चाल १
वंदून जिजाईच्या सुता । गातो शिवगाथा ।
ऐकावी कथा । ठेवा शांतता सभा स्थानास ।
कुजबूजू नका लागू कानास । विभूते शाहीर गातो कवनास ॥ध्रु०॥
एके दिवशी जिजाई महालात । उभी वाडयात । चोहीकडे पहात ।
तोच काय तिला प्रकार दिसला । कवळया हृदयात धक्का बसला ।
कोणता होता प्रकार असला ॥१॥
निजामाच्या दरबारातून । लोक सारे जण ।
जाती परतून । तोच किंचाळ्या आल्या कानास ।
पिसाळला हत्ती जुमानी कोणास ? सापडेल त्याच्या घेई प्राणास ॥२॥
चाल
जाधवाच्या दत्ताजी राव । सैनिकाला म्हणे पुढ याव ।
हत्तीन घेतली पर धाव । सोंडेन कैका फाडाव ।
पायाखाली कितिक चिरडाव । सैन्यान काढला पळ सांभाळून जिव ॥३॥
जाधवाचा झाला अपमान । दत्ताजी झाला बेभान ।
हत्तीवर धाव घालून----काढली सोंड कापून ।
पिसाळला हत्ती कोसळला सोडला प्राण ॥४॥
दांगटी
हत्तीची सरता कामगीरी । फिरला माघारी ।
भोसल्यावरी । उगारली जाधवाने तलवार ।
संभाजीराव झाले तय्यार । दोघांचे चालले वारावर वार ।
यात कुणी घेतली नाही माघार । दत्ताजीला बसला वर्मी एक वार ।
फटकार्या सरशी जाहला ठार । लखूजिला कळला घडला प्रकार ।
सरसावून फिरवू लागला तलवार । समोर जावाई शहाजी प्यार ।
नाही वा त्याचा त्याला दरकार । संभाजीला केल जाधवान ठार ।
निजामान पाहून सारा प्रकार । केला मग उपदेशाचा भडिमार ।
जाधव भोसल्याचं नात हे पार ---तुटल गा दादा ॥५॥
चाल ३
सासरची तशी माहेरची पाहूनी दैना ॥६॥
महालात जिजाईला दुःख आवरेना ॥७॥
भावासाठी रडाव कां दिरासाठी समजेना ॥८॥
निजामाचा खरा हा डाव कुणा समजेना ॥९॥
चाल : मिळवणी
देव घरात धावली जिजाबाई । रडे धाई धाई ।
आई अंबाबाई । कधी हे जुलूमी दिवस सरणार ।
मराठी राज्य कधी ठरणार । सांग तू कधी शस्त्र धरणार ॥१०॥
चाल १
जिजाऊला माहेर तुटले । दुःख दाटले ।
हृदय पेटले । परि करुनिया पूर्ण विचार ।
सोडला नाही तिनं आचार । सुरवात करती आप्ला विचार ॥१॥
चाल २
नांदती जिजाऊ घरात । वाढतो गर्भ उदरात ॥२॥
जिजाई झाली प्रसूत । जन्माला संभाजी सूत ॥३॥
पुन्हा चार पुत्र पदरात । काळान केला पर घात ॥४॥
चारी पुत्र नेले स्वर्गात । संभाजी बाळ वाढत ॥५॥
चाल ३
तोच निरोप निजामशाहीचा शहाजी राजाला ॥६॥
आंबर मलिकने हुकूम केला शहाजीला ॥७॥
तय्यार व्हावे शत्रूशी सामना देण्याला ॥८॥
शाहाजी बरोबर शरिफ भाऊ संगतीला ॥९॥
सारे चुलत बंधू धावले त्याचे सहाय्याला ॥१०॥
चाल ४
१६२४ सालाला । अहमदनगर भागाला ।
लागले तोंड युद्धाला । घनघोर संग्राम झाला ।
शहाजीन पराक्रम केला । दिले यश वजिर-निजामला ।
असा पराक्रम करुनिया राजा परतला ॥११॥
लढाईला रंग चढलेला । लढाईत शरिफ हरपला ।
लढाईत विजय शहाजीला । असा पराक्रम करुनिया शहाजी परतला ॥१२॥
लढाईत दीर गेल्याचं दुःख जिजाईला ॥१३॥
मिळवणी
म्हणे माझी सख्खी जाऊबाई । रडे धायी धायी ।
ती दुगाबाई । शहासाठी तिचा प्राण लढला ।
सौभाग्य मणी गळून पडला । तिचा संसारी वेल खुडला ॥१४॥
चाल ४
घरधनी असता विचारात । येवून लाडात ।
जिजाबाई बोलत । शहाजी राजाला ।
म्हणे नाथ द्यावं उत्तर माझ्या प्रश्नाला ॥१५॥
सुलतानाच मोंगलाच वैर । त्याचे सरदार ।
मराठे शूर । येती लढण्याला ।
स्वतः मरुन विजयाचा वाटा देती शहाला ॥१६॥
तुम्ही ऐका विचार हे माझे । फेका शाही ओझे ।
व्हा स्वतः राजे । लागा कार्याला ।
या साठी सार्या मराठयांच्या करा एकिला ॥१७॥
चाल ४
जाणून भविष्य चांगल । शहाजीच मन रंगल ।
पर धूंद होऊन मोंगल । चहूकड करती दंगल ।
म्हणे इथून पाहिजे पांगल । पाठीवर बिर्हाड टांगल ।
निराशेन मन खंगल । आशेन तुडवी जंगल ।
गाठला किल्ला शिवनेरी होईल मंगल ॥१८॥
मिळवणी
शिवनेरी किल्ला कडेकोट । होता बळकट ।
मजबूत तट । विश्वासराव किल्लया वरती ।
जिजाउला त्याचे स्वाधीन करिती ।
ठेविली जड जोखिम पुरती ॥१९॥
चाल २
लागला गर्भ वाढिला । डोहाळे जिजाबाईला ॥१॥
मैत्रिणी पुसती राणीला । डोहाळे सांगा आम्हाला ॥२॥
जिजाबाई बोले सर्वाला । डोहाळे सांगते आपणाला ॥३॥
पद
या देशाचे मालक आम्ही आमचे आम्ही काही करु ।
नको गुलामगिरी ही माथेफिरु ॥ध्रु०॥
मला नको मिठाई मेवा । नको गुलाब पाणी शिडकावा ।
सरबताचा पेला दूर ठेवा । अत्तराचा वास नच दावा ।
विहार कसला मला न आवडे चक्र सारखे आहे सुरु ॥४॥
मला वाटे किल्ल्यावर जावे । ध्वज उंच उंच फडकावे ।
सोन्याच्या तक्ती बैसावे । मस्तकी छत्र ते रहावे ।
दानधर्म तो खूप करावा । प्रसन्न होतिल यात्रेकरु ॥५॥
हा मेणा बाजूला काढा । ठाण्यावरुन हत्तीला सोडा ।
अंबारीला झालरी जोडा । मी बसता झडू दे चौघडा ।
डुलत जाईन मुजरे घेत मी निवडीन सच्चा, पोटभरु ॥६॥
लगट
दिवसा मागून दिवस उलटले । नऊ मास नऊ दिवस संपले ।
टाकि जिजाई मंद पाऊले । जिजाबाईला अलगत नेले ।
खास दरवाजे बंद जाहले । दारावरती पडदे लोंबले ।
वैद्य मुरब्बी गोळा झाले । पंचागासह जोतीषी आले ।
विश्वास रावांचे लक्ष वेधले । तोच खाडकन दार उघडले ।
काय हो सांगा । म्हणे मुलगा जाहला मुलगा ॥७॥
चाल १
बाळाची जन्म कुंडली । पुढ मांडली । फुलं सांडली ।
ज्योतिषी म्हणे धन्य सुकुमार । जणू आहे दैवी अवतार ।
पुढे हा शककर्ता होणार ॥८॥
चाल २
हा बाळ जिजाबाईचा । सोनुला हा सह्याद्रीचा ॥९॥
हा पुत्र शहाजी राजाचा । हा तान्हा महाराष्ट्राचा ॥१०॥
किल्ल्यावर थाट बारशाचा । पाळणा भारत वर्षाचा ॥११॥
पाळणा
शिवनेरीवर सर्व सोहळा सुवासिनी सार्या जाहल्या गोळा
जिजामाउलीच्या घेऊन बाळा । घ्याग गोविंद घ्याग गोपाळा ॥१२॥
पहिल्या दिवशी नदर भेटी । मुख पाहून शर्करा वाटी ।
न्हाऊ घालूनिया धरिले पोटी । टाहो फोडीतो आवळून मुठी ॥१३॥
दुसर्या दिवशी दुसरा प्रकार । गुढया तोरणे शिवनेरीवर ।
दान धर्म तो केला अपार । कृपा दृष्टी असो बालकावर ॥१४॥
तिसर्या दिवशी दत्ताची छाया । चौथ्या दिवशी गणेश माया ।
सार्या दैवतानो यावे सहाय्या । चंद्र सूर्याला आता पुजूया ॥१५॥
पांचव्या दिवशी सटविचा मान । लपत छपत आली चोरुन ।
भाळि लिहिल भविष्य तीन । पुजिल्या कुवारणी झाला सन्मान ॥१६॥
सहाव्या दिवशी स्वच्छता करा । सातव्या दिवशी साती अप्सरा ।
गुप्तपणे तिचा येईल फेरा । लिंबू नारळ टाका उतारा ॥१७॥
आठवा आनंद आता आवरु । नवव्या दिवशी नवस करु ।
भवानी आईची ओटी ती भरु । सांभाळ आई तुझ लेकरु ॥१८॥
दहाव्या दिवशी मोठा उल्लास । सुगंधी अत्तर येई सुवास ।
उगवला अकरावा हा दिवस । पुजून वंदिले त्या मारुतीस ॥१९॥
बाराव्या दिवशी मोठी आरास । इष्ट मैत्रिणी आल्या सर्रास ।
आंगडे टोपडे घाली बाळास । नाव कळू द्या आता सर्वास ॥२०॥
पाळण्याचा हाती धरुन दोर । माय बोलली तीन अक्षर ।
नाव शिवाजी झाले जाहिर । झाला वाद्यांचा एक नजर ॥२१॥
चाल ३
संपला पाळणा मग बसली पंगत ॥२२॥
रंगला पोवाडा शाहीर आला रंगात ॥२३॥
मिळवणी
शब्दाला शब्द सांधून । कवन बांधून ।
गातो वंदून । विभूते शाहीर कवि सम्राट ।
दीक्षित गुरुकृपा ही दाट । म्हणून कळसाला बांधली घाट ॥२४॥