चाल १
घडवीला ज्याने इतिहास । दक्षिण देशास ।
महाराष्ट्रास । धन्य शिव छत्रपती अवतार ।
जिजाऊ माता धन्य होणार । धन्य शिव शाहिर कीर्ति गाणार ॥ध्रु०॥
ते मर्द मावळे सच्चे । शिवबाचे बच्चे ।
नव्हते कुणी कच्चे । शिवबाचा शब्द जीव कीं प्राण ।
स्वधर्मासाठी अर्पिती प्राण । राखला भगव्या झेंडयाचा मान ॥१॥
दांगटी
दाऊनी आपुले तेज । स्थापूनी राज्य ।
करि कामकाज । स्थापी हिंदवी स्वराज्याला ।
सुखवीले हिंदू समाजाला । संरक्षण संतसज्जनाला ।
राखी बायकांच्या इज्जतीला । भेटवी गाय वासराला ।
सारे जण करती वर्णनाला । मानिती देव शिवाजीला ।
परंतु काही मराठयाला । म्हणवेना राजा शिवाजीला ।
म्हणे जरी शिवबा राजा झाला । नाही पर राज्यछत्र त्याला ।
शिक्का मोर्तब नाही राजा । शिवाजीला दादा ॥२॥
चाल १
बोलते सारे शेतकरी । सारे कामकरी ।
सारे मानकरी । विषय हा सर्वांना पटणार ।
परि बोलाया कोण उठणार । पुढिल चौकात प्रश्न सुटणार ॥३॥
चाल २
गागाभट्टाचार्य पंडित काशी क्षेत्रात ।
या शास्त्रींचे लक्ष वेधले दक्षिण देशात ॥४॥
शत्रू सैन्याला धक्का देणारा मर्द मराठयात ।
शिव शौर्याने नांव दुमदुमे सार्या मुलुखात ॥५॥
असा हा बडा राजा शिवाजी राजा हा फक्त ।
परि राजाला छत्रच नाही बसावया तक्त ॥६॥
चाल १
म्हणे आपण स्वतः जाऊन । ते करु तक्त स्थापन ॥७॥
निश्चय मनी ठरवून । काशीहून निघाला विद्वान ॥८॥
शिवाजीचे घेऊन दर्शन । छत्र धरु सांबावर जाण ॥९॥
चाल ४
काशीचा महा पंडित । पोहोंचला नाशीक शहरात ।
शिवाला कळता वृत्तांत । मावेना हर्ष गगनात ।
आणावया त्याना किल्ल्यांत । लवाजमा पाठवले दूत ।
रायगडावरुन आले शिवबा कराया स्वागत ॥१०॥
दोघाची भेट जाहली । हर्षाने मने बहरली ।
दर्शना संधी लाभली । शुभ इच्छा तृप्त जाहली ।
मंडळी गडावर आली । रणवाद्ये वाजू लागली ।
षोडशोपचारें शिवबाने पुजा ती केली ॥१॥
दांगटी
मग बोले गागा पंडित । झाले मन तृप्त ।
परंतू त्यात । आहे म्हणा आशा एक मजला ।
गेल्या अशा अनेक शतकाला । असा नाही वीर पुरुष झाला ।
शून्यातून राज्य निर्मायाला । स्वराज्य धर्म राखण्याला ।
रामराज्य शिवराज्य आजला । अशा महा युगपुरुषाला ।
छत्रसिंहासनावीण आजला । पूर्णत्व नाही शिवाजीला ।
करुनिया आलो विचाराला । करावे राज्यभिषेकाला ।
महत्त्व पटेल उभ्या दुनियेला । शिवाजीचे दादा ॥२॥
चाल ६
शके पंधराशे शहाण्णव साली मुहूर्त मुक्रार । आनंदनामे संवत्सर ॥३॥
ज्येष्ठ मासी शुद्ध त्रयोदशी पाहून शनिवार । साधला मुहूर्त सुंदर ॥४॥
तीन घटका पहाटे सूर्योदया अगोदर । जाहला मुहूर्त जाहीर ॥५॥
लगट
चाले तय्यारी रायगडास । आणवून उत्तम कारागिरास ।
इमारतीच्या बांधकामास । दगडावरी कोरुन मुर्तीस ।
शिसम् लाकूड मजबूतीस । नकशी कोरली त्यावर खास ।
शोभा आणवली त्या वाडयास । सभा मंडपाची झाली तय्यारी ।
मढवू लागले छान आंबारी । दिखाऊ दिसती आब्दागिरी ।
पालखी भोवती गोंडे भारी । मेणा शोभतो रंग अंजेरी ।
कलशा आणि छत्र सोनेरी ॥ कलशा दुसरा तो चांदीचा ।
चौरंग होता चांदी सोन्याचा । सुवर्ण दंड चोपदाराचा ।
अंथरला गालिचा जरिचा ॥ शुभ लक्षणी घोडे आणती ।
शुभ लक्षणी हत्तीवरती । अलंकार बहु त्यास घालीती ।
कलाकाराला नाही गणती । वाद्यांचे लई ताफे येती ॥
असे प्रकार । वर्णन करु कुठवर ॥६॥
चाल ३
सिंहासनासाठी ते सोने बत्तिस मण ॥७॥
मौल्यवान अमोलिक रत्ने वरती जडवून ॥८॥
सिंहाचे काढिले चित्र दोन्ही कडे छान ॥९॥
चौथर्यावर चौथरे बांधिले दोन ॥१०॥
हे सिंहासन त्यावरी ठेवले नेऊन ॥११॥
त्यावरच्या मंडपी मुळे दिसे शोभून ॥१२॥
सिंहासनी बैसूनी होते सूर्य दर्शन ॥१३॥
चाल ४
वयोवृद्ध अशा माऊलीला । होती इच्छा जिजाबाईला ।
राज्यछत्राखाली शिवबाला । सिंहासनावरी बसलेला ।
अभिषेक पहावा झालेला । ऐकावे मंत्र घोषाला ।
मंगलवाद्य ऐकून मिटावं डोळ्याला ॥१४॥
चाल १
तो दिवस महाराष्ट्राचा । खरा भाग्याचा ।
क्षण मोलाचा । कुमारी भू देवी घाली अलंकार ।
तिची आज इच्छा पूर्ण होणार । निवडला तोच पति मिळणार ॥१॥
रायगडावरी बहु लोक । पहाया कौतुक ।
राज्याभिषेक । धाडीले लोक चारी मुलुखास ।
आमंत्रण सार्या देव देवतास । यावं शुभ आशिर्वाद देण्यास ॥२॥
गोंधळी
गजाजना मुषकावर बसून या ।
राज्याभिषेक रायगडावर या ॥३॥
तुळजापूर सोडून भवानी आइ या ॥४॥
दत्तराज गाणगापूर सोडून या ॥५॥
पंढरीच्या पांडुरंगा जोडप्यानं या ॥६॥
करवीर सोडून अंबाबाई या ॥७॥
सार्या जल देवतानो लगबग या ॥८॥
हिमालय सह्याद्री पर्वतानो या ॥९॥
चाल २
प्रतापगडावरी शिव गेले । भवानीला हो वंदन केले ॥१०॥
सव्वामण सोने खर्चिले । रत्नजडित छत्र बनवीले ॥११॥
देविच्या मस्तकी धरिले । मग रायगडी परतले ॥१२॥
चाल १
दुसरे दिवशी मोठी गडबड । सजविला गड ।
प्रकाश चहुकड । रायगड किल्ला दिपून गेला ।
नक्षीदार होत्या दीपमाला । युगामधे थाटमाट पहिला ॥१३॥
चाल २
निवडक मंडळी त्यात । गडावर होती आनंदात ॥१४॥
रामचंद्र पिंगळे मोरोपंत । सेनापती अन् दत्ताजी पंत ॥१५॥
जेथे चिटणीस निराजीपंत । देशमुख त्रिंबक पंत ॥१६॥
चाल ३
शिवराय पहाता गडावर झाली आठवण ॥१७॥
तानाही, सूर्याजी, बाजी, दिसेना कोण ॥१८॥
बाजी पासलकर, बाजी मुरार, गेले निघून ॥१९॥
प्रतापराव गुजर, असे महायोद्धे बलवान ॥२०॥
असे हिरे हरपले म्हणून उगवला दिन ॥२१॥
सर्वाना आठवूनी डोळे भरले पाण्यानं ॥२२॥
चाल ४
तोवरी आल बोलावण । राणीसह चलाव आपण ।
घातले पंचामृत स्नान । पुन्हा घातले शुद्धोदक स्नान ।
त्यावरी समुद्र स्नान । मग घातले उष्णोदक स्नान ।
चढविला वस्त्रालंकार शिवाजी राजानं ॥२३॥
चाल : दांगटी
घालून वस्त्रालंकार । झाले तय्यार ।
पुजिले ढालतलवारीला । पुजिले धनुष्य बाणाला ।
नमस्कार केला भवानीला । केले वंदन जिजाऊला ।
नमस्कार गागा पंडिताना । बाळंभट्ट राजोपाध्ये याना ।
नमस्कार संत सज्जनाला । नमस्कार केला मंडळीला गा ।
सर्वांला दादा ॥२४॥
चाल ४
गागापंडिताच्या आज्ञेनं । राजाराणी चालले जोडीनं ।
शंभूराजे पाठिमागून । चौरंगानजिक येऊन ।
महाराज बसले जाऊन । भोवती अष्ट प्रधान ।
चालला मंत्राचा घोष मोठमोठयानं ॥१॥
चाल १
मंगल वाद्य वाजू लागे सनई सुरात । ताशा तडतडे जोरात ।
त्याला ढोलाची हो साथ । वाजू लागले तुतारी चौघडा ।
मुहूर्ताला वेळ आता थोडा ॥२॥
रणवाद्य वाजतसे नगारा खुलून । झडती नौबत मागून ।
गेले वाजंत्री गुंगून । खरा रंग आला वाद्याला ।
जागविले सार्या राष्ट्राला ॥३॥
चाल ३
पंडित म्हणे महाराज चढावे वर ॥४॥
शिवराय जाऊनी बसले सिंहासनावर ॥५॥
गागापंडिताने स्वतः धरले छत्र त्यावर ॥६॥
मग बोले आज शिव झाले छत्रपति वीर ॥७॥
बोला छत्रपतीकी जय घुमली ललकार ॥८॥
वाजले शिंग वाद्यांचा एक गजर ॥९॥
चाल ४
सोळा सुवासिनीनी जाण । सोळा कुमारीका येऊन ।
कुंकूम तिलक लावून । ओवाळीले राजाला जाण ।
हत्ती वरुन निघाले (राजे) घ्याया देव दर्शन ॥१०॥
मिळवणी
एक लक्ष रुपये दक्षिणा । गागा पंडिताना ।
पाठवले त्याना । धन्य ते छत्रपती शिवराय ।
धन्य ती धन्य जिजाऊ माय । विभूते शाहिर कवि गुण गाय ॥११॥