामधीं आला ॥

लाला महाली मुक्काम ठेविला । कडेकोट बंदोबस्त केला ॥

इतक्यात दिल्लीहून आला । जसवंत सिंग मदतीला ॥

चाल ३

शिवबाला सिंहगडी कळतां सर्व प्रकार ।

जमविले सर्व संवगडी वीर सरदार ।

शिवराय सांगे सर्वांना सारा समाचार ।

यांतून भवानी माय आम्हां तारणार ।

देवीनं दिला दृष्टांत ऐका साधार ॥

चाल लगट

नको भिऊं शिवबा खानाला, मी आहे तुझ्या पाठीला,

ऐकून अशा शब्दाला आनंद झाला शिवबाला,

त्यानं विचार मनाशी केला, शक्तीपेक्षा युक्तीन काढूं कांटा या वेळां ॥

असा बेत शिवाचा झाला, संभाजी कावजीच्या एका नातेवाईकाला ॥

वश करुन घेतला त्यावेळां, अन् लग्नाचा सोहाळा मांडला,

वरातीचा परवाना खानाकडनं मिळविला ॥

पंधराशें मावळा घेऊन कात्रज घाटात आला ॥

मग बोलला आपल्या लोकांला । मी जातो लाल महालाला,

तुम्ही इकडं बांधावे पोत झाडाझुडपाला ॥

तसेच बैलांच्याही शिंगाला । शिंगे, करणे असुंद्यात संगतीला,

यापरी सावध रहाण्याचा इषारा दिला ॥

चाल १

वरातीच्या हो निमित्तानं, पंचवीस जण,

मावळे घेऊन, कंक येसाजी तानाजी स्वार,

जिवाचे जिवलग जोडीदार, ज्यांनी दिलं प्रेम शिवास अपार ॥

चाल १

शिरस्त्राण घालून डोईवरी, मंदील भर्जरी,

चिलखत छातीवरी, झगा त्यावरी चढविला खास,

वाघनखं ठेवली एका हातास, भवानी समशेर दुसर्‍या हातास ॥

अंधारी रात्र घनदाट, काळोख किट्ट, शिवा परि धीट,

सर्जा मराठयांचा डेर्‍यांत घुसला, मध्यरात्रीच्या सुमाराला,

चाहुल पर लागली नाही कुणाला ॥

चाल २

शाहीस्ते खानाची स्वारी । झोपली होती पलंगावरी ॥

खानाची पत्‍नी शेजारी । निद्रिस्त होती खरोखरी ॥

शिवबाची लागता चाहूल । बैसली उठून झडकरी ॥

चाल ३

शिवाजीनं खानाला धरुन खाली ओढला ॥

घाबरला खान दगा दगा ओरडू लागला ॥

खानाची पत्‍नी धावून आली त्या वेळा ॥

चटकन शिवाजीच्या घट्ट धरलं पायाला ॥

काकुळती येऊन बोलली काय शिवबाला ॥

चाल पाळणा

शिव तूंच खरा पैगंबर वा अल्ला, दे प्राणदान मम पतीला ॥

या जगीं नसे तोड तुझ्या कीर्तीला, दे जीवदान मम पतीला ॥

सांगेन तुझे ब्रीद सर्व जगताला । दे चुडेदान--भगिनीला ॥

चाल

समजून भगिनी धर्माची, दे भिक्षा मज प्रिय पतीची ।

करी मान्य विनंती साची । ऐकून तिच्या गहिंवरलेल्या बोला ।

दिले जीवदान खानाला ॥

मोहिम ३ : चाल १

शिवराय बोलला खानाला, नीती धर्माला, जाणुनी तुला,

दिले मी आज पहा जीवदान, नाहीं तर तुझा घ्यावया प्राण,

उशीर काय खाना, ऐक दे ध्यान ॥

चाल लगट

गर्जून म्हणे खानाला, करुं नको अगदी गलबला,

जरा ऐक माझ्या बोलाला, ज्याला पकडायाला तूं आला,

तोच हाय मी शिवाजी भोसला, ऐकून खान थरथरा कापू लागला ॥

शिवाजीनं पहा त्या वेळां, खानाच्या धरुन हाताला,

तलवारीनं छाटली चार बोटं आहे दाखला ॥

पुन्हा बोलला शिवबा खानाला, जर कां गडबड केलीस ।

तर ठार करीन बघ तुला, असं बोलून झटकन वाडयाबाहेर आला ॥

चाल ३

निसटुनी आपल्या सैन्यांत येऊन मिसळला ।

शिंगे, कर्णे वाजवून सैन्यास इशारा दिला ॥

चाल लगट

बैलांच्या शिंगांचे पोत, त्यापरीच झाडाझुडुपांत,

पेटवून पळविले बैल रानोमाळांत ॥

आणि आपण सैन्यासह गेला कोंडाण्यावरतं ॥

चाल भेदीक

लाला महालांतील गडबड ऐकून भयभीत झाला यवन खरा ।

शस्त्र सज्ज होऊन निघाला म्हणती शिवबाला धरा धरा ॥

दिवटया लावून पहा चालला शिवा भोसला झरझरा ।

दौड मारुनी त्यास गाठूंया चला गडयांनो करा त्वरा ॥

चाल ३

पहांटेच्या समयीं आला खान कात्रज घाटांत ।

पेटलेले पोत झाडा झुडुपांच्या बेटांत ।

पाहून खानानं बोट घातलं तोंडांत ।

खानानं बेत बदलला, सिंहगडी मोर्चा वळविला,

घातला वेढा किल्ल्याला, खान किल्ल्याजवळ वर आला,

शिवाजीनं तोफांचा मारा वरनं सुरु केला ॥

शाहिस्तेखानाचं सैन्य, मार्‍यानं झालं हैराण,

पळूं लागलं सारं वैराण, खानाची उडाली दैना झाली दाणादाण ॥

चाल ३

जिवावरचं बोटावर गेलं न्, वांचला प्राण ।

उठवून वेढा खानानं केलं प्रयाण ।

चाल १

शक्तीला युक्तीची जोड, लावून बिनतोड, टरला अजोड,

छत्रपती शिवाजी शिव अवतार, हिंदू धर्माला झाला आधार,

तयाला प्रणाम वारंवार ॥

जिला पाहून अक्कल गुंगली, वस्ती चांगली,

शहर सांगली, वाहते जिथे कृष्णामाई, शाहीर दीक्षित तिथें राही,

राष्ट्रसेवेंत धन्य होई ॥

N/A

References :

क्रांतिशाहीर : र.द.दीक्षित, चिंचणीकर

Last Updated : April 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP